Thursday, 15 February 2024

वाढता वाढता वाढे, उत्पन्न राष्ट्रहिता करिता


जग सध्या एका घुसळणीतून जात आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन ते आता स्थिरावले आहे. ते युद्ध थांबवण्यात कोणालाच रस नाही की काय अशी परिस्थिती आहे. या युद्धाबरोबरच त्यामुळे होणारे परिणाम देखील स्थिरावले आहेत. किंबहुना त्यातून मार्ग काढत आपला अर्थव्यवस्थेचा गाडा हाकता ठेवण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहे. 

चीन एका निराळ्याच आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. कोविड महासाथीपासून चीनची आर्थिक घोडदौड मंदावण्याकडे वाटचाल सुरु आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार, भाष्यकार सी. राजा मोहन यांनी त्याचे अचूक निदान 'एएनआय पॉडकास्ट' या कार्यक्रमात मांडले आहे, की दंग शिओफंग यांनी आर्थिक क्षेत्रातील निर्णयप्रक्रियेत एक खुलेपणा आणला होता. प्रांतांकडे निर्णयाचे अधिकार दिले होते. त्यातून चीनची यशस्वी आर्थिक घोडदौड झाली. 

सध्याचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या निर्णयप्रक्रियेचे पुन्हा एकदा केंद्रीकरण सुरु केले. या सर्व परिस्थितीत अनेक जागतिक कंपन्या ज्या आपली उत्पादने चीनमध्ये तयार करत होत्या त्यांनी तिथून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. जागतिक पुरवठा साखळीमध्ये उत्पादन, व्यापार यासाठी पोषक वातावरण देऊ शकतील असे देश, अर्थव्यवस्था भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया या आहेत. या पार्श्वभूमीवर कोविडोत्तर काळात भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने घोडदौड करत आहे. 

भारताने कोविड साथीच्या संकटाचे संधीत रूपांतर करत झपाट्याने अनेक आर्थिक सुधारणा, धोरणे पुढे आणली. त्यात आत्मनिर्भर भारत हे अभियान आहेच पण उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना या गेमचेंजर ठरत आहेत. ठरणार आहेत. कोविड काळात आखलेली धोरणे, योजना आहेतच पण गेल्या नऊ वर्षात भारतात आर्थिक सुधारणा सातत्याने सुरु आहेत. त्या वार्षिक अर्थसंकल्पात मांडलेल्या नाहीत तर वर्षभरात योग्य वेळ साधून घोषित केल्या, आणि अंमलबजावणी सुरु करण्यात आली अशा प्रकारच्या आहेत. त्यात जीएसटी, दिवाळखोरी आणि नादारी संहिता, सरफेसी कायदा, रेरा, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन, गती शक्ती सह अनेक सुधारणा आहेत. शिवाय वार्षिक अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करातील अनेक बदलांसह काही निर्णय आहेत. 

ही सर्व पार्श्वभूमी विशद करणे आवश्यक आहे, त्यावरुनच वाढते राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याचे महत्त्व लक्षात येऊ शकेल. एसबीआय रिसर्च केलेल्या एका महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात खूप आश्वासक माहिती समोर आली आहे. 

गेल्या बारा वर्षात कर संकलनात ३०३ टक्के वाढ झाली, तर याच काळात भारतीय अर्थव्यवस्था ९३ टक्के वाढली . कर संकलन वर्ष २०१० मध्ये ६.२ लाख कोटी होते ते वाढून वर्ष २०२२ मध्ये २५.२ लाख कोटी झाले. भारतीय अर्थव्यवस्थेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (स्थिर किमतीनुसार) वर्ष ७६.५ लाख कोटी रुपये होते ते वाढून वर्ष २०२२ मध्ये १४७.४ लाख कोटी एवढे झाले. सरकारचे कर संकलन आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न गुणोत्तर वर्ष २०१० मध्ये ८.२ होते ते वर्ष २०२२ मध्ये १७.१ झाले. 

ही प्राथमिक तुलनात्मक आकडेवारी झाली. ही वाढ होत असताना बारा वर्षात अनेक गोष्टी झाल्या. भारतात दोन पद्धतीची कर पद्धती आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष करात आयकर, कॉर्पोरेट कर, मालमत्ता कर वगैरे. अप्रत्यक्ष करात जीएसटी येण्यापूर्वी मूल्यवर्धन कर, सेवा कर, केंद्रीय विक्री कर, कस्टम, अबकारी कर असे विविध कर होते, आता जीएसटी आहे. 

आयकर हा स्लॅब्स मध्ये आकारला जातो. जवळ जवळ सर्व सरकारांची हे स्लॅब्स वाढवून सामान्य करदात्यांना दिलासा देण्याची वृत्ती असते. त्याप्रमाणे वेळोवेळी हे स्लॅब वाढत जाऊन आता शून्य उत्पन्न ते ५ लाखापर्यंत सूट, आणि ६.५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर रिबेट मिळून शून्य कर आहे. त्यापुढे मग १०-२०-३० वगैरे कर आहेत. कॉर्पोरेट करात देखील वेळोवेळी कपात करत तो २५ टक्क्यांच्या आसपास आणण्यात आला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करप्रणाली अधिकाधिक सोपी करण्याकडे सातत्यपूर्ण वाटचाल सुरु आहे. जीएसटी मुळे अप्रत्यक्ष कर भरणाऱ्या लोकांच्या संख्येत झालेली वाढ, वाढत्या आर्थिक समावेशनामुळे, अर्थव्यवस्था अधिकाधिक संघटित होत असल्यामुळे आयकर विवरण भरणाऱ्यांत वाढ झाली. 

या पार्श्वभूमीवर पुन्हा काही आकडेवारी समोर ठेवणे आवश्यक आहे. वर्ष २०११ मध्ये १.६ कोटी लोकांनी आयकर विवरणपत्रे भरली, त्यातील ८४ टक्के लोक हे ५ लाखापर्यंत उत्पन्न असणारे होते. वर्ष २०२२ मध्ये ६.८५ कोटी लोकांनी आयकर विवरणपत्रे भरली, त्यातील ६४ टक्के लोक ५ लखपर्यंत उत्पन्न असणारे होते. म्हणजेच वर्ष २०११ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये या गटात असणाऱ्या लोकांच्या संख्येत १३.६ टक्के घट झाली. याचाच दुसरा अर्थ असा की तेवढी लोकसंख्या अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटात गेली. 

एसबीआयने आयकर विवरणपत्रांचे अध्ययन करुन भारतीयांच्या सरासरी वाढ झाली आहे, आणि असाच कल राहिला तर वर्ष २०४७ पर्यंत हे सरासरी उत्पन्न ४९.७० लाखापर्यंत जाईल असे निष्कर्ष  काढले आहेत. वर्ष २०१२-१३ मध्ये भारतीयांचे सरासरी उत्पन्न ४ लाख होते ते वाढून वर्ष २०२२-२३ मध्ये १३ लाख झाले आहे. भारतात वर्ष २०२३ मध्ये काम करणाऱ्यांची संख्या ५३ कोटी आहे, वर्ष २०४७ पर्यंत ही संख्या ७२.५ कोटी पर्यंत जाणार आहे. या उत्पन्न वाढीबरोबरच अधिकाधिक लोक अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटात जातील. 

एकुणात विचार करता एका बाजूला भारतीयांचे सरासरी उत्पन्न वाढत आहे, आयकर विवरण भरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे.  दुसऱ्या बाजूला भारत सरकारचे कर संकलन, कर संकलन आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे गुणोत्तर वाढते आहे. तिसऱ्या बाजूला भारतीय अर्थव्यवस्था ६.५-७ टक्क्यांनी वाढत आहे. ही वाढ गेल्या १२ वर्षात, त्यातही गेल्या ८-९ वर्षात प्रामुख्याने दिसून आली आहे. यात सातत्यपूर्ण आर्थिक सुधारणा, संकटाचे संधीत रुपांतर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासन व्यवस्थेवरचा वाढता विश्वास यांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच वाढता वाढता वाढे, उत्पन्न राष्ट्रहिता करिता.. 


- बऱ्याच पूर्वी लिहिलेला ब्लॉग. 

Thursday, 1 February 2024

गांधार ते तालिबान: The Afghan Connection


अफगाणिस्तान हे कोडं आहे. सध्याच्या काळात साम्राज्यांची दफनभूमी अशी प्रमुख ओळख कायम झाली आहे. पण प्राचीन काळात याच  भूभागात संस्कृतीचे मळे फुलले. पश्चिम आणि उत्तरेकडून भारतावर झालेली सर्व आक्रमणे गांधार भूमीतूनच झाली. कारण पश्चिम आणि उत्तरेकडून भारतात प्रवेश करण्यासाठी दोनच जमिनी वाटा होत्या. एक खैबर आणि दुसरी बोलन खिंड. समुद्री मार्ग खुले झाले, भूराजकीय गणिते बदलली तरी या भागाचं महत्त्व काही कमी झालं नाही. 

भारत आणि अफगाणिस्तान ही पूर्वापार चालत आलेली एक अतूट बंधनाची नाळ आहे. तीच डॉ. प्रमोद पाठक यांनी त्यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या पुस्तकात उलगडली आहे.  

भारतीय उपखंड आणि त्याच्या लगत असणाऱ्या भूभागात जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक उदयाला आली, वाढली. काही बदल होत तीच संस्कृती आजही या उपखंडात टिकून आहे. मोठे बदल झाले ते सीमावर्ती भागात म्हणजेच, वायव्य भागात. इस्लामिक आक्रमणानंतर झालेले बदल वरवरचे आहेत हे बलोच स्वातंत्र्यकांक्षीच्या, "आम्ही पाकिस्तानी गेल्या ५०-६० वर्षांपासून आहोत, मुस्लिम १४०० वर्षांपासून पण गेल्या हजारो वर्षांपासून आम्ही बलोच आहोत" वाक्यातून स्पष्ट होते. 

द अफगाण कनेक्शन या पुस्तकात डॉ. पाठक अफगाणिस्तानचा प्रागैतिहासिक काळापासून धांडोळा घेण्यास सुरवात करतात. त्या काळाचे काही पुरावे त्या भूमीत आहेत त्यांचे यथायोग्य दाखले देत एका महत्त्वपूर्ण घटनेकडे येतात. 

सिंधू संस्कृती म्हणून जी ओळखल्या जात होती, ती आता अधिक अभ्यासांती सिंधू-सरस्वती संस्कृती म्हणून ओळखली जात आहे. अधिकाधिक अभ्यासातून हेदेखील स्पष्ट होत आहे की त्या संस्कृतीचा काळ आजवर समजत होतो त्यापेक्षा अधिकच जुना आहे. तर सिंधू-सरस्वती संस्कृतीला समांतर काही ठिकाणे, गांधार भूमीत आढळून आली आहेत. ऋग्वेदात दाशराज्ञ युद्ध ही एक फार महत्त्वपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. त्या युद्धात देखील गांधार भूमीतून गेलेल्या तत्कालीन टोळ्यांचा पुरावा डॉ. मांडतात. 

वेद वाङ्मय आणि प्राचीन पर्शिअन पवित्र ग्रंथ अवेस्ता मध्ये एका सामाजिक दुभंगाचा संदर्भ आहे. सिंधू-सरस्वती संस्कृतीतील शहरे लयाला जात असताना मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यातील एक शाखा पश्चिमेकडे गेली. त्यांनी अग्निपूजेवर आधारित असा पारशी धर्म वाढवत नेला. दुसरी शाखा पूर्वेकडे येऊन गंगा खोऱ्यात विसावली आणि यज्ञ संस्कृतीवर आधारित सनातन धर्म पुढे गेला. या सर्व घटनेचा, त्याच्या शक्यतांचा, त्यांच्या आपसातील संबंधांचा यथायोग्य धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे. 

महाभारत, गांधार आणि भारतीय युद्ध हा भारताच्या इतिहासातील एक स्थित्यंतर घडवून आणणारा टप्पा आहे. केवळ महाकाव्यांतील लिखित पुरावेच नाही तर पुरातत्त्वीय पुरावे देखील आता समोर येत आहेत. त्यातून हा अन्योन्य संबंध अधिकाधिक ठळक होत आहे. याचाही यथायोग्य धांडोळा घेण्यात आला आहे. 

पुढे ग्रीक आक्रमण, त्यांना भारताच्या भूमीत झालेला कडवा प्रतिकार आणि मध्य आशियाच्या भूमीत स्थापन झालेली ग्रीक क्षत्रपांची राज्ये त्यातून पुढे आलेल्या अनेक परंपरा यांचा अभ्यास डॉ. पाठक यांनी मांडला आहे. उत्तरेकडून आलेली शक-कुशाणांची आक्रमणे, त्यांचा विस्तार आणि त्यासोबत घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे अफगाण भूमीत बौद्ध मताचा प्रचार-प्रसार. 

हे बौद्ध मत एका निराळ्या, सुंदर अशा गांधार कलाशाखेला वृद्धिंगत करुन गेले. भारतीय मूर्तिशास्त्र, कलाकारी यांच्या विकासाची एक शाखा गांधारात समृद्ध झाली. या कलाकारीचे सर्वोच्च टोक म्हणता येतील अशा बामियानच्या बुद्धमूर्ती.... होत्या. 

पुढचा इस्लामिक आक्रमणे, अफगाण भूमीचे बौद्ध मतातून संपूर्ण इस्लामीकरण हा इतिहास आहे. जयपाळ आणि अनंगपालांची राजपूत हिंदू राज्ये ही या भागातील शेवटची हिंदू राज्ये. इस्लामी आक्रमकांनी केलेल्या हिंदू-बौद्धांच्या कत्तली, त्यांची गोठलेली कलेवरे यातूनच त्या पर्वतरांगेला 'हिंदुकुश' हे नाव पडले. मध्ययुगीन अफगाण भूमीचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. गजनी-घोरीची आक्रमणे यापासून सुरु झालेला सिलसिला अब्दाली पाशी येऊन थांबला. तिथून पुढला ग्रेट गेमच्या वाटेने तालिबान पर्यंतचा इतिहास डॉ. पाठक यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या छोटेखानी पण आशयाने भरपूर असलेल्या पुस्तकात वाचायलाच हवा. 


पूर्वप्रसिद्धी: 


Artha and the Civilisation: What Really Drives the Indian Economy

  Any system rests on two principal components. One is the driving force behind the system's construction, and the other is the guiding ...