जगातली सर्व क्षेत्रातली थोर माणसं मुख्यतः पहिल्या दोन निकषात चपखल बसतात. तिसऱ्याचा विचार सध्या करण्यात अर्थ नाही. 'बॉर्न ग्रेट' मध्ये भारतीय इतिहासात आणि त्यातही आधुनिक भारताच्या इतिहसात अनेक लोक आहेत. त्यात बळवंतराव टिळक ते…. अशी खूप मोठी यादी सांगता येईल. 'अचिव्ह ग्रेटनेस' म्हणजे नक्की काय? तर या लोकांनी त्यांच्या वर्तमानाची अशी काही मांडामांड केली की, इतिहासाचे पाटच बदलले. त्या वर्तमानाच्या मांडणीमुळे इतिहास घडला आणि त्या मांडणीवरच वर्तमान भारत आपलं वर्तमान आणि भविष्य सुदृढ आणि संपन्न करू शकणार आहे. या 'बोर्न आणि अचिव्ह ग्रेटनेस यांच्या यादीत एक नाव मात्र असा आहे की, अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन जन्म घेतला, त्यांच्या ग्रेटनेस अचिव्ह करण्याच्या मार्गातली खडतरता यातूनच इतिहास घडला आणि त्याच्या आधारे भारत देशाचं वर्तमान आणि भविष्य उज्वलतेच्या दिशेनं जाणार आहे, ते नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर.
बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय जीवनातील विचार करताना इतिहासाचा धांडोळा घेणं आवश्यक आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थिती काय होती? काही विशिष्ट जाती या 'अस्पृश्य आहेत. त्यांनी गावाच्या मुख्य प्रवाहात यायचं नाही. त्यांनी हलक्या दर्जाची कामं करायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचा हक्क नाही. मोठ्या संख्येत असणारा हा दलित किंवा अस्पृश्य समाज आणि स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाही. मग सक्षमता नक्की कोणाची? त्या विशिष्ट समाजातील लोकांना, तथाकथित 'सवर्ण' मुळात माणूस मानायलाच तयार नव्हते, तर बाहेरच्या देशातून आलेला इंग्रज त्यांना सैन्यात सामावून, काही एक चांगलं राहणीमान आणि शिक्षणाची संधी देत असेल तर त्यांनी 'कोरेअव भीमा'ची लढाई (ज्यात इंग्रजांच्या वतीनं मराठ्यांविरुद्ध लढली महार पलटण ) त्याला राष्ट्रद्रोह वगैरे कोणत्या तोंडाने म्हणणार? म्हणूनच भविष्यात स्वतः बाबासाहेब अनेक वेळा या द्वंद्वात अडकले होते की ज्यांच्यामुळे ही संधी मिळाली त्यांच्याविरुद्धच संघर्ष करायचा. ह्याच खडतर मार्गावरून चालत बाबासाहेब ग्रेटनेस ला पोचले आहेत.
या वैचारिक द्वंद्वाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा समाजकारणाचा विचार, लढा हा सामातेसाठीचा लढा म्हणता येईल. हा प्रस्थापित सवर्णांविरोधातला असला तरी तो सरसकट प्रत्येक व्यक्तीविरोधातला नव्हता. ज्याप्रमाणे अस्पृश्य समजल्या जाणार्या समाजातील लोक उन्नतीसाठी लढा देत होते, त्याचप्रमाणे प्रस्थापित वर्गातील कित्येक लोक या दुषित व्यवस्थेविरुद्ध काम करत होते. म्हणूनच चवदार तळयाच्या सत्याग्रहाच्या प्रसंगी महाड गावातील जोशी इत्यादी मंडळी बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. रत्नागिरित स्थानबद्धतेत असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाबासाहेबांच्या चवदार तळं, मंदिर प्रवेशासाठीचे सत्याग्रह यांना संपूर्ण पाठींबा दिलेला होता. या सर्व घटनाक्रमाच्या पुढे जात आंबेडकरांनी १९३६ साली धर्मान्तराची घोषणा केली. त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. धर्मांतराच्या घोषणेमागची कारणं बाबासाहेबांच्या मनात सुस्पष्ट होती. ती पाहू गेल्यास त्याचा प्रतीवाद करणे अवघड जातं. प्रस्थापित असलेला धर्म जो असंख्य जाती-जमातीत विभागला गेलेला आहे. जातीभेद अत्यंत टोकाचे आहेत, आणि काही विशिष्ट जातीतील लोकांना तथाकथित सवर्ण लोक हे मुळात माणूस मानायलाच तयार नाहीत. सार्वजनिक तळ्यात, विहिरीत जनावरांनी पाणी पिलेलं चालेल पण 'त्या'नि पाणी पिलं तर ते विटाळतं? म्हणजे ती माणसं जनावरांपेक्षाही खालच्या पातळीवर. हे प्रातिनिधिक उदाहरण झालं. इतकी विषमता आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही अशा एखाद्या धर्मात जाऊ इच्छितो ज्यात विषमतेला स्थान नाही, माणसाला माणूस म्हणून वागवण्याची पध्दत आहे. त्याला प्रस्थापितांचा विरोध. म्हणजे त्यांनी आयुष्यभर विषमतेत, शोशिताचांच आयुष्य जगावं का? मग यावर अनेक तत्कालीन विचारवंतानी बाबासाहेबांना वेळोवेळी विनंती केली की, धर्मांतरासाठी भारतीय परंपरेतलाच धर्माची निवड करावी. म्हणूनच जगाला शांती आणि करुणेचा संदेश देणाऱ्या बुद्ध धम्माचा स्वीकार बाबासाहेबांनी हजारो अनुयायांसह केला. या समाजोन्नती आणि समतेसाठीचा संघर्ष खडतर मारावरून पण ग्रेटनेस कडेच घेऊन गेला आहे.
ब्रिटीश सत्तेविरोधातला, स्वातन्त्र्यासाठीचा लढा अंतिम टप्प्यात आले असताना, स्वतंत्र होणाऱ्या देशाचं भवितव्य काय? हा प्रश्न आला. ह्या राष्ट्राची शासनव्यवस्था, राज्यव्यवस्था काय असावी? लोकांना कोणते अधिकार असावे किंवा असू नयेत? असे एक ना अनेक प्रश्न होते पण त्यासाठी आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट घडली ती म्हणजे संविधान सभा. ९ डिसेंबर,१९४६ रोजी तिच गातान झालं. प्रारंभी ३८९ सदस्य असणाऱ्या संविधानसभेत फाळणीच्या निर्णयानंतर २९९ सदस्य राहिले. या संविधान सभेत सर्व भाषांचे, समाजाचे, जातींचे, पंथाचे लोक होते. त्यात उच्चविद्याविभूषित तर होतेच त्याचबरोबर इतरही होतेच. निवडणुकीतील बहुमत वगैरे विषयांपेक्षा गुणवत्ता यांना महत्व आणि सर्वसमावेशकता सभेत होती. (अपूर्ण)
Comments
Post a Comment