Skip to main content

कर्नाटकचा निवडणुकीचा धुरळा…

                                    


    
                     लोकसभा निवडणुकीच्या रंगीत तालमी म्हणता येतील अशा कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली निवडणुका. त्यातही कर्नाटक आणि दिल्ली निवडणुका दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांसाठी महत्वाच्या आहेत. सलग तिसरी टर्म दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भोगणाऱ्या शीला दिक्षितांवर दिल्लीची जनता आणि त्यांच्याच पक्षातील लोक नाराज आहेत. दिल्ली महापलिका निवडणुकांमध्ये यश मिळवलेल्या भाजपसाठी दिल्लीत सत्ता स्थापणे हा कळीचा मुद्दा आहे. याउलट कर्नाटकात. भाजपला दक्षिणेतील राज्यात पहिल्यांदाच मिळालेली सत्ता टिकवण्याची धडपड करावी लागणार आहे. केंद्रात प्रचंड घोटाळ्यांची मालिका उभी करणाऱ्या सरकार विरोधात रान उठवणार्या भाजपच्या तोंडाला कर्नाटकातील खाण घोटाळ्यामुळे फेस आलेला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये भाजपची प्रस्थापित सत्ता आहे. त्या निवडणुका स्थानिक प्रश्नांवरच लढल्या जातील. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी विकासाचा ढोल पिटण्यास सुरवात केली आहे. छत्तीसगड राज्यात निवडणुकीवर नक्षलवादाचा प्रभाव असणारच आहे. राजस्थानात निवडणुकांची आणि प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी वसुंधरा राजेंकडे आलेली आहे. त्यांच्यासमोर राजस्थानात पुन्हा भाजपची सत्ता आणणे हि प्रमुख जबाबदारी असणार आहे. इतक्या प्रस्तावनेनंतर मूळ विषयाकडे येऊ. बहुचर्चित आणि चुरशीची अशी कर्नाटक विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि तिचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आले. कर्नाटकी जनतेने भाजपला संपूर्ण धूळ चारत सत्ता पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या स्वाधीन केली. स्वतःला आगीतून फुफाट्यात ढकलले.
                       दक्षिण दिग्विजय असा गाजावाजा करत विजयाच्या लाटेवर आरूढ झालेल्या भाजपचा फुगा लवकरच फुटला. येडीयुरप्पांच सरकार अस्तित्वात अल्याल्याच प्रशासनातील गलथान कारभाराच्या सुरस आणि चमत्कारिक कथा बाहेर येण्यास सुरुवात झाली. दक्षिणेतील अन्य राज्यात कसलेही स्थान नसलेल्या भाजपला गेल्या निवडणुकीत सत्ता मिळाली ती येडीयुरप्पा यांच्या प्रयत्नामुळे यात शंका नाही. कोणताही पक्ष हा व्यक्तींचाच बनलेला असतो. परंतु एखादी व्यक्ती म्हणजे पक्ष नव्हे, याचे भान येडीयुरप्पा यांना राहिले नाही. आपण म्हणजेच कर्नाटकातील भाजप असा भ्रम त्यांना झाला आणि प्रचंड मोठ्या खाण घोटाळ्यानंतरही आपण म्हणू तीच पूर्व दिशा हवी असा त्यांचा हट्ट राहिला. शेवटी वाटाघाटी फिसकटल्यानंतर भाजपने त्यांना काडीमोड देऊन टाकला. त्यानंतर येडीयुरप्पा यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. वास्तविक कर्नाटकात भाजपचा पराभव झाला तो येडीयुरप्पा यांच्यामुळे नाही तर त्यांच्या पश्चात पक्षाने कर्नाटकात जो गोंधळ घातला त्यामुळे. पक्षाच्या दिल्लीतील नेतृत्वाला कर्नाटक भाजपचे करायचे काय याचा अंदाज आला नाही. आधी सदानंद गौडा आणि नंतर जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री केले गेले. यातून भाजपमधील निर्नायाक्ताच दिसून आली. याचा परिणाम मतपेटीत दिसून आला यात नवल ते काय? येडीयुराप्पानी आधी कर्नाटकात धुमाकूळ घातला, नंतर केंद्रीय नेतृत्वाने. येडीयुरप्पांच्या उद्योगांमुळे निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळावी हे पक्षाध्यक्ष गडकरीभौना सुधारत नव्हते. त्या भरात भाजपमधली दुही जगजाहीर झाली. येडीयुरप्पा यांच्या पश्चात पक्षाची सूत्रे कोणा जबाबदार आणि ठाम नेत्याच्या हातात दिली असती तर कदाचित भाजपची इतकी वाताहत झाली नसती.
                      येडीयुरप्पा ज्या प्रमाणात हवेत चढले होते, त्या प्रमाणात त्यांची ताकत खरोखरच होती काय? हे तपासून पहिले तर उत्तर नकारार्थीच मिळते. निकालातील त्याच्या पक्षाची स्थिती हेच सुचित करते. कर्नाटकात बहुसंख्येनं असणारा लिंगायत समाज आपल्या बाजूने आहे असा येडियुरप्पांचा झालेला भ्रम या निवडणूक निकालांमुळे दूर झाला असेल. स्वतःविषयी करून घेतलेले असले गैरसमज आणि त्यामुळे मारलेल्या फुकाच्या गमजा, यामुळे तोंडावर आपटलेल्या लोकांची संख्या भरपूर आहे. उत्तर प्रदेशात कल्याण सिंघ, गुजरातेत शंकरसिंह वाघेला आणि मध्य प्रदेशात उमा भारती याचं आदर्श उदाहरण आहेत. येदियुराप्पानी या दुसर्यांच्या अनुभवातून तरी शहाणपण शिकावयास हवे होते. आता यामुळे त्यांचा निवडणुकीपूर्वी चौखूर उधळणारा वारू बसेल.
                     कर्नाटकातील आणखी एक प्रमुख पक्ष म्हणजे जनता दल(सेक्युलर). त्यांचे प्रमुख नेते म्हणजे देवेगौडा आणि कुमारस्वामी. हे दोन्ही नेते आपली सत्ता येणार नाही हे पूर्णपणे जाणून होते परंतु सरकार स्थापण्यासाठी कोणत्याही पक्षास आपली गरज पडावी इतक्या जागा निवडून आणावयाचे प्रमुख उद्दिष्ट त्यांच्यासमोर होते. आपली मदत घेतल्याशिवाय कोणताच पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही इतपत जागा निवडून आणावयाच्या आणि त्या जोरावर अनेक मागण्या पदरात पाडून घ्यावयाच्या. पण अशी वेळ मतदारांनी येउच दिली नाही. वास्तविक कर्नाटकच्या घसरणीस सुरुवात झाली ती देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्या पक्षाच्या कार्यकाळातच. प्रचारादरम्यान समाजवादाच्या गोष्टी करणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर कर्नाटकातील सर्वात धनाढ्य बांधकाम व्यावसायिक निवडणूक लढवत होते. हेतू हा कि, देवेगौडा आणि कुमारस्वामी सत्तास्थापनेत मोक्याच्या जागी आले कि त्या जोरावर हवे ते पदरात पडून घ्यावे. पण सौदेबाजीची संधी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे त्यांना मिळालीच नाही.
                  कर्नाटकात कॉंग्रेसला मिळालेला विजय निर्भेळ म्हणता येईल. आपण सत्ता चालवायला लायक नाही हे केंद्रातील संपुआ सरकारप्रमाणेच कर्नाटकात भाजप ने सिद्ध करून दाखवल्यामुळे कॉंग्रेसला विजय मिळवण्यासाठी फारसे काही करावेच लागले नाही. आता कॉंग्रेसमध्ये राहुल गांधींच्या करिष्म्याच्या गोष्टी सांगण्यास उत येईल. पण कर्नाटकात राहुल गांधींची झाकली मुठ उघडण्याची फारशी गरजच पडली नाही. वास्तविक हि निवडणूक स्थानिक प्रश्नांवरच बेतलेली असल्यामुळे येथील विजय ना राहुल गांधींचा म्हणता येईल, नरेंद्र मोदींचा विषय यात येईल. स्थानिक पातळीवर आपले नालायकत्व भाजपने पुरेपूर सिद्ध केल्यामुळे त्यांनी विजयाची अशा करणेच चूक होते. कॉंग्रेसचा विजय होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वछ होते.
                  आता या विजयामुळे २०१४ लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा आत्मविश्वास दुणावेल यात शंका नाही. पण जनमताचा कौल काहीही असू शकतो. २००४ साली केंद्रात सत्तेत असताना भाजपने तीन राज्यात विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या पण त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. कार्नाताकावरून भाजप काही धडा घेईल काय हा प्रश्न महत्वाचा आहे. केंद्रात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून रोज गोत्यात येणारं संपुआ सरकार आणि आक्रमक विरोधक या पार्श्वभूमीवर २०१४ साली भाजप केंद्रात सत्तेवर येईल काय हा उत्सुकता वाढवणारा प्रश्न आहे. भाजप केंद्रात सत्तेवर आरूढ होतो कि तेथेही कानडी राग आळवला जातो हे पहावं लागेल.

Comments

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं