"सोबत… काही क्षणी सोबत असावीच. अगदी जवळच्यांची. ती सोबत, क्षणाचा आनंद द्विगुणीत करते तर दुःखात आधार देऊन दुःख दूर करते. अशी सोबत… कायम असावी.. " 'ति'चं हे वाक्य, हे बोलणं भिडलं. काय चुकीचं बोलली ती? Input किंवा Output एकतर्फी असेल तर धोकादायक ठरतो. किंवा हानिकारक ठरतो. स्वगतापेक्षा संवाद अधिक प्रभावी.. अगदी प्रत्येक वेळी असतोच असं नाही. पण ज्या क्षणी शब्द आणि कधी कधी मौनाचं Give and Take सुरु होतं त्या क्षणी संवाद सुरु होतो. बहुतेक वेळा शब्दांशिवाय झालेला संवाद अधिक परिणामकारक ठरतो. तो थेट मनांचा, संवेदनांचा संवाद होतो. शब्दांची गरज संपते.
सोबत! मला तिची सोबत आहे. भावना, संवेदनांचं एका दिशेनं जाणारं दळणवळण तिच्या सोबतीमुळे दोन दिशांचं होतं. मनाचा, संवेदनांचा थेट संवाद सुरु होतो. परिणाम साधू लागतो. तिचं म्हणणं अधिकाधिक क्षणाक्षणाला पटत जातं. सोबतीचा असा काय परिणाम होतो? काय होतो??.. प्रश्न अवघड आहे. उत्तर शब्दात मांडणं कठीण आहे. आजवर या सोबतीमुळे कित्येक प्रसंगात मी ताळ्यावर आलो आहे. प्रचंड आनंद आणि त्यामुळे डोक्यात जाऊ पाहणारी हवा 'ति'च्या सोबतीमुळे ताळ्यावर आली आहे. काही प्रसंगात काही कारणांमुळे आलेली निराशा दूर झाली आहे. या नैराश्याचं प्रमाण कधी कधी खूप जास्त असायचं. एकंदर आयुष्याबद्दलच तिरस्कार, सगळं संपून गेल्याची भावना यायची. पण 'ति'च्याशी संवाद साधताना दोन टोकांचा प्रवास व्हायचा. प्रचंड निराश, हरलेल्या विचारांपासून ते आयुष्याबद्दल प्रचंड आशावादी, काय वाट्टेल ते समोर आलं तरी त्याच्याशी लढून, झगडून पार होण्याची उमेद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होण्यापर्यंतचा हा प्रवास असतो.
सोबत! प्रत्येक वेळी असतेच असं नाही. गेले कित्येक दिवस ही सोबत हरवल्यासारखी झाली होती. सोबतीची, संवादाची गरज आत्यंतिक होती. ती आज मिळाली. हा खूप काळाच्या ताटातुतटीनंतर एकत्र आल्याचा आनंद आहे. मला… 'ति'ला. माझी 'ती'…. सोबती.. लेखणी….!!
आता तिच्यापासून ताटातूट होऊ नये याची काळजी घ्या! ☺
ReplyDelete