गडांचा राजा…
महाराष्ट्र. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला, विविधतेनं नटलेला, विविध भाषा, विविध प्रकारची माणसं, विविध संस्कृती असणारा वैविध्यपूर्ण प्रदेश. इथे काय नाही? गोदावरी, कृष्णा-भीमेसारख्या नद्या कि ज्यांच्या काठाकाठाने इथली संस्कृती बहरली-फुलली. साक्षात भार्गवरामाने समुद्र मागे हटवून निर्माण केलेली कोकणची नितांतसुंदर भूमी. मायमराठीचा माहेरघर म्हणावा असा मराठवाड्याचा प्रदेश. समृद्ध वनांनी बहरलेली अशी विदर्भाची भूमी. इतकं सगळं असूनही आपल्या नितांतसुंदर आणि रौद्रभीषण अस्तित्व राखून या राष्ट्राभूमिचा खद पहारेकरी म्हणजे सह्याद्री. मराठेशाहीची मुहूर्तमेढ आपल्या अंगाखांद्यावर समर्थपणे रोवून घेणारा आणि अभिमानाने आजतागायत वागवणारा हा सह्याद्री. या महाराष्ट्र देशी चांद्यापासून-बांद्यापर्यंत ४०० हून अधिक गडकोट आहेत. त्यातले निम्म्याहून अधिक ह्या राकट, कणखर सह्याद्रीत आहेत. पुरंदर, राजगड, तोरणा, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, हरिश्चंद्रगड…. किती नावं सांगावीत? हे प्रमुख गडकोट, यांच्या जोडीलाच असंख्य लहानमोठे किल्ले हा सह्याद्री आपल्या अंगाखांद्यावर वागवतो आहे. पण या सगळ्यांचा राजा शोभावा असा गड म्हणजे गडांचा राजा रायगड. मराठेशाहीची दुसरी राजधानी. जिने छत्रपती शिवाजीचा राज्याभिषेक पहिला, संभाजीचा चौफेर पराक्रम पहिला. ह्या पराक्रमाचे साक्षीदार म्हणून आज हे गाड्कोतच उरले आहेत, तेही भग्न रुपात. त्या असीम पराक्रमाचं स्मरण करणं आपलं कर्तव्यच आहे. असाच पवित्र आणि उदात्त वगैरे हेतू उराशी बाळगून आम्ही पाच महाभाग या रायगड दर्शनासाठी निघालो. मी, शुभम, वरद, संकेत, आणि कौस्तुभ.
पावसाळा हा तसा सुट्ट्यांचा हंगाम. आणि आमच्यासारख्या भटक्यांसाठी तर हा पर्वणीचा काळ. ह्या सर्व गडकोटांच आणि एकूणच सह्याद्रीचं पावसाळ्यातलं रूप तर काय वर्णाव? साक्षात स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्यासारखं वाटतं. उरात प्रचंड उत्साह बाळगून आम्ही पुण्याच्या स्वारगेट स्थानकावर आलो. ( आपल्याकडचे लोक इतर काही बाळगो न बाळगो उत्साह, महत्वाकांक्षा वगैरे बाळगुनच असतात.) बराच वेळ वाट पाहिल्यानंतर बस मिळाली. त्या भर सुट्ट्या संपण्याच्या काळातसुद्धा फारशी गर्दी नव्हती. त्या गाडीत प्रवासी पक्षात आम्ही पाच, तीन लोकांचं एक कुटुंब आणि दोन जोड्या होत्या. ST पक्षाकडून Driver आणि Conductor याचं आगमन झालं. तिकिटांचा नित्य कार्यक्रम झाला आणि त्या बसचा खडखडाट सुरु झाला. आम्ही ज्या ताम्हिणी घाट मार्गे जाणार होतो त्याची रसभरीत वर्णनं मी आधीपासूनच केलेली असल्यामुळे इतर चौघेजण भलतेच उत्साही होते ते पाहण्यासाठी. हि उत्सुकता इतकी शिगेला पोचली होती कि त्या तालात वरद Conductor साहेबाना विचारता झाला,
"अं… साहेब ताम्हिणी घाट सुरु व्हायला किती वेळ आहे?"
Conductor साहेबांनी माशी झटकावी तद्वत हा प्रश्न निकालात काढला,
" लई टायम आहे, बसा गुमान मागं… " प्रवासी वर्गात अपेक्षेप्रमाणे हास्यस्फोट झाला. आता बस पुण्यापासून बरीच लांब आलेली होती निसर्गाची मुक्त उधळण दिसू लागलेली होती. फोटो काढण्याचा सपाटा सुरु झालेला होता. आम्ही निव्वळ मजा करायला निघालेलो होतो त्यामुळे लाज शरम गुंडाळून ठेवून मुक्त शब्दांची नी हास्याची उधळण चाललेली होती. आमच्या नकळतच बसमधले इतर प्रवासीदेखील आमच्या हास्यकल्लोळात सामील होत होते. पुण्यापासून निघाल्यानंतर ताम्हिणी Actually सुरु होईपर्यंत प्रत्येकाने किमान ५ वेळा तरी मला प्रश्न विचारला असेल,
''कधी सुरु होतोय बे घाट ?"
शेवटी एकदाचा तो घाट सुरु झाला. एका बाजूला मुळशी धरणाचा अथांग जलाशय आणि दुसर्या बाजूला उंच कडे आणि रस्त्याच्या कडेला पडणारे जलप्रपात. काय वर्णन करावं त्या सर्व परिसराचं? स्वर्ग म्हटलं तर स्वर्गाचादेखील अपमान होईल. डोंगरांवर पसरलेली पांढरी शुभ्र धुक्याची चादर आजूबाजूला सुंदर नजारा. कोणाच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. ह्या दीड तासात बस मध्ये मात्र काही मुलभूत बदल झाले होते. काही नवीन लोक पिरंगुट-मुळशी वगैरे गावातून चढले होते. मी आणि शुभम एका सीटवर, संकेत आणि वरद एका सीटवर आणि कौस्तुभ एका सीटवर असे बसलो होतो. कौस्तुभच्या शेजारी एक जागरूक शेतकरी दादा बसले होते. निसर्गसौंदर्याचं शेतकारीदादाना फारसं अप्रूप असण्याचं काही कारणच नव्हतं. मग काय करता, शेताकारीदादानी आपल्या सहप्रवाशाशी बोलणी काढली,
"पुन्याकडचे दिसताय जनू…. "
कौस्तुभ् नि सहनुभूतीदर्शक नुसतीच होकारार्थी मान हलवली. मग शेताकारीदादानी पावसापाण्याच्या चर्चा सुरु केल्या,
"आवंदा पाउस लई लवकर सुरु झाला, " कौस्तुभच्या चेहऱ्यावर 'कुठून या नसत्या आपत्तीत अडकलो असले भाव होते. आमचा लक्ष होतच. आम्ही आपले त्याचा चेहरा बघून हसू दाबण्याचे शक्य तितकी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो.
''कुठले पुन्याचेच का आणखी कुठले तुम्ही?" इति शेतकरीदादा.
'' आम्ही परभणी चे… " अर्थात हे उत्तर कौस्तुभच.
''पिकं कंचे घेता तुम्ही?"
'' सोयाबीन, कापूस आणि उस घेतो'' चेहऱ्याकडे पाहवत नव्हतं हो कौस्तुभच्या. शेवटी कुठल्या तरी गावात हे शेतकरीदादा उतरले. प्रवासात पंडित मैत्री होते म्हणतात. कौसुभच्या वाट्याला हे शेती पंडित आले होते. हा सुखसंवाद झाल्यानंतरचा त्याचा चेहरा म्हणजे, परमानंद वगैरे दाखवणारा चेहरा होता. आमची तर हसून हसून मुरकुंडी वळली होति. हे सगळं होत होत माणगाव जवळ आलं होतं. बडबड हसणं हे सगळं करून पोरं कावली होती. एकदाचं माणगाव आलं, तिथून महाड ला जाण्यासाठी बस लगेच मिळाली. महाडला उतरलो. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. एका हॉटेलात रूम घेतली समान टाकलं, थोडेसे 'फ्रेश' झालो आणि तेवढ्यात महाराष्ट्र वीज मंडळाची अवकृपा झाली. लाईट गेले. आता काय करायचं? निघालो मग गाव भटकायला. बरं ते गाव पण काय? टिपिकल तालुक्याचा ठिकाण असतं त्या गावाला जशी कळा असते तसलीच कळा होती. जेवणखाण करून झोपलो.
दुसर्या दिवशी सकाळी, लवकर उठलो. Actually रोजची जी झोपायची वेळ असायची त्या वेळेला आम्ही चक्क झोप घेऊन उठलो होतो. रायगड पहायचा आहे हि धुंदी डोक्यात होती न! पटापट तयार झालो. महाड हून रायगड पायथ्याला कसे आलो ते सांगण्यात मी वेळ घालत नाही. रायगड पायथ्याला आलो. तिथलं दृश्य पाहून वाचाच बंद पडली. इतका ताम्हिणी घाट पाहून आलो पण जे समोर त्या क्षणाला दिसत होतं त्याला तोड नाही. चहापान करून 'हर हर महादेव' चा उद्घोष करून चढायला सुरुवात केली. रायगडाची चढाई भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवणारी गोष्ट आहे. सोपी आहे पण भरपूर आहे. सुरुवातीला गप्पा-गोष्टी कमी होत्या कारण पायर्या चढताना दमछाक होत होती. खुबलढा बुरुज आणि त्यांनतर थोडं अंतर गेल्यानंतर पायवाट आली. आजूबाजूला किरर्र झाडी आणि खोल दऱ्या मधून जाणारी चिंचोळी वाट. खूपच सुंदर. एका बाजूला गडाचा काळाकभिन्न आणि दुसऱ्या बाजूला दरी असल्या वाटेतून जात होतो. सुमारे तासाभरानंतर गडाच्या तटबंदीच प्रथमदर्शन झालं. वाहत्या पाण्याचा आवाज फार तीव्रतेनं येत होता. पण किरर्र झाडीमुळे अंदाज येत नव्हता. समोर जाऊन पाहतो तो काय, एक पाण्याचा प्रपात भर वाटेतच पडत होता. त्या पाण्याचा तो आवाज, ते दृश्य अवर्णनीय. चान्स सोडण्याचा प्रश्नच नव्हता. वरद, संकेत, शुभम, कौस्तुभ त्या धारेखालीच जाऊन उभे राहिले. त्या थंड पाण्यात हात घटला तर गोठून गेला असता असलं थंड पाणी. तसल्या पाण्याच्या धारेखाली जाऊन आम्ही उभे राहिलो. वरद तर उत्साहाच्या परमोच्च शिखरावर होता. फोटो चा धडाका उडालेला होता. त्या वाहत्या पाण्यात बसून ध्यान लाऊन बसणे काय, पाण्यात अक्षरशः आडवा होणे काय! असल्या नाही नाही त्या गोष्टी करून झाल्या. मनसोक्त भिजून पुढे निघालो. . महाद्वाराच्या अलीकडे आणखी एक धबधबा. तिथेही मनसोक्त भिजलो. ह्या प्रपाताची धार अजूनच बोचरी होती. रायगडचा महादरवाजा साद घालत होता.
रायगडाच्या महादार्वाजात उभे होतो. मी नेहमीप्रमाणे माहितीदानाला सुरुवात केली. महाद्वाराच्या बांधकामाचं वैशिष्ट्य वगैरे सांगून झालं. नी पुढे निघालो. रायगडचा महादरवाजा आला म्हणजे किल्ला आला असे नाही. तिथूनही अडीचशे पायर्या चढून जाव्या लागतात. तशा त्या चढून गेलो. आणि रायगडाची खरी ओळख असणारे ते विजयस्तंभ आणि बेलाग बालेकिल्ला समोर उभा राहिला. वरद, संकेत आणि शुभम नि रायगड पहिल्यांदाच पहिला होता. रायगडाच हे वैभव पाहून तर आनंदाला पारावर राहिला नाही. एकतर गडावर आमच्या शिवाय दुसरं कोणीही नव्हतं. नाही म्हणायला शिवराज्याभिषेक दिनाच्या तयारीसाठी आलेले मंडप कार्यकर्ते होते. पण त्याचं काम राजसभेत सुरु होतं. विजयस्तंभ, ध्यानाची जागा, संभाजीचा महाल असं सगळं पाहत महाराजांच्या राजवाड्यात आलो. राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची ८ वर्ष इथे व्यतीत केली. आणि ३ एप्रिल १६८० ला याच ठिकाणी महाराजांनी आपली जीवनयात्रा संपवली. नंतर प्रधानांचे वाडे, राणीवसा आणि फड ( Administrative Office ) पाहून मागल्या बाजूनी राजसभेत प्रवेश केला. तिथे राज्याभिषेक दिनाची तयारी सुरु होती. या राजसभेतला आवाजाची विलक्षण व्यवस्था पाहून त्या काळच्या Engineer's ची तारीफ करत बाजारपेठेकडे निघालो. रायगडावर येउन शिव समाधीचं दर्शन न घेत जाण म्हणजे काशीला जाऊन विश्वेश्वराच दर्शन न घेत जाण्यासारखं आहे. समाधीचं दर्शन घेऊन उतरण्याच्या तयारीने वापस निघालो.
उतरताना हलक्या प्व्साला सुरुवात झाली होती. त्यामुळे असल्या ठिकाणी जी वस्तू सर्वात जास्त वेळ खाते ती म्हणजे कॅमेरा, ती बंदिस्त होऊन बसली. त्यामुळे चढताना लागला त्याच्या अर्धाच वेळ उतरताना लागला. पायथ्याला येउन बसची वाट पाहत बसलो. चौकशीअंती कळले कि महाडकडे जाणारी एक बस नुकतीच गेली आहे. आता २ तास तरी बस नाही. ज्यासाठी इतका आटापिटा करून धावतपळत खाली उतरलो ती बस अमचा पुतळा करून निघून गेली होती. आता २ तास बस ची बघत बासना प्राप्तच होतं. तशी ती पाहत बसलो. रायगडावर आता मुसळधार पूस बरसात होता. समोर संपूर्ण पांढरी चादर पसरली होती. समोर उभा असलेला माणूस दिसत नव्हता अत्र एवढ्या उंचीचा रायगड काय दिसणार पण त्या रायगडावरून नजर हटत नव्हती एवढ मात्र खरं…!!
Comments
Post a Comment