Skip to main content

वारसा मुंबईचा..


मुंबईकर-पुणेकर-नागपूरकरांच्या पुढे 'कर' जोडताना पु.ल. हे लिहून गेले आहेत, ".... एक तर मुंबईच नव्हती. ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर. त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच. ..." ते तत्कालीन व्यंगात्मक लेखन होते. त्याचा आस्वाद घेत आपण सगळेच मनमुराद हसतो, पण वास्तवात मुंबई आणि मुंबई भोवतालच्या परिसराला हजारो किंबहुना कोटीच्या कोटी वर्षांचा इतिहास आहे. मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत पुरात्तवज्ञ आणि कलेतिहासकार डॉ. सुरज पंडित यांनी अपरान्त आणि पुरातत्त्व विभाग व बहिःशाल विभाग, मुंबई विद्यापीठ प्रकाशित 'वारसा मुंबईचा' या पुस्तकात तो समृद्ध इतिहास उलगडला आहे. 

तो उलगडावा वाटला याचे कारण सुरज पंडित यांनी नमूद केले आहे. ते म्हणतात, "मला कायम प्रश्न पडत असत, ही मुंबई अशी का आहे? ही जर पोर्तुगीज-ब्रिटिशांनी वसवलेली असेल तर प्राचीन साहित्यात तिचे उल्लेख कसे येतात?  या प्रश्नांचा मागोवा घेताना एक प्रवास सुरु झाला.." त्याला साथ मिळाली ती मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात MMRDA च्या वारसा संवर्धन विभागाची आणि त्या अंतर्गत उभ्या राहिलेल्या प्रकल्पाची. या प्रकल्पाला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पुरात्तवज्ञ श्री अरविंद जामखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुरज पंडित यांनी सुरु केलेला तो प्रवास या पुस्तकाच्या रुपाने प्रकाशित झाला आहे. 

इतिहास संशोधनाचे स्रोत कोणते? त्यातही प्राचीन इतिहासाचे स्रोत कोणते? अश्मयुगीन हत्यारे, अवशेष, भांडी, त्यापुढे ताम्रपट, शिलालेख, स्तूप, लेणी, मूर्ती, वेद-पुराण-ग्रंथ, परकीय प्रवासी आणि त्यांचे अनुभव, नाणी, वस्तू इत्यादी. या सर्वांचा साद्यन्त अभ्यास करुन इतिहास उलगडत जातो.

भारतीय उपखंड आणि त्यातही भारतीय द्वीपकल्प हा भौगोलिक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो जितका जुना आहे तितकाच आधुनिकही आहे. म्हणजे काही कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला अरवली पर्वत कदाचित हिमालयापेक्षाही उंच होता ज्याची धूप होत होत सध्या आहे तितका उरला आहे. दुसऱ्या बाजूला हिमालय पर्वत निर्माण ही निरंतर प्रक्रिया अजूनही सुरु आहे. दरवर्षी काही मिलीमीटर ने हिमालयाची उंची वाढत आहे. याच मालिकेत मुंबईची देखील गोष्ट येते. भारतीय उपखंड आशिया प्लेट कडे सरकत असताना लाव्हारस प्रचंड प्रमाणात वाहत होता, तो स्थिर होत होता, समुद्राची पातळी कमी-जास्त होत होती. पश्चिम किनाऱ्यावरील डोंगररांगा, अजस्र सह्याद्री ही सर्व याची देणगी आहे. मुंबईची ही कथा सांगणारा ढळढळीत पुरावा अंधेरी भागात 'गिलबर्ट हिल'च्या रुपात इमरतींच्या दाटिवाटीत उभा आहे. 

प्राचीन स्तूप: शूर्पारक

मुंबई परिसरात ज्ञात इतिहास उलगडण्याची सुरुवात होते ती शूर्पारक म्हणजेच आजच्या सोपाऱ्यात. तिथे अशोकाच्या राजाज्ञा, स्तूप आणि अनेक प्राचीन मूर्ती आढळून आल्या आणि प्राचीन व्यापाराचा समृद्ध इतिहास प्रत्यक्षात आला. शूर्पारक या बंदराचा आणि परिसराचा इतिहास त्याही मागे जातो. मगधाची राजधानी पाटलीपुत्र आणि शूर्पारक परिसरातील चिंचणीचा पुत्रक यांची कहाणी चित्तवेधक आहे. शूर्पारक आणि पुढील काळात विकसित झालेली सेमूल म्हणजेच चौल, कल्याण आणि घोडबंदर ही बंदरे मुंबई परिसर प्राचीन काळापासून व्यापारी वृत्ती-प्रकृतीचा असल्याचे द्योतक आहेत. 

मुंबईचा प्राचीन इतिहास उलगडण्यात कृष्णगिरी पर्वत आणि तेथील भिक्खू संघ हा खूप महत्त्वाचा स्रोत आहे. प्रामुख्याने सातवाहन काळात बहरलेल्या या भिक्खू संघाने एका प्रचंड मोठ्या लेणी समूहाची निर्मिती केली, ज्याला आपण सध्या कान्हेरी लेणी म्हणून ओळखतो. भारतीय पौराणिक परंपरेत पौराणिक कथेमुळे, प्रत्यक्ष ती देवता तेथे अवतरल्याच्या, वास करीत असल्याच्या कथेमुळे  मंदिराला, तेथील देवतेला माहात्म्य येते. तीच परंपरा बौद्ध-जैन या भारतीय पंथात-धम्मात दिसून येतात. बौद्ध विचारात 'त्रिकाय' संकल्पनेला महत्त्व आहे. त्यातच 'धर्मकाय' अशी एक संकल्पना येते आणि त्याचा अविष्कार साक्षात तथागत भगवान बुद्धांनी शुर्पारकला भेट दिल्याच्या कथेत दिसून येतो. 

कान्हेरीची लेणी अनेक कारणांनी महत्त्वाची आहेत. त्या लेणी खोदण्यासाठी, तेथील भिक्खू संघासाठी सातवाहन ते त्रैकूटक ते कलचुरी अशा राजघराण्यांनी दाने दिलीच पण त्यात व्यापाऱ्यांनी, श्रेणीच्या 'श्रेष्टींनी' दिलेल्या दानांचे तपशीलवार वर्णन तेथील विस्तृत शिलालेखात आहेत. कान्हेरीच्या लेण्यांत कोकण किनारपट्टी ते मध्य आणि पश्चिम आशिया तसेच ग्रीक-रोमन साम्राज्याशी असणाऱ्या व्यापाराचा विस्तृत पट उलगडतो. दोन मदारींच्या बॅक्ट्रियन उंटाचे शिल्प, ग्रिफिन या ग्रीक लोककथेतील सिंह आणि गरुड यांच्या मिश्रणातून होणाऱ्या प्राण्याचे शिल्प यातून ते अधिक ठळक होते. नाशिकच्या 'त्रिरश्मी' लेण्यांत देखील या ग्रिफिनचे शिल्प आहे, यातून या व्यापाराच्या विस्तृत पटाची कल्पना येते. 

कान्हेरी बरोबरच जोगेश्वरी ही दुसरी महत्त्वाची लेणी आहेत. दक्षिण भारतातील सर्वात जुने किंबहुना भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असे जोगेश्वरी आहे. आज इतिहास अभ्यासाच्या सोयीकरता तांत्रिकदृष्ट्या त्याचे वर्गीकरण लेणी या प्रकारात केले जात असले तरी ते एक मंदिर आहे. यातून हे दिसून येते की मुंबईच्या परिसरात एकाच वेळी बौद्ध आणि हिंदू पद्धती-परंपरा गुण्यागोविंदाने नांदत होत्या किंबहुना बहरत होत्या. त्या बहराचे पुढचे पाऊल म्हणजे घारापुरीची लेणी. 

सदाशिव: घारापुरी

एका बाजूला मंदिर-लेणी-शिलालेख हे स्रोत धुंडाळत असताना तत्कालीन राजघराणी यांचाही आढावा सूरज पंडित यांनी घेतला आहे. मौर्य- सातवाहन- क्षत्रप- अभीर- गुप्त- वाकाटक- त्रैकूटक- कलचुरी- कोकण मौर्य- बदामी चालुक्य- राष्ट्रकूट- शिलाहार- मोढ- यादव- खिलजी- तुघलक- बहामनी- गुजरातचे सुलतान- मराठे- पोर्तुगीज- ब्रिटिश अशी सलग मालिका आहे. त्यात श्रीस्थानक म्हणजेच ठाण्यातून राज्य करणाऱ्या शिलाहारांनी कित्येक अप्रतिम देणग्या दिल्या आहेत. त्यात घोडबंदर, अंबरनाथ शिवमंदिर, आणि कित्येक मूर्तींचा समावेश आहे. श्रीस्थानक अर्थात ठाणे हे अनेक आळ्या-पाखाड्या आणि तलावांचे शहर म्हणून नावारूपाला आले ती शिलाहारांची कर्तबगारी आहे. 

परकीय व्यापारी आणि त्यांच्या अनुभवांतून उलगडणारा इतिहास समृद्ध करणारा असतो. हर्ष वर्धनच्या काळात भारत भ्रमणासाठी आलेल्या ह्युएन त्संगने आपले अनुभव लिहून ठेवले आहेत. आपल्या भ्रमण काळात त्याने शूर्पारक, कृष्णगिरी भिक्खू संघ आणि तत्कालीन राजवटींची भेट घेतली होती. ह्युएन त्संग लिहितो, "इथली माणसं साधी, सरळ पण स्वाभिमानी आहेत.." हे वाचून आपल्याबद्दलच एक अभिमान वाटू लागतो.

आठव्या शतकात अग्निपूजक झरत्रुष्टच्या अनुयायांना इस्लामी आक्रमणापासून वाचण्यासाठी पळ काढावा लागला. ते संजानला उतरले आणि दुधात साखर, पाण्यात मीठ मिसळून जावे तसे मिसळून गेले. त्यांचाही संपर्क येथील लोकांशी, राजवटींशी आला आणि त्यांचे व्यापारी संबध, त्यांचे अनुभव इतिहास उलगडण्यात मदत  करतात. पर्शियन लोक अशा पद्धतीने आले तर अरब व्यापारी त्यापूर्वीपासूनच येत जात होते. त्याचे उल्लेख आणि संपर्क अनेक ठिकाणी दिसून येतात. उत्तर कोकणात शनिवार तेली म्हणून ओळखले जाणारे ज्यू देखील मिसळून गेले आणि मुंबई परिसराला समृद्ध करुन गेले. 

यादवांच्या पाडावानंतर उत्तरेत गुजरातेत इस्लामी आक्रमणे झाली आणि लोकांच्या स्थलांतराचा मोठा ओघ मुंबई परिसरात आला. त्यांनी महिकावती म्हणजेच माहीमला आपली राजधानी थाटली. या स्थलांतरित लोकांमध्ये पाठारे प्रभू, सामवेदी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा समावेश आहे. मुंबईचा परिसर अनेक राजघराणी, जगभरातील व्यापाराच्या निमित्ताने येणारे लोक, व्यापारी-औद्योगिक समृद्धीमुळे, इतर भागातील आक्रमणे इत्यादींमुळे होणाऱ्या स्थलांतरामुळे सातत्याने बदलता राहिला. मध्ययुगीन काळातील सुंदोपसुंदी आणि तांत्रिक प्रगतीकडे केलेले दुर्लक्ष आणि पोर्तुगीज-इंग्रजांची राजवट हा इतिहास बहुतेकांना ज्ञात असतो. त्यामुळेच त्यापूर्वीचा समृद्ध इतिहास उलगडणारे हे पुस्तक वाचनीय, संग्राह्य आहे. 

पंडित यांना सातत्याने पडणाऱ्या प्रश्नांचा मागोवा घेताना, एका प्रकल्पा अंतर्गत हा इतिहास उलगडला आहे. तो एका वर्तमानपत्रात स्तंभलेखनाच्या माध्यमातून ते मांडत गेले आणि त्याचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. सामान्य वाचकांसाठी अचंबित करणारी माहिती सोप्या शब्दात आणि अभ्यासकांसाठी खोलात शिरण्यासाठी प्रवेशद्वार असे हे पुस्तक आहे. मुंबईत राहणाऱ्या आणि भारतभरातील लोकांनाही ठाऊक असावे की मुंबईचा इतिहास प्राचीन आहे यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, संग्राह्य आहे. मुंबईचा हा समृद्ध वारसा वाचून ही वारसास्थळे पाहण्याची, जतन करण्याची प्रेरणा मिळो ही सदिच्छा. 



Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...