Skip to main content

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट 

अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे? 

एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला. 

त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्चारात मराठीपण येणारच. काय करायचं ते करा.. ' का हो? 

हे असं तिरकं डोकं का चालतं? आणि लता मंगेशकर यांना अक्कल शिकवणारे हे कोण? लता मंगेशकर या साक्षात सरस्वतीच्या संगीत, उच्चार बाबतीत बोलण्याची आपली क्षमता नाही. शिकवणं तर लांबच राहिलं. तसेच त्यांना धर्म विचार यांबद्दलही काही शिकवण्याची, त्याबद्दल बोलण्याची आपली क्षमता नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदर्श मानणारे ते कुटुंब आहे. 

लता मंगेशकर यांनी उर्दू शिकण्याचे कष्ट घेतले. आणि तत्कालीन उर्दू शायरांचे प्राबल्य असणाऱ्या सिनेसंगीत सृष्टीत अनेक दशके आपले अधिराज्य गाजवले. उर्दू सोबतच हिंदी, अवधी, ब्रज, आणि भारतातील यच्चयावत भाषांमध्ये त्यानीं गाणी गायली. त्या प्रत्येक भाषेचा पोत, अंगभूत लय समजून, उच्चार स्पष्ट-शुद्ध राखत गायल्या. आपल्या मराठीत तर गायल्याच शिवाय संगीत दिग्दर्शनही केलं. त्या सृष्टीत त्या अनभिषिक्त सम्राज्ञी प्रमाणे वावरल्या. तितक्याच सन्मानाने भारतरत्न होऊन काहीशा निवृत्तही झाल्या. या सगळ्यात त्यांचा अंगभूत मराठीपणा नाही सुटला. त्यांनी सुटू नाही दिला. 

शिरीष कणेकर यांनी एक प्रसंग सांगितला आहे. लता मंगेशकर काणेकरांशी बोलताना एकदा म्हणाल्या होत्या, 'नव्या नट्यांमधे ही माधुरी माझ्याशी हिंदीत का बोलते? आता घरी गेल्यावर मी माईला, क्यों माई कैसी हो, वगैरे म्हणाले तर कसं वाटेल ते?' एक सरळ वाक्य, एक बिनतोड युक्तिवाद. 

त्यांनी आपलं मराठीपण दृढ राखत इतर भाषांवर प्रभुत्व मिळवत त्रिखंड गाजवला. आम्ही आजवर लता मंगेशकर यांच्या व्यक्तिमत्वामधून, कर्तृत्वामधून हाच अर्थ काढला. त्यामुळे अनर्थ नाही झाला, घोटाळा नाही झाला.  

मऱ्हाटीची बोलू कौतुके ते हेच. 

शिरीष कणेकर यांच्याच साक्षीने दुसरा प्रसंग. कणेकर नाना पाटेकर यांच्या घरी बसले होते. हिंदीतल्या एका निर्मात्याचा नानांना फोन आला. चित्रपटाच्या मानधना संबंधी बोलणी सुरु होती. नानांनी एक मोठा आकडा सांगितला. आणि घासाघीस करत एकेक दिवस उशीर करत राहिलास तर दिवसागणिक आकडा वाढत जाईल अशी गर्भित धमकीही दिली. कणेकर म्हणतात मीच जागच्या जागी संकोचलो, नानाला जरा सबुरीचा सल्ला देऊ लागलो तर, नाना म्हणे, जातात कुठे येतील बरोबर. तो आणि इतर अनेक निर्माते आले, नानांनी सांगितली ती रक्कम गुमान दिली आणि नाना हिंदी सिनेसृष्टीत सुपरस्टार झाले. कणेकरांनी या प्रसंगाचा शेवट, "कर्तृत्ववान मराठी माणसाचा हा आत्मविश्वास मला खूप काही शिकवून गेला." असा केला आहे. 

मऱ्हाटीची बोलू कौतुके ते हेच. 

असे अनेक प्रसंग सांगता येतील. संदर्भ देता येतील. मग पुढचा मुद्दा येतो तो आपण मराठी लोक मराठी बोलत नाही म्हणून रस्त्यावरच्या हातगाडीवर विक्री करणाऱ्या, रहिवासी सोसायटी मध्ये मराठी बोलत नाही म्हणून दमदाटी, मारहाण या संकुचित पातळीवर का आलो? मुंबईत अशा प्रसंगांचे प्रमाण जास्त आहे. 

मुंबई मुळातच एक Cosmopolitan शहर आहे. तिथे गिरगावातील मराठी माणूस अंबरनाथ-बदलापूर-वसई-विरार-डोंबिवली कडे कसा आणि का फेकला गेला याची कर्मकहाणी सर्वांना ज्ञात आहे. या मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी वगैरे लढणाऱ्या संघटनेने हे होत असताना काही फारसे केले नाही हा इतिहास आहे आणि वर्तमान तर अधिक भेदक आहे. 

मराठी बोलत नाही म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण, फेरीवाल्यांना मारहाण आणि हयात मुंबईत घालून मराठीचा म देखील ठाऊक नसणाऱ्या जावेद अख्तर, अमिताभ बच्चन आणि तमाम मांदियाळीला पायघड्या हा दुटप्पीपणा आता वर्तमानात अधिकच ठळकपणे दिसून येत आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य काय? नन्नाचा पाढा. मराठी माणूस उद्योजक व्हावा अधिक पुढे जावा म्हणून कार्य काय? वडापावच्या गाड्या आणि तत्सम कामे. मराठी माणसाला नोकरी नाही मिळाली तर विमानतळ धावपट्टी उखडून टाकू असल्या विध्वंसक धमक्या. आणि वर हे कलासक्त वगैरे म्हणून मिरवणार. 

हे मऱ्हाटीची कौतुके बोलावी? 

नुसतीच विध्वंसक भाषा बोलण्यापलीकडे जे खरोखर कार्य करतात त्यांच्याकडे आपलं कितपत लक्ष असतं? 

मराठी भाषेची महती, मराठी भाषा ही भव्य, दिव्य आहे हे ठणकावून सांगणारे कौशल इनामदार यांचे मराठी अभिमान गीत असे अनेक प्रकल्प झाले आहेत, होत आहेत. 

मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाहीत म्हणून नेहमीचा कांगावा असतो. मराठी प्रेक्षक म्हणजे निर्बुद्ध पब्लिक आहे हे गृहीत धरून त्यांना उपदेशाचे डोस पाजणारे चित्रपट करायचे, मराठी मनोरंजन वाहिन्यांवर चालणाऱ्या भंगार-टुकार-वाह्यात मालिकांचे कथानक संक्षिप्त करुन ते चित्रपट म्हणून पुढे आणायचे आणि मग आम्हाला स्क्रीन मिळत नाही हो म्हणून टाहो फोडायचे. असं कसं चालणार? शिवराज अष्टक, सैराट-दशावतार (मला स्वतःला हे अजिबात आवडलेले नाहीत) यांना स्क्रीनसाठी टाहो नाही फोडावा लागला तो? आणि, 

मराठी नाटक, मराठी सांगीतिक कार्यक्रम यांना दणदणीत मराठी आणि इतर भाषिक प्रेक्षक आहे. फोक आख्यान चा सांगीतिक थाट तिकीटविक्री सुरु केल्याच्या काही मिनिटात हाऊसफुल्ल होतो. म्हणजे दोष कोणाचा आहे? 

मराठी माणसाला एक न्यूनगंड आलेला आहे. नक्की कशाचा कोण जाणे? साधी राहणी, उच्च विचारसरणी, धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती वगैरे कुविचार कधी-कसे-का पक्के बसले कोण जाणे? पुल जे 'श्रीमंतीइतकं धट्टकट्ट काही नसतं हे कळेकळेपर्यंत पार लुळेपांगळे होऊन गेले...' म्हणाले ते खोटं नाही. किंवा उद्योजक मंदार भारदे 'का हो, उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी नाही का अंगिकारता येत?' हा बिनतोड प्रश्न विचारतात. 

मराठी ही अभिजात भाषा आहे. शासकीय मान्यता आता मिळाली इतकेच. पुल जे म्हणतात की ज्याला स्वभाषेवर प्रेम करता आले तोच इतर भाषांवर स्वार होऊ शकतो. लता मंगेशकर यांनी ते सिद्ध करुन दाखवलं आहे. आपण ही संकुचित वृत्ती सोडून द्यावी. न्यूनगंड सोडून द्यावा. योग्य अर्थ घ्यावे. न्यून ते सोडून द्यावे. मराठीपण दृढ राखावे, मऱ्हाटीची कौतुके बोलावी, जग पादाक्रांत करावे हेच बरे. 


Comments

Popular posts from this blog

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

रुपयाचा प्रश्न

वाढता डॉलर की घसरता रुपया: एका किचकट प्रश्नाचा मागोवा  फोटो सौजन्य: गुगल  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, "रुपयाची किंमत घसरत नाहीए, तर डॉलर अधिकाधिक बळकट होत आहे." असे विधान केले. त्यावर विरोधकांकडून अर्थमंत्र्यांची अक्कल काढणारे, त्यांच्यावर स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी करण्यात आलेले असत्य, गोलमोल विधान अशी टीका केली जाईल. पण अर्थशास्त्रीयदृष्ट्या विचार करता लक्षात घेतले पाहिजे की हे विधान काळजीपूर्वक, सर्व समजून-उमजून केलेले आहे. ते कसे हे समजून घेण्यासाठी मुळातून एखाद्या देशाचे चलन, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमत, होणारे बदल याचे गणित, शास्त्र समजून घ्यावे लागेल. हा विषय किचकट आहे, क्लिष्ट आहे. पण रोमांचकारी आहे. सध्या उलगडत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सर्व मुद्दा उलगडायचा असल्यामुळे चलन म्हणजे काय या मूलभूत मुद्द्यापासून सुरु न करता, थेट चलन विनिमय, आणि त्याचे दर याचा विचार करु.  चलन आणि विनिमय:  चलन विनिमय दर म्हणजे, एका चलनाची दुसऱ्या चालनाच्या तुलनेत होऊ शकणारी किंमत होय. ही किंमत ठरवण्याचे दोन मार्ग. एक, निश्चित दर आणि दुसरा...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...