Monday, 7 December 2015

इराण आणि भारत: इतिहास आणि वर्तमान..


                    इराण. जगातला क्रमांक चारचा तेल साठे असणारा आणि निर्यातदार देश. कायम धगधगता. तेल आणि त्याभोवतीच्या राजकारणातला महत्वाचा खेळाडू. कधी स्वतः खेळवला जाणारा आणि बर्याच वेळा इतरांना खेळवणारा. 

एक इराणच्या राजकारणातला खेळाडू. ज्याने ब्रिटीश कंपन्या ज्या इराणमधल्या तेलक्षेत्रावर प्रभुत्व मिळवून होत्या, ज्या एतद्देशीयांची पिळवणूक करत होत्या, त्याविरोधात पेटून उठून इराणी राष्ट्रवादाची पायाभरणी त्याने केली. जो नफेखोर, तेलपिपासू ब्रिटन, अमेरिकेच्या विरोधात पाय गाडून उभा राहिला. अमेरिकन, ब्रिटीश कंपन्यांनी त्याच्याविरोधात त्या त्या सरकारांकडे आगपाखड केली. 

अमेरिकेची CIA, ब्रिटनची MI 5 आणि इतर इराणच्या शहांसह त्याच्याविरुद्ध कारवाईसाठी तयार झाले. ज्याने इराणमधल्या ब्रिटीश कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केलं, इराणला श्रीमंतीच्या, संपन्नतेच्या आणि आधुनिकीकरणाच्या वाटेवर नेलं, पण हे करत असताना तेलकंपन्या आणि बड्या राष्ट्रांची नाराजी ओढवून घेतली. आणि इराणमध्ये त्याच्याविरोधात प्रचार सुरु झाला. त्याला Communist धार्जिणा, धर्मविरोधी असा ठरवणारा प्रचार सुरु झाला. ज्या इराणच्या जनातेच्या पाठींब्यावर तो अध्यक्षपदावर पोचला होता त्याच जनतेला त्याच्याविरोधात चिथवल गेलं. वातावरण टिपेला गेल्यावर, इराणच्या शहाला त्या अध्यक्षाला हटवण्यास भाग पाडण्यात आलं. स्वतःच्या राष्ट्रासाठी उभ्या ठाकलेल्या या खंबीर, राष्ट्रवादी नेत्याची राजवट उलथवून टाकण्यातआली. तो इराणचा नेता एका वर्षीचा TIME मासिकाचा 'Person of the Year' होता. 

आता काळ पुढे सरकला आहे. काळाच्या ओघात जगभरच्या विविध नद्यांवरील पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. आता काही संदर्भ आणि खेळाडू बदलले आहेत.
          
 १९४७ आणि १९९१. ही दोन वर्ष भारताच्या संदर्भात कायम संस्मरणीय असणार आहेत. त्यातही आता १९९१चं महत्व वाढलं आहे वाढणार आहे. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण स्वीकारून भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली आणि झपाट्याने वाढायला लागली. भारतीय अर्थव्यवस्थेने स्थिर आश्वासक अशी प्रतिमा निर्माण केली आहे. राष्ट्रीय ऐक्य आणि सार्वभौमत्व यासाठी आवश्यक असणाऱ्या परराष्ट्र धोरणातील आश्वासक बदल आणि त्यानंतरची वाटचाल ते  बरयाच अर्थानी बदल घडवणारं २०१४ हे वर्ष,बर्याच घटनांना चलन देणारं ठरणार आहे. 

२०१४, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले. बदल आणि आक्रमकता दिसून आली ती परराष्ट्र धोरणात. शपथविधी समारंभास SAARC देशांच्या प्रमुखांना आमंत्रण, भूतान आणि पाठोपाठचे शेजारी राष्ट्रांचे दौरे. द्विपक्षीय करार आणि त्या त्या देशात असणार्या अनिवासी भारतीयांबरोबर संवाद, SOFT POWER उभारणी, चीनच्या विरोधात ( अप्रत्यक्षपणे ) उघडलेली 'Anti Encirclement policy' किंवा 'String of Diamonds', विविध युद्धग्रस्त राष्ट्रांमधून केलेला बचावकार्य,  आपत्तीत केलेल मदतकार्य यामुळे भारताची प्रतिमा उंचावली आहे. आर्थिक आघाडीवर जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर ७.४% या गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बहुमतातल स्थिर सरकार.

गृह, अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षण या चार महत्वपूर्ण आघाड्यांवर सक्षम नेतृत्व आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या 'Ceasefire' उल्लंघनाविरुध्द सुरु असणारा सक्षम प्रतिकार जो पाकिस्तानचं कंबरड मोडत आहे. आणि सीमेवरील आगळीक बंद झाल्याशिवाय चर्चा होणार नाही असा भारताचा पवित्रा त्याचबरोबर पाकिस्तानची आर्थिक, राजकीय कोंडी करण्याचे आक्रमक पाउल. ह्या काही प्रातिनिधिक घडामोडी.शेती, उद्योग, उर्जा इत्यादी क्षेत्रात होत असलेले उल्लेखनीय काम या पार्श्वभूमीवर राष्ट्रांतर्गत घेण्यात आलेले 'काही लोकांची' कोंडी करणारे निर्णय देशात वातावरण ढवळण्यासाठी कारणीभूत ठरल्यासारखे झाले आहेत.




 २००२. गुजरात दंगल. ज्यामुळे मोदींना 'मौत के सौदागर' वगैरे विशेषणे मिळाली. सर्व आरोपातून मोदी बाहेर निघाले. त्या दंगलीत मुस्लिमांवर अन्याय झाला, त्यांच्या पुनर्वसनासाठी म्हणून परदेशातून प्रचंड पैसा गोळा करण्यात आला. जो पूर्णपणे बेकायदेशीर होता. ज्या कारणासाठी तो गोळा केलेला होता त्या कारणासाठी न वापरता 'इतर'अनेक कारणांसाठी वापरण्यात आला. त्याचे हिशेब देण्याचे आणि न दिल्यास कायदेशीर कारवाई संबंधित व्यक्ती पक्षी तिस्ता सेटलवाड यांच्यावर करण्याचे निर्णय झाले. सरकार 'असहिष्णू' होण्यास सुरुवात झाली.

उत्तर प्रदेश. एक छोटंसं गाव, दादरी. गोमांस घरात असल्याच्या संशयावरून मोह्हमद अखलाख या व्यक्तीची हत्या. वास्तविक प्रत्यक्ष घटना घडली उत्तर प्रदेशात. ती घडली त्यामागची प्रत्यक्ष कारणं बाहेर येऊ शकली नाही किंवा येऊ दिली नाहीत. प्रत्यक्ष घटनेसाठी, तपासासाठी स्थानिक राज्य सरकार आणि पोलिस खत जबाबदार आहे आणि असतं. ज्या व्यक्तीचा मुलगा भारतीय वायुसेनेत आहे, अशा व्यक्तीची हत्या नुसत्या संशयावरून होते आणि प्रत्यक्ष सत्य बाहेर येऊ दिल जात नाही हे संशयास्पद नाही काय? यासाठी भाजप आणि परिवार, असहिष्णुता वाढल्याचा साक्षात्कार कित्येकांना होतो आणि 'पुरस्कार वापसी' हे नाटक सुरु होतं. 

'पुरस्कार वापसी' मधील आर्थिक गणित लक्षात घेतलं तर बरयाच  विचित्र आणि संशाय्स्पद हालचाली सापडतात. बहुतेक लेखक, कलाकार कोणत्या न कोणत्या NGO किंवा इतर संस्था ज्या परदेशी पैशावर चालतात. बहुतेक पैसा अमेरिकेतील काही संस्था ज्या गुप्तहेर संघटना वगैरेंशी संबंधित आहेत इथून येतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत झाडून सर्व माध्यमं मोदीनामाचा गजर करत होती. आता अचानक स्वतःला पुरोगामी(?) म्हणवून घेणाऱ्या लोकांनी आणि बेताल माध्यमांनी देशात असहिष्णुता वाढल्याची बोंबाबोंब सुरु केली आहे. आठवण होत नाही इराणची??
               
या पार्श्वभूमीवर, जागतिक राजकारणाचे बदललेले संदर्भ, नव्याने उदयाला आलेले दमदार खेळाडू, जे बराच काळ प्यादी होते. शह-काटशह नित्याचे सुरु आहेत. इराणच्या जनतेला भडकवण्यासाठी 'त्या' अध्यक्षाला धर्मविरोधी, सोविएतचा हस्तक वगैरे ठरवलं गेलं.  भारतात कट्टर धार्मिक आणि असहिष्णू ठरवलं जात आहे. या तथाकथित पुरोगामी, पाकिस्तान मध्ये जाउन मोदींना हटवण्यासाठी आवाहन करण्याऱ्या तथाकथित निधर्मी नेत्यांचा हा देशद्रोह का समजू नये हा महत्वाचा प्रश्न आहे. 

तरुणांचा देश जो जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून आहे तिथे असली राष्ट्रविरोधी भूमिका समर्थनीय आहे? हा प्रश्न ज्यानेत्याने आपापल्या बुद्धीने सोडवावा. चीन आणि पाकिस्तान देश जात-पात, धर्म या आधारावर फोडायला टपलेले आहेत. आपण त्यांना आपल्या तथाकथित पुरोगामी(?) आचरणाने आपण बळच देत आहोत, हे समजण्याची त्यांची कुवत नाही. आणि असलीच तर पैसा भल्याभल्यांची नियत फिरवणारा घटक आहे. मग आता बदललेल्या जगाच्या राजकारणात एक समर्थ खेळाडू म्हणून उभं राहायचं की प्यादे बनून रहायचं? 

क्षमता आहे पण ती असल्या फुटकळ गोष्टींपायी आपण वाया घालवणार असू तर काहीच शक्य नाही. 'त्या' अध्यक्षानंतर इराणची काय अवस्था झाली हा इतिहास जगजाहीर आहे, मग आपण त्याच वाटेनं जाणं योग्य आहे? प्रश्न अनेक आहेत, उत्तरं समोर दिसत आहेत पण झाकून ठेवण्यातच धन्यता मानली जाते. प्रश्न… सोडवण्याची क्षमता आहे, गरज आहे इच्छाशक्ती आणि सावधपणाची.

Sunday, 19 July 2015

सोबत..!

                                         

                      "सोबत… काही क्षणी सोबत असावीच. अगदी जवळच्यांची. ती सोबत, क्षणाचा आनंद द्विगुणीत करते तर दुःखात आधार देऊन दुःख दूर करते. अशी सोबत… कायम असावी.. " 'ति'चं हे वाक्य, हे बोलणं भिडलं. काय चुकीचं बोलली ती? Input किंवा Output एकतर्फी असेल तर धोकादायक ठरतो. किंवा हानिकारक ठरतो. स्वगतापेक्षा संवाद अधिक प्रभावी.. अगदी प्रत्येक वेळी असतोच असं नाही. पण ज्या क्षणी शब्द आणि कधी कधी मौनाचं Give and Take सुरु होतं त्या क्षणी संवाद सुरु होतो. बहुतेक वेळा शब्दांशिवाय झालेला संवाद अधिक परिणामकारक ठरतो. तो थेट मनांचा, संवेदनांचा संवाद होतो. शब्दांची गरज संपते. 
                सोबत! मला तिची सोबत आहे. भावना, संवेदनांचं एका दिशेनं जाणारं दळणवळण तिच्या सोबतीमुळे दोन दिशांचं होतं. मनाचा, संवेदनांचा थेट संवाद सुरु होतो. परिणाम साधू लागतो. तिचं म्हणणं अधिकाधिक क्षणाक्षणाला पटत जातं. सोबतीचा असा काय परिणाम होतो? काय होतो??.. प्रश्न अवघड आहे. उत्तर शब्दात मांडणं कठीण आहे. आजवर या सोबतीमुळे कित्येक प्रसंगात मी ताळ्यावर आलो आहे. प्रचंड आनंद आणि त्यामुळे डोक्यात जाऊ पाहणारी हवा 'ति'च्या सोबतीमुळे ताळ्यावर आली आहे. काही प्रसंगात काही कारणांमुळे आलेली निराशा दूर झाली आहे. या नैराश्याचं प्रमाण कधी कधी खूप जास्त असायचं. एकंदर आयुष्याबद्दलच तिरस्कार, सगळं संपून गेल्याची भावना यायची. पण 'ति'च्याशी संवाद साधताना दोन टोकांचा प्रवास व्हायचा. प्रचंड निराश, हरलेल्या विचारांपासून ते आयुष्याबद्दल प्रचंड आशावादी, काय वाट्टेल ते समोर आलं तरी त्याच्याशी लढून, झगडून पार होण्याची उमेद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होण्यापर्यंतचा हा प्रवास असतो. 
             सोबत! प्रत्येक वेळी असतेच असं नाही. गेले कित्येक दिवस ही सोबत हरवल्यासारखी झाली होती. सोबतीची, संवादाची गरज आत्यंतिक होती. ती आज मिळाली. हा खूप काळाच्या ताटातुतटीनंतर एकत्र आल्याचा आनंद आहे. मला… 'ति'ला. माझी 'ती'…. सोबती.. लेखणी….!!







Friday, 29 May 2015

बदल...



                काळ आला कठीण!… काय आहे कठीण? वेग. कसला वेग? आयुष्याचा वेग. बदलाचा वेग. बदल. कोणते बदल? सगळ्या प्रकारचे बदल. स्मार्टफोनच APP, स्मार्टफोन- कंप्युटरचे हार्डवेअर, सोशल नेटवर्किंग, प्रायव्हेट बोलणी , तीही वर्च्युअल. सगळंच कसं बदलत चाललंय. जमाने के साथ कदम मिलाओ, वरना जमाना तुम्हे कुचलकर आगे निकाल जायेगा. हाच आजच्या काळाचा मूलमंत्र आहे. जो ना तुम्ही थांबवू शकत, ना मी. या बदलांच्या प्रवाहात, वेगात वाहत जाणं हे आणि हेच आवश्यक आहे.  बदल. बदल काय फक्त तंत्रज्ञानातच आहे काय? एकंदर आयुष्यच बदलू लागलं आहे. प्रचंड वेगवान होऊ लागलं आहे. नाती-भावना, त्याचं प्रदर्शन करणं-न करणं. त्यांच्यात येऊ लागलेला व्यवहारीपणा, त्यांच्यातली निवळ कर्तव्याची जाणीव. कुठल्याही भावभावनांशिवायची. बदल. बदल नात्यांमधला. रक्ताच्याच नाही तर मनाच्या, इमोशन्सच्या. मैत्रीच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत. रिलेशनशिप, प्रेम, कमिटमेंट यात ' Use and Throw' वृत्ती वाढायला लागली आहे. वेग. प्रचंड वेग आहे बदलांचा. कधी कधी आणि काही बाबतीत झेपत नाही हा वेग. म्हणून आम्ही वेगळे पडतो. काही वेळा पडले जातो. काही का असेना, आहोत आम्ही वेगळे!!
               अपडेट आले की स्मार्टफोनवर वा इतर कशावर त्याच्यासाठी वेळ खर्च करा. वास्तविक काही बेसिक गोष्टींव्यतिरिक्त स्मार्टफोन फार काही वेगळं असं देतात असं वाटत नाही.  तसा अनुभवही आलेला नाही. अर्थात प्रत्येकाच्या वापरण्याच्या पद्धतीत फरक असतोच म्हणा. WhatsApp, Facebook या गोष्टी आज जवळजवळ मुलभूत गरज बनलेल्या आहेत. पण त्याचा एका मर्यादेपलीकडे वापर कंटाळवाणा व्हायला लागतो, कारण मुळातच स्वभावात स्थिरता नाही. सतत वेगळेपणाची हाव असते. दुसरी गोष्ट गाणी. जीवाच्या शांततेसाठीचा प्रचंड मोठा आधार आहे तो. निदान मी जी गाणी किंवा संगीत ऐकतो तो तरी नक्कीच शांततेचा, मानसिक स्थैर्याचा आधार आहे माझ्यासाठी. ती एक गरज अधोरेखित करता येऊ शकते. बाकी सेल्फी, ते सतत अपलोड करणं, त्यावर फेसबुक किंवा इतर ठिकाणी फुकटच्या चर्चा करणं  बुद्धीबाहेरचं आहे. मूर्खपणाचं वाटतं. आता या गोष्टींमुळे जर आम्ही मागासलेले, वेगळे वाटत असू, त्यास आमचा इलाज नाही. आम्ही आहोत वेगळे!!
             So Called पाश्चात्त्य जगाचा प्रभाव आजच्या आमच्या युवा पिढीवर आहे. ही पाश्चात्त्य संस्कृती किंवा 'Western Culture' म्हणजे नक्की काय? मुक्तता, विचार-आचार स्वातंत्र्य. पण ही मुक्तता उद्दामपणाकडे झुकत असेल तर? तर काय? यातून माज वाढेल, बाकी काही नाही. यातून सुरक्षितता कमी होत चालली आहे. बारीकसारीक गोष्टींचं पर्यवसान डिप्रेशन, फ़्रस्ट्रेशन आणि त्यातून व्यसनाधीनता. Western Culture मधून नक्की काय अभिप्रेत आहे? स्वातंत्र्य-सुसंस्कृततेच्या बंधनात असेललं, भोगलेलं स्वातंत्र्य की असंस्कृततेतून वाढणारा स्वैराचार? Western Culture म्हणजे काय? पार्ट्या, पब्ज इ. माझं तोकडं ज्ञान इतपतच येउन थांबतं. पण यापलीकडेही बरंच काही आहे. ही गरज आहे? मला तरी नाही वाटत. या गोष्टींसाठी पैसा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. त्या खर्च होणाऱ्या पैशातून निष्पन्न काय होतं? चार घटका करमणूक. हिडीस करमणूक. बाकी काही नाही. आधीपासून हा विचार अंगात भिनलेला होता म्हणा किंवा चार चांगल्या लोकांच्या सहवासातून, वाचनातून विचार वाढत गेला म्हणून म्हणा, आजपर्यंत तरी या सगळ्यापासून दूर आहे. आता या गोष्टी जर इतरांना मागासलेपणाच्या वाटत असतील. वेगळेपणाच्या वाटत असतील, तर आमचा इलाज नाही. आम्ही आहोत वेगळे!!
                रिलेशनशिप, कमीटमेंट, प्रेम आजकाल पावसाळ्यानंतर माजलेल्या तणासारखं पसरलंय. काही धरबंध राहिलेला नाही. शाळकरी मुला-मुलींपासून ते पुढे….  शाळकरी वयातलं ते केवळ आकर्षण असतं. त्यांची धाव कुठवर जाते याची चिकित्सा करण्यात काहीच हशील नाही. कारण ते वयच तसं असतं. पण 'पुढे' काय? परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 'होईल तोपर्यंत होईल, नाहीतर होऊ वेगळे' हा आजचा attitude आहे. जुळण्याच्यापेक्षा जास्त प्रमाण 'Break Up' चं आहे. क्षुल्लक कारणांवरून ब्रेक उप होतात. क्षुल्लक कारणांवरून गोष्टी या थराला जात असतील तर त्या रिलेशनशिप मधल्या खरेपणाची खोली कळते. वास्तविक काही खोली नसतेच. असल्या उथळ नात्यांना कितीसं आयुष्य असणार? रिलेशनशिप मध्ये असणं ही गरज बनू लागली आहे. ग्रूप मधले सगळेच कोणाशी ना कोणाशी रिलेशन मध्ये आहेत म्हणून आपणही असावं, असली उदाहरणं भरपूर दिसतात. काय अर्थ आहे त्याला?  एकमेकांच्या आयुष्याशी खेळल्यासारखं आहे ते. हा आणि असा विचार आम्ही करतो म्हणून आम्ही मागासलेले, वेगळे ठरतो. वेगळे पडतो. आम्ही आहोतच वेगळे!!
            हाताची पाच बोटं सारखी नसतात. प्रत्येक मनुष्य काही वेगळा विचार-आचार घेऊन आलेला असतो. वर उल्लेखलेल्या मुद्द्यांवर कोणी सहमत असेलच असं नाही. प्रत्येकाची आपापली वेगळी मतं असतात. त्यामुळेच प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने वेगळा असतो. हे वेगलेपणच त्याची ओळख असते. ओळख तयार करते. … आम्ही आहोतच वेगळे..!!!

Saturday, 21 February 2015

सरदार पटेल: एकसंध भारताचे शिल्पकार

                        


          काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि कांडलापासून किबिथु ( अरुणाचल प्रदेश ) पर्यंत पसरलेला खंडप्राय देश, भारत. प्राचीन काळाच्या सीमा याही पलीकडे जात थेट अफगाणिस्तान, म्यानमार वगैरेना भिडतात. १९४७ साली खंडित भारताला स्वातंत्र्य मिळालं. ३२,८७,२६४ चौ. किमी. चा हा अवाढव्य प्रदेश. ज्याला आपण भारतीय संघराज्य असे म्हणतो. इ. स. १८१८ ते १९४७ पर्यंतच्या गुलामगिरीच्या पाशातून मुक्त झालेला भारत. गुलामगिरीतून हि भारतीय भूमी मुक्त व्हावी यासाठी कित्येक लोकांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने लढत होता. मार्ग कुठले का असेना पण प्रत्येकाचं अंतिम ध्येय मात्र एकच होतं. ते म्हणजे स्वातंत्र्य. प्रदीर्घ काळ चाललेल्या लढ्यातून शेवटी स्वातंत्र्य मिळालं. पण मग पुढे काय? या ३७ कोटी लोकसंख्येचा देश एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र म्हणून उभं करणं तितकाच आवश्यक होतं. कारण इंग्रजांच राज्य संपलं असलं तरी देशात धार्मिक दंगली, फुटीर संस्थानिक आणि इतर प्रश्न होतेच. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू स्थानापन्न झाले. त्यांच्यासमोर ही सगळी प्रमुख आव्हाने आ वासून उभी होती. देशभर विखुरलेली ५०० पेक्षा जास्त संस्थानं, त्याचबरोबर इतर प्रशासनिक कार्य उभी करणं हे आव्हान होतं. थोडक्यात सांगायचं तर नुकताच स्वतंत्र झालेलं हे राष्ट्र ' एकसंध' करणं आवश्यक होतं. हे अवघड काम करून दाखवलं ते या एका माणसाने. बारडोलीचा सत्याग्रह यशस्वी करून दाखवून ' सरदार' ही उपाधी मिळवणाऱ्या वल्लभभाई पटेल यांनी. म्हणूनच एकसंध भारताचे शिल्पकार म्हणून सरदारांच्याकडे पाहत असताना तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. त्यातील पहिली महत्वपूर्ण गोष्ट सरदारांची देशाच्या फाळणीबाबतची भूमिका, दुसरी ती संस्थानांच्या विलीनीकरणाबाबतची भूमिका आणि  महत्वाची म्हणजे भारताची औद्योगिक, सामाजिक आणि प्रशासनिक पातळीवरील उभारणी. 

                अखंड भारताची फाळणी करून मुस्लिमबहुल प्रांताचे 'पाकिस्तान' हे राष्ट्र निर्माण केले जावे ही मागणी १९४२ पासून प्रामुख्याने जोर धरू लागली. 'मुस्लिम लीग' या बाबतीत सर्वाधिक आग्रही आणि आक्रमक होती. १९४२ च्या राष्ट्रव्यापी 'छोडो भारत' आंदोलनकाळात बहुतांश काँग्रेस नेते तुरुंगात गेले. दुसर्या महायुद्धाच्या अंतापर्यंत म्हणजेच १९४५ पर्यंत हा प्रश्न तसाच भिजत पडलेला होता. वास्तविक अखंड भारत टिकवण्यासाठी सरदार मुसलमानांना विभक्त मतदारसंघ, विशेष अधिकार, राखीव जागा इत्यादी सर्व  देण्यास तयार होते. वायव्य सरहद्द प्रांतात 'सरहद्द गांधीनी' नेते व्हावे, काश्मिरात शेख अब्दुल्लांनी नेते व्हावे याला त्यांचा विरोध नव्हता. सर्व मुसलमानांना पाकिस्तान दिल्यानंतरसुद्धा बरोबरीचे अधिकार असावेत यावर त्यांनी कधी खळखळ केली नाही. पण इतके सगळे झाल्यानंतर मुसलमानांनी या राष्ट्रावर प्रेम करावे, या भूमीच्या आशा आकांक्षांशी एकरूप व्हावे हा त्यांचा आग्रह होता. पण १९४५ च्या निवडणुकीत काँग्रेसला मुसलमानेतर मतदारसंघात ९७% मते मिळाली तर लीगला मुस्लिम मतदारसंघात ८६% मते मिळाली. हे सत्य समोर दिसत असताना भारतीय राष्ट्रवादावर मुसलमानांची श्रद्धा गृहीत धरता येत नाही. म्हणूनच lord  Mountbatton यांची फाळणीची कल्पना प्रथम सरदारांना पटली. नंतर नेहरुंना आणि त्यानंतर गांधीना. लीगचा आक्रमक पवित्रा, दंगली, कत्तली हे समोर दिसत असताना ३५ कोटी हिंदूंचे जीवन उध्वस्त करून अखंड भारत टिकवण्याइतके स्वप्नाळू पटेल-नेहरू-गांधी खचितच नव्हते. किंमत एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागताच हे तिघे तुकडे पडण्यास तयार झाले, हि गोष्ट खरी आहे. 

                    भारतभर पसरलेली ५०० पेक्षा जास्त संस्थाने. स्वतंत्र भारताच्या आत अशी संस्थानांची ही अशी पोखरण राष्ट्रविघातक ठरणारी होती. एकसंध, बलवान देश उभा राहणं हि राजकीय, सामाजिक गरज होती. वास्तविक १९३५ पर्यंत सरदार संस्थाने स्वतंत्र असावीत या मताचे होते. या मुद्द्यावर त्यांचा नेहरूंशी मतभेद होता. संस्थाने नामशेष झाली पाहिजेत या निर्णयावर सरदार १९३७ पर्यंत आले. एकदा या निर्यावर आल्यानंतर राष्ट्रहितासाठी दया-माया न दाखवता सर्व संस्थानिकांना नामशेष करण्याचे अजस्त्र काम त्यांनी करून दाखवले. संस्थाने भारतात विलीन करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद अशा सर्व आयुधांचा वापर सरदारांनी निर्भीडपणे केला. सावध, धूर्त, मुत्सद्दी असणाऱ्या सरदारांनी प्रथम संस्थानिकांना राष्ट्रवादी आव्हान केले. त्यांच्या संपत्तीचे जतन करण्याचे आणि पेन्शन्स देण्याचे आश्वासन दिले. कुठलीही कठोर कारवाई न करता केवळ वाटाघाटींच्या माध्यमातून जवळ जवळ ५०० संस्थाने भारतात विलीन करण्यात आली. सरदार काश्मीर, इंदोरचे राजे हिंदू म्हणून त्यांना प्रेमाने वागवावे व भोपाल, हैदराबादचे नवाब मुसलमान म्हणून त्यांचा सूड घ्यावा असे मानतच नव्हते. हिंदू संस्थानिक किती राष्ट्रद्रोही आहेत हे सरदार डोळ्यांनी पाहताच होते. रामस्वामी मुदलियार मुसलमान नव्हते पण त्यांना त्रावणकोर भारतात विलीन करण्याची इच्छा नव्हती. निरनिराळे संस्थानिक हिंदू असूनही भारत्बाहेर राहाण्याचा प्रयत्न करत होते. काश्मीरचे राजे आणि पंतप्रधान हिंदूच होते. त्यांना वेळीच शहाणपणा सुचला असता तर काश्मीर प्रश्न इतका वेद-वाकडा झालाच नसता. भारतापेक्षा पाकिस्तानात विलीन होण्याची इच्छा प्रदर्शित करणाऱ्या हैदराबादच्या निजामाशी प्रदीर्घ वाटाघाटी सरदार करत होते. वास्तविक, वर्हाड प्रांत निजामाला मिळावा, भोपाल संस्थान स्वतंत्र रहावे असा प्रयत्न करणारे लोक काँग्रेसमध्ये होते. निजामाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न भारत सरकारचे एजंट्स करत होते. पण सरदार बधले नाहीत. प्रश्न वाटाघाटींनी सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर सरदारांनी 'पोलिस एक्शन' चा आदेश दिला. भारतीय लष्कराच्या रेट्यासमोर निजामाचा निभाव लागला नाही. अखेर १७ सप्टेंबर,१९४८ ला निजाम संस्थान भारतात विलीन झाले. 

                 स्वतंत्र भारताच्या प्रशासनिक, सामाजिक, राजकीय एकसंधतेचा विचार करता सरदारांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, निर्णय खूप महत्वपूर्ण ठरतात. स्वतंत्र भारताच्या शासनव्यवस्थेचा विचार करत असताना सरदार सदैव वर्तमानकाळ दृढतेनं मांडतात, तो प्रस्थापित करण्याची धडपड करताना आढळतात. प्रौढ मतदानावर आधारलेली संसदीय लोकशाही आणि उद्योगप्रधान, एकात्म, बलवान भारतीय राष्ट्र हा आजचा महत्वपूर्ण प्रश्न आहे असे त्यांचे मत होते. भारताला एकसंध करण्याच्या दृष्टीने सरदारांचे विचार, स्पष्ट आणि दृढ होते. उद्योगीकीकरणप्रधान, आधुनिक, बलवान राष्ट्र ह्या मुद्द्यावर सरदार ठाम होते. समाजवादाकडे ओढ असणाऱ्या नेहरूंपेक्षा सरदारांचे विचार भिन्न होते. त्या अर्थाने पाहू गेल्यास सरदार उजव्या गटात मोडले जातील. तरीही सरदारांनी " हे राष्ट्र बलवान करण्यासाठी व औद्योगिक दृष्टीने समृद्ध करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. या उद्योगीकरणाची गती आमच्या इच्चेनुसार राहावी यासाठी शासनाने प्रयत्न केले तर त्याचे भांडवलदारांनी स्वागत करावे. " याचा गर्भितार्थ असाच होता की वेळ आली तर उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पर्याय खुला असेल. त्याचबरोबर प्रशासनिक  एकसंधतेच्या दृष्टीने विचार करता ब्रिटीशकालीन ' Imperial Civil Service' च्या जागी ' Indian Administration Services' आणून भारत एकसमान प्रशासनिक पद्धतीत गठीत करणात सरदारचा पुढाकार होता. ह्यामुळे न केवळ प्रश्सानिक एकसंधतेचा पुरस्कार झाला तर त्याचबरोबर जनतेत एकराष्ट्रीयत्वाची भावना रौजाव्ण्यास मदत झाली. तसं पाहायला गेलं तर ह्या अगदी बारीक सारीक गोष्टी आहेत पण यांचा दीर्घकालीन परिणाम अतिशय गहन झाले. आज हा आसेतुहिमाचल भारत भौतिक आणि मानसिक दृष्ट्या एकसंधपणे उभा आहे. भौतिक एकसंधता टिकणे न टिकणे हे लोकांच्या मानसिक एकसंधतेवर अवलंबून असते. म्हणूनच ह्या एकसंध भारताच्या शिल्पकाराचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. 

          त्याच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भलेमोठे 'Statue of Unity' उभारणे गरजेचे आहे काय? जर त्या सरदाराच्या कार्याचा Statue प्रत्येकाच्या मनामनात भक्कमपणे उभा असेल, राहिला तर त्या प्रत्यक्ष Statue हे फक्त सोपस्कार म्हणून उरतील. हा एकसंधतेचा ' शिल्पकार' स्वतःच एक पुतळा म्हणून उरेल.

Artha and the Civilisation: What Really Drives the Indian Economy

  Any system rests on two principal components. One is the driving force behind the system's construction, and the other is the guiding ...