भारतीय विद्या भवन, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेज आणि अशा अनेक संस्थांमधून चालणारे थेट उत्खनन, ताम्रपट, शिलालेख, नाणी, ग्रंथ, मंदिरे, लेण्या, कला यांच्या प्रत्यक्ष अभ्यासाद्वारे चालणारे संशोधन काहीसे मागे पडले. वास्तविक श्रेष्ठ इतिहास तज्ज्ञ म. के. ढवळीकर, काशीप्रसाद जायस्वाल, गो. ब. देगलूरकर, महाजन, राजवाडे, मजुमदार, प्रा. सांखळिया, इत्यादी लोकांचे विस्तृत, प्राथमिक संशोधनावर आधारित लेखन उपलब्ध आहे. पण ते काहीसे मागे पडले होते. पण आता देशाच्या विविध भागातला, प्रमुख धारेत दुर्लक्षिला गेलेला इतिहास पुढे येत आहे. तो येणे गरजेचे आहे. त्याच मालिकेत, 'कोण होते वाकाटक?' हे प्रा. डॉ. अरविंद जामखेडकर यांचे पुस्तक अपरान्त प्रकाशन घेऊन आले आहेत.
प्रा. जामखेडकर यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि अर्धमागधी विषयात बी. ए., संस्कृत आणि भाषाशास्त्र या विषयात एम. ए., वसुदेवहिंडी-अ कल्चरल स्टडी या विषयावर संशोधन करून पीएच. डी. केले. नागपूर विद्यापीठात भारतीय इतिहास, संस्कृती, आणि पुरातत्व विभाग, १९७७ ते १९९७ या काळात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि संग्रहालये या संचालनालयाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. या काळात अनेक प्रत्यक्ष उत्खनन कार्य, ऐतिहासिक स्थळांच्या भेटी, श्रेष्ठ पुरातत्त्वज्ञ, इतिहास तज्ज्ञ यांच्या कार्याचा अभ्यास या आधारे प्रा. जामखेडकर यांनी प्राचीन भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान, कला आणि स्थापत्य, बृह्दश्म संस्कृती या विशेष अभ्यासाच्या क्षेत्रात ग्रंथ लेखन केले आहे. त्याच मालिकेत त्यांचे भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ म्हणता येईल अशा काळावर आणि त्यातील महत्त्वाचा राजवंश वाकाटक यांच्यावरील पुस्तक महत्त्वपूर्ण आहे.
प्रा. जामखेडकर यांनी या पुस्तकात इतिहसा मांडणीची अनोखी पद्धत अवलंबली आहे. सुरुवातच वाकाटक कोण, महाकवी कालिदास आणि गुप्त-वाकाटक संबंध यांचा दाखला देऊन करतात. त्यानंतर तत्कालीन बदलत्या धर्मसंकल्पना आणि त्यामुळे स्थापत्य, कला, समाज यांच्या मांडणीत काय बदल झाले आणि त्यांचा गुप्त-वाकाटक कालीन इतिहास समजण्यास, अभ्यास करण्यास कसा लाभ झाला याचे सूतोवाच करतात. धार्मिक संकल्पनांबाबत जामखेडकर यांनी महामहोपाध्याय वा. वि. मिराशी, भाऊ दाजी लाड आणि इतर काही श्रेष्ठ इतिहास, संस्कृती तज्ज्ञांच्या अभ्यासाधारे काही निरीक्षणे नोंदवतात, ती सद्यकाळातील धार्मिक कल्पना, निष्कारण निर्माण होणारे, केले जाणारे कलह या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आहेत. जामखेडकर यांनी त्या काळाचे द्योतक, बदलता हिंदू आणि एकूणच भारतीय समाज, समाजरचना यांचे अचूक वर्णन केले आहे.
गुप्त-वाकाटक काळ म्हणजे मौर्य-शुंग-सातवाहन-कुशाण काळानंतर आलेला आहे. दरम्यानच्या काळात जैन-बौद्ध या क्रांतिकारी कल्पना येऊन, पंथ स्थापन झाले, त्यातही काळाच्या ओघात तात्त्विक मतभेद इत्यादी होऊन त्यांच्यातील संप्रदाय निर्माण झाले. प्रत्येक बंडखोरी कालांतराने प्रचलित व्यवस्थेत सामावून घेतली जाते, स्वतःच एक व्यवस्था बनून जाते या न्यायाने बौद्ध आणि जैन हे स्थापन झाले होते. त्याच काळात वैदिक धर्मात बदल होत होते. पुराणे घडत होती. नव्या प्रकारचा हिंदू धर्म पुढे येत होता. आगमाधिष्टित धर्म व्यवस्था पुढे आली. त्यातून शैव, वैष्णव, शाक्त इत्यादी पंथ-संप्रदाय पुढे येत गेले. होम-हवनातील बळी नाकारले गेले आणि धान्य, तूप, दूध इत्यादींचा अंगीकार झाला. इतिहासतज्ज्ञ नयनज्योत लाहिरी यांनी तो बदल स्पष्टपणे मांडला आहे, ते म्हणतात अशोकाचे शिलालेख प्रकृतीमध्ये आहेत, तर गिरनार येथील रुद्रदामनचा शिलालेख वाङ्मयीन मूल्य असणाऱ्या संस्कृतमध्ये आहे. हे अचानक कसे घडले? कारण गुप्त सम्राटांनी वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाला पाठबळ दिले होते. अशा सर्व पार्श्वभूमीवर, सातवाहन राजवट उतरणीला लागलेली असताना सातपुड्याच्या परिसरात विंध्यशक्ती या वाकाटकांच्या आद्य पुरुषाने आपल्या राजवटीचा प्रारंभ केला.
एका भविष्यवाणीनुसार या वाकाटक वंशाच्या चार शाखा होतील व त्या विविध प्रदेशावर राज्य करतील असे नमूद करण्यात आले होते. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांनुसार वाकाटक राजवंशाच्या दोन शाखा निश्चित आहेत. त्यातली एक रामटेक जवळच्या नंदीवर्धन (सध्याचे नगरधन) येथून तर दुसरी शाखा वत्सगुल्म (सध्याचे वाशिम) येथून राज्य करत होती. गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य याची मुलगी प्रभावतीगुप्ता ही नंदीवर्धन शाखेचा वाकाटक राजा रुद्रसेन याची पत्नी. रुद्रसेनाचे अकाली निधन झाल्यामुळे खूप मोठा काळ प्रभावतीगुप्ता मुले लहान असल्यामुळे स्वतः राज्य करत होती. तिच्यासोबत उज्जयनीहुन प्रभावतीगुप्ताच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तसेच साहाय्य करण्यासाठी पाठवलेला चंद्रगुप्ताचा विश्वासू म्हणजे महाकवी कालिदास. याच कारणामुळे मघदूत या काव्याची निर्मिती रामगिरी म्हणजेच रामटेकला झाली.
वाकाटक राज्याचा इतिहास वैभवसंपन्न आहे. हा इतिहास अभ्यासण्यासाठी विश्वसनीय पुरावे, साधने म्हणजे लेणी, मंदिरे, ताम्रपट, नाणी, पुराणे, शिलालेख आणि ग्रंथ हे आहेत. महाराष्ट्रात सातवाहन काळापासून प्रामुख्याने लेणी खोदण्यास आरंभ झाला आहे. त्याची परमावधी गुप्त-वाकाटक आणि पुढे चालुक्य-राष्ट्रकूट काळापर्यंत झाली आहे. मध्य प्रदेशातील बाघ, उदयगिरी, विदिशा, महाराष्ट्रातील धाराशिव, कान्हेरी, घारापुरी आणि अजिंठा इत्यादी अनेक लेण्या. मांढळ, रामटेक, लक्कमेट्टा, वाशिम इत्यादी ठिकाणची मंदिरे आणि असंख्य ठिकाणी मिळालेली नाणी, ताम्रपट हे वाकाटकांच्या वैभवशाली इतिहासावर प्रकाश टाकतात. लेणी खोदण्याची पद्धत, खांब, मूर्ती खोदण्याची पद्धत यावरुन कालनिश्चिती कशी केली जाते, उपलब्ध लिखित साहित्य आणि लेणी, मंदिरे, स्तूप, निवासस्थाने यांचा तौलनिक अभ्यास करुन काल, राजवंश निश्चिती कशी केली जाते ही इतिहास अभ्यासाची पद्धत या पुस्तकात मुळातून वाचण्यासारखी आहे.
भारतीय इतिहासात एकच एक राजवंश, कोणत्या तरी प्रमुख स्थानावरुन राज्य करत आहे, तोच प्रमुख इतिहास अशी मांडणी केल्यास ती खूप मोठी प्रतारणा ठरेल. महाभारत काळ हा इतिहास धरून पुढे गेलो तर युधिष्टिर ते समुद्रगुप्त असे अनेक चक्रवर्ती सम्राट झाले, त्यांनी दिग्विजय केला. पण एक गोष्ट कायम आहे की स्थानिक राजवंश सार्वभौम, बलशाली सम्राटाचे श्रेष्ठत्व मान्य करुन आपापल्या प्रदेशात राज्य करत असत. तोच प्रकार दक्षिणेत गुप्त-वाकाटक आणि नंतरच्या राजवंशांना लागू होतो. म्हणूनच वाकाटक राजे प्रबळ बलशाली होते त्यावेळी कोसल, मालव, मेकल, त्रैकूटक, नाग, कुंतल, राष्ट्रकूट, विष्णुकुण्डी इत्यादी स्थानिक राजवंश वाकाटकांचे मंडलिक म्हणून राज्य करत होते. त्यातले राष्ट्रकूट, कदंब इत्यादी वंश पुढे अधिक बलशाली झाले, स्वतंत्र, सार्वभौम राजे झाले. राष्ट्रकुटांच्या काळात वेरूळचे कैलास लेणे तयार झाले. हे राजवंश वाकाटकांचे मंडलिक होते म्हणजे काय, त्यांचे वाकाटक आणि तत्कालीन काळात आणि सध्याच्या काळात इतिहासातील महत्त्व प्रा. जामखेडकर यांनी उत्कृष्टरित्या उलगडून सांगितले आहे.
वाकाटक काळातील सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे अजिंठा, ज्याच्या निर्मितीमध्ये वाशिम शाखेच्या हरिषेण राजाची प्रेरणा, आधार यावर स्वतंत्र प्रकरण आहे. लेणी निर्मिती, काल निश्चिती, चित्रकला त्यांचे इतिहास अभ्यासातील महत्त्व चौकसपणे वाचले पाहिजे. लेण्यांची जागा, त्यांचे व्यापारी मार्गांशी संबंध, व्यापारी भरभराट यामुळे हा काळ समृद्ध होता याची मीमांसा जामखेडकर यांनी उत्तम प्रकारे केली आहे. गुप्त-वाकाटक तसेच त्यांचे मंडलिक राजे प्रामुख्याने हिंदू आहेत, ज्यांनी वाजपेय, अश्वमेध असे यज्ञ केले, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले, पण लेण्यांची संख्या आणि त्यातील जैन-बौद्ध लेण्यांचे प्रमाण यावरून धार्मिक सहिष्णुता दिसून येते. आर्थिक सुबत्ता, सामाजिक सलोखा यांमुळे हा निश्चितच भारताचा सुवर्णकाळ म्हणता येतो. इसवीसनाचे तिसरे ते सहावे शतक हे भारतातील सामंतशाहीचे, आर्थिक दुर्बलतेमुळे सामाजिक विषमता वाढीला लागली असे काही इतिहासकारांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला जामखेडकर यांनी एके ठिकाणी परिच्छेदात संयत भाषेत पण ठाम उत्तर दिले आहे. वास्तविक संपूर्ण पुस्तक आणि मांडणी हेच अशा इतिहासकारांना ठाम उत्तर आहे. त्यामुळे आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या इतिहासाचा हा धांडोळा प्रत्येकाने वाचलाच पाहिजे.
पुस्तक: कोण होते वाकाटक?
लेखक: प्रा. डॉ. अरविंद जामखेडकर
प्रकाशन: अपरान्त प्रकाशन
- शौनक कुलकर्णी
- भ्र: ९४०४६७०५९०
- ईमेल: sgk28774@gmail.com
Comments
Post a Comment