नरेंद्र मोदी- गुजरातच्या विजयाचे शिल्पकार
लोकप्रियता, मानसन्मान मिळवणं हि फार कठीण गोष्ट आहे. आयुष्यभरचे कष्ट, जिद्द यांच्या जोरावरच उत्तरायुष्यात लोकप्रियता लाभते. शून्यातून पुढे येउन राजकारणातलं, प्रशासनातलं उच्च पद मिळवणं यासाठी बेसुमार कष्टांची, ध्येयाच्या मागे हात धुवून लागण्याची आवश्यकता असते. Excellence, Brilliance, Honesty, Ethics या चार गोष्टींच्या मागे धावणाऱ्या माणसाच्या मागे लोकप्रियता धावत असते. याचंच एक उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे मोदी पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार मानले जातात. गुजरात राज्याला प्रादेशिक अस्मितेची आणि सर्वांगीण विकासाची हाक देअन्रे आणि ती बर्यापैकी पूर्ण करणारे मोदी आज सलग तिसर्यांदा गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकले.
सुमारे वर्षभरापासून आरोप-प्रत्यारोप आणि प्रचाराच्या धूमधडाक्यामुळे चुरशीची बनलेली हि निवडणूक अखेर सलग ११ वर्षापासून सत्तेत असणार्या भाजपनेच जिंकली. वास्तविक भाजपने म्हणण्यापेक्षा मोदिनीच जिंकली असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण प्रचारादरम्यान भाजप च्या इतर राष्ट्रीय नेत्यांचा सहभाग अत्यंत म्हणजे या ठिकाणी पक्षीय नाही तर व्यक्तिकेंद्रित लोकप्रियता विजयी झाली. आणि का न व्हावी?? १०% विकासदर असणारं, उत्तमोत्तम पायाभूत सुविधा, उत्तम-पारदर्शक प्रशासन देणारा नेता गुजरातच्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून निवडून द्यावा हे साहजिकच म्हणावे लागेल. ११ वर्ष सत्ता असताना राज्याचा झालेला विकास वाखाणण्यासारखा आहे. रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजांच्या जोडीला शिक्षण, रोजगार, उद्योगांसाठी पोषक वातावरण, पर्यटन, शेती, आरोग्य सुविधा, व्यापार वृद्धिसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदरांचा विकास, म्हणजे एकंदर सर्वच बाबतीत विकास साधला गेलेला आहे.
भाजप, स्वतःला सामुहिक नेतृत्व आणि लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष म्हणवून घेतो. कितीही नाही म्हटलं तरी हा पक्ष रास्व संघच्या रिमोट कंट्रोल वर चालतो. त्यामानाने गुजरातेत भाजपची हि प्रतिमा धुळीला मिळाल्यागत जमा आहे, कारण तिथे नरेंद्र मोडी नामक एककेंद्री नेतृत्व प्रस्थपित झाले आहे. हे भाजप च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वर्तुळात पचनी पडण्यासारखं नाही. म्हणजेच गुजरातेतील भाजप हे नरेंद्र मोडी यांचे स्वतंत्र संस्थान झालेले आहे. वेळीप्रसंगी मोडी राष्ट्रीय नेतृत्वाला गुंडाळण्यात मागेपुढे पाहत नाहीत, यामुळे संघही मोदींवर उखडलेला आहे.मध्यंतरी नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. त्यावेळी असाही लक्षात आलं होतं कि ह्या आरोपांची सुरवात, त्याचं मुल हे गुजरातेत आहे. वास्तविक मोदींचा विजय हि काळ्या दगडावरची रेघ होती. किती जागा कमावणार आणि किती जागा गमावणार हि फक्त पाहण्यासारखी बाब होती. बाकी काहीही असो यामुळे भाजप मधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत एवढ मात्र नक्की.
गुजरातच्या निवडणुकीतही राहुल गांधीनी मोदींविरोधात बर्यापैकी दंड थोपटले होते. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली होती. पण त्यांची डाळ काही शिजली नाही. वास्तविक बिहार, उत्तर प्रदेशचा ताजं उदाहरण असताना राहुल गांधींकडून फारश्या अपेक्षा नव्हत्या, पण किमान भाजपच्या काही जागा कमी होतील अशी अपेक्षा होती. नाराज केशुभाई पटेलांचा नवा पक्षदेखील फार काही दिवे लावू शकला नाही. ज्या पटेल समाजाच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी नवा पक्ष उभारला तो पटेल समाजच मोदींच्या बाजूने उभा राहिला. या सगळ्या धामधूमीनंतरही (म्हणजे आधीच ) राहुल गांधींकडे पुढील निवडणूकींची माळ सोपवणे हे कॉंग्रेसच्या लाचार परंपरेला अनुसरूनच झाले. त्याला कोण काय करणार? याच लाचार्पानामुळे कि काय कुठल्याच राज्यात कॉंग्रेसला स्थानिक प्रभावी नेतृत्व देत आलं नाही. गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे याचे ठळक उदाहरणं म्हणता येतील. आता परीस्थित बदलणं शक्य नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय दिवे लागतात हे पाहणं संयुक्तिक ठरेल.
मोदिनी साधलेला हा सलग तिसरा विजय म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची नांदी आहे अशी चर्चा सर्वत्र झडते आहे. मोदीच पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार आहेत, अशी चर्चा प्रसारमाध्यम रंगवू लागलेली आहेत. पण ह्या प्रश्नावर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी बाळगलेलं मौन बराच काही सांगून जातं. नरेंद्र मोडी हे एककल्ली आणि बर्याच प्रमाणात हुकुमशाहिप्रमाणे राज्य करतात असा प्रमुख आरोप त्यांच्यावर होतो. शिवाय याच कारणामुळे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संघ मोदींवर नाराज आहे. आता या ११ वर्षांच्या काळात गुजरात भाजप मध्ये झालेला आणखी एक लक्षणीय बदल म्हणजे नेतृत्वाची दुसरी फळीच नाहीशी झालेली आहे. वास्तविक राजकीय पक्सःत आणि त्यातही भाजप सारख्या लोकशाही पक्षाची हि अवस्था घातक आहे. नरेंद्र मोदींनी उद्या राष्ट्रीय राक्कारणात उडी घेतलीच तर त्यांची जागा घेणारा नेता गुजरातेत दुसरा नाही. हे अत्यंत घातक आहे. व्यवस्थापन शास्त्रात 'Succession Planning' हे प्राथमिक तत्वांपैकी १ आहे पण या ठिकाणी हेच धाब्यावर बसवलेले आहे. स्वतःला CEO म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींना हि साधी गोष्ट कळू नये हे दुर्दैवी म्हणायला हवे.
Comments
Post a Comment