"साहेब उद्या मी एक प्रेस कॉन्फ़रन्स बोलावणार आहे. त्यात मी ह्या शहरातल्या 10 सर्वात मोठ्या स्मगलर्सची नावं जाहीर करणार आहे. त्याचबरोबर राजकारणातील त्यांच्या गॉडफादर्सची नावंही मी जाहीर करणार आहे.."
मुंबईतील मरीन ड्राइव भागातील एका चकचकीत इमारतीच्या गच्चीवर कम्युनिस्ट कामगार पुढारी डीकास्टा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये खासगी पण गुप्त संवाद सुरु आहे. डीकास्टाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणतात,
" हे सगळ बोलण खूप सोपं आहे डीकास्टा! अरे मनात आणलं तर आम्ही स्मगलिंग चोवीस तासात बंद करू. पण सध्या ते तितकसं महत्वाचं नाही. राज्यात इतर प्रश्न महत्वाचे आहेत. गरीबी आहे. कित्येक गावात अजून वीज नाही. महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकावं लागतं... मनात आलं की कसं गलबलायला होतं.. त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत रे???
"स्मगलारांना संरक्षण देणार, असाच याचा अर्थ होतो, साहेब!"
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन चित्रपटातील हा एक सूचक प्रसंग. एकाचवेळी दोन भिन्न विचारसरणीची माणसं, सत्ताकेंद्र काही वाक्यांमधून परिस्थिती मांडतात. प्रसंग 1970 च्या दशकातला असला तरी परिस्थितीत फारसा फरक नाही. काही तपशील बदलले आहेत. असं का? ही परिस्थिती का आहे? ह्यावर काहीच करता येणार नाही का? एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालायला लागतात.
कुठल्याही मोठ्या शहरातला वाहतूक दिवे असणारा मोठा चौक घ्या. रहदारी अखंड वाहत असते. दिवा लाल झाला की थांबते. अचानक त्या वाहनांच्या घोळक्यात हातात गुलाबांचे गुच्छ, खेळण्या घेउन विकायला येणारी लहान मुलं दिसतात. गाड्यांच्या काचा शक्यतो खाली येत नाहीत. दुचाकीस्वार बघून न बघितल्यासारखे करतात. चौकाच्या एखाद्या कोपऱ्यात त्या अभागी मुलांची आई वगैरे असते. मांडीवर एखादं तान्हं मूल असतं. त्या मुलांच्या हातातल्या वस्तू आपण विकत घेउ शकत नाही. कारण गरज नसते. मन कितीही संवेदनशील असलं तरी तर्कशुद्ध विचार करणारं मन 'गरज नाही..!!' हे स्पष्ट बजावतं.मनात प्रश्न पडतात यांचं भविष्य काय? यांच्या शिक्षणाचं काय? हे असं आयुष्य देण्यासाठी त्या अभागी माता इतक्या मुलांना जन्माला का घालतात? पण मग अर्थस्त्रातली कठोर सिद्धांत डोक्यात येतात. शिक्षण नाही. त्यामुळे समज कमी. 'जितकी जास्त मुलं तितके काम करणारे हात' ह्या न्यायाने 'शिक्षणाचा अभाव- समज कमी- अधिक मुले जन्माला घालणे- गरीबी- कुपोषण' हे अखंड चालणारं वर्तुळ चालूच राहतं. हे वर्तुळ कुठे, कोण आणि कधी भेदणार? मुख्य म्हणजे कोण भेदणार??
हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. ते पाहत असताना मुख्यमंत्र्याना पडणारे प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला पडतात. काही लोक ती प्रश्न डोक्यात घेउन 'मला काय त्याचे (?)' ह्या भावनेने पुढे जातात. काही लोकांच्या डोक्यात ती प्रश्न कायम घोळत असतात. ती त्या प्रश्नांच्या मुळाशी जातात. त्याचा अभ्यास करतात. काही लोक त्या अभ्यासाच्या पलीकडे जात ती प्रश्न सोडवण्याच्या मागे लागतात. ह्या सगळ्यात आपण कुठे आहोत? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
ह्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना मोर्चा आपसूक आर्थिक आणि राजकीय विचारसरणीकड़े वळतो. भांडवलशाही, काही वेळा crony capitalism कड़े वळणारी भांडवलशाही की साम्यवाद-समाजवाद? वास्तविक सदरची मांडणी ही समाजवादाकडे झुकणारी असली तरी दूसरी बाजू कायम डोळ्यासमोर येते. खुलं उद्योगक्षेत्र, खासगी भांडवलाला मान्यता, उद्योजकता विकास यामुळे देशाची झपाटयाने आर्थिक प्रगती झाली. ही वस्तुस्थिती नाकरता येत नाही. त्यामुळेच पुन्हा आर्थिक वृद्धी की विकास हे द्वंद्व उभं ठाकतं. सगळ करून पुन्हा वैचारिक गोंधळात आणि प्रश्नांकडे मोर्चा येउन ठेपतो. आणि मुख्यमंत्र्यांसारखंच वाक्य उच्चारावंसं वाटतं,
" त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत....??"
Comments
Post a Comment