Skip to main content

Partition and Unintended consequences


पुस्तकं हा ग्रेट खजिना आहे. कधी, कुठल्या पुस्तकात काय भन्नाट वाचायला मिळेल, काही निराळीच दृष्टी मिळेल काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ, वसंत पटवर्धन लिखित विष्णुगुप्त चाणक्याच्या आयुष्यावरील 'आर्य' ही कादंबरी. रूढार्थाने ही कादंबरी आहे. त्यावेळी उपलब्ध असलेले सर्व ऐतिहासिक पुरावे, त्यांचा अभ्यास करुन मांडलेली असली तरी शेवटी ती कादंबरीच, तो इतिहास मांडणी करणारा ग्रंथ नव्हे. पण त्या कादंबरीत बौद्ध विचार, बौद्ध पंथाच्या भविष्यातील ऱ्हासाची कारणे, ही चाणक्याच्या गहन चिंतनाचा भाग म्हणून मांडली आहेत. इतिहास ग्रंथात किंवा इतर विश्लेषणात्मक ग्रंथांपेक्षा त्या मांडणीतून तो सर्व मुद्दा अधिक स्पष्टपणे वैयक्तिक पातळीवर मला समजला. आणखी एक उदाहरण, अमेरिकेत साठ आणि सत्तरच्या दशकांत व्हिएतनाम युद्ध, हिप्पी चळवळ, भरकटलेली तरुणाई हा गंभीर प्रश्न झाला होता. या सर्वांची माझी पहिली ओळख झाली पु. ल. देशपांडे यांच्या 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकातील 'एक बेपत्ता देश' या लेखातून. उत्सुकता वाढली तेव्हा मग मिळतील साधने वाचून, माहितीपट पाहून हा विषय आणि या विषयाचे अनेक पदर उलगडत गेले. हाच प्रत्यय साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांच्या 'पुष्पांजली' या पुस्तकाच्या वाचनातून येत आहे. 


भारताची फाळणी ही भारताच्या इतिहासात अभूतपूर्व उलथापालथ घडवणारी घटना आहे. या घटनेने भारतीय उपखंडाचा इतिहास, भूगोल, राजकारण बदलले. फाळणीच्या संदर्भात विविध माध्यमांत आणि सामान्य स्तरावर राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक घटकांची चर्चा होते. आर्थिक परिणाम या घटकाकडे विशिष्ट वर्तुळापलीकडे लक्ष जात नाही. त्यांची सामान्य पातळीवर चर्चा होत नाही. फाळणीमुळे पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान (सध्या बांग्लादेश) मधून आपल्या मिळकती, मालमत्ता सोडून कफल्लक अवस्थेत, निर्वासित म्हणून भारतात आले इथे साधारण चर्चा संपते. पण उद्योग आणि व्यवसायाच्या पातळीवर काही खूपच जटील प्रश्न निर्माण झाले होते. त्यातल्या एकाचा उल्लेख करुन मूळ विषयाकडे जाऊ. 

पूर्व आणि पश्चिम बंगालची फाळणी, नक्की कोणत्या आधारावर झाली हा एक गहन प्रश्न आहे. त्यातल्या एन्क्लेव्ह चा प्रश्न आता काही वर्षांपूर्वी निर्णायकरित्या सुटला. ते असो. तर, फाळणी झाली त्यावेळी आणि आताही बंगाल-आसाम वगैरे प्रदेशात ज्यूटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कोलकाता आणि आसपासचा भाग हा ज्यूट मिल साठी प्रसिद्ध होता, किंबहुना कोलकाता एक महानगर म्हणून विकसित होण्यात या ज्यूट मिलचा मोठा वाटा आहे. ज्यूटची शेती, उत्पादन करणारा प्रमुख प्रदेश होता पूर्व बंगाल आणि प्रक्रिया उद्योग कोलकाता मध्ये एकवटलेला होता. फाळणीमुळे पूर्व बंगाल मधल्या शेतकऱ्यांना आपला माल प्रक्रिया उद्योगपर्यंत पोचवण्यात अडचण आणि कोलकाता मधील मिलना कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा जवळ जवळ ठप्प. असे अनेक जटील प्रश्न उभे राहिले. वास्तविक हा झाला फाळणीचा प्रत्यक्ष, दृश्य परिणाम. पण फाळणीच्या गदारोळाशी तसा थेट संबंध नसताना सुद्धा जमशेदपूरला टाटा मोटर्स म्हणजे पूर्वीची 'टेल्को' वर परिणाम झाले. तेच फाळणीचे Unintended Consequences. 

गोविंद तळवलकर यांचे 'पुष्पांजली' हे पुस्तक त्यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रदीर्घ काळात जे मृत्युलेख लिहिले त्यांचे एकत्रीकरण आहे. त्यात टेल्कोचे माजी प्रमुख सुमंत मुळगांवकर यांच्यावरील मृत्युलेखात हे Unintended Consequences चे भन्नाट उदाहरण समोर आले. फाळणीपूर्व काळात टेल्को मोटार गाड्या नाही तर रेल्वे इंजिन तयार करत असे. ती साहजिकच कोळशावरील इंजिने असत. त्या इंजिनांचे बॉयलर तयार करणारे कामगार प्रामुख्याने पठाण होते. फाळणीनंतर हा कामगार वर्ग निघून गेला आणि कंपनीपुढे प्रश्न पडला की करायचं काय? आणि त्यातून निर्माण झाली मोटार गाड्या तयार करणारी टेल्को. जी पूर्वी प्रामुख्याने मालवाहतूक करणारे ट्रक इत्यादी तयार करत असे. पुढे रतन टाटांच्या काळात टेल्कोचे रूपांतर 'टाटा मोटर्स' मध्ये झाले आणि ती कंपनी आता मालवाहतूक मोटारींबरोबरच प्रवासी वाहन क्षेत्रात देखील आपला दबदबा राखून आहे. 

हे असं आहे. कधी, कुठला भन्नाट धागा हाती लागेल ते सांगता येत नाही. त्यामुळेच कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे, "वाचाल तर वाचाल" तसेच "वाचाल तर समृद्ध व्हाल". 

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...