Thursday, 9 January 2025

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड 

बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले. 

उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला. 

अशावेळी वसाहतवादी ब्रिटिशांना दुसरा हक्काचा स्रोत मिळाला तो भारत. मध्य भारत, गुजरात हे हक्काचे कापूस उत्पादक मिळाले. त्याचवेळी केप ऑफ गुड होपचा वळसा टाळणारा सुएझ कालवा प्रत्यक्षात आला, आणि मुंबई बंदराचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले. मुंबई ते ठाणे या मार्गावर १८५३ साली धावलेली रेल्वे १८६५ पर्यंत गुजरात, मध्य भारता पर्यंत पोचली. ती पोचवण्या मागे भारतीयांना लाभ देणे, त्यांचा विकास हे हेतू नव्हते. भारतात कापसाची जलद आणि बिनधोक वाहतूक करण्यासाठीच रेल्वेचा प्राथमिक विकास झाला. कापसाची जलद वाहतूक, उपलब्धता यामुळे मुंबई ही कापूस व्यापाराबरोबरच कापड गिरण्याचेही केंद्र बनली. याच कारणामुळे सुरत, अहमदाबाद यांचा वस्त्रोद्योग केंद्र म्हणून विकास झाला. 

एकोणिसाव्या शतकात हजारो मैल लांब अमेरिकेतील युद्धामुळे भारतात वस्त्रोद्योग आणि व्यापार उभा राहिला. आता एकविसाव्या शतकात शेजारी बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि इतर कारणांमुळे तयार वस्त्रोद्योग क्षेत्रात मुसंडी मारण्याची एक संधी भारतासाठी चालून आली आहे. 

वस्त्रोद्योग क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. कापूस पिकवणारा शेतकरी, ते कापूस वेचणारे मजूर, वाचलेला कापूस जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी पर्यंत ने-आण करणारी वाहतूक व्यवस्था (लॉजिस्टिक्स), जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी, पुढली पायरी धागा निर्माण, त्यापुढे डायिंग, कापड तागा निर्माण आणि सर्वात शेवटी तयार कपड्यांची फॅक्टरी, अशी भलीमोठी साखळी आहे. त्यात कापूस उत्पादन, ते कापड तागा निर्माण ही साखळी भारतात उभी आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राचा देशाच्या जीडीपी मध्ये २.३%, निर्यातीमध्ये १२% आणि एकूण औद्योगिक उत्पादनात १३% वाटा आहे. भारतात तामिळनाडूतील तिरुपूर हे तयार कपड्यांच्या उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. पण गेल्या काही काळात बांगलादेशने तयार कपड्यांच्या उद्योगात झपाट्याने आघाडी घेतली. 

बांगलादेशात मजूर स्वस्त मिळत होते. कामगार विषयक कायदे लवचिक होते आणि आहेत. विकेंद्रित अशी कपड्यांची उत्पादन व्यवस्था होती आणि आहे. पाश्चात्य देशातील मोठमोठ्या ब्रँड्स, कंपन्यांना ही व्यवस्था आकर्षक वाटली आणि त्यांनी बांग्लादेशात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. युरोप, अमेरिका, जपान मधील झारा वगैरेंसारख्या मोठमोठ्या ब्रॅंड्सच्या तिकडील दुकानांत मिळणाऱ्या कपड्यांवर 'मेड इन बांगलादेश' दिमाखाने झळकू लागले. चीन+१ या धोरणाचा लाभ बांगलादेशला मिळाला. किंबहुना त्यांनी करुन घेतला.  बांगलादेशातून होणाऱ्या निर्यातीतील ८५% वाटा तयार कपड्यांचा आहे. वस्त्रोद्योग निर्यात हा बांगलादेशच्या परकीय गंगाजळीचा हा मोठा आधार बनला. इतका की २०१५ मध्ये बांगलादेश 'लोअर मिडल इन्कम' पातळीचा देश झाला. २०२०-२२ या काळात बांगलादेशचा दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न भारतापेक्षा जास्त होते. त्या काळात भारतात अनेक तथाकथित तज्ज्ञांनी भारताने बांगलादेशाकडून काही शिकावे असे आगंतुक सल्लेही दिले. 

कोविड महामारीपासून या सर्व यशस्वी घोडदौडीला लगाम लागायला सुरुवात झाली. सगळे जग ठप्प झाले होते. पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्यात रशिया-युक्रेन, इस्राएल-हमास वगैरे युद्धांची भर पडली. कोविड मधील आर्थिक फटका, पुरवठा साखळी विस्कळीत होणे आणि इतर कारणांमुळे विकसित देशांत महागाई वाढली आणि वस्त्रोद्योगासह सर्वच वस्तूंची मागणी तात्पुरती घटली. 

त्याचवेळी बांगलादेश एका संक्रमणातून गेला. वस्त्रोद्योगातून आणि इतर व्यापारातून आलेल्या संपत्तीमुळे लोकांचे जीवनमान उंचावले आणि त्याचबरोबर मजुरीचे भावही वाढले. त्याचा परिणाम तयार कपड्यांच्या किंमतीवर झाला. वस्त्रोद्योगासाठी लिक्विफाईड नॅचरल गॅस-LNG ची आवश्यकता असते. भारताचा पूर्व किनारा आणि बांगलादेशला सातत्याने चक्रीवादळांचा सामना करावा लागतो. त्यातल्या फेंगल चक्रीवादळाने बांगलादेशातील प्रमुख साठ्याचे प्रचंड नुकसान झाले आणि अनेक दिवसांसाठी पुरवठा ठप्प झाला. आधीच घटलेली मागणी, त्यात वाढत्या किंमती यामुळे वस्त्रोद्योगावर परिणाम झाला. त्याचा परिणाम बांगलादेशातील विविध आंदोलनामध्ये दिसून आला. तथाकथित विद्यार्थी आंदोलनांत त्याचा कळसाध्याय दिसून आला आणि पंतप्रधान शेख हसीना यांना तातडीने देश सोडून जावे लागले. हे आंदोलन उत्स्फूर्त होते की शेख हसीना यांना पदच्युत करुन आपल्या मर्जीतले सरकार बसवण्यासाठी केलेली पद्धतशीर खेळी होती याची चर्चा झाली आहे. ती इथे प्रस्तुत नाही. 

या पार्श्वभूमीवर भारतातील तिरुपूरहुन एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या काळात २६,००० कोटी रुपयांची तयार कपड्यांची निर्यात झाली. मागील वर्षी, पूर्ण वर्षभरात ३०,६९० कोटी रुपयांची निर्यात झाली होती. ही आकडेवारी पाहता चालू वर्षी निर्यातीत लक्षणीय वाढ होणार हे नक्की. यात बांगलादेशातील राजकीय परिस्थीचा आहे तितकाच वाटा डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाच्या किंमतीचा देखील आहे हेही नमूद केले पाहिजे. पण तिरुपूर एवढ्यावरच थांबलेले नाही. तिरुपूर ने हरित ऊर्जेचा वापर वाढवला आहे, झिरो लिक्विड डिस्चार्ज आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत सर्व ESG मानके पूर्ण करत कार्बन न्यूट्रल हा दर्जा प्राप्त केला आहे. कृत्रिम मेधा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) सह नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ केली आहे. 

बांगलादेशातील अस्थिरता, वाढता खर्च यामुळे चीन+१ या धोरणाचा लाभ करुन घेण्यासाठी दक्षिण-पूर्व आशियातील व्हिएतनाम, कंबोडिया सह शेजारी श्रीलंका यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. प्रचंड उत्पादन क्षमता, लवचिक कामगार कायदे आणि कमी खर्च हे पॅकेज त्यांनी दिले आहे, आणि लाभ मिळवला आहे. या सगळ्यात भारत कोठे आहे? या चालून आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी काय करत आहे? एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी रेल्वे, कापड गिरण्यांना प्रोत्साहन इत्यादी गोष्टी झपाट्याने केल्या. एकविसाव्या शतकात भारत सरकार काय पावले उचलत आहे? 

भारताने २०३० पर्यंत १०० बिलियन डॉलरच्या वस्त्रोद्योग वस्तू निर्यातीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यासाठी तात्कालिक, मध्यकालीन आणि दीर्घकालीन योजना आखल्या आहेत. उत्पादन आणि निर्यात वाढवण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर, पायाभूत सुविधा विकासावर भर देण्यात आला आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी निर्यात मित्र योजना लागू आहे. भांडवली वस्तूंच्या निर्यातीसाठी निर्यात प्रोत्साहन योजना लागू आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह) कार्यान्वित आहेत. भारतातील किचकट कामगार कायदे रद्दबातल करून नवे लेबर कोड कार्यान्वित होत आहेत. ONDC च्या माध्यमातून उत्पादक-व्यापाऱ्यांना एक लाभकारक अशी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. 

दीर्घकालीन योजनांमध्ये तिरूपूर सह सुरत आणि इतर ठिकाणी तयार कपड्यांची निर्मिती केंद्रे उभारण्यासाठी प्रोत्साहन, पायाभूत सुविधा विकास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कापूस उत्पादन आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील अमरावती येथे 'टेक्स्टाईल पार्क'चा  शिलान्यास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने प्रचंड क्षमतेच्या वाढवण बंदराचा शिलान्यास केला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादन क्षेत्रातून समृद्धी, शक्तीपीठ, नांदेड-जालना अशा महामार्गाचा विकास होत आहे. त्यातील समृद्धी महामार्ग येत्या काळात पूर्णपणे कार्यान्वित होईल जो, वाढवण, जेएनपीटी, नवी मुंबई विमानतळाशी जोडलेला असेल. सुरत-चेन्नई असा नवा महामार्ग आकाराला येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात 'आपदा में अवसर' हा मंत्र दिला आणि त्यानुसार आत्मनिर्भर भारत योजना मांडली. आता बांगलादेशातील आपदा आपल्यासाठी अवसर मानून योग्य पावले उचलली तर भारत हा जगासाठी तयार कपड्यांचे एक खात्रीशीर केंद्र होईल यात कोणतीच शंका नाही. गरज आहे सामूहिक इच्छाशक्ती आणि कार्याची. 


पूर्वप्रसिद्धी: 


Sunday, 5 January 2025

वारसा मुंबईचा..


मुंबईकर-पुणेकर-नागपूरकरांच्या पुढे 'कर' जोडताना पु.ल. हे लिहून गेले आहेत, ".... एक तर मुंबईच नव्हती. ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर. त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच. ..." ते तत्कालीन व्यंगात्मक लेखन होते. त्याचा आस्वाद घेत आपण सगळेच मनमुराद हसतो, पण वास्तवात मुंबई आणि मुंबई भोवतालच्या परिसराला हजारो किंबहुना कोटीच्या कोटी वर्षांचा इतिहास आहे. मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत पुरात्तवज्ञ आणि कलेतिहासकार डॉ. सुरज पंडित यांनी अपरान्त आणि पुरातत्त्व विभाग व बहिःशाल विभाग, मुंबई विद्यापीठ प्रकाशित 'वारसा मुंबईचा' या पुस्तकात तो समृद्ध इतिहास उलगडला आहे. 

तो उलगडावा वाटला याचे कारण सुरज पंडित यांनी नमूद केले आहे. ते म्हणतात, "मला कायम प्रश्न पडत असत, ही मुंबई अशी का आहे? ही जर पोर्तुगीज-ब्रिटिशांनी वसवलेली असेल तर प्राचीन साहित्यात तिचे उल्लेख कसे येतात?  या प्रश्नांचा मागोवा घेताना एक प्रवास सुरु झाला.." त्याला साथ मिळाली ती मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात MMRDA च्या वारसा संवर्धन विभागाची आणि त्या अंतर्गत उभ्या राहिलेल्या प्रकल्पाची. या प्रकल्पाला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पुरात्तवज्ञ श्री अरविंद जामखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुरज पंडित यांनी सुरु केलेला तो प्रवास या पुस्तकाच्या रुपाने प्रकाशित झाला आहे. 

इतिहास संशोधनाचे स्रोत कोणते? त्यातही प्राचीन इतिहासाचे स्रोत कोणते? अश्मयुगीन हत्यारे, अवशेष, भांडी, त्यापुढे ताम्रपट, शिलालेख, स्तूप, लेणी, मूर्ती, वेद-पुराण-ग्रंथ, परकीय प्रवासी आणि त्यांचे अनुभव, नाणी, वस्तू इत्यादी. या सर्वांचा साद्यन्त अभ्यास करुन इतिहास उलगडत जातो.

भारतीय उपखंड आणि त्यातही भारतीय द्वीपकल्प हा भौगोलिक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो जितका जुना आहे तितकाच आधुनिकही आहे. म्हणजे काही कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला अरवली पर्वत कदाचित हिमालयापेक्षाही उंच होता ज्याची धूप होत होत सध्या आहे तितका उरला आहे. दुसऱ्या बाजूला हिमालय पर्वत निर्माण ही निरंतर प्रक्रिया अजूनही सुरु आहे. दरवर्षी काही मिलीमीटर ने हिमालयाची उंची वाढत आहे. याच मालिकेत मुंबईची देखील गोष्ट येते. भारतीय उपखंड आशिया प्लेट कडे सरकत असताना लाव्हारस प्रचंड प्रमाणात वाहत होता, तो स्थिर होत होता, समुद्राची पातळी कमी-जास्त होत होती. पश्चिम किनाऱ्यावरील डोंगररांगा, अजस्र सह्याद्री ही सर्व याची देणगी आहे. मुंबईची ही कथा सांगणारा ढळढळीत पुरावा अंधेरी भागात 'गिलबर्ट हिल'च्या रुपात इमरतींच्या दाटिवाटीत उभा आहे. 

प्राचीन स्तूप: शूर्पारक

मुंबई परिसरात ज्ञात इतिहास उलगडण्याची सुरुवात होते ती शूर्पारक म्हणजेच आजच्या सोपाऱ्यात. तिथे अशोकाच्या राजाज्ञा, स्तूप आणि अनेक प्राचीन मूर्ती आढळून आल्या आणि प्राचीन व्यापाराचा समृद्ध इतिहास प्रत्यक्षात आला. शूर्पारक या बंदराचा आणि परिसराचा इतिहास त्याही मागे जातो. मगधाची राजधानी पाटलीपुत्र आणि शूर्पारक परिसरातील चिंचणीचा पुत्रक यांची कहाणी चित्तवेधक आहे. शूर्पारक आणि पुढील काळात विकसित झालेली सेमूल म्हणजेच चौल, कल्याण आणि घोडबंदर ही बंदरे मुंबई परिसर प्राचीन काळापासून व्यापारी वृत्ती-प्रकृतीचा असल्याचे द्योतक आहेत. 

मुंबईचा प्राचीन इतिहास उलगडण्यात कृष्णगिरी पर्वत आणि तेथील भिक्खू संघ हा खूप महत्त्वाचा स्रोत आहे. प्रामुख्याने सातवाहन काळात बहरलेल्या या भिक्खू संघाने एका प्रचंड मोठ्या लेणी समूहाची निर्मिती केली, ज्याला आपण सध्या कान्हेरी लेणी म्हणून ओळखतो. भारतीय पौराणिक परंपरेत पौराणिक कथेमुळे, प्रत्यक्ष ती देवता तेथे अवतरल्याच्या, वास करीत असल्याच्या कथेमुळे  मंदिराला, तेथील देवतेला माहात्म्य येते. तीच परंपरा बौद्ध-जैन या भारतीय पंथात-धम्मात दिसून येतात. बौद्ध विचारात 'त्रिकाय' संकल्पनेला महत्त्व आहे. त्यातच 'धर्मकाय' अशी एक संकल्पना येते आणि त्याचा अविष्कार साक्षात तथागत भगवान बुद्धांनी शुर्पारकला भेट दिल्याच्या कथेत दिसून येतो. 

कान्हेरीची लेणी अनेक कारणांनी महत्त्वाची आहेत. त्या लेणी खोदण्यासाठी, तेथील भिक्खू संघासाठी सातवाहन ते त्रैकूटक ते कलचुरी अशा राजघराण्यांनी दाने दिलीच पण त्यात व्यापाऱ्यांनी, श्रेणीच्या 'श्रेष्टींनी' दिलेल्या दानांचे तपशीलवार वर्णन तेथील विस्तृत शिलालेखात आहेत. कान्हेरीच्या लेण्यांत कोकण किनारपट्टी ते मध्य आणि पश्चिम आशिया तसेच ग्रीक-रोमन साम्राज्याशी असणाऱ्या व्यापाराचा विस्तृत पट उलगडतो. दोन मदारींच्या बॅक्ट्रियन उंटाचे शिल्प, ग्रिफिन या ग्रीक लोककथेतील सिंह आणि गरुड यांच्या मिश्रणातून होणाऱ्या प्राण्याचे शिल्प यातून ते अधिक ठळक होते. नाशिकच्या 'त्रिरश्मी' लेण्यांत देखील या ग्रिफिनचे शिल्प आहे, यातून या व्यापाराच्या विस्तृत पटाची कल्पना येते. 

कान्हेरी बरोबरच जोगेश्वरी ही दुसरी महत्त्वाची लेणी आहेत. दक्षिण भारतातील सर्वात जुने किंबहुना भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असे जोगेश्वरी आहे. आज इतिहास अभ्यासाच्या सोयीकरता तांत्रिकदृष्ट्या त्याचे वर्गीकरण लेणी या प्रकारात केले जात असले तरी ते एक मंदिर आहे. यातून हे दिसून येते की मुंबईच्या परिसरात एकाच वेळी बौद्ध आणि हिंदू पद्धती-परंपरा गुण्यागोविंदाने नांदत होत्या किंबहुना बहरत होत्या. त्या बहराचे पुढचे पाऊल म्हणजे घारापुरीची लेणी. 

सदाशिव: घारापुरी

एका बाजूला मंदिर-लेणी-शिलालेख हे स्रोत धुंडाळत असताना तत्कालीन राजघराणी यांचाही आढावा सूरज पंडित यांनी घेतला आहे. मौर्य- सातवाहन- क्षत्रप- अभीर- गुप्त- वाकाटक- त्रैकूटक- कलचुरी- कोकण मौर्य- बदामी चालुक्य- राष्ट्रकूट- शिलाहार- मोढ- यादव- खिलजी- तुघलक- बहामनी- गुजरातचे सुलतान- मराठे- पोर्तुगीज- ब्रिटिश अशी सलग मालिका आहे. त्यात श्रीस्थानक म्हणजेच ठाण्यातून राज्य करणाऱ्या शिलाहारांनी कित्येक अप्रतिम देणग्या दिल्या आहेत. त्यात घोडबंदर, अंबरनाथ शिवमंदिर, आणि कित्येक मूर्तींचा समावेश आहे. श्रीस्थानक अर्थात ठाणे हे अनेक आळ्या-पाखाड्या आणि तलावांचे शहर म्हणून नावारूपाला आले ती शिलाहारांची कर्तबगारी आहे. 

परकीय व्यापारी आणि त्यांच्या अनुभवांतून उलगडणारा इतिहास समृद्ध करणारा असतो. हर्ष वर्धनच्या काळात भारत भ्रमणासाठी आलेल्या ह्युएन त्संगने आपले अनुभव लिहून ठेवले आहेत. आपल्या भ्रमण काळात त्याने शूर्पारक, कृष्णगिरी भिक्खू संघ आणि तत्कालीन राजवटींची भेट घेतली होती. ह्युएन त्संग लिहितो, "इथली माणसं साधी, सरळ पण स्वाभिमानी आहेत.." हे वाचून आपल्याबद्दलच एक अभिमान वाटू लागतो.

आठव्या शतकात अग्निपूजक झरत्रुष्टच्या अनुयायांना इस्लामी आक्रमणापासून वाचण्यासाठी पळ काढावा लागला. ते संजानला उतरले आणि दुधात साखर, पाण्यात मीठ मिसळून जावे तसे मिसळून गेले. त्यांचाही संपर्क येथील लोकांशी, राजवटींशी आला आणि त्यांचे व्यापारी संबध, त्यांचे अनुभव इतिहास उलगडण्यात मदत  करतात. पर्शियन लोक अशा पद्धतीने आले तर अरब व्यापारी त्यापूर्वीपासूनच येत जात होते. त्याचे उल्लेख आणि संपर्क अनेक ठिकाणी दिसून येतात. उत्तर कोकणात शनिवार तेली म्हणून ओळखले जाणारे ज्यू देखील मिसळून गेले आणि मुंबई परिसराला समृद्ध करुन गेले. 

यादवांच्या पाडावानंतर उत्तरेत गुजरातेत इस्लामी आक्रमणे झाली आणि लोकांच्या स्थलांतराचा मोठा ओघ मुंबई परिसरात आला. त्यांनी महिकावती म्हणजेच माहीमला आपली राजधानी थाटली. या स्थलांतरित लोकांमध्ये पाठारे प्रभू, सामवेदी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा समावेश आहे. मुंबईचा परिसर अनेक राजघराणी, जगभरातील व्यापाराच्या निमित्ताने येणारे लोक, व्यापारी-औद्योगिक समृद्धीमुळे, इतर भागातील आक्रमणे इत्यादींमुळे होणाऱ्या स्थलांतरामुळे सातत्याने बदलता राहिला. मध्ययुगीन काळातील सुंदोपसुंदी आणि तांत्रिक प्रगतीकडे केलेले दुर्लक्ष आणि पोर्तुगीज-इंग्रजांची राजवट हा इतिहास बहुतेकांना ज्ञात असतो. त्यामुळेच त्यापूर्वीचा समृद्ध इतिहास उलगडणारे हे पुस्तक वाचनीय, संग्राह्य आहे. 

पंडित यांना सातत्याने पडणाऱ्या प्रश्नांचा मागोवा घेताना, एका प्रकल्पा अंतर्गत हा इतिहास उलगडला आहे. तो एका वर्तमानपत्रात स्तंभलेखनाच्या माध्यमातून ते मांडत गेले आणि त्याचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. सामान्य वाचकांसाठी अचंबित करणारी माहिती सोप्या शब्दात आणि अभ्यासकांसाठी खोलात शिरण्यासाठी प्रवेशद्वार असे हे पुस्तक आहे. मुंबईत राहणाऱ्या आणि भारतभरातील लोकांनाही ठाऊक असावे की मुंबईचा इतिहास प्राचीन आहे यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, संग्राह्य आहे. मुंबईचा हा समृद्ध वारसा वाचून ही वारसास्थळे पाहण्याची, जतन करण्याची प्रेरणा मिळो ही सदिच्छा. 



Artha and the Civilisation: What Really Drives the Indian Economy

  Any system rests on two principal components. One is the driving force behind the system's construction, and the other is the guiding ...