Skip to main content

अथातो बिंब जिज्ञासा


अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती, मंदिर यांचे अभ्यासक आशुतोष बापट यांनी अनुवादित करुन या पुस्तकाच्या रुपाने पुढे आणला आहे.

भारतातील धर्म संकल्पना अनेकश्वरवादी आहे, ती विविध विचार, दर्शने, उपासना पद्धती यांना वेगळा विचार करण्यास परवानगी देते तरीही एका परंपरेत राखते. भारतीय परंपरेतील हिंदू धर्मात आणि काही पंथात मूर्ती निर्माण, मूर्ती पूजा आहे. त्याचे स्वरूप, प्रकार भिन्न आहेत. त्याचा साकल्याने विचार करतांना देगलूरकर मांडतात की भारतीय समाजाच्या संदर्भात कोणतीही चिन्हे, सांकेतिक खुणा किंवा धार्मिक प्रतिमा तयार केल्या जातात त्या कोणतातरी संदेश समाजापर्यंत पोचवण्यासाठी केलेल्या असतात. हे मान्य करुन प्रश्न येतो तो डॉ. देगलूरकर मूर्तींना 'बिंब' ही संज्ञा का देतात? तर त्याचे अतिशय समर्पक उत्तर ते देतात, "एखाद्या तत्त्वज्ञानाने किंवा विचारसरणीने मोक्षप्राप्ती हे सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी जी विचारसरणी सांगितली त्याचे मूर्तीमध्ये रुपांतर प्राचीन शिल्पीनी करुन दाखवले. त्याला मी 'बिंब-ब्रह्म' म्हणतो. ज्याप्रमाणे संगीतात नाद-ब्रह्म, व्याकरणात शब्द-ब्रह्म, तत्त्वज्ञानात अद्वैत-ब्रह्म तसेच मूर्ती शास्त्रात बिंब-ब्रह्म."

या एका वाक्यातून डॉ. देगलूरकर भारतीय विचार परंपरेचे, धर्म संकल्पनेचे सार सांगून जातात, आणि विषयाला आरंभ करतात ते त्यांचा मूर्तिशास्त्राशी असलेला अनुबंध उलगडून. मूर्तिशास्त्राचे प्रयोजन, वस्तुस्थिती ते तीन प्रकारांनी विशद करतात. एक समाज प्रबोधन, दुसरे ते सामाजिक परिवर्तन आणि तिसरे ते सामाजिक अभिसरण. सामाजिक परिवर्तनाचे उदाहरण देताना ते आंध्र प्रदेशातील चंचू लोकसमूहाची 'वृष्णीवीर' या पाच आकृतींपैकी एक नरसिंह, विष्णूच्या अवतार कल्पने द्वारे सनातन हिंदू परंपरेत कशी समाविष्ट झाली याचे देतात. सामाजिक अभिसरणाचे उदाहरण देताना ते पर्शियातील सूर्यपूजक आणि अग्निपूजक यांच्यातील झगड्यामुळे भारतात पायात बूट घातलेला सूर्यदेव यांच्या मूर्ती कोणार्क आणि मोढेरा येथे कशा आल्या याची कहाणी सांगतात. 

मूर्तिशास्त्राची अभिव्यक्ती आणि विकास यावर भाष्य करताना ते ऋग्वेदातील सूक्ते विष्णूची शाब्दिक प्रतिमा होत्या ते पुढचा विकास हा नराकार, म्हणजे मूर्ती मनुष्यरूपात घडवण्यास सुरुवात केली यावर भर देतात. त्याचा पुढला विकास म्हणजे मूर्तींना अतिमानवी रूप, चिन्हे देणाऱ्या 'सुराकार' प्रतिमा. मग एकल प्रतिमा ते मिश्र प्रतिमा, एखादी कथा उलगडून सांगणारी प्रतिमा असा विकास त्यात दिसून येतो. श्रुती-स्मृती-पुराणांनुसार त्या त्या देवतांची शुभचिन्हे आणि त्याद्वारे वैशिष्ट्ये अधोरेखित करणे हे ठळक झाले. जसे शंख-चक्र-गदा-पद्म ही विष्णूची लक्षणे, त्रिशूळ-डमरू-नाग-खड्ग/कवटी ही शिव/भैरवाची लक्षणे, किंवा त्यांची वाहने याद्वारे प्रतिमानिश्चिती ठळक झाली.

पौराणिक कथा या मूर्तीद्वारे उलगडून सांगितल्या जातात. त्याचे उत्कृष्ट उदाहरण शिव-पार्वतीचे आहे. पार्वती जेव्हा शिवाच्या प्राप्तीसाठी आराधना, तपस्या करत असते तेव्हा ती तपस्यारत पार्वती, तिला गौरी म्हटले जाते. तिचे वाहन चिवटपणाचे, निर्धाराचे प्रतीक म्हणून घोरपड दाखवले जाते. पार्वती जेव्हा गौरी असते तेव्हा शिव हा 'हर' म्हणून संबोधला जातो. महाराष्ट्रात विवाहापूर्वी 'गौरीहर' पूजन केले जाते, यामागील गर्भितार्थ वधूसमोर पार्वतीचा आदर्श असावा हा असतो. तसेच अर्धनारीश्वर शिल्प. हे केवळ शिव-पार्वतीचे मिलन नाही तर प्रकृती आणि पुरुष या संकल्पनेचे मूर्त रूप असते. ते प्रकृती आणि पुरुष तत्त्वातून विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सांख्य दर्शनाचे प्रतीक आहे. 

अशाच प्रतिमा शैव, वैष्णव, शाक्त, नाथ संप्रदाय यांच्या आहेत. त्यांच्या निराळ्या कथा आणि प्रतिमा आहेत. मूर्ती लक्षण, वाहन यावरून ती मूर्ती कोणाची हे जसे निश्चित करता येते तसेच मूर्ती कुठल्या मंदिरात आहे, मंदिराच्या कोणत्या भागात आहे यावरून ते मंदिर कोणते हेदेखील निश्चित करता येते. जसे भोकरदन जवळील अन्वा येथील मंदिर, ज्याच्या मंडोवरावर (बाह्य भिंतीवर) विष्णूच्या चोवीस विभवांच्या शक्ती (पत्नी नव्हे) कोरलेल्या आहेत. विष्णूच्या हातातील प्रदक्षिणा क्रमाने शंख-चक्र-गदा-पद्म कसे आहेत यावरुन त्याचे केशव, माधव, शारंगधर, विष्णू, नारायण, संकर्षण, अनिरुद्ध, वामन, दामोदर असे विभव ठरतात. त्यांना चतुर्विंशतिमूर्ती म्हणतात. प्रत्येकाची विष्णूच्या त्या विभवांनुसार शक्ती आहेत. त्या शक्ती प्रतिमा प्रामुख्याने आहेत, पण गाभाऱ्यात शिवलिंग आहे, यावरून हे निश्चित होते की ते मूळ लक्ष्मीचे मंदिर होते, कालांतराने बदल होऊन गाभाऱ्यात महादेव प्रस्थापित झाले. अशा अनेक अभ्यासपूर्ण कथा, दाखले देत बिंब ब्रह्माचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आला आहे. 

बिंब-मूर्तीचे प्रयोजन यावर आपले विवेचन मांडल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो काल निश्चितीचा, म्हणजे कोणत्या काळातील मूर्तींचा अभ्यास प्रामुख्याने करण्यात आला आहे. तो सातवाहन ते यादव या कालखंडाचा करण्यात आला आहे. या राजवटींचा थोडक्यात आढावा घेताना त्या त्या राजवटीतील प्रमुख राजे, त्यांचे मंदिर निर्माणातील योगदान यावर भाष्य केले आहे. त्यात अनेक उद्बोधक दाखले दिले आहेत. राजांचे पराक्रम, राण्यांची दानशूरता मंदिरांतील मूर्तींवर कशी प्रतिबिंबित होते याची उदाहरणे देण्यात आली आहेत. कालनिश्चितीसोबतच स्थलनिश्चिती देखील स्पष्ट करण्यात आली आहे. यात केवळ महाराष्ट्रातील मंदिरांचा, मूर्तींचा अभ्यास करण्यात आला आहे आणि आवश्यक तिथे तुलनेकरता भारतभरातील मूर्तींचा विचार केला आहे. महाराष्ट्रातील जुन्यात जुने असे वाकाटक कालीन मांढळ येथील मंदिर ते अंबरनाथ, सिन्नर येथील मंदिरे तसेच अगदी २१व्या शतकात खोदकाम करताना आढळलेल्या मूर्तींचा अभ्यास करुन डॉ. देगलूरकर यांनी हा थिसीस सिद्ध केला आहे. 

डॉ. देगलूरकर यांची पुस्तके  ज्यांनी वाचली असतील किंवा व्याख्याने ऐकली असतील ते त्यांच्या साध्या, रसाळ भाषेशी, आजोबा आपल्या नातवाला गोष्ट सांगत आहेत अशा पद्धतीने हा गहन विषय उलगडण्याच्या पद्धतीविषयी परिचित असतील. तीच पद्धत त्यांच्या थिसीस मध्ये आहे आणि अनुवादकर्ते आशुतोष बापट यांनी ती अचूकपणे पकडली आहे. अनुवादकर्ते हे डॉ.देगलूरकर यांचे एका अर्थी शिष्यच असल्यामुळे हे त्यांच्यासाठी कठीण गेले नसावे. त्यामुळे अनेक वेळा मूर्तिशास्त्रातील कठीण संकल्पना, शास्त्र वाचत असतानाही ते सुलभ होऊन आपल्यासमोर येतात.  स्नेहल प्रकाशनाने अतिशय नेटके असे हे पुस्तक तयार केले आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या खास वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती भारतात अन्यत्र नाहीत. आपले हे वैभव समजून घ्यावे, थोडासा त्यामागचा शास्त्रशुद्ध आधार जाणून घेत अथातो बिंब जिज्ञासा करावी, बिंब-ब्रह्म ते वास्तू-ब्रह्म असा प्रवास अधिक डोळस, आनंददायी होईल हे नक्की. 

अथातो बिंब जिज्ञासा 

डॉ. गो. ब. देगलूरकर 

अनुवाद: आशुतोष बापट 

प्रकाशक: स्नेहल प्रकाशन


Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...