Skip to main content

नमामि ब्रम्हपुत्र.

                      

             ब्रम्हपुत्र. मानससरोवर ते बंगालचा उपसागर व्हाया गंगा नदी असा विविधतेनं नटलेला, लांबलचक प्रवास करणारा नद. तिबेटमध्ये त्सांगपो वगैरे नामाभिधान घेत 'द ग्रेट बेंड' ला अक्षरशः तोंड फिरवून अरुणाचल प्रदेशात प्रवेश घेतो. हिमालयातील अनेक प्रवाह आणि लोहित वगैरे नद्यांचा प्रवाह सामावून घेत आसामातल्या सादियाजवळ अक्राळविक्राळ रूप धारण करतो. मग मिडिया ते सध्या बांग्लादेशच्या सीमेजवळ असणाऱ्या धुबरीपर्यंत आसामची मैदानं गाळानं सुपीक, सुजलाम,सुफलाम करत जातो. त्याचबरोबर वर्षातून दोन वेळा अलोट पाण्याचा प्रवाह सामावत जिंव्हा पात्रात न सामावल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशात पसरत हाहाकार माजवून देतो. मालमत्ता, वित्त, आणि जीविताच्या हानीस कारणीभूत ठरतो. ह्या कारणामुळे 'आसामचे अश्रू' वगैरे विशेषणं झेलतो. ते काहीही असलं तरी 'मानवी जीवन,सांस्कृती, सभयता' नद्यांच्या खोऱ्यात वसतात, बहरतात, फळतात, फुलतात. नाशही पावतात. सत्यच आहे. भारताच्या सांस्कृतिक एकटेच भक्कम पुरावा असणाऱ्या महाभारतापासून अस्तित्वाच्या खुणा ब्रम्हपुत्रच्या खोऱ्यात आढळतात. प्राग्ज्योतिषपूर, कामरूप ते भारतातलं सर्वात जास्त काळ राज्य केलेलं घराणं 'ताई आहोम', त्यांचा पराक्रमी सेनापती लछित हा गौरवशाली इतिहास मिरवणारं, स्वातंत्र्यसेनानी आणि आसामला एकसंध भारतात राखण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या 'लोकप्रिय' गोपीनाथ बार्डोलाई यांचं  खोरं. श्रीमंत शंकरदेवांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या वैष्णव संप्रदायाची पताका मिरवणारं खोर. बरोबर एक वर्ष २ ,अहिन्यापूर्वी ह्या प्रदेशात अभ्यास दौरा केला होता. त्याचे अनुभव जसे आठवतील, सुचतील, तसे शब्दबद्ध करतो आहे. ( आता हे आठवण्याचं कारण आसाम सरकारचा महत्वाकांक्षी 'नमामि ब्रम्हपुत्र' हा महोत्सव.)  त्यातीलच हा एक.. 
            त्रिपुरातला मैदानी, टेकड्यांचा प्रदेश त्यानंतर बराक नदीच्या खोऱ्याचा प्रदेश, दिमा हसओचा आदिवासी आणि अशांत प्रदेश पाहत, अनुभवत पुढल्या टप्प्यात आलो ते ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात. जोरहाट. ब्रम्हपुत्राच्या खोऱ्यातलं जिल्ह्याचं ठिकाण. आसामचं मुख्य शैक्षणिक केंद्र, विशेषतः कृषी क्षेत्रातील शिक्षण, संशोधनाचं क्षेत्र. जगातलं सर्वात मोठं नदीतील बेट 'माजुली' चा प्रदेश आणि जिल्हा. ( आता माजुली बेट हा स्वतंत्र जिल्हा आहे. आसाम मध्ये सरकार बदललं आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ माजुली आहे. एकाच वर्षात सादिया {लवकरच वाहतुकीसाठी सुरु होणाऱ्या }, तेजपूर आणि गौहातीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.) जोरहाट शहरापासून जवळच कमलबारी गाव, तिथून माजुलीकडे जाणाऱ्या बोट सेवा आहेत. ब्रम्हपुत्रमधला एकुणात दीड तासाचा प्रवास, तीथु शंकरदेवांच्या वैष्णव संप्रदायाच्या मंदिरांपर्यन्त, माजुलीतील अत्यंत हलक्या वजनाच्या लाकडी मुखवट्यांच्या कलाकेंद्रांपर्यंत, माजुलीतील विविध आदिवासी वस्त्या, पाण्याचे प्रवाह इत्यादींपर्यंत गाडीने प्रवास. रोजच्या वापरातल्या वस्तू ते इतर बाबतींसाठी ह्या बेटावरली जवळ जवळ २ लाख लोकसंख्या जोरहाट आणि उत्तरेकडल्या लखीमपूर वगैरेवर अवलंबून आहे. तेथील निसर्ग, जनजीवन पाहिलं, अनुभवलं. पण त्यापलीकडील जीवाला चटका लावणारा प्रसंग माजुलीला जात असतानाच कमलबारीला पहिला. जेट्टीच्या इथे एका बाजूला, एक महिला आकांत करत होती. आजूबाजूच्या परिस्थितीचा जणू तिला विसर पडला होता. तो आकांत अजूनही कानात घुमतो. अधिक चौकशी केली असता, कारण समजलं ते ऐकून कुठलीच प्रतिक्रिया येईना. विचार सुन्न पडले. त्या महिलेचा अवघा अडीच वर्षाचा मुलगा तिच्याच मांडीवर असताना हे जग सोडून गेला होता. जानेवारी महिन्यातली थंडी, त्या मुलाला असणारा कसलातरी आजार, त्या महिलेची आपल्या मुलाला आरोग्य सेवेपर्यन्त घेऊन जाण्यात असलेली आर्थिक असमर्थता आणि सरकारी काय किंवा खासगी काय आरोग्य सेवा पोचू न शकणं ह्यामुळे तो जीव गेला होता. 
                 विचार! विचार!! काही क्षण लाज वाटायला लागली. स्वतःची. कसली? इतक्या सुविधा मिळूनही आपण त्याची किंमत ठेवत नाही याची. सर्व सुखसोयी, सेवा हाताशी असूनही आपण सतत काहीतरी नसल्याचं रडगाणं गात राहतो याची. 'अभ्यास दौरा' त्यातून काय मिळतं? हेच सुन्न करणारे त्याचबरोबर काहीतरी करण्याचं बाळ आणि ईर्ष्या देणारे अनुभव मिळतात. प्रश्नच आवाका लक्षात यायला लागतो. सरकार, समाज, (खरोखर) समाजसेवा करणाऱ्या संस्था यांच्यासमोरचं आव्हान यांचा अंदाज यायला लागतो. माजुलीचा, आसाम राज्याचा अनुभव घेत संध्याकाळी भेट घेतली 'कार्यकर्ता अधिकारी' विशाल सोळंकी सरांची. जे त्यावेळी जोरहाटचे जिल्हाधिकारी ( आसाममध्ये उपायुक्त) होते. सध्या ते आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत. विविध प्रश्न त्यांची अत्यंत,  संयत आणि अभ्यासपूर्ण उत्तरं, हे सुरु असताना सकाळच्या 'त्या' अनुभवाच्या संदर्भात एक प्रश्न आमच्यातल्या एकीने विचारला. त्यावर सरांनी अत्यंत खेदपूर्वक नमूद केलं की ही परिस्थिती भरपूर ठिकाणी आहे. प्रामाणिक प्रयत्न आहेत पण त्याला निसर्ग, काही असामाजिक घटक यामुळे अडथळा येतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट त्यानंतर सोळंकी सरांनी जोरहाटची सूत्र त्यांच्या जागी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या हाती सोपवण्यापूर्वी आरोग्यसेवा सुधारली होती. ब्रम्हपुत्र आणि माजुलीला बोटीतील रुग्णवाहिका आणि प्राथमिक आरोग्य सेवा सुरु झाली होती आणि ती सुरळीत चालू लागलेली आहे. 
           जोरहाट-माजुलीचा संमिश्र अनुभव घेत, roll model असणाऱ्या लोकांना भेटत प्रवासाच्या पुढल्या टप्प्याला सुरुवात केली. पुढला टप्पा होता, हिमालय. तवांग !!!!

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...