Skip to main content

जागतिक आर्थिक घुसळणीत चमचमता तारा भारत

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४:

उत्तम आर्थिक विकासदर, संतुलित देशांतर्गत महागाई, स्थिर बाह्य क्षेत्र, स्थिर खासगी उपभोग, गुंतवणुकीला भक्कम मागणी या घटकांच्या आधारे दमदार आर्थिक विकास भारताने साधला आहे. 


फेब्रुवारीला लोक कान टवकारून, सज्ज होऊन बसलेले असतात. अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत, त्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात काय बदल होणार, काय महागणार, काय स्वस्त होणार.  मध्यमवर्गीय, नोकरदार आयकर भरणारे, सवलत मिळते की करात वाढच होते हे जाणून घेण्यासाठी सर्वाधिक उत्सुक असतात. ते बरोबरच आहे. पण आताशा किंबहुना मोदी सरकार मध्ये सुरुवातीचे काही अर्थसंकल्प सोडले तर फार काही उलथापालथ घडवणारे निर्णय येत नाहीत. नुकताच आलेला निवडणुकोत्तर पूर्ण अर्थसंकल्पही याला अपवाद नाही. पण या सगळ्यात एका महत्त्वाच्या गोष्टीकडे अर्थतज्ज्ञ, अभ्यासक वगळता इतरांचे फार लक्ष जात नाही, ती म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल. 

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार, सध्या डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन, हे मुख्यतः रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या माहिती-आकडेवारीच्या आधारे आर्थिक पाहणी अहवाल तयार करतात, तो केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे स्वाधीन करतात. या आर्थिक पाहणी अहवालात गेल्या वर्षीच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा, त्यापूर्वीच्या काळातील धोरणांमुळे गेल्या वर्षात काही परिणाम झाला का, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि पुढील काळात अर्थव्यवस्था कशी असेल, आव्हाने काय असतील यांवर टिप्पणी असते. हा अहवाल अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी संसदेच्या पटलावर ठेवणे आवश्यक असते, त्यानुसार दर वर्षी साधारण ३१ जानेवारीला ठेवला जातो, यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे फेब्रुवारीत अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला होता. त्यामुळेच पूर्ण आर्थिक पाहणी अहवाल २२ जुलै रोजी आला आणि २३ जुलै रोजी अर्थसंकल्प. 

वर्ष २०२३-२४ च्या आर्थिक पाहणी अहवालात २०१४-२४ या दशकाचा, दशकातील बदलांचा आढावा घेत मांडणी केली आहे. त्यातील वैशिष्ट्ये पुढे येतीलच, सुरवात प्राथमिक आकडेवारी पासून करणे आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ८.२%, तर महागाई दर ५.४%, सकल मूल्यवर्धन ७.२% आणि कर संकलनात १९.१% निव्वळ वाढ, चालू खात्यातील तूट नीचांकी ०.७% वर आली आहे. या आकडेवारीचे सार शब्दांत वर्णन करायचे तर उत्तम आर्थिक विकासदर, संतुलित देशांतर्गत महागाई, स्थिर बाह्य क्षेत्र, स्थिर खासगी उपभोग, गुंतवणुकीला भक्कम मागणी या घटकांच्या आधारे दमदार आर्थिक विकास भारताने साधला आहे. 

ही दमदार कामगिरी गेल्या दशकभराच्या धोरणात्मक पायाभरणीचा परिपाक आहे. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक मूलभूत धोरणात्मक निर्णय घेतले त्यात उद्योग, वित्त क्षेत्र आमूलाग्र बदलणारी धोरणे होती त्याचबरोबर अंत्योदय सूत्रानुसार आखलेली धोरणे होती. दिवाळखोरी आणि नादारी संहिता, वस्तू व सेवा कर, रेरा सारखे वित्त, उद्योग क्षेत्र ढवळून काढणारे हे निर्णय आहेत. जनधन, युपीआय, मुद्रा, स्टॅन्ड अप, सारखी अंत्योदय सूत्रानुसार राबवलेली धोरणे योजना आहेत. सामाजिक क्षेत्रात उज्ज्वला, उजाला, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, जल जीवन मिशन, आयुषमान भारत, आवास योजना अशा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणाऱ्या, अंत्योदय सुत्रानुसारच्या योजना आहेत. त्याचबरोबर सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजना, कृषी क्षेत्रासाठी कृषी सिंचाई, e NAM, आणि पायाभूत सुविधा विकासावर प्रचंड भर दिला गेला आहे. 

सामाजिक विकास, सामाजिक न्याय यासाठी होणाऱ्या खर्चात देखील गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. सामाजिक सुविधा यावर होणारा खर्च जीडीपीच्या ७.९% वर पोचला आहे, आरोग्य सुविधेवरील खर्च १.९% वर पोचला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुषमान भारत योजनेने कनिष्ठ मध्यमवर्ग, गरिबांच्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन आणले आहे. मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग आणि गरीब यांना आपल्या आर्थिक स्थितीच्या एक किंवा दोन स्तर खाली आणण्यात आरोग्यावरील, विशेषतः मोठ्या, गंभीर आजारांवरील उपचाराचा खिशातून करावा लागणारा खर्च हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. आयुषमान भारतमुळे ही शक्यता खूप कमी झाली आणि त्यामुळे वाचलेले उत्पन्न इतर उत्पादक घटकांकडे वळून कौटुंबिक उन्नतीचा वेग वाढला असे आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले आहे. 

दिवाळखोरी आणि नादारी संहितेमुळे वित्त क्षेत्रातील 'ट्वीन बॅलन्स शीट प्रॉब्लेम' सुटायला खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. गेल्या तीन वर्षात ३३,३९४ कॉर्पोरेट कंपन्या ज्यात विविध वित्तसंस्थांचे १३.९ लाख कोटी रुपये अडकले होते अशी प्रकरणे निकालात निघाली आहेत. बँका सुस्थितीत आल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडून होणारा वित्तपुरवठा १६४.३ लाख कोटींवर गेला आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह योजनांमधून १.२८ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. खासगी गुंतवणुकीला चालना, MSME चा विस्तार, आणि कृषी क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. उद्योग वृद्धी दर ९.५% वर गेला आहे. हे होत असताना मात्र एक महत्त्वपूर्ण नोंद करण्यात आली आहे की वित्तपुरवठ्यात बँकांचा दबदबा कमी होत भांडवल बाजाराचा सहभाग वाढत आहे. याचे पडसाद अर्थसंकल्पीय तरतुदीत दिसून आले.  फ्युचर्स-ऑप्शन ट्रेडिंग, समभाग, म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून फिरणारा पैसा काही प्रमाणात का होईना पुन्हा बँकिंग व्यवस्थेत यावा अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

या सर्व सकारात्मक वातावरणात काही चिंताही यात व्यक्त करण्यात आल्या आहेत. जागतिक पातळीवर, विशेषतः विकसित देशात व्याजदर वाढीमुळे भारतात देखील व्याजदर वाढ झाली. परिणामी वित्तुभारणीचा खर्च वाढला, तरीही भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीवर झाला नाही. भांडवली बाजारात देखील झाला नाही कारण देशांतर्गत पैसे म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक माध्यमातून गुंतवला गेला. हरित ऊर्जा क्षेत्रात भारताने दणदणीत कामगिरी केली आहे. त्यासाठी गुंतवणूक केली आहे. हे करत असताना खासगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीवर भर, रोजगार निर्मितीवर भर देत वेगवान आर्थिक वृद्धीचा दर राखता येणार आहे. 

आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प दोन्हीही आता आलेले आहेत. अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात चर्चा, वादविवाद झाले, आणखी काही दिवस होत राहतील. पण आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प एकत्रितरित्या पाहिले, अभ्यासले तर गेल्या दशकातील धोरणात्मक पाया, त्यावर उभारलेली आजच्या वेगवान वृद्धीची इमारत आणि विकसित भारताची पायाभरणी अशी सलगता प्रतीत होते. उच्च विकास दर, नियंत्रित महागाई, जागतिक व्यापारात वाढती भागीदारी, वाढती गुंतवणूक, याच बरोबर सामाजिक सुरक्षा केलेल्या खर्चासह राखलेली शिस्त यातून भारत जागतिक आर्थिक घुसळणीतला चमचमता तारा हे बिरुद राखत विकसित भारताकडे वाटचाल करणार हे नक्की. 

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरुण भारत




 

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...