भारत आणि अफगाणिस्तान ही पूर्वापार चालत आलेली एक अतूट बंधनाची नाळ आहे. तीच डॉ. प्रमोद पाठक यांनी त्यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या पुस्तकात उलगडली आहे.
भारतीय उपखंड आणि त्याच्या लगत असणाऱ्या भूभागात जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक उदयाला आली, वाढली. काही बदल होत तीच संस्कृती आजही या उपखंडात टिकून आहे. मोठे बदल झाले ते सीमावर्ती भागात म्हणजेच, वायव्य भागात. इस्लामिक आक्रमणानंतर झालेले बदल वरवरचे आहेत हे बलोच स्वातंत्र्यकांक्षीच्या, "आम्ही पाकिस्तानी गेल्या ५०-६० वर्षांपासून आहोत, मुस्लिम १४०० वर्षांपासून पण गेल्या हजारो वर्षांपासून आम्ही बलोच आहोत" वाक्यातून स्पष्ट होते.
द अफगाण कनेक्शन या पुस्तकात डॉ. पाठक अफगाणिस्तानचा प्रागैतिहासिक काळापासून धांडोळा घेण्यास सुरवात करतात. त्या काळाचे काही पुरावे त्या भूमीत आहेत त्यांचे यथायोग्य दाखले देत एका महत्त्वपूर्ण घटनेकडे येतात.
सिंधू संस्कृती म्हणून जी ओळखल्या जात होती, ती आता अधिक अभ्यासांती सिंधू-सरस्वती संस्कृती म्हणून ओळखली जात आहे. अधिकाधिक अभ्यासातून हेदेखील स्पष्ट होत आहे की त्या संस्कृतीचा काळ आजवर समजत होतो त्यापेक्षा अधिकच जुना आहे. तर सिंधू-सरस्वती संस्कृतीला समांतर काही ठिकाणे, गांधार भूमीत आढळून आली आहेत. ऋग्वेदात दाशराज्ञ युद्ध ही एक फार महत्त्वपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. त्या युद्धात देखील गांधार भूमीतून गेलेल्या तत्कालीन टोळ्यांचा पुरावा डॉ. मांडतात.
वेद वाङ्मय आणि प्राचीन पर्शिअन पवित्र ग्रंथ अवेस्ता मध्ये एका सामाजिक दुभंगाचा संदर्भ आहे. सिंधू-सरस्वती संस्कृतीतील शहरे लयाला जात असताना मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यातील एक शाखा पश्चिमेकडे गेली. त्यांनी अग्निपूजेवर आधारित असा पारशी धर्म वाढवत नेला. दुसरी शाखा पूर्वेकडे येऊन गंगा खोऱ्यात विसावली आणि यज्ञ संस्कृतीवर आधारित सनातन धर्म पुढे गेला. या सर्व घटनेचा, त्याच्या शक्यतांचा, त्यांच्या आपसातील संबंधांचा यथायोग्य धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
महाभारत, गांधार आणि भारतीय युद्ध हा भारताच्या इतिहासातील एक स्थित्यंतर घडवून आणणारा टप्पा आहे. केवळ महाकाव्यांतील लिखित पुरावेच नाही तर पुरातत्त्वीय पुरावे देखील आता समोर येत आहेत. त्यातून हा अन्योन्य संबंध अधिकाधिक ठळक होत आहे. याचाही यथायोग्य धांडोळा घेण्यात आला आहे.
पुढे ग्रीक आक्रमण, त्यांना भारताच्या भूमीत झालेला कडवा प्रतिकार आणि मध्य आशियाच्या भूमीत स्थापन झालेली ग्रीक क्षत्रपांची राज्ये त्यातून पुढे आलेल्या अनेक परंपरा यांचा अभ्यास डॉ. पाठक यांनी मांडला आहे. उत्तरेकडून आलेली शक-कुशाणांची आक्रमणे, त्यांचा विस्तार आणि त्यासोबत घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे अफगाण भूमीत बौद्ध मताचा प्रचार-प्रसार.
हे बौद्ध मत एका निराळ्या, सुंदर अशा गांधार कलाशाखेला वृद्धिंगत करुन गेले. भारतीय मूर्तिशास्त्र, कलाकारी यांच्या विकासाची एक शाखा गांधारात समृद्ध झाली. या कलाकारीचे सर्वोच्च टोक म्हणता येतील अशा बामियानच्या बुद्धमूर्ती.... होत्या.
पुढचा इस्लामिक आक्रमणे, अफगाण भूमीचे बौद्ध मतातून संपूर्ण इस्लामीकरण हा इतिहास आहे. जयपाळ आणि अनंगपालांची राजपूत हिंदू राज्ये ही या भागातील शेवटची हिंदू राज्ये. इस्लामी आक्रमकांनी केलेल्या हिंदू-बौद्धांच्या कत्तली, त्यांची गोठलेली कलेवरे यातूनच त्या पर्वतरांगेला 'हिंदुकुश' हे नाव पडले. मध्ययुगीन अफगाण भूमीचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. गजनी-घोरीची आक्रमणे यापासून सुरु झालेला सिलसिला अब्दाली पाशी येऊन थांबला. तिथून पुढला ग्रेट गेमच्या वाटेने तालिबान पर्यंतचा इतिहास डॉ. पाठक यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या छोटेखानी पण आशयाने भरपूर असलेल्या पुस्तकात वाचायलाच हवा.
पूर्वप्रसिद्धी:
Comments
Post a Comment