गुलाबी थंडी. संध्याकाळची वेळ. वातावरणात वेगळीच धुंदी होती. हजारोंचा जनसमुदाय कानात प्राण आणून बसलेला. एकाच ध्यासासाठी. स्वरांची आतषबाजी कानात साठवण्यासाठी. रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी. चार-पाच दिवस चालणारा हा महोत्सव स्वरांची पर्वणी असते. महोत्सवाला आबालवृद्धांची अलोट गर्दी असते. आमच्यासारख्या तरुणाईचीही संख्या लक्षणीय असते. तिथे संगीतातले जाणकार येतात त्याचप्रमाणे आमच्यासारखे 'अ'जाणकारही येतात. शास्त्रीय संगीतातलं रागाचं नाव रागात अस्ताई, अंतरा वगैरे असतात यापलीकडे काहीही माहिती नसणारे आमच्यासारखे 'अ'जाणकार तिथे येतात ते फक्त गायकीतला गोडवा, ती नजाकत ऐकण्यासाठी. शास्त्रीय घटक कळत नसले तरी ते ऐकायला छान वाटतात आणि डोक्यात काहीतरी स्ट्राईक होतं. बस्स!! एवढ्याचसाठी आम्ही तिथे जातो. यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंडित संजीव अभ्यंकर-डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची 'जसरंगी' मैफल, उस्ताद निशात खान यांची सतार आणि त्याला पंडित आनिन्दो चात्तार्जी यांची तबल्यावर साथ. आणि संगीत मार्तंड पंडित जसराज यांचा स्वरसाज. ही पर्वणी सोडणं शक्यच नव्हतं.
जसरंगी मैफिलीत मूर्छना प्रकारचे सादरीकरण पंडित अभ्यंकर आणि पंडिता भिडे-देशपांडेनी केले. पंडिता अश्विनिजीनी राग अभोगी आणि पंडित अभ्यंकरांनी राग गायले. एकाच मंचावर भिन्न राग मांडले. सारेगम पर्यंत राग अभोगी तर मध्यमाला षड्ज मानून कलावती राग पेश केला. (म्हणजे नक्की झालं ते कळलंच नाही) पण संजीव अभ्यंकरांचा गोड आवाज, भिडे-देशपांडेंचा आवाज, त्या दाणेदार ताना ऐकायला मजा येत होती. त्यानंतरचा राग दुर्गा आणि रागांचा राजा भूप अशीच झिंग आणून गेला. एव्हाना थंडी वाढायला होती. या जसरंगी मैफिलीनंतर उस्ताद निशात खान आणि पंडित आनिन्दो याचं आगमन झालं. त्यांची सतार ऐकायला मी अतिशय उत्सुक होतो. सतार हे माझं आवडतं वाद्य. तरीसुद्धा प्रत्यक्ष सतार कधीच ऐकली नव्हती. आता योग आला होता.
उस्ताद निशात खान यांनी यमन वाजवला. यमन राग हा एक अवघड राग आहे. आणि हिंदी सिनेमांमध्ये बरीच गाणी या रागाच्या सुरावटीवर बेतलेली आहेत. इतकीच आम्हाला या रागाची माहिती. आणि तसाही माहिती करून घ्यायची इच्छा नव्हती. निदान त्या वेळी तरी. कानात प्राण आणून बसलो होतो. यमन रागाची आलापी सुरु होती. कुठल्याही शास्त्रीय वाद्याच्या मैफिलीत तबल्याची साथ सुरु होण्यापूर्वी जी काही सुरावट छेडली जाते त्याला आलापी म्हणतात, यापलीकडे 'आलापी' विषयी काहीही माहिती नव्हतं. गमक आणि मींड यांनी बढत सुंदर जमली होती. अनेक आरोही-अवरोही वर्ण, खटक्या, मुरक्या, लांगडाट, जमजमा सुंथ यांची भरपूर रेलचेल होती असं एका जाणकाराने सांगितल्यामुळे कळलं होतं. (हे सगळं कधी येउन गेलं ते समजलंच नव्हतं )बाकी हे सोडलं तर, सतारीवरची ती करामत डोक्यात फिट्ट बसली होती. पंडित अनिन्दो यांची तबल्यावर उत्तम साथसंगत होती. त्या थंडीत हे दोन कलाकार बोटांमध्ये वीज संचारल्यागत सतार-तबल्यावर करामती होते. आणि मग मंचावर आगमन झालं संगीत मार्तंड पंडित जसराज याचं.
या जसराज मैफिलीचा आनंद दुहेरी होता. पंडित जसराज यांच्या स्वरसाथीला पंडित संजीव अभ्यंकर होते. द्रोणाचार्य आणि अर्जुनच जणू. अर्जुन आपली कला दाखवून गेला होता आणि आता द्रोणाचार्य आपली आयुधं सरसावून आले होते. अभूतपूर्व योग होता तो. पंडितजींनी राग पुरिया सदर केला. 'अब मोरी रखो लाज' ही विलंबित झपतालातली सुरु झाली. आणि शेवट मध्यलय त्रितालातली 'शामकुंवर मोरे घर आये' सादर केली. हीच बंदिश रेकोर्ड केलेली ऐकली आहे पण प्रत्यक्षात ती ऐकताना काही निराळीच अनुभूती येत होती. या पहिल्या दिवशीच्या अभोगी-कलावती, दुर्गा-भूप, यमन, पुरिया या रागांच्या मैफिलीमुळे सुरांचा अमृतकुंभच जणू उघडला होता.डोळे-कान तृप्त करणारा हा अनुभव संपूच नये असं वाटत होतं. ती मैफिल संपली तरी ती स्वरांची धुंदी पुढलं आयुष्यभर तरी उतरेल असं वाटत नाही.
Comments
Post a Comment