Skip to main content

विश्वास कसा ठेवावा?


दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी.

ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.
“आमचा मुलगा निष्पाप आहे.”
“सरकार खोटे आरोप करते.”
ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो, विश्वास कसा ठेवावा?

मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले. 

पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या शंभरपैकी नव्व्याण्णव यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी. 

२०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली पदार्थ असो किंवा देशभरात पकडलेले ISIS प्रेरित ‘लोन वुल्फ’ ही सर्व यशस्वी कारवाया शांततेचा पाया बळकट करत राहिल्या. पडद्यामागे गुप्तचर यंत्रणांनी शेकडो कट उधळले, हल्ले रोखले. अनेकांना अटक झाली, शस्त्रसाठे हाती लागले. या सर्व घटनांच्या छोट्या बातम्या झाल्या, चर्चा नाही.

कारण यशस्वी कारवाई मुख्य शीर्षक होत नाही; पण एक अपयश देश हादरवते.

लाल किल्ल्यातील स्फोट हे असेच ‘निसटते अपयश’. १९ ऑक्टोबरपासून जम्मू-कश्मीरसह गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, पुणे अशा ठिकाणी साखळी अटकसत्रे झाली. इंजिनिअर, डॉक्टर, पॅरामेडिक असे सुशिक्षित लोक या जाळ्यात सापडले. प्राथमिक अंदाजानुसार, सर्व साथीदार पकडले गेल्याचे लक्षात आल्यावर डॉ. उमरने आत्मघातकी स्फोट केला.

तपास सुरू आहे; अनेक माहिती पुढे येईल.

अशा वेळी काही माध्यमांचे नेहमीचेच दृश्य पुन्हा दिसले. दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांच्या मुलाखती.

याचे उत्तर एका वैयक्तिक अनुभवातून देता येईल.

२००४–०५ चा काळ. आम्ही परभणीत राहत होतो. नांदेडमध्ये आमच्या नव्या घराचे बांधकाम सुरू होते. माझा मामा अभियंता असल्यामुळे कंत्राटदार, मिस्त्री हे त्याच्या ओळखीतील.

एका कामानिमित्त मी नांदेडला गेलो होतो आणि परतताना बांधकामाचे साहित्य आणणाऱ्या ट्रकमध्येच यायचे ठरले. परभणीत मला घ्यायला येणारी व्यक्ती उशिरा पोचली, त्यामुळे मी त्या कंत्राटदार-मिस्त्रींच्या घरी थांबलो.

घर अगदी सामान्य. टीव्ही, सीडी प्लेअर, आणि सीडींचा गठ्ठा. मी कंटाळू नये म्हणून त्यांनी टीव्हीवर एक सिनेमा लावला.

तो सिनेमा पाकिस्तानी होता.

प्रश्न तिथून सुरू झाले. 

त्या काळात परकीय सिनेमाचा अर्थ, हॉलीवूड, किंवा ब्रूस ली-जॅकी चॅन.

मग प्रश्न निर्माण झाला, पाकिस्तानी सिनेमे? ना ते काही विशेष लोकप्रिय, ना ते जागतिक दर्जाचे. रभणीसारख्या शहरातील एक साधारण कंत्राटदार-मिस्त्रीच्या घरात पाकिस्तानी सिनेमांच्या अनधिकृत सीडींचा गठ्ठा का?

  • इतकी आवड?

  • कोणता सांस्कृतिक प्रभाव?

  • कुठली सामाजिक ओढ?

  • की अजून काही?

तेव्हा इंटरनेट नव्हते, युट्यूब नव्हता. तरीही त्या "सीडी" घरोघरी कशा? आणि त्या का हव्या असायच्या? हे काही तात्काळ तर्क लावण्यासारखे साधे प्रकरण नव्हते. हा प्रश्न तेव्हाच मनात पेरला गेला.

जेव्हा एखादा दहशतवादी पकडला जातो तेव्हा कुटुंबीय "तो निरपराध आहे" असे सांगतात. शेजारी त्याला ‘चांगला मुलगा’ म्हणतात. पण एखाद्या समाजात आतून काय पाहिले जाते, काय ऐकले जाते, कोणते प्रभाव आणि कथनं प्रसारित होतात, हे बाहेरच्यांना दिसत नाही.

कधी कधी "आम्ही ८०० वर्षे राज्य केले" अशा मानसिकतेची सावली अजूनही काहींच्या अवचेतनात दिसून येते. आणि त्यामुळेच प्रश्न उरतो, 

विश्वास कसा ठेवावा?

दहशतवादाच्या विरोधातील युद्ध केवळ सीमेवर नाही तर ते घरोघरी लढायचे आहे. सुरक्षा यंत्रणा हल्ले रोखू शकतात. पण संशय, भीती, आणि अविश्वास यांचं निराकरण 'त्या' समाजालाच करावे लागणार आहे. तोवर हा प्रश्न कायम राहणार आहे, 

विश्वास कसा ठेवावा? 

Comments

Popular posts from this blog

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

रुपयाचा प्रश्न

वाढता डॉलर की घसरता रुपया: एका किचकट प्रश्नाचा मागोवा  फोटो सौजन्य: गुगल  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, "रुपयाची किंमत घसरत नाहीए, तर डॉलर अधिकाधिक बळकट होत आहे." असे विधान केले. त्यावर विरोधकांकडून अर्थमंत्र्यांची अक्कल काढणारे, त्यांच्यावर स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी करण्यात आलेले असत्य, गोलमोल विधान अशी टीका केली जाईल. पण अर्थशास्त्रीयदृष्ट्या विचार करता लक्षात घेतले पाहिजे की हे विधान काळजीपूर्वक, सर्व समजून-उमजून केलेले आहे. ते कसे हे समजून घेण्यासाठी मुळातून एखाद्या देशाचे चलन, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमत, होणारे बदल याचे गणित, शास्त्र समजून घ्यावे लागेल. हा विषय किचकट आहे, क्लिष्ट आहे. पण रोमांचकारी आहे. सध्या उलगडत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सर्व मुद्दा उलगडायचा असल्यामुळे चलन म्हणजे काय या मूलभूत मुद्द्यापासून सुरु न करता, थेट चलन विनिमय, आणि त्याचे दर याचा विचार करु.  चलन आणि विनिमय:  चलन विनिमय दर म्हणजे, एका चलनाची दुसऱ्या चालनाच्या तुलनेत होऊ शकणारी किंमत होय. ही किंमत ठरवण्याचे दोन मार्ग. एक, निश्चित दर आणि दुसरा...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...