Friday, 4 March 2022

अखेरचा हा तुला दंडवत



स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे.. शांता शेळकेंच्या शब्दांना स्वरसाज चढवणारी व्यक्ती ही त्यातल्या 'मराठी पाऊल पडते पुढे' चे मूर्तिमंत उदाहरण. यात काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. आठ दशकांहून अधिक काळ हिंदी, मराठी सोबत भारतातील जवळ जवळ सर्व भाषांतील हजारांच्या घरातील गाणी, मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन, अशी त्यांची देदीप्यमान कारकीर्द. ते मराठी पाऊल अवघे जग व्यापून दशांगुळे उरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे लता मंगेशकर. सर्वांच्या लाडक्या लता दीदी. त्यांच्या अचाट, अफाट कामगिरीचा यथोचित गौरव झाला. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न, चित्रपट जगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके सन्मान आणि अगणित सन्मान त्यांना मिळाले. कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण प्रत्येक पिढीला त्या 'आपल्या' वाटत आलेल्या आहेत. हे आपलेपण, हा जिव्हाळा, हे प्रेम, एखाद्याच्याच वाट्याला येते. ते आयुष्याचे संचित गाठण्यासाठी कुठली तपश्चर्या करावी लागत नाही. आपण निवडलेले क्षेत्र, त्यातली उत्तमता, उत्कृष्टता हीच तपश्चर्या होते. 

मुली औक्षवंत हो, असा आशीर्वाद देताना पु. लंनी यथार्थ वर्णन केले आहे की, "आमची पहाट लताच्या सुरांबरोबर उमलते. मध्यान्ह, सांज, रात्र, मध्यरात्र ह्याच सुरांची साथ घेऊन येतात. वातावरणात कुठे ना कुठेतरी लताचा स्वर मावळत्या किंवा उगवत्या सूर्य-चंद्राच्या साक्षीने विहरत असतात."  शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक उस्ताद बडे गुलाम अली आपल्या अनोख्या शैलीत म्हणतात, "कंबख्त कभी बेसुरीही नहीं होती." श्रेष्ठ संगीतकार सचिन देव बर्मन अनेक वेळा म्हणत असत, "लता आणि हार्मोनियम द्या, मी संगीत निर्माण करेन." सज्जाद हुसैन सारखे कलंदर, काहीसे विक्षिप्त संगीतकार, त्यांनी "सिर्फ लता गाती हैं, बाकी सब रोती हैं" असे उद्गार काढले होते. लतादीदी उत्कृष्ट आहेतच. त्यात वाद नाही. पण इतरांची अशी संभावना कशाला असा प्रश्न आपल्याला पडतो, पण तो कलंदर कलावंत बोलून गेला. १९६२ च्या भारत-चीन युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ तयार झालेल्या अजरामर 'ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी' गाण्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी, "बेटी तुमने मुझे आज रुला दिया" असे उद्गार काढले होते. 

गेल्या सात दशकांत अनेक पिढ्या बदलल्या. लोकांची अभिरुची बदलली. तंत्र बदलली. पण या सर्वात एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे काळानुरूप बदल स्वीकारत गेलेला, तरीही आपला आब राखलेला तो दिव्य आवाज. असं काय गूढ आहे त्या आवाजात की येणारी प्रत्येक नवी पिढी प्रेमातच पडते! शोध घ्यायचा प्रयत्न केला तर मती गुंग होते. शेवटी विचार करुन एका निष्कर्षावर यावे लागते ते म्हणजे कसलाही शोध घ्यायच्या फंदात पडायचे नाही. लता मंगेशकर नावाच्या अलौकिक गळ्यातून उमटलेली अवीट गोडीची गाणी ऐकायची. सुखाची, समाधानाची, आनंदाची परमावधी अनुभवावी. त्या विधात्याचे, परमेश्वराचे आभार मानावे की त्याने सहस्त्रकातून निर्माण होणारी मनुष्यरूपी वीणा या भरतभूमीत पाठवली. 


भारतीय चित्रपट संगीत हे एक प्रचंड मोठे भांडार आहे. त्या भांडारातील एक मोठा भाग लता मंगेशकर या गानकोकीळेच्या अवीट गोडीच्या गाण्यांनी भरलेला आहे. एखाद्या चित्रपट संगीत चाहत्याला, त्यातही लता दीदींच्या चाहत्याला बुचकळ्यात पाडायचं असेल, त्रेधातिरपीट उडवायची असेल तर, सर्व गाण्यांचा जवाहिरखाना समोर ठेवायचा आणि सांगायचं यातलं सर्वात आवडतं जवाहीर निवड. काय कपाळ निवडणार? कोण धांदल उडेल. पण या धांदलीत एक गोष्ट चांगली होईल की निवड करण्याच्या बहाण्याने त्या विशाल सागरात मनसोक्त विहार होईल. केवढा प्रचंड आकार तो! खेमचंद प्रकाश ते आजच्या ए. आर. रहमान ते मराठीतील सलील कुलकर्णी अशा संगीत दिग्दर्शकांची प्रचंड यादी. कोणाचं कुठलं गाणं आठवावं? चित्रपट संगीतात नव्या सांगीतिक वादळाच्या आगमनाची नांदी देणारं 'आएगा आनेवाला' पासून सुरुवात करता येईल कदाचित. पण थांबायचं कुठे? अंतच लागत नाही. 

सज्जाद हुसैन यांनी संगीत दिलेल्या 'संगदिल' सिनेमातलं 'दिल में समा गए सजन' समोर ठेवलं की 'तराना' मधले 'सीने में सुलगते हैं अरमान' दिसायला लागते. एका बाजूला सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेल्या 'अलबेला' मधील 'धीरे से आ जा रे अखियन में' ही कदाचित हिंदी चित्रपट संगीतातील सर्वोत्कृष्ट लोरी तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच 'अनारकली' मधलं कारुण्यपूर्ण 'ये जिंदगी उसीकी हैं' ही रेंज. गजल, आणि भावपूर्ण संगीत देणाऱ्या मदन मोहन यांच्याकडील 'आप की नजरो ने समझा प्यार के काबील हमें, नैना बरसे रिमझिम' किंवा मदन मोहन यांनी रचलेल्या चाली वापरून केलेली 'वीर-झारा' सिनेमातली गाणी. सलील चौधरी यांनी संगीत दिलेल्या 'मधुमती' मधली सगळीच गाणी त्यातही 'आजा रे परदेसी' सारखं गाणं आणि 'हाफ टिकिट' मधील 'वह इक निगाह क्या मिली' गाण्यातील इंटरल्यूड. त्या इंटरल्यूड मधील तान मानवी गळ्यातून निघाली आहे, यावर विश्वास बसणं कठीण आहे. पण तो मानवी गळा लता मंगेशकर असेल तर अशक्य काहीच नाही. 

लता दीदी आणि सचिन देव बर्मन यांच्यातला अबोला, बेबनाव, बर्मन यांच्या एका "लता, आजा, तुझे गाना हैं" या एका वाक्यावर संपला, आणि 'बंदिनी' सिनेमातलं 'मोरा गोरा अंग लै ले' सारखं अवीट गोडीचं गाणं जन्माला आलं. चित्रपट संगीतात धमाल कव्वाली सोबतच सर्व प्रकारचं संगीत देणाऱ्या रोशन यांच्यावर लतादीदींनी त्या निर्माण करु इच्छित होत्या अशा 'भैरवी सिनेमाचं संगीत विश्वासाने सोपवलं होतं. तो सिनेमा निघाला नाही. संगीतकारांच्या पिढ्या बदलत गेल्या. तंत्र बदलत गेलं. पण तो अलौकिक गळा गातच राहिला. थोरल्या बर्मनदांकडे बंदिनी ते आराधना आणि नंतरही गाणाऱ्या लता दीदींनी राहुल देव बर्मन यांच्याकडेही अनेक उत्कृष्ट गाणी गायली. त्यातही सर्वोत्कृष्ट म्हणता येईल 'आंधी' हा अल्बम. 'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा, इस मोड से जाते हैं' ही गाणी अत्युच्च सांगीतिक आनंद देणारी आहेत. 

लतादीदींच्या एकल गाण्यांसोबतच युगल गीतांचेही प्रचंड भांडार आहे. लता-रफी, लता-किशोर, लता-तलत, लता-हेमंत कुमार, लता-मन्ना डे, लता-येसूदास ते लता-उदित नारायण, लता-कुमार सानू अशी मोठी यादी आहे. प्रत्यक्ष जोडीची एक एक गाणी निवडणे हे एक दिव्यच आहे. पण एकेकच भन्नाट गाणी सांगायची तर, 'ताज महल' मधील लता-रफी यांचं 'जो वादा किया वो निभाना पडेगा' हे ऐका. लता-किशोर जोडीचं 'अभिमान' मधील 'तेरे मेरे मिलन की ये रैना' ऐका. लता-तलत यांचे 'तराना' मधले 'नैन मिले नैन हुए बावरे' ऐका. लता-हेमंत कुमार यांचे 'पतिता' मधले 'याद किया दिल ने कहाँ हो तुम' ऐका. लता-मन्ना डे यांचे 'बसंत बहार' मधील 'नैन मिले चैन कहाँ' ऐका. लता-उदित नारायण यांचे 'दिल तो पागल हैं' मधले 'कब तक चूप बैठे, अब तो कुछ है बोलना' ऐका. लता-कुमार सानू यांचे 'जब प्यार किसीसे होता हैं' मधले 'मदहोश दिल की धडकन' ऐका. ही यादी वाटेल तेवढी वाढवता येईल. 

महल मधल्या नवख्या मधुबालाला जो आवाज शोभला तो पुढील काळात हेमा मालिनी, अमृता सिंग, माधुरी दीक्षित, काजोल वगैरेंना देखील चपखल बसला. वयाच्या त्या टप्प्यावर देखील 'दीदी तेरा देवर दिवाना, चॉकलेट लाईम ज्यूस आईस्क्रीम टॉफीया' ही गाणी श्रवणीय वाटली. पुढल्या काळात त्या दैवी आवाजाला न्याय दिला तो ए. आर. रहमान या तितक्याच तोलामोलाच्या संगीतकाराने. मणिरत्नमच्या 'दिल से' मधले 'जिया जले जां जले', 'लगान' मध्ये परमेश्वराला घातलेली आर्त हाक 'ओ पालनहारे' आणि काळजाला हात घालणारे 'रंग दे बसंती' मधील 'लुकाछुपी बहुत हुई' ही गाणी खरोखर वेगवेगळा पण दैवीय आनंद देतात. 


हिंदी चित्रपटांबरोबरच लतादीदींची मराठी संगीतातील कारकीर्द तर दुहेरी आहे. गायिका त्याच बरोबर अनेक चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शक म्हणून. त्यांनी 'आनंदघन' या नावाने संगीत दिग्दर्शन केले. त्यात 'साधी माणसं' चित्रपटातले 'ऐरणीच्या देवा' आहे, 'मराठा तितुका मेळवावा' मधील 'रेशमाच्या रेघांनी, शूर आम्ही सरदार आम्हाला', मोहित्यांची मंजुळा मधील 'बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला' ते कित्येक गाणी. यादी करायला बसलो तर 'धुंडिराज' होऊन जातो. मराठी चित्रपट गीतांबरोबरच भजन, अभंग, भावगीत असे अनेक प्रकार त्यांनी गायले. त्यात संत ज्ञानेश्वरांच्या 'अवचिता परिमळू, रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा' अशा विरहिणी आहेत. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली 'श्रावणात घननीळा बरसला' अशी भावगीते आहेत. पंडित भीमसेन जोशींसोबत भैरवी रागातील 'बाजे रे मुरलीया बाजे' हे भजन आहे. बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या जैत रे जैत मधील 'मी रात टाकली' असो की उंबरठा मधील 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या' अशी किती गाणी! 

पण या सर्वाचा कळसाध्याय आहे तो शब्दप्रभू स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांना त्यांनी दिलेला स्वरसाज. जयोस्तुते श्री महन्मंगले हे स्फूर्तिगीत, मातृभूमीच्या ओढीने सागरास घातलेली साद, सागरा प्राण तळमळला, स्वातंत्र्यवीरांचे शब्द सुयोग्य चाल आणि योग्य कंठातून उमटले. ते अजरामर झाले. असाच दुसरा अप्रतिम आविष्कार म्हणजे 'शिवकल्याण राजा', शिवरायांची आरती 'जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया' बाल शिवबाला स्वातंत्र्याची अंगाईगीतातून स्वातंत्र्याची शिकवण 'गुणी बाळ असा जागसी का रे' शिवरायांचे ते साक्षात नृसिंह रुप 'हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा' ते समर्थ राम दासांच्या प्रतिभेतून उमटलेला शिवरायांच्या कौतुकाचा वर्षाव 'निश्चयाचा महामेरू'. या अद्वितीय कार्यासाठी त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. आभार मानावे तेवढे थोडे. 

गोव्याच्या मंगेशीच्या महादेवाच्या अभिषेकाचा मान असणारे हे घराणे. घरात कीर्तन परंपरा. गायनाचा ध्यास घेऊन दीनानाथ नाटक कंपनीत गेले. ते नाट्यसंगीत क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणारे मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. त्या अद्वितीय गायक-नटाची लता ही थोरली लेक. दीनानाथांच्या अकाली निधनानंतर घराची जबाबदारी आलेली. त्यांनी आपल्या थोर पित्याचा वारसा पुढे चालवत, तो वृद्धिंगत करत, त्रिकाल कीर्ती मिळवली. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही सर्वच भावंडे सरस्वतीचे वरदान घेऊन आली. लता दीदींनी दिगंत कीर्ती मिळवली. उदंड यश, प्रेम, जिव्हाळा त्यांना लाभला. उदंड आयुष्य त्यांना लाभले. पण जन्माला यायचा तो एक दिवशी जाणारच. जन्म-मृत्यूचा फेरा कोणाला चुकला नाही. चुकणार नाही. त्या कातर भावना बाकीबाब बोरकरांनी कागदावर उतरवल्या आहेत. अगदी अलीकडे डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केल्या. त्याच दैवी आवाजाने त्या भावना स्वरसाजात उतरवल्या. 
"आयुष्याची आता झाली उजवण 
येतो तो क्षण अमृताचा 
जें जें भेटे तें तें दर्पणाचे बिंब 
तुझे प्रतिबिंब लाडे गोडे 
संधीप्रकाशात अजून जो सोने 
तो माझी लोचने मिटो यावी" 
भरल्या अंतःकरणाने त्या अलौकिक व्यक्तीला निरोप देताना, शांता शेळक्यांचे शब्द हाताशी घ्यावे वाटतात, अखेरचा हा तुला दंडवत. 

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरुण भारत 

Wednesday, 2 March 2022

कोण होते वाकाटक?





भारताचा हजारो वर्षांचा देदीप्यमान इतिहास हा गौरवाचा, अभिमानाचा विषय आहे. इथल्या दगडादगडाला इतिहास आहे. मातीचा प्रत्येक कण त्या इतिहासाचा साक्षीदार आहे. भारतात विविध काळात, विविध प्रदेशात विविध राजवंश राज्य करुन गेले. भारतीय इतिहासाकडे एकाच दृष्टीने, एकच एक प्रदेश डोळ्यासमोर ठेऊन इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला तर ती इतिहासाशी, इतिहास मांडणी शास्त्राशी प्रतारणा होईल. हाच भारताचा इतिहास म्हणून जो मांडण्यात आला आहे, पाठ्यक्रमात आहे तो असाच एकांगी आहे. इतिहास, मांडणी ही जणू काही आपली मक्तेदारी आहे याप्रमाणे डाव्या इतिहासकारांनी थोपला. काही वेगळेपण मांडणारे, इतिहासाशी प्रामाणिक राहून मांडणी करणारे यांच्या ग्रंथांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळणार नाही याची तजवीज करण्यात या मंडळींनी काळ खर्ची घातला. 

भारतीय विद्या भवन, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेज आणि अशा अनेक संस्थांमधून चालणारे थेट उत्खनन, ताम्रपट, शिलालेख, नाणी, ग्रंथ, मंदिरे, लेण्या, कला यांच्या प्रत्यक्ष अभ्यासाद्वारे चालणारे संशोधन काहीसे मागे पडले. वास्तविक श्रेष्ठ इतिहास तज्ज्ञ म. के. ढवळीकर, काशीप्रसाद जायस्वाल, गो. ब. देगलूरकर, महाजन, राजवाडे, मजुमदार, प्रा. सांखळिया, इत्यादी लोकांचे विस्तृत, प्राथमिक संशोधनावर आधारित लेखन उपलब्ध आहे. पण ते काहीसे मागे पडले होते. पण आता देशाच्या विविध भागातला, प्रमुख धारेत दुर्लक्षिला गेलेला इतिहास पुढे येत आहे. तो येणे गरजेचे आहे. त्याच मालिकेत, 'कोण होते वाकाटक?' हे प्रा. डॉ. अरविंद जामखेडकर यांचे पुस्तक अपरान्त प्रकाशन घेऊन आले आहेत. 

प्रा. जामखेडकर यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि अर्धमागधी विषयात बी. ए., संस्कृत आणि भाषाशास्त्र या विषयात एम. ए., वसुदेवहिंडी-अ कल्चरल स्टडी या विषयावर संशोधन करून पीएच. डी. केले. नागपूर विद्यापीठात भारतीय इतिहास, संस्कृती, आणि पुरातत्व विभाग, १९७७ ते १९९७ या काळात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि संग्रहालये या संचालनालयाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. या काळात अनेक प्रत्यक्ष उत्खनन कार्य, ऐतिहासिक स्थळांच्या भेटी, श्रेष्ठ पुरातत्त्वज्ञ, इतिहास तज्ज्ञ यांच्या कार्याचा अभ्यास या आधारे प्रा. जामखेडकर यांनी प्राचीन भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान, कला आणि स्थापत्य, बृह्दश्म संस्कृती या विशेष अभ्यासाच्या क्षेत्रात ग्रंथ लेखन केले आहे. त्याच मालिकेत त्यांचे भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ म्हणता येईल अशा काळावर आणि त्यातील महत्त्वाचा राजवंश वाकाटक यांच्यावरील पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. 

प्रा. जामखेडकर यांनी या पुस्तकात इतिहसा मांडणीची अनोखी पद्धत अवलंबली आहे. सुरुवातच वाकाटक कोण, महाकवी कालिदास आणि गुप्त-वाकाटक संबंध यांचा दाखला देऊन करतात. त्यानंतर तत्कालीन बदलत्या धर्मसंकल्पना आणि त्यामुळे स्थापत्य, कला, समाज यांच्या मांडणीत काय बदल झाले आणि त्यांचा गुप्त-वाकाटक कालीन इतिहास समजण्यास, अभ्यास करण्यास कसा लाभ झाला याचे सूतोवाच करतात. धार्मिक संकल्पनांबाबत जामखेडकर यांनी महामहोपाध्याय वा. वि. मिराशी, भाऊ दाजी लाड आणि इतर काही श्रेष्ठ इतिहास, संस्कृती तज्ज्ञांच्या अभ्यासाधारे काही निरीक्षणे नोंदवतात, ती सद्यकाळातील धार्मिक कल्पना, निष्कारण निर्माण होणारे, केले जाणारे कलह या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आहेत. जामखेडकर यांनी त्या काळाचे द्योतक, बदलता हिंदू आणि एकूणच भारतीय समाज, समाजरचना यांचे अचूक वर्णन केले आहे. 

गुप्त-वाकाटक काळ म्हणजे मौर्य-शुंग-सातवाहन-कुशाण काळानंतर आलेला आहे. दरम्यानच्या काळात जैन-बौद्ध या क्रांतिकारी कल्पना येऊन, पंथ स्थापन झाले, त्यातही काळाच्या ओघात तात्त्विक मतभेद इत्यादी होऊन त्यांच्यातील संप्रदाय निर्माण झाले. प्रत्येक बंडखोरी कालांतराने प्रचलित व्यवस्थेत सामावून घेतली जाते, स्वतःच एक व्यवस्था बनून जाते या न्यायाने बौद्ध आणि जैन हे स्थापन झाले होते. त्याच काळात वैदिक धर्मात बदल होत होते. पुराणे घडत होती. नव्या प्रकारचा हिंदू धर्म पुढे येत होता. आगमाधिष्टित धर्म व्यवस्था पुढे आली. त्यातून शैव, वैष्णव, शाक्त इत्यादी पंथ-संप्रदाय पुढे येत गेले. होम-हवनातील बळी नाकारले गेले आणि धान्य, तूप, दूध इत्यादींचा अंगीकार झाला. इतिहासतज्ज्ञ नयनज्योत लाहिरी यांनी तो बदल स्पष्टपणे मांडला आहे, ते म्हणतात अशोकाचे शिलालेख प्रकृतीमध्ये आहेत, तर गिरनार येथील रुद्रदामनचा शिलालेख वाङ्मयीन मूल्य असणाऱ्या संस्कृतमध्ये आहे. हे अचानक कसे घडले? कारण गुप्त सम्राटांनी वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाला पाठबळ दिले होते. अशा सर्व पार्श्वभूमीवर, सातवाहन राजवट उतरणीला लागलेली असताना सातपुड्याच्या परिसरात विंध्यशक्ती या वाकाटकांच्या आद्य पुरुषाने आपल्या राजवटीचा प्रारंभ केला. 

एका भविष्यवाणीनुसार या वाकाटक वंशाच्या चार शाखा होतील व त्या विविध प्रदेशावर राज्य करतील असे नमूद करण्यात आले होते. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांनुसार वाकाटक राजवंशाच्या दोन शाखा निश्चित आहेत. त्यातली एक रामटेक जवळच्या नंदीवर्धन (सध्याचे नगरधन) येथून तर दुसरी शाखा वत्सगुल्म (सध्याचे वाशिम) येथून राज्य करत होती. गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य याची मुलगी प्रभावतीगुप्ता ही नंदीवर्धन शाखेचा वाकाटक राजा रुद्रसेन याची पत्नी. रुद्रसेनाचे अकाली निधन झाल्यामुळे खूप मोठा काळ प्रभावतीगुप्ता मुले लहान असल्यामुळे स्वतः राज्य करत होती. तिच्यासोबत उज्जयनीहुन प्रभावतीगुप्ताच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तसेच साहाय्य करण्यासाठी पाठवलेला चंद्रगुप्ताचा विश्वासू म्हणजे महाकवी कालिदास. याच कारणामुळे मघदूत या काव्याची निर्मिती रामगिरी म्हणजेच रामटेकला झाली. 

वाकाटक राज्याचा इतिहास वैभवसंपन्न आहे. हा इतिहास अभ्यासण्यासाठी विश्वसनीय पुरावे, साधने म्हणजे लेणी, मंदिरे, ताम्रपट, नाणी, पुराणे, शिलालेख आणि ग्रंथ हे आहेत. महाराष्ट्रात सातवाहन काळापासून प्रामुख्याने लेणी खोदण्यास आरंभ झाला आहे. त्याची परमावधी गुप्त-वाकाटक आणि पुढे चालुक्य-राष्ट्रकूट काळापर्यंत झाली आहे. मध्य प्रदेशातील बाघ, उदयगिरी, विदिशा, महाराष्ट्रातील धाराशिव, कान्हेरी, घारापुरी आणि अजिंठा इत्यादी अनेक लेण्या. मांढळ, रामटेक, लक्कमेट्टा, वाशिम इत्यादी ठिकाणची मंदिरे आणि असंख्य ठिकाणी मिळालेली नाणी, ताम्रपट हे वाकाटकांच्या वैभवशाली इतिहासावर प्रकाश टाकतात. लेणी खोदण्याची पद्धत, खांब, मूर्ती खोदण्याची पद्धत यावरुन कालनिश्चिती कशी केली जाते, उपलब्ध लिखित साहित्य आणि लेणी, मंदिरे, स्तूप, निवासस्थाने यांचा तौलनिक अभ्यास करुन काल, राजवंश निश्चिती कशी केली जाते ही इतिहास अभ्यासाची पद्धत या पुस्तकात मुळातून वाचण्यासारखी आहे. 

भारतीय इतिहासात एकच एक राजवंश, कोणत्या तरी प्रमुख स्थानावरुन राज्य करत आहे, तोच प्रमुख इतिहास अशी मांडणी केल्यास ती खूप मोठी प्रतारणा ठरेल. महाभारत काळ हा इतिहास धरून पुढे गेलो तर युधिष्टिर ते समुद्रगुप्त असे अनेक चक्रवर्ती सम्राट झाले, त्यांनी दिग्विजय केला. पण एक गोष्ट कायम आहे की स्थानिक राजवंश सार्वभौम, बलशाली सम्राटाचे श्रेष्ठत्व मान्य करुन आपापल्या प्रदेशात राज्य करत असत. तोच प्रकार दक्षिणेत गुप्त-वाकाटक आणि नंतरच्या राजवंशांना लागू होतो. म्हणूनच वाकाटक राजे प्रबळ बलशाली होते त्यावेळी कोसल, मालव, मेकल, त्रैकूटक, नाग, कुंतल, राष्ट्रकूट, विष्णुकुण्डी इत्यादी स्थानिक राजवंश वाकाटकांचे मंडलिक म्हणून राज्य करत होते. त्यातले राष्ट्रकूट, कदंब इत्यादी वंश पुढे अधिक बलशाली झाले, स्वतंत्र, सार्वभौम राजे झाले. राष्ट्रकुटांच्या काळात वेरूळचे कैलास लेणे तयार झाले. हे राजवंश वाकाटकांचे मंडलिक होते म्हणजे काय, त्यांचे वाकाटक आणि तत्कालीन काळात आणि सध्याच्या काळात इतिहासातील महत्त्व प्रा. जामखेडकर यांनी उत्कृष्टरित्या उलगडून सांगितले आहे. 




वाकाटक काळातील सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे अजिंठा, ज्याच्या निर्मितीमध्ये वाशिम शाखेच्या हरिषेण राजाची प्रेरणा, आधार यावर स्वतंत्र प्रकरण आहे. लेणी निर्मिती, काल निश्चिती, चित्रकला त्यांचे इतिहास अभ्यासातील महत्त्व चौकसपणे वाचले पाहिजे. लेण्यांची जागा, त्यांचे व्यापारी मार्गांशी संबंध, व्यापारी भरभराट यामुळे हा काळ समृद्ध होता याची मीमांसा जामखेडकर यांनी उत्तम प्रकारे केली आहे. गुप्त-वाकाटक तसेच त्यांचे मंडलिक राजे प्रामुख्याने हिंदू आहेत, ज्यांनी वाजपेय, अश्वमेध असे यज्ञ केले, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले, पण लेण्यांची संख्या आणि त्यातील जैन-बौद्ध लेण्यांचे प्रमाण यावरून धार्मिक सहिष्णुता दिसून येते. आर्थिक सुबत्ता, सामाजिक सलोखा यांमुळे हा निश्चितच भारताचा सुवर्णकाळ म्हणता येतो. इसवीसनाचे तिसरे ते सहावे शतक हे भारतातील सामंतशाहीचे, आर्थिक दुर्बलतेमुळे सामाजिक विषमता वाढीला लागली असे काही इतिहासकारांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला जामखेडकर यांनी एके ठिकाणी परिच्छेदात संयत भाषेत पण ठाम उत्तर दिले आहे. वास्तविक संपूर्ण पुस्तक आणि मांडणी हेच अशा इतिहासकारांना ठाम उत्तर आहे. त्यामुळे आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या इतिहासाचा हा धांडोळा प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. 

पुस्तक: कोण होते वाकाटक?
लेखक: प्रा. डॉ. अरविंद जामखेडकर 
प्रकाशन: अपरान्त प्रकाशन 

- शौनक कुलकर्णी 
- भ्र: ९४०४६७०५९०
- ईमेल: sgk28774@gmail.com




Artha and the Civilisation: What Really Drives the Indian Economy

  Any system rests on two principal components. One is the driving force behind the system's construction, and the other is the guiding ...