Skip to main content

बदल...



                काळ आला कठीण!… काय आहे कठीण? वेग. कसला वेग? आयुष्याचा वेग. बदलाचा वेग. बदल. कोणते बदल? सगळ्या प्रकारचे बदल. स्मार्टफोनच APP, स्मार्टफोन- कंप्युटरचे हार्डवेअर, सोशल नेटवर्किंग, प्रायव्हेट बोलणी , तीही वर्च्युअल. सगळंच कसं बदलत चाललंय. जमाने के साथ कदम मिलाओ, वरना जमाना तुम्हे कुचलकर आगे निकाल जायेगा. हाच आजच्या काळाचा मूलमंत्र आहे. जो ना तुम्ही थांबवू शकत, ना मी. या बदलांच्या प्रवाहात, वेगात वाहत जाणं हे आणि हेच आवश्यक आहे.  बदल. बदल काय फक्त तंत्रज्ञानातच आहे काय? एकंदर आयुष्यच बदलू लागलं आहे. प्रचंड वेगवान होऊ लागलं आहे. नाती-भावना, त्याचं प्रदर्शन करणं-न करणं. त्यांच्यात येऊ लागलेला व्यवहारीपणा, त्यांच्यातली निवळ कर्तव्याची जाणीव. कुठल्याही भावभावनांशिवायची. बदल. बदल नात्यांमधला. रक्ताच्याच नाही तर मनाच्या, इमोशन्सच्या. मैत्रीच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत. रिलेशनशिप, प्रेम, कमिटमेंट यात ' Use and Throw' वृत्ती वाढायला लागली आहे. वेग. प्रचंड वेग आहे बदलांचा. कधी कधी आणि काही बाबतीत झेपत नाही हा वेग. म्हणून आम्ही वेगळे पडतो. काही वेळा पडले जातो. काही का असेना, आहोत आम्ही वेगळे!!
               अपडेट आले की स्मार्टफोनवर वा इतर कशावर त्याच्यासाठी वेळ खर्च करा. वास्तविक काही बेसिक गोष्टींव्यतिरिक्त स्मार्टफोन फार काही वेगळं असं देतात असं वाटत नाही.  तसा अनुभवही आलेला नाही. अर्थात प्रत्येकाच्या वापरण्याच्या पद्धतीत फरक असतोच म्हणा. WhatsApp, Facebook या गोष्टी आज जवळजवळ मुलभूत गरज बनलेल्या आहेत. पण त्याचा एका मर्यादेपलीकडे वापर कंटाळवाणा व्हायला लागतो, कारण मुळातच स्वभावात स्थिरता नाही. सतत वेगळेपणाची हाव असते. दुसरी गोष्ट गाणी. जीवाच्या शांततेसाठीचा प्रचंड मोठा आधार आहे तो. निदान मी जी गाणी किंवा संगीत ऐकतो तो तरी नक्कीच शांततेचा, मानसिक स्थैर्याचा आधार आहे माझ्यासाठी. ती एक गरज अधोरेखित करता येऊ शकते. बाकी सेल्फी, ते सतत अपलोड करणं, त्यावर फेसबुक किंवा इतर ठिकाणी फुकटच्या चर्चा करणं  बुद्धीबाहेरचं आहे. मूर्खपणाचं वाटतं. आता या गोष्टींमुळे जर आम्ही मागासलेले, वेगळे वाटत असू, त्यास आमचा इलाज नाही. आम्ही आहोत वेगळे!!
             So Called पाश्चात्त्य जगाचा प्रभाव आजच्या आमच्या युवा पिढीवर आहे. ही पाश्चात्त्य संस्कृती किंवा 'Western Culture' म्हणजे नक्की काय? मुक्तता, विचार-आचार स्वातंत्र्य. पण ही मुक्तता उद्दामपणाकडे झुकत असेल तर? तर काय? यातून माज वाढेल, बाकी काही नाही. यातून सुरक्षितता कमी होत चालली आहे. बारीकसारीक गोष्टींचं पर्यवसान डिप्रेशन, फ़्रस्ट्रेशन आणि त्यातून व्यसनाधीनता. Western Culture मधून नक्की काय अभिप्रेत आहे? स्वातंत्र्य-सुसंस्कृततेच्या बंधनात असेललं, भोगलेलं स्वातंत्र्य की असंस्कृततेतून वाढणारा स्वैराचार? Western Culture म्हणजे काय? पार्ट्या, पब्ज इ. माझं तोकडं ज्ञान इतपतच येउन थांबतं. पण यापलीकडेही बरंच काही आहे. ही गरज आहे? मला तरी नाही वाटत. या गोष्टींसाठी पैसा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. त्या खर्च होणाऱ्या पैशातून निष्पन्न काय होतं? चार घटका करमणूक. हिडीस करमणूक. बाकी काही नाही. आधीपासून हा विचार अंगात भिनलेला होता म्हणा किंवा चार चांगल्या लोकांच्या सहवासातून, वाचनातून विचार वाढत गेला म्हणून म्हणा, आजपर्यंत तरी या सगळ्यापासून दूर आहे. आता या गोष्टी जर इतरांना मागासलेपणाच्या वाटत असतील. वेगळेपणाच्या वाटत असतील, तर आमचा इलाज नाही. आम्ही आहोत वेगळे!!
                रिलेशनशिप, कमीटमेंट, प्रेम आजकाल पावसाळ्यानंतर माजलेल्या तणासारखं पसरलंय. काही धरबंध राहिलेला नाही. शाळकरी मुला-मुलींपासून ते पुढे….  शाळकरी वयातलं ते केवळ आकर्षण असतं. त्यांची धाव कुठवर जाते याची चिकित्सा करण्यात काहीच हशील नाही. कारण ते वयच तसं असतं. पण 'पुढे' काय? परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 'होईल तोपर्यंत होईल, नाहीतर होऊ वेगळे' हा आजचा attitude आहे. जुळण्याच्यापेक्षा जास्त प्रमाण 'Break Up' चं आहे. क्षुल्लक कारणांवरून ब्रेक उप होतात. क्षुल्लक कारणांवरून गोष्टी या थराला जात असतील तर त्या रिलेशनशिप मधल्या खरेपणाची खोली कळते. वास्तविक काही खोली नसतेच. असल्या उथळ नात्यांना कितीसं आयुष्य असणार? रिलेशनशिप मध्ये असणं ही गरज बनू लागली आहे. ग्रूप मधले सगळेच कोणाशी ना कोणाशी रिलेशन मध्ये आहेत म्हणून आपणही असावं, असली उदाहरणं भरपूर दिसतात. काय अर्थ आहे त्याला?  एकमेकांच्या आयुष्याशी खेळल्यासारखं आहे ते. हा आणि असा विचार आम्ही करतो म्हणून आम्ही मागासलेले, वेगळे ठरतो. वेगळे पडतो. आम्ही आहोतच वेगळे!!
            हाताची पाच बोटं सारखी नसतात. प्रत्येक मनुष्य काही वेगळा विचार-आचार घेऊन आलेला असतो. वर उल्लेखलेल्या मुद्द्यांवर कोणी सहमत असेलच असं नाही. प्रत्येकाची आपापली वेगळी मतं असतात. त्यामुळेच प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने वेगळा असतो. हे वेगलेपणच त्याची ओळख असते. ओळख तयार करते. … आम्ही आहोतच वेगळे..!!!

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...