Saturday, 14 December 2013

Savai Gandharv Mahotsav.



           गुलाबी थंडी. संध्याकाळची वेळ. वातावरणात  वेगळीच धुंदी होती. हजारोंचा जनसमुदाय कानात प्राण आणून बसलेला. एकाच ध्यासासाठी. स्वरांची आतषबाजी कानात साठवण्यासाठी. रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी. चार-पाच दिवस चालणारा हा महोत्सव स्वरांची पर्वणी असते.  महोत्सवाला आबालवृद्धांची अलोट गर्दी असते. आमच्यासारख्या तरुणाईचीही संख्या लक्षणीय असते. तिथे संगीतातले जाणकार येतात त्याचप्रमाणे आमच्यासारखे 'अ'जाणकारही येतात. शास्त्रीय संगीतातलं रागाचं नाव रागात अस्ताई, अंतरा वगैरे असतात यापलीकडे काहीही माहिती नसणारे आमच्यासारखे 'अ'जाणकार तिथे येतात ते फक्त गायकीतला गोडवा, ती नजाकत ऐकण्यासाठी.  शास्त्रीय घटक कळत नसले तरी ते ऐकायला छान वाटतात आणि डोक्यात काहीतरी स्ट्राईक होतं. बस्स!! एवढ्याचसाठी आम्ही तिथे जातो. यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंडित संजीव अभ्यंकर-डॉ.  अश्विनी भिडे-देशपांडे यांची 'जसरंगी' मैफल, उस्ताद निशात खान यांची सतार आणि त्याला पंडित आनिन्दो चात्तार्जी यांची तबल्यावर साथ. आणि संगीत मार्तंड पंडित जसराज यांचा स्वरसाज. ही पर्वणी सोडणं शक्यच नव्हतं.
               जसरंगी मैफिलीत मूर्छना प्रकारचे सादरीकरण पंडित अभ्यंकर आणि पंडिता भिडे-देशपांडेनी केले. पंडिता अश्विनिजीनी राग अभोगी आणि पंडित अभ्यंकरांनी राग गायले. एकाच मंचावर  भिन्न राग  मांडले. सारेगम पर्यंत राग अभोगी तर मध्यमाला षड्ज मानून कलावती राग पेश केला. (म्हणजे नक्की  झालं ते कळलंच नाही) पण संजीव अभ्यंकरांचा गोड आवाज, भिडे-देशपांडेंचा आवाज, त्या दाणेदार ताना ऐकायला मजा येत होती. त्यानंतरचा राग दुर्गा आणि रागांचा राजा भूप अशीच झिंग आणून  गेला. एव्हाना थंडी वाढायला होती. या जसरंगी मैफिलीनंतर उस्ताद निशात खान आणि पंडित आनिन्दो याचं आगमन झालं. त्यांची सतार ऐकायला मी अतिशय उत्सुक होतो. सतार हे माझं आवडतं वाद्य. तरीसुद्धा प्रत्यक्ष सतार कधीच ऐकली नव्हती. आता योग आला होता.
             उस्ताद निशात खान यांनी यमन वाजवला. यमन राग हा एक अवघड राग आहे. आणि हिंदी सिनेमांमध्ये बरीच गाणी या रागाच्या सुरावटीवर  बेतलेली आहेत. इतकीच आम्हाला या रागाची माहिती. आणि तसाही माहिती करून घ्यायची इच्छा नव्हती. निदान त्या वेळी तरी. कानात प्राण आणून बसलो होतो. यमन रागाची आलापी सुरु होती. कुठल्याही शास्त्रीय वाद्याच्या मैफिलीत तबल्याची साथ सुरु होण्यापूर्वी जी काही सुरावट छेडली जाते त्याला आलापी म्हणतात, यापलीकडे 'आलापी' विषयी काहीही माहिती नव्हतं.  गमक आणि मींड यांनी बढत सुंदर जमली होती. अनेक आरोही-अवरोही वर्ण, खटक्या, मुरक्या, लांगडाट, जमजमा सुंथ यांची भरपूर रेलचेल होती असं एका जाणकाराने सांगितल्यामुळे कळलं होतं. (हे सगळं कधी येउन गेलं ते समजलंच नव्हतं )बाकी हे सोडलं तर, सतारीवरची ती करामत डोक्यात फिट्ट बसली होती. पंडित अनिन्दो यांची तबल्यावर उत्तम साथसंगत होती. त्या थंडीत हे दोन कलाकार बोटांमध्ये वीज संचारल्यागत सतार-तबल्यावर करामती होते. आणि मग मंचावर आगमन झालं संगीत मार्तंड पंडित जसराज याचं.
               या जसराज मैफिलीचा आनंद दुहेरी होता. पंडित जसराज यांच्या स्वरसाथीला पंडित संजीव अभ्यंकर होते. द्रोणाचार्य आणि अर्जुनच जणू. अर्जुन आपली कला दाखवून गेला होता आणि आता द्रोणाचार्य आपली आयुधं सरसावून आले होते. अभूतपूर्व योग होता तो. पंडितजींनी राग पुरिया सदर केला. 'अब मोरी रखो लाज' ही  विलंबित झपतालातली सुरु झाली. आणि शेवट मध्यलय त्रितालातली 'शामकुंवर मोरे घर आये' सादर केली. हीच बंदिश रेकोर्ड केलेली ऐकली आहे पण प्रत्यक्षात ती ऐकताना काही निराळीच अनुभूती येत होती. या पहिल्या दिवशीच्या अभोगी-कलावती, दुर्गा-भूप, यमन, पुरिया या रागांच्या मैफिलीमुळे सुरांचा अमृतकुंभच जणू उघडला होता.डोळे-कान तृप्त करणारा हा अनुभव संपूच नये असं वाटत होतं. ती मैफिल संपली तरी ती स्वरांची धुंदी पुढलं आयुष्यभर तरी उतरेल असं वाटत नाही.

Friday, 5 July 2013

Raigad trip.

                   गडांचा राजा…

                     महाराष्ट्र. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला, विविधतेनं नटलेला, विविध भाषा, विविध प्रकारची माणसं, विविध संस्कृती असणारा वैविध्यपूर्ण प्रदेश. इथे काय नाही? गोदावरी, कृष्णा-भीमेसारख्या नद्या कि ज्यांच्या काठाकाठाने इथली संस्कृती बहरली-फुलली. साक्षात भार्गवरामाने समुद्र मागे हटवून निर्माण केलेली कोकणची नितांतसुंदर भूमी. मायमराठीचा माहेरघर म्हणावा असा मराठवाड्याचा प्रदेश. समृद्ध वनांनी बहरलेली अशी विदर्भाची भूमी. इतकं सगळं असूनही आपल्या नितांतसुंदर आणि रौद्रभीषण अस्तित्व राखून या राष्ट्राभूमिचा खद पहारेकरी म्हणजे सह्याद्री. मराठेशाहीची मुहूर्तमेढ आपल्या अंगाखांद्यावर समर्थपणे रोवून घेणारा आणि अभिमानाने आजतागायत वागवणारा हा सह्याद्री. या महाराष्ट्र देशी चांद्यापासून-बांद्यापर्यंत ४०० हून अधिक गडकोट आहेत. त्यातले निम्म्याहून अधिक ह्या राकट, कणखर सह्याद्रीत आहेत. पुरंदर, राजगड, तोरणा, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, हरिश्चंद्रगड…. किती नावं सांगावीत? हे प्रमुख गडकोट, यांच्या जोडीलाच असंख्य लहानमोठे किल्ले हा सह्याद्री आपल्या अंगाखांद्यावर वागवतो आहे. पण या सगळ्यांचा राजा शोभावा असा गड म्हणजे गडांचा राजा रायगड. मराठेशाहीची दुसरी राजधानी. जिने छत्रपती शिवाजीचा राज्याभिषेक पहिला, संभाजीचा चौफेर पराक्रम पहिला. ह्या पराक्रमाचे साक्षीदार म्हणून आज हे गाड्कोतच उरले आहेत, तेही भग्न रुपात. त्या असीम पराक्रमाचं स्मरण करणं आपलं कर्तव्यच आहे. असाच पवित्र आणि उदात्त वगैरे हेतू उराशी बाळगून आम्ही पाच महाभाग या रायगड दर्शनासाठी निघालो. मी, शुभम, वरद, संकेत, आणि कौस्तुभ.  
               पावसाळा हा तसा सुट्ट्यांचा हंगाम. आणि आमच्यासारख्या भटक्यांसाठी तर हा पर्वणीचा काळ. ह्या सर्व गडकोटांच आणि एकूणच सह्याद्रीचं पावसाळ्यातलं रूप तर काय वर्णाव? साक्षात स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्यासारखं वाटतं. उरात प्रचंड उत्साह बाळगून आम्ही पुण्याच्या स्वारगेट स्थानकावर आलो. ( आपल्याकडचे लोक इतर काही बाळगो न बाळगो उत्साह, महत्वाकांक्षा वगैरे बाळगुनच  असतात.) बराच वेळ वाट पाहिल्यानंतर बस मिळाली. त्या भर सुट्ट्या संपण्याच्या काळातसुद्धा फारशी गर्दी नव्हती. त्या गाडीत प्रवासी पक्षात आम्ही पाच, तीन लोकांचं एक कुटुंब आणि दोन जोड्या होत्या. ST पक्षाकडून Driver आणि Conductor याचं आगमन झालं. तिकिटांचा नित्य कार्यक्रम झाला आणि त्या बसचा खडखडाट सुरु झाला. आम्ही ज्या ताम्हिणी घाट मार्गे जाणार होतो त्याची रसभरीत वर्णनं मी आधीपासूनच केलेली असल्यामुळे इतर चौघेजण भलतेच उत्साही होते ते पाहण्यासाठी. हि उत्सुकता इतकी शिगेला पोचली होती कि त्या तालात  वरद Conductor साहेबाना विचारता झाला, 
        "अं… साहेब ताम्हिणी घाट सुरु व्हायला किती वेळ आहे?" 
 Conductor  साहेबांनी माशी झटकावी तद्वत हा प्रश्न निकालात काढला, 
        " लई टायम आहे, बसा गुमान मागं… " प्रवासी वर्गात अपेक्षेप्रमाणे हास्यस्फोट झाला. आता बस पुण्यापासून बरीच लांब आलेली होती निसर्गाची मुक्त उधळण दिसू लागलेली होती. फोटो काढण्याचा सपाटा सुरु झालेला होता. आम्ही निव्वळ मजा करायला निघालेलो होतो त्यामुळे लाज शरम गुंडाळून ठेवून मुक्त शब्दांची नी हास्याची उधळण चाललेली होती. आमच्या नकळतच बसमधले इतर प्रवासीदेखील आमच्या हास्यकल्लोळात सामील होत होते. पुण्यापासून निघाल्यानंतर ताम्हिणी Actually सुरु होईपर्यंत प्रत्येकाने किमान ५ वेळा तरी मला प्रश्न विचारला असेल, 
          ''कधी सुरु होतोय बे घाट ?"
                     शेवटी एकदाचा तो घाट सुरु झाला. एका बाजूला मुळशी धरणाचा अथांग जलाशय आणि दुसर्या बाजूला उंच कडे आणि रस्त्याच्या कडेला पडणारे जलप्रपात. काय वर्णन करावं त्या सर्व परिसराचं? स्वर्ग म्हटलं तर स्वर्गाचादेखील अपमान होईल. डोंगरांवर पसरलेली पांढरी शुभ्र धुक्याची चादर आजूबाजूला सुंदर नजारा. कोणाच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. ह्या दीड तासात बस मध्ये मात्र काही मुलभूत बदल झाले होते.  काही नवीन लोक पिरंगुट-मुळशी वगैरे गावातून चढले होते. मी आणि शुभम एका सीटवर, संकेत आणि वरद एका सीटवर आणि कौस्तुभ एका सीटवर असे बसलो होतो. कौस्तुभच्या शेजारी एक जागरूक शेतकरी दादा बसले होते. निसर्गसौंदर्याचं शेतकारीदादाना  फारसं अप्रूप असण्याचं काही कारणच नव्हतं. मग काय करता, शेताकारीदादानी आपल्या सहप्रवाशाशी बोलणी काढली, 
             "पुन्याकडचे दिसताय जनू…. "
 कौस्तुभ् नि  सहनुभूतीदर्शक नुसतीच होकारार्थी मान हलवली. मग शेताकारीदादानी पावसापाण्याच्या चर्चा सुरु केल्या, 
         "आवंदा पाउस लई लवकर सुरु झाला, " कौस्तुभच्या चेहऱ्यावर 'कुठून या नसत्या आपत्तीत अडकलो असले भाव होते. आमचा लक्ष होतच. आम्ही आपले त्याचा चेहरा बघून हसू दाबण्याचे शक्य तितकी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो. 
         ''कुठले पुन्याचेच का आणखी कुठले तुम्ही?" इति शेतकरीदादा.  
         '' आम्ही परभणी चे… " अर्थात हे उत्तर कौस्तुभच. 
         ''पिकं कंचे घेता तुम्ही?" 
        '' सोयाबीन, कापूस आणि उस घेतो'' चेहऱ्याकडे पाहवत नव्हतं हो कौस्तुभच्या. शेवटी कुठल्या तरी गावात हे शेतकरीदादा उतरले. प्रवासात पंडित मैत्री होते म्हणतात. कौसुभच्या वाट्याला हे शेती पंडित आले होते. हा सुखसंवाद झाल्यानंतरचा त्याचा चेहरा म्हणजे, परमानंद वगैरे दाखवणारा चेहरा होता. आमची तर  हसून हसून मुरकुंडी वळली होति. हे सगळं होत होत माणगाव जवळ आलं होतं. बडबड हसणं हे सगळं करून पोरं कावली होती. एकदाचं माणगाव आलं, तिथून महाड ला जाण्यासाठी बस लगेच मिळाली. महाडला उतरलो. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. एका हॉटेलात रूम घेतली समान टाकलं, थोडेसे 'फ्रेश' झालो आणि तेवढ्यात महाराष्ट्र वीज मंडळाची अवकृपा झाली. लाईट गेले. आता काय करायचं? निघालो मग गाव भटकायला. बरं ते गाव पण काय? टिपिकल तालुक्याचा ठिकाण असतं त्या गावाला जशी कळा  असते तसलीच कळा होती. जेवणखाण करून झोपलो. 
                 दुसर्या दिवशी सकाळी, लवकर उठलो. Actually रोजची जी झोपायची वेळ असायची त्या वेळेला आम्ही चक्क झोप घेऊन उठलो होतो. रायगड पहायचा आहे हि धुंदी डोक्यात होती न! पटापट तयार झालो. महाड हून रायगड पायथ्याला कसे आलो ते सांगण्यात मी वेळ घालत नाही. रायगड पायथ्याला आलो. तिथलं दृश्य पाहून वाचाच बंद पडली. इतका ताम्हिणी घाट पाहून आलो पण जे समोर त्या क्षणाला दिसत होतं त्याला तोड नाही. चहापान करून 'हर हर महादेव' चा उद्घोष करून चढायला सुरुवात केली. रायगडाची चढाई भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवणारी गोष्ट आहे. सोपी आहे पण भरपूर आहे. सुरुवातीला गप्पा-गोष्टी कमी होत्या कारण पायर्या चढताना दमछाक होत होती. खुबलढा बुरुज आणि त्यांनतर थोडं अंतर गेल्यानंतर पायवाट आली. आजूबाजूला किरर्र झाडी आणि खोल दऱ्या मधून जाणारी चिंचोळी  वाट. खूपच सुंदर. एका बाजूला गडाचा काळाकभिन्न आणि दुसऱ्या बाजूला दरी असल्या वाटेतून जात होतो. सुमारे तासाभरानंतर गडाच्या तटबंदीच प्रथमदर्शन झालं. वाहत्या पाण्याचा आवाज फार तीव्रतेनं येत होता. पण किरर्र झाडीमुळे अंदाज येत नव्हता. समोर जाऊन पाहतो तो काय, एक पाण्याचा प्रपात भर वाटेतच पडत होता. त्या पाण्याचा तो आवाज, ते दृश्य अवर्णनीय. चान्स सोडण्याचा प्रश्नच नव्हता. वरद, संकेत, शुभम, कौस्तुभ त्या धारेखालीच जाऊन उभे राहिले. त्या थंड पाण्यात हात घटला तर गोठून गेला असता असलं थंड पाणी. तसल्या  पाण्याच्या धारेखाली जाऊन आम्ही उभे राहिलो. वरद तर उत्साहाच्या परमोच्च शिखरावर होता. फोटो चा धडाका उडालेला होता. त्या वाहत्या पाण्यात बसून ध्यान लाऊन बसणे  काय, पाण्यात अक्षरशः आडवा होणे काय! असल्या नाही नाही त्या गोष्टी करून झाल्या.  मनसोक्त भिजून पुढे निघालो. . महाद्वाराच्या अलीकडे आणखी एक धबधबा. तिथेही मनसोक्त भिजलो. ह्या प्रपाताची धार अजूनच बोचरी होती.  रायगडचा महादरवाजा साद घालत होता. 
                  रायगडाच्या महादार्वाजात उभे होतो. मी नेहमीप्रमाणे माहितीदानाला सुरुवात केली. महाद्वाराच्या बांधकामाचं वैशिष्ट्य वगैरे सांगून झालं. नी पुढे निघालो. रायगडचा महादरवाजा आला म्हणजे किल्ला आला असे नाही. तिथूनही अडीचशे पायर्या चढून जाव्या लागतात. तशा त्या चढून गेलो. आणि रायगडाची खरी ओळख असणारे ते विजयस्तंभ आणि बेलाग बालेकिल्ला समोर उभा राहिला. वरद, संकेत आणि शुभम नि रायगड पहिल्यांदाच पहिला होता. रायगडाच हे वैभव पाहून तर आनंदाला पारावर राहिला नाही. एकतर गडावर आमच्या शिवाय दुसरं कोणीही नव्हतं. नाही म्हणायला शिवराज्याभिषेक  दिनाच्या तयारीसाठी आलेले मंडप कार्यकर्ते होते. पण त्याचं काम राजसभेत सुरु होतं. विजयस्तंभ, ध्यानाची जागा, संभाजीचा महाल असं सगळं पाहत महाराजांच्या राजवाड्यात आलो. राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची ८ वर्ष इथे व्यतीत केली. आणि ३ एप्रिल १६८० ला याच ठिकाणी महाराजांनी आपली जीवनयात्रा संपवली. नंतर प्रधानांचे वाडे, राणीवसा आणि फड ( Administrative Office ) पाहून मागल्या बाजूनी राजसभेत प्रवेश केला. तिथे राज्याभिषेक दिनाची तयारी सुरु होती. या राजसभेतला आवाजाची विलक्षण व्यवस्था पाहून त्या काळच्या Engineer's ची तारीफ करत बाजारपेठेकडे निघालो. रायगडावर येउन शिव समाधीचं दर्शन न घेत जाण म्हणजे काशीला जाऊन विश्वेश्वराच दर्शन न घेत जाण्यासारखं आहे. समाधीचं दर्शन घेऊन उतरण्याच्या तयारीने वापस निघालो. 
                     उतरताना हलक्या प्व्साला सुरुवात झाली होती. त्यामुळे असल्या ठिकाणी जी वस्तू सर्वात जास्त वेळ खाते ती म्हणजे कॅमेरा, ती बंदिस्त होऊन बसली. त्यामुळे चढताना लागला त्याच्या अर्धाच वेळ उतरताना लागला. पायथ्याला येउन बसची वाट पाहत बसलो. चौकशीअंती कळले कि महाडकडे जाणारी एक बस नुकतीच गेली आहे. आता २ तास तरी बस नाही. ज्यासाठी इतका आटापिटा करून धावतपळत खाली उतरलो ती बस अमचा पुतळा करून निघून गेली होती. आता २ तास बस ची बघत बासना प्राप्तच होतं. तशी ती पाहत बसलो. रायगडावर आता मुसळधार पूस बरसात होता. समोर संपूर्ण पांढरी चादर पसरली होती. समोर उभा असलेला माणूस दिसत नव्हता अत्र एवढ्या उंचीचा रायगड काय दिसणार पण त्या रायगडावरून नजर हटत नव्हती एवढ मात्र खरं…!!

Friday, 17 May 2013

कर्नाटकचा निवडणुकीचा धुरळा…

                                    


    
                     लोकसभा निवडणुकीच्या रंगीत तालमी म्हणता येतील अशा कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली निवडणुका. त्यातही कर्नाटक आणि दिल्ली निवडणुका दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांसाठी महत्वाच्या आहेत. सलग तिसरी टर्म दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भोगणाऱ्या शीला दिक्षितांवर दिल्लीची जनता आणि त्यांच्याच पक्षातील लोक नाराज आहेत. दिल्ली महापलिका निवडणुकांमध्ये यश मिळवलेल्या भाजपसाठी दिल्लीत सत्ता स्थापणे हा कळीचा मुद्दा आहे. याउलट कर्नाटकात. भाजपला दक्षिणेतील राज्यात पहिल्यांदाच मिळालेली सत्ता टिकवण्याची धडपड करावी लागणार आहे. केंद्रात प्रचंड घोटाळ्यांची मालिका उभी करणाऱ्या सरकार विरोधात रान उठवणार्या भाजपच्या तोंडाला कर्नाटकातील खाण घोटाळ्यामुळे फेस आलेला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये भाजपची प्रस्थापित सत्ता आहे. त्या निवडणुका स्थानिक प्रश्नांवरच लढल्या जातील. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी विकासाचा ढोल पिटण्यास सुरवात केली आहे. छत्तीसगड राज्यात निवडणुकीवर नक्षलवादाचा प्रभाव असणारच आहे. राजस्थानात निवडणुकांची आणि प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी वसुंधरा राजेंकडे आलेली आहे. त्यांच्यासमोर राजस्थानात पुन्हा भाजपची सत्ता आणणे हि प्रमुख जबाबदारी असणार आहे. इतक्या प्रस्तावनेनंतर मूळ विषयाकडे येऊ. बहुचर्चित आणि चुरशीची अशी कर्नाटक विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि तिचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आले. कर्नाटकी जनतेने भाजपला संपूर्ण धूळ चारत सत्ता पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या स्वाधीन केली. स्वतःला आगीतून फुफाट्यात ढकलले.
                       दक्षिण दिग्विजय असा गाजावाजा करत विजयाच्या लाटेवर आरूढ झालेल्या भाजपचा फुगा लवकरच फुटला. येडीयुरप्पांच सरकार अस्तित्वात अल्याल्याच प्रशासनातील गलथान कारभाराच्या सुरस आणि चमत्कारिक कथा बाहेर येण्यास सुरुवात झाली. दक्षिणेतील अन्य राज्यात कसलेही स्थान नसलेल्या भाजपला गेल्या निवडणुकीत सत्ता मिळाली ती येडीयुरप्पा यांच्या प्रयत्नामुळे यात शंका नाही. कोणताही पक्ष हा व्यक्तींचाच बनलेला असतो. परंतु एखादी व्यक्ती म्हणजे पक्ष नव्हे, याचे भान येडीयुरप्पा यांना राहिले नाही. आपण म्हणजेच कर्नाटकातील भाजप असा भ्रम त्यांना झाला आणि प्रचंड मोठ्या खाण घोटाळ्यानंतरही आपण म्हणू तीच पूर्व दिशा हवी असा त्यांचा हट्ट राहिला. शेवटी वाटाघाटी फिसकटल्यानंतर भाजपने त्यांना काडीमोड देऊन टाकला. त्यानंतर येडीयुरप्पा यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. वास्तविक कर्नाटकात भाजपचा पराभव झाला तो येडीयुरप्पा यांच्यामुळे नाही तर त्यांच्या पश्चात पक्षाने कर्नाटकात जो गोंधळ घातला त्यामुळे. पक्षाच्या दिल्लीतील नेतृत्वाला कर्नाटक भाजपचे करायचे काय याचा अंदाज आला नाही. आधी सदानंद गौडा आणि नंतर जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री केले गेले. यातून भाजपमधील निर्नायाक्ताच दिसून आली. याचा परिणाम मतपेटीत दिसून आला यात नवल ते काय? येडीयुराप्पानी आधी कर्नाटकात धुमाकूळ घातला, नंतर केंद्रीय नेतृत्वाने. येडीयुरप्पांच्या उद्योगांमुळे निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळावी हे पक्षाध्यक्ष गडकरीभौना सुधारत नव्हते. त्या भरात भाजपमधली दुही जगजाहीर झाली. येडीयुरप्पा यांच्या पश्चात पक्षाची सूत्रे कोणा जबाबदार आणि ठाम नेत्याच्या हातात दिली असती तर कदाचित भाजपची इतकी वाताहत झाली नसती.
                      येडीयुरप्पा ज्या प्रमाणात हवेत चढले होते, त्या प्रमाणात त्यांची ताकत खरोखरच होती काय? हे तपासून पहिले तर उत्तर नकारार्थीच मिळते. निकालातील त्याच्या पक्षाची स्थिती हेच सुचित करते. कर्नाटकात बहुसंख्येनं असणारा लिंगायत समाज आपल्या बाजूने आहे असा येडियुरप्पांचा झालेला भ्रम या निवडणूक निकालांमुळे दूर झाला असेल. स्वतःविषयी करून घेतलेले असले गैरसमज आणि त्यामुळे मारलेल्या फुकाच्या गमजा, यामुळे तोंडावर आपटलेल्या लोकांची संख्या भरपूर आहे. उत्तर प्रदेशात कल्याण सिंघ, गुजरातेत शंकरसिंह वाघेला आणि मध्य प्रदेशात उमा भारती याचं आदर्श उदाहरण आहेत. येदियुराप्पानी या दुसर्यांच्या अनुभवातून तरी शहाणपण शिकावयास हवे होते. आता यामुळे त्यांचा निवडणुकीपूर्वी चौखूर उधळणारा वारू बसेल.
                     कर्नाटकातील आणखी एक प्रमुख पक्ष म्हणजे जनता दल(सेक्युलर). त्यांचे प्रमुख नेते म्हणजे देवेगौडा आणि कुमारस्वामी. हे दोन्ही नेते आपली सत्ता येणार नाही हे पूर्णपणे जाणून होते परंतु सरकार स्थापण्यासाठी कोणत्याही पक्षास आपली गरज पडावी इतक्या जागा निवडून आणावयाचे प्रमुख उद्दिष्ट त्यांच्यासमोर होते. आपली मदत घेतल्याशिवाय कोणताच पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही इतपत जागा निवडून आणावयाच्या आणि त्या जोरावर अनेक मागण्या पदरात पाडून घ्यावयाच्या. पण अशी वेळ मतदारांनी येउच दिली नाही. वास्तविक कर्नाटकच्या घसरणीस सुरुवात झाली ती देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्या पक्षाच्या कार्यकाळातच. प्रचारादरम्यान समाजवादाच्या गोष्टी करणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर कर्नाटकातील सर्वात धनाढ्य बांधकाम व्यावसायिक निवडणूक लढवत होते. हेतू हा कि, देवेगौडा आणि कुमारस्वामी सत्तास्थापनेत मोक्याच्या जागी आले कि त्या जोरावर हवे ते पदरात पडून घ्यावे. पण सौदेबाजीची संधी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे त्यांना मिळालीच नाही.
                  कर्नाटकात कॉंग्रेसला मिळालेला विजय निर्भेळ म्हणता येईल. आपण सत्ता चालवायला लायक नाही हे केंद्रातील संपुआ सरकारप्रमाणेच कर्नाटकात भाजप ने सिद्ध करून दाखवल्यामुळे कॉंग्रेसला विजय मिळवण्यासाठी फारसे काही करावेच लागले नाही. आता कॉंग्रेसमध्ये राहुल गांधींच्या करिष्म्याच्या गोष्टी सांगण्यास उत येईल. पण कर्नाटकात राहुल गांधींची झाकली मुठ उघडण्याची फारशी गरजच पडली नाही. वास्तविक हि निवडणूक स्थानिक प्रश्नांवरच बेतलेली असल्यामुळे येथील विजय ना राहुल गांधींचा म्हणता येईल, नरेंद्र मोदींचा विषय यात येईल. स्थानिक पातळीवर आपले नालायकत्व भाजपने पुरेपूर सिद्ध केल्यामुळे त्यांनी विजयाची अशा करणेच चूक होते. कॉंग्रेसचा विजय होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वछ होते.
                  आता या विजयामुळे २०१४ लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा आत्मविश्वास दुणावेल यात शंका नाही. पण जनमताचा कौल काहीही असू शकतो. २००४ साली केंद्रात सत्तेत असताना भाजपने तीन राज्यात विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या पण त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. कार्नाताकावरून भाजप काही धडा घेईल काय हा प्रश्न महत्वाचा आहे. केंद्रात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून रोज गोत्यात येणारं संपुआ सरकार आणि आक्रमक विरोधक या पार्श्वभूमीवर २०१४ साली भाजप केंद्रात सत्तेवर येईल काय हा उत्सुकता वाढवणारा प्रश्न आहे. भाजप केंद्रात सत्तेवर आरूढ होतो कि तेथेही कानडी राग आळवला जातो हे पहावं लागेल.

Sunday, 3 February 2013

                       महासत्तान्मागच सत्य

                       १९३९ ते १९४५ अशी जवळजवळ सहा वर्ष, युरोप, आशिया, आणि अमेरिका असे तीन खंड, आणि कित्येक देशांमध्ये चाललेल्या भीषण महायुद्धानंतर आणि नाझी  जर्मनी, जपान यांच्या पतनानंतर उरलेल्या जागतिक महासत्ता म्हणजे एक भांडवलशाही अमेरिका आणि दुसरी साम्यवादी रशिया. या दोन धृवान्भोवती आणि धृवांमुळे जग विभागालं गेलं. जगाचं राजकारण या दोन धृवांपासून सुरु व्हावयाच आणि त्यांच्यापाशीच येउन संपायचं. त्या दोन देशांच्या आणि एकूणच जगाच्या जीवावर उठलेला तो शीतयुद्ध नामक कुरघोडीचा खेळ सगळ्या जगाचे नकाशे बदलून गेला. अमेरिकेचा पराकोटीचा साम्यवाद विरोध कित्येक राष्ट्रांना बर्बादिकडे घेऊन गेला. यात पोलंड आणि आता अफगाणिस्तानचा क्रमांक सर्वात वरचा आहे. सोव्हिएत युनियन च्या पंजात आलेले कित्येक देश  साम्यवादाच्या असंख्य त्रुटींचे शिकार झाले आणि देशोधडीला लागले. कालांतराने स्वतः रशियाच त्या घाईला आला. संपूर्णपणे कोसळलेली अर्थव्यवस्था आणि अंतर्गत बंडाळीमुळे सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. १९९१ ला झालेल्या या घडामोडीनंतर जगात उरलेली एकमेव महासत्ता म्हणजे अमेरिका.  संपूर्ण जगाचं राजकारण आणि अर्थकारण अमेरीकेभोवती घुटमळत आणि अमेरिका तेलाच्या मागे घुटमळते. या तेलापायीच अमेरिकेनं स्वतःसकट कित्येक देशांना मंदीच्या खाईत ढकललं. आधीच अन्नाला मोताद असलेल्या देशांमध्ये युद्धखोरी माजवून दिली. या सगळ्या नाठाळ उद्योन्गाचा परिणाम म्हणजे चीनचा उदय. आज १०% GDP Growth Rate असणारा चीन आज जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनचं या आश्चर्यकारक प्रगतीमुळे अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान मिळू लागलेलं आहे. सद्यपरिस्थितीत अखाती देशातील राजकारणानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या अग्रभागी चीन आहे. सध्या तिसर्या क्रमांकावर असणारी भारतीय अर्थव्यवस्था चीनच्या आव्हानाला पेलण्यासाठी अमेरिकेला मदतगार ठरणार आहे. कारण आगामी काळात चीनच्या बरोबरीनेच भारतही जागतिक महासात्तापदाचा दावेदार आहे.
                    चीन आणि भारत. शेजारी असणारे हे दोन राष्ट्रं. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पूर्णपणे भिन्न. एक लोकशाही तर दुसरी एकपक्षीय राज्यव्यवस्था. दोघेही महासात्तापादाचे दावेदार मानले जातात. जरी प्रगतीच्या बाबतीत चीन भारताच्या कित्येक पावलं पुढे असला  तरी, एक भक्कम आणि उद्यमशील अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं. तरुणांचा देश म्हणून भारत ओळखला जातो कारण, १५ ते ६४ या वयोगटात भारत्तली ६४% लोकसंख्या आहे. स्वयंपूर्ण शेती, व्यापार आणि उद्योग यांनी युक्त असणारा भारत आहे. या तरुणांच्या देशाला चालवत मात्र वयाची सत्तरी ओलांडलेल सरकार (ह्यात सचिन पायलट,ज्योतिरादित्य शिंदे यांसारखे काही सन्माननीय अपवाद आहेत). हे एक असं मंत्रिमंडळ आहे ज्यांच्याकडे १२१कोटी लोकसंख्येच्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि वर्त्मानासाठीही निश्चित धोरणं नाहीत. एका उद्योगपतीसोबतच्या वादांमुळे काळ रात्रीपर्यंत तेल मंत्री असणारा मनुष्य आज सकाळी अचानक ग्रामविकास मंत्री होतो.
कालपर्यंत उर्जा मंत्री असणारा मनुष्य अचानक गृहमंत्री होतो आणि वाटेल तशी विधानं करत सुटतो.
 कित्येक लहानमोठ्या देशांच्या GDP इतके इथल्या भ्रष्टाचार घोटाळ्यांचे आकडे असतात आणि त्यावरचे खटले वर्षानुवर्ष सुरु असतात. जातीपातीचं राजकारण, खाप पंचायती, फतवे प्रचंड प्रमाणात सुरु आहे. 'आरक्षण' नावाच्या एका भिकेसाठी निर्लज्ज जातीसंघटना आंदोलनं करतात. दर दोन महिन्यांनी कुठेनाकुठे निवडणुका येतात. आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडतो. आंतरराष्ट्रीय परिस्थिती पूर्णपणे भारतविरोधी असताना भारतातलं सरकार मात्र अंतर्गत राजकारणात आणि सत्ता टिकवण्याची लाजिरवाणी धडपड करण्यातच मग्न असतं. भारतही कशात काही नसताना स्वतःचा महास्त्तापादाचा दावेदार म्हणून उदोउदो करवून घेतो. हे म्हणजे "घरात नाही दाणा आणि म्हणे मला बाजीराव म्हणा" अशी गात झाली.
                 दुसर्या बाजूला फुत्कार टाकणारा चीन. साम्यवादी राज्यव्यवस्था असूनही कडक धोरणांच्या जोरावर आज या आर्थिक आणि राजकीय परीस्थितीत पोचलेला. इलेक्ट्रॉनिक, वाहनुद्योग, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात चीनी उद्योगांनी जागतिक बाजारपेठा पादाक्रांत केल्या आहेत. Made In China वस्तूंनी संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जागतिक उद्योगसमूहांना त्यांचे Production Plants  उभारण्यासाठी दिलेल्या सवलतींमुळे चीनच्या राष्ट्रीय उत्पन्नात आणि लोकांच्या राहणीमानात प्रचंड फरक पडला आहे. (भारतात वादग्रस्त ठरलेल्या SEZ - Special Economic Zone ची सुरुवात चीनमध्ये झालेली आहे. चीनच्या साम्यवादी आणि एकाधिकारशाही राज्यव्यवस्थेमुळे स्थानिक शेतकरी आणि जनतेचा विरोध दडपून टाकण्यात आला. )रस्ते, रेल्वे, शिक्षण आणिहिक मंदी इक  आरोग्य या मुलभूत गरजांची उभारणी आणि लोकाभिमुखता खूप मोठ्या प्रमाणात आहे. चीनमधील हो हँग हो, यांगस्ते आणि इतर मोठ्या नद्यांवर धरणं बांधून शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. ब्रम्हपुत्र नदीवरील (तिबेटमधील नाव त्सांग पो) जगातील सर्वात मोठं धरण बांधून ते पाणी तिबेटच्या उत्तरेकडच्या वाल्वंती प्रदेशात वळवण्याची योजना पाहून जग थक्क होऊन गेलं. जगाच्या छतावर तिबेट आणि पामीर पठारावर रस्ते आणि रेल्वेचं जाळं विणल्यामुळे सैन्याच्या हालचालींची (भारताविरुद्ध) सोय करून ठेवली आहे. या सगळ्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणांबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असं जगातलं सर्वात मोठं लष्कर हि एक चीनची मोठी ताकद आहे.
                   हि अचाट प्रगती आणि विश्वविक्रमी आकडे हि चीनच्या नाण्याची एक बाजू झाली पण ह्या नाण्याची दुसरी बाजू तितकीच उद्बोधक आहे. नुकतीच चीनच्या राजकीय वर्चस्वमंडळात फेरफार झाली. Xi Jinping हे Communist Party of China चे सर्वोच्च नेते म्हणून निवडले गेले. सुधारणावादी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यासमोर सरकारी अधिकार्यांमध्ये वाढलेला भ्रष्टाचार रोखणे, माहिती प्रसारणावरील निर्बंधामुळे आलेला जनतेतला असंतोष, त्याचप्रमाणे साम्यवादी राज्यव्यवस्थेतील अपरिहार्य त्रुटींमुळे आणि राबवण्यात आलेल्या कडक धोरणांमुळे आलेला जनतेताला असंतोष आहे आणि त्याविरोधात संघटीत निदर्शनं आणि जागतिक आर्थिक मंदी हि आव्हानं असणार आहेत. चीन त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४५% रक्कम Fixed Assets, Primary Infrastructure, Manufacturing facilities आणि housing या गोष्टींवर खर्च करतं. यापैकी अर्धी गुंतवणूक सरकारी अंमलदारांमार्फत होते. यात कंत्राटदारांकडून ठराविक रकमांची मागणी अंमलदार करतात. या अंमलदारांना कंत्राटाच्या रकमेची १०% रक्कम रिती केली जाते. एकूण बेरीज केली तर चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP ) च्या २.२५% इतका हा आकडा जातो. हा भ्रष्टाचाराचा प्रचंड आकडा हा चीनसमोरचा प्रमुख प्रश्न आहे. चीनमध्ये जनतेच्या असंतोषाच्या अजेंड्यावर असणारा प्रश्न म्हणजे माध्यमस्वातंत्र्याचा. चीनच्या सरकारकडून सामान्य जनतेवरील या माध्यमस्वातंत्र्यावरील निर्बंधाविरुद्ध तीव्र असंतोष आहे आणि त्याविरोधात संगःतीत आंदोलनं चीनमध्ये वेळोवेळी होत असतात. पण त्या बातम्या जगापासून लपवून ठेवल्या जातात. भारतात १६ डिसेंबर च्या दिल्ली बलात्कार प्रकरणामुळे संघटीत झालेलं जनमत आणि आंदोलनाच्या बातम्यांवर चीनमध्ये बंदी घालण्यात आली. कारण यापासून प्रेरणा घेऊन चीनमधील जनमत उसळेल आणि उसळण्याआधीच त्याची गळचेपी करण्याच्या उद्देशानं हि या बातम्यांवर बंदी घालण्यात आली होती.
                 तर एकंदर परिस्थिती हि अशी आहे. अंतर्गत असंतोषाची आणि इतर प्रकरणांची गळचेपी सुरु असतानाहि अंतरराष्ट्रीय राजकारणावर चीनची सूक्ष्म नजर आहे. चीनचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे भारत. भारताविरुद्ध राजकीय आणि व्यापारी कोंडी करण्याची एकही संधी चीन सोडत नाही. २०१४ पर्यंत अफगाणिस्तान आणि इराकमधून NATO फौजा निघून गेल्यानंतर जी एक पोकळी निर्माण होणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा तालिबानचा उदय अपरिहार्य आहे. पाकिस्तानात चीनच्या लष्करी कवायती आणि पाकिस्तानला लष्करी मदत वाढली आहे, ती भारताची कोंडी आणि अफगाणिस्तानच्या अप्रकाशित तेलावर ताबा मिळवण्यासाठीच. श्रीलंकेला दिलेली आर्थिक आणि लष्करी मदत काय सुचित करते? अक्साई चीन आणि अरुणाचलच्या तवांग चा मुद्दा हा राजकीय संघर्षाची नांदी होती. आफ्रिकेतील तेल साठ्यांवर भारताच्या नाकावर टिच्चून चीनने मिळवलेला ताबा भारताला त्याची जागा दाखवून गेला. या सर्व परीस्थितीत भारताकडून उच्च दर्जाच्या मुत्सद्देगिरीची अपेक्षा आहे. दक्षिण-पूर्व आशियातील विकसनशील देश मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या देशांबारोबारचे आर्थिक आणि राजकीय संबंध महत्वाचे ठरणार आहेत. या राष्ट्रांवर विशेष लक्ष द्यायला हवं. कित्येक भारतीय उद्योग या देशांमध्ये गुंतवणूक करतात. व्यापार दृष्टीने पहावयास गेल्यास भारताचा बहुतांश व्यापार या देशांशी चालतो. भारताच्या IT उद्योगाची बरीच मोठी ग्राहक संख्या या देशांमध्ये विखुरलेली आहे. आता या सगळ्या गोष्टींची नुसतीच चर्चा होते. या सगळ्या गोष्टी करण्याची भारताची ऐपतच नाही. या अशाप्रकारच्या चतुर आणि धूर्त राजकारणाची अपेक्षा भारताकडून करणं सद्यपरिस्थितीत तरी शक्य नाही. म्हणूनच असं म्हणण्याला वाव आहे कि २०२० ला भारत महासत्ता होणार हे निव्वळ स्वप्न आहे आणि सत्याशी त्याचा दुरान्वयेही संबंध नाही.
                   

Friday, 11 January 2013

                      नरेंद्र मोदी- गुजरातच्या विजयाचे शिल्पकार 

                         लोकप्रियता, मानसन्मान मिळवणं हि फार कठीण गोष्ट आहे. आयुष्यभरचे कष्ट, जिद्द यांच्या जोरावरच उत्तरायुष्यात लोकप्रियता लाभते. शून्यातून पुढे येउन राजकारणातलं, प्रशासनातलं उच्च पद मिळवणं यासाठी बेसुमार कष्टांची, ध्येयाच्या मागे हात धुवून लागण्याची आवश्यकता असते. Excellence, Brilliance, Honesty, Ethics या चार गोष्टींच्या मागे धावणाऱ्या माणसाच्या मागे लोकप्रियता धावत असते. याचंच एक उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे मोदी पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार मानले जातात. गुजरात राज्याला प्रादेशिक अस्मितेची आणि सर्वांगीण विकासाची हाक देअन्रे आणि ती बर्यापैकी पूर्ण करणारे मोदी आज सलग तिसर्यांदा गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकले.  
                     सुमारे वर्षभरापासून आरोप-प्रत्यारोप आणि प्रचाराच्या धूमधडाक्यामुळे चुरशीची बनलेली हि निवडणूक अखेर सलग ११ वर्षापासून सत्तेत असणार्या भाजपनेच जिंकली. वास्तविक भाजपने म्हणण्यापेक्षा मोदिनीच जिंकली असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण प्रचारादरम्यान भाजप च्या इतर राष्ट्रीय नेत्यांचा सहभाग अत्यंत   म्हणजे या ठिकाणी पक्षीय नाही तर व्यक्तिकेंद्रित लोकप्रियता विजयी झाली. आणि का न व्हावी?? १०% विकासदर असणारं, उत्तमोत्तम पायाभूत सुविधा, उत्तम-पारदर्शक प्रशासन देणारा नेता गुजरातच्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून निवडून द्यावा हे साहजिकच म्हणावे लागेल. ११ वर्ष सत्ता असताना राज्याचा झालेला विकास वाखाणण्यासारखा आहे. रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजांच्या जोडीला शिक्षण, रोजगार, उद्योगांसाठी पोषक वातावरण, पर्यटन, शेती, आरोग्य सुविधा, व्यापार वृद्धिसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदरांचा विकास, म्हणजे एकंदर सर्वच बाबतीत विकास साधला गेलेला आहे.
                     भाजप, स्वतःला सामुहिक नेतृत्व आणि लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष म्हणवून घेतो. कितीही नाही म्हटलं तरी हा पक्ष रास्व संघच्या रिमोट कंट्रोल वर चालतो. त्यामानाने गुजरातेत भाजपची हि प्रतिमा धुळीला मिळाल्यागत जमा आहे, कारण तिथे नरेंद्र मोडी नामक एककेंद्री नेतृत्व प्रस्थपित झाले आहे. हे भाजप च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वर्तुळात पचनी पडण्यासारखं नाही. म्हणजेच गुजरातेतील भाजप हे नरेंद्र मोडी यांचे स्वतंत्र संस्थान झालेले आहे. वेळीप्रसंगी मोडी राष्ट्रीय नेतृत्वाला गुंडाळण्यात मागेपुढे पाहत नाहीत, यामुळे संघही मोदींवर उखडलेला आहे.मध्यंतरी नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. त्यावेळी असाही लक्षात आलं होतं कि ह्या आरोपांची सुरवात, त्याचं मुल हे गुजरातेत आहे. वास्तविक मोदींचा विजय हि काळ्या दगडावरची रेघ होती. किती जागा कमावणार आणि किती जागा गमावणार हि फक्त पाहण्यासारखी बाब होती. बाकी काहीही असो यामुळे भाजप मधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत एवढ मात्र नक्की. 
                     गुजरातच्या निवडणुकीतही राहुल गांधीनी मोदींविरोधात बर्यापैकी दंड थोपटले होते. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली होती. पण त्यांची डाळ काही शिजली नाही. वास्तविक बिहार, उत्तर प्रदेशचा ताजं उदाहरण असताना राहुल गांधींकडून फारश्या अपेक्षा नव्हत्या, पण किमान भाजपच्या काही जागा कमी होतील अशी अपेक्षा होती. नाराज केशुभाई पटेलांचा नवा पक्षदेखील फार काही दिवे लावू शकला नाही. ज्या पटेल समाजाच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी नवा पक्ष उभारला तो पटेल समाजच मोदींच्या बाजूने उभा राहिला. या सगळ्या धामधूमीनंतरही (म्हणजे आधीच ) राहुल गांधींकडे पुढील निवडणूकींची माळ सोपवणे हे कॉंग्रेसच्या लाचार परंपरेला अनुसरूनच झाले. त्याला कोण काय करणार? याच लाचार्पानामुळे कि काय कुठल्याच राज्यात कॉंग्रेसला स्थानिक प्रभावी नेतृत्व देत आलं नाही. गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे याचे ठळक उदाहरणं म्हणता येतील. आता परीस्थित बदलणं शक्य नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय दिवे लागतात हे पाहणं संयुक्तिक ठरेल. 
                   मोदिनी साधलेला हा सलग तिसरा विजय म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची नांदी आहे अशी चर्चा सर्वत्र झडते आहे. मोदीच पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार आहेत, अशी चर्चा प्रसारमाध्यम रंगवू लागलेली आहेत. पण ह्या प्रश्नावर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी बाळगलेलं मौन बराच काही सांगून जातं. नरेंद्र मोडी हे एककल्ली आणि बर्याच प्रमाणात हुकुमशाहिप्रमाणे राज्य करतात असा प्रमुख आरोप त्यांच्यावर होतो. शिवाय याच कारणामुळे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संघ मोदींवर नाराज आहे. आता या ११ वर्षांच्या काळात गुजरात भाजप मध्ये झालेला आणखी एक लक्षणीय बदल म्हणजे नेतृत्वाची दुसरी फळीच नाहीशी झालेली आहे. वास्तविक राजकीय पक्सःत आणि त्यातही भाजप सारख्या लोकशाही पक्षाची हि अवस्था घातक आहे. नरेंद्र मोदींनी उद्या राष्ट्रीय राक्कारणात उडी घेतलीच तर त्यांची जागा घेणारा नेता गुजरातेत दुसरा नाही. हे अत्यंत घातक आहे. व्यवस्थापन शास्त्रात 'Succession Planning' हे प्राथमिक तत्वांपैकी १ आहे पण या ठिकाणी हेच धाब्यावर बसवलेले आहे. स्वतःला CEO म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींना हि साधी गोष्ट कळू नये हे दुर्दैवी म्हणायला हवे.
                         

Artha and the Civilisation: What Really Drives the Indian Economy

  Any system rests on two principal components. One is the driving force behind the system's construction, and the other is the guiding ...