पुस्तकं हा ग्रेट खजिना आहे. कधी, कुठल्या पुस्तकात काय भन्नाट वाचायला मिळेल, काही निराळीच दृष्टी मिळेल काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ, वसंत पटवर्धन लिखित विष्णुगुप्त चाणक्याच्या आयुष्यावरील 'आर्य' ही कादंबरी. रूढार्थाने ही कादंबरी आहे. त्यावेळी उपलब्ध असलेले सर्व ऐतिहासिक पुरावे, त्यांचा अभ्यास करुन मांडलेली असली तरी शेवटी ती कादंबरीच, तो इतिहास मांडणी करणारा ग्रंथ नव्हे. पण त्या कादंबरीत बौद्ध विचार, बौद्ध पंथाच्या भविष्यातील ऱ्हासाची कारणे, ही चाणक्याच्या गहन चिंतनाचा भाग म्हणून मांडली आहेत. इतिहास ग्रंथात किंवा इतर विश्लेषणात्मक ग्रंथांपेक्षा त्या मांडणीतून तो सर्व मुद्दा अधिक स्पष्टपणे वैयक्तिक पातळीवर मला समजला. आणखी एक उदाहरण, अमेरिकेत साठ आणि सत्तरच्या दशकांत व्हिएतनाम युद्ध, हिप्पी चळवळ, भरकटलेली तरुणाई हा गंभीर प्रश्न झाला होता. या सर्वांची माझी पहिली ओळख झाली पु. ल. देशपांडे यांच्या 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकातील 'एक बेपत्ता देश' या लेखातून. उत्सुकता वाढली तेव्हा मग मिळतील साधने वाचून, माहितीपट पाहून हा विषय आणि या विषयाचे अनेक पदर उलगडत गेले. हाच प्रत्यय साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांच्या 'पुष्पांजली' या पुस्तकाच्या वाचनातून येत आहे.
भारताची फाळणी ही भारताच्या इतिहासात अभूतपूर्व उलथापालथ घडवणारी घटना आहे. या घटनेने भारतीय उपखंडाचा इतिहास, भूगोल, राजकारण बदलले. फाळणीच्या संदर्भात विविध माध्यमांत आणि सामान्य स्तरावर राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक घटकांची चर्चा होते. आर्थिक परिणाम या घटकाकडे विशिष्ट वर्तुळापलीकडे लक्ष जात नाही. त्यांची सामान्य पातळीवर चर्चा होत नाही. फाळणीमुळे पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान (सध्या बांग्लादेश) मधून आपल्या मिळकती, मालमत्ता सोडून कफल्लक अवस्थेत, निर्वासित म्हणून भारतात आले इथे साधारण चर्चा संपते. पण उद्योग आणि व्यवसायाच्या पातळीवर काही खूपच जटील प्रश्न निर्माण झाले होते. त्यातल्या एकाचा उल्लेख करुन मूळ विषयाकडे जाऊ.
पूर्व आणि पश्चिम बंगालची फाळणी, नक्की कोणत्या आधारावर झाली हा एक गहन प्रश्न आहे. त्यातल्या एन्क्लेव्ह चा प्रश्न आता काही वर्षांपूर्वी निर्णायकरित्या सुटला. ते असो. तर, फाळणी झाली त्यावेळी आणि आताही बंगाल-आसाम वगैरे प्रदेशात ज्यूटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कोलकाता आणि आसपासचा भाग हा ज्यूट मिल साठी प्रसिद्ध होता, किंबहुना कोलकाता एक महानगर म्हणून विकसित होण्यात या ज्यूट मिलचा मोठा वाटा आहे. ज्यूटची शेती, उत्पादन करणारा प्रमुख प्रदेश होता पूर्व बंगाल आणि प्रक्रिया उद्योग कोलकाता मध्ये एकवटलेला होता. फाळणीमुळे पूर्व बंगाल मधल्या शेतकऱ्यांना आपला माल प्रक्रिया उद्योगपर्यंत पोचवण्यात अडचण आणि कोलकाता मधील मिलना कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा जवळ जवळ ठप्प. असे अनेक जटील प्रश्न उभे राहिले. वास्तविक हा झाला फाळणीचा प्रत्यक्ष, दृश्य परिणाम. पण फाळणीच्या गदारोळाशी तसा थेट संबंध नसताना सुद्धा जमशेदपूरला टाटा मोटर्स म्हणजे पूर्वीची 'टेल्को' वर परिणाम झाले. तेच फाळणीचे Unintended Consequences.
गोविंद तळवलकर यांचे 'पुष्पांजली' हे पुस्तक त्यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रदीर्घ काळात जे मृत्युलेख लिहिले त्यांचे एकत्रीकरण आहे. त्यात टेल्कोचे माजी प्रमुख सुमंत मुळगांवकर यांच्यावरील मृत्युलेखात हे Unintended Consequences चे भन्नाट उदाहरण समोर आले. फाळणीपूर्व काळात टेल्को मोटार गाड्या नाही तर रेल्वे इंजिन तयार करत असे. ती साहजिकच कोळशावरील इंजिने असत. त्या इंजिनांचे बॉयलर तयार करणारे कामगार प्रामुख्याने पठाण होते. फाळणीनंतर हा कामगार वर्ग निघून गेला आणि कंपनीपुढे प्रश्न पडला की करायचं काय? आणि त्यातून निर्माण झाली मोटार गाड्या तयार करणारी टेल्को. जी पूर्वी प्रामुख्याने मालवाहतूक करणारे ट्रक इत्यादी तयार करत असे. पुढे रतन टाटांच्या काळात टेल्कोचे रूपांतर 'टाटा मोटर्स' मध्ये झाले आणि ती कंपनी आता मालवाहतूक मोटारींबरोबरच प्रवासी वाहन क्षेत्रात देखील आपला दबदबा राखून आहे.
हे असं आहे. कधी, कुठला भन्नाट धागा हाती लागेल ते सांगता येत नाही. त्यामुळेच कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे, "वाचाल तर वाचाल" तसेच "वाचाल तर समृद्ध व्हाल".


