Skip to main content

जोकर

जोकर

अस्वस्थ करणारा सिनेमा 



माझ्याशिवाय तुझ्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. मी आहे म्हणून तुझे महत्व आहे... ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'द डार्क नाईट राईसेज' चित्रपटातील जोकर हे खलनायकी पात्र नायक, सुपरहिरो बॅटमॅन ला म्हणतो. हे खरेच आहे. चित्रपट असो कि सामान्य जीवन खलनायकाच्या खलत्वावर नायकाचे नायकत्व अवलंबून असते. चित्रपट, कथा, कादंबऱ्यांत आपल्या समोर उभा केला जातो तो नायक. त्याची बाजू. त्याची नायक होण्याकडची वाटचाल. पण त्यातील खलनायकाची देखील एक बाजू असते. त्याची देखील काही कहाणी असते. ती विचारात घेणे आवश्यक वाटू लागते. त्या खलनायकाच्या नकारात्मक बाजूचे उदात्तीकरण योग्य नाहीच. पण बाजू समजून घेणे आवश्यक आहे. जगभरच्या चित्रपटांमध्ये अनेक वेळा अँटी हिरो ह्या संकल्पनेवर आधारित चित्रपट तयार झाले आहेत. त्यात अमेरिकेतील माफिया जगतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट गॉडफादरचा उल्लेख अपरिहार्य आहे. भारतीय चित्रपट परिप्रेक्ष्यात देखील अनेक अँटी हिरो संकल्पनेवर अनेक चित्रपट तयार झाले आहेत. रोमान्स चा बादशहा म्हणवला जाणारा शाहरुख खान पुढे आला तो अँटी हिरो टाईपच्या भूमिकांमधूनच. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की भारतीय चित्रपटजगतात गाजलेल्या मिस्टर इंडिया सारख्या चित्रपटात खलनायक मोगॅम्बो खूप मोठी कामगिरी बजावतो. नुकताच येऊन गेलेल्या पद्मावत चित्रपटात खलनायकी छटा असणारा खिलजी अधिक भाव खाऊन गेला. तसाच नोलन दिग्दर्शित डार्क नाईट राईसेज मधला जोकर आणि ती भूमिका साकारणारा हिथ लेजर भाव खाऊन गेला. 

डीसी कॉमिक्स, हा अमेरिकेतील एक प्रमुख सुपरहिरो पात्र निर्माण करणारे प्रकाशन आहे. एका बाजूला मार्व्हल कॉमिक्स आहे. जिथे लोकप्रिय सुपरहिरो आणि लोकप्रिय, करमणूक प्रधान कॉमिक्स आणि चित्रपट केले जातात. तर दुसऱ्या बाजूला डीसी कॉमिक्स, जिथे सुपरहिरो आणि एकंदर कथानके एका गडद छायेत असतात. मार्व्हल ने अव्हेंजर्स चित्रपटांची मालिकाच आणली आहे. त्या चित्रपटांनी जगभर भरपूर व्यवसाय केला. पण मार्टिन स्कॉर्सेसी सारख्या हॉलिवूड मधील महनीय चित्रपट दिग्दर्शकाने मात्र मार्व्हलचे चित्रपट हे 'चित्रपट' या व्य्ख्येत बसत नाही. तो एक नुसताच तमाशा असतो अशी टीका केली आहे. दुसऱ्या बाजूला डीसी कॉमिक्स वर आधारित नोलन दिग्दर्शित डार्क नाईट त्रयी, मॅन ऑफ स्टील आणि ताजा आलेला जोकर कलात्मकदृष्ट्या उच्च दर्जाचे चित्रपट आहेत. वास्तविक लहानांसाठी असणाऱ्या कॉमिक्स वर आधारित इतके चांगले आणि मुख्य म्हणजे सर्व स्तरातील प्रेक्षक पाहू शकतील असे चित्रपट तयार केले गेले आहेत. या मालिकेत नुकताच आलेला जोकर हा चित्रपट मात्र एक वेगळा, अस्वस्थ करणारा अनुभव आहे. बॅटमॅन मालिकेत जोकर हे एक विकृत खलनायक पात्र आहे. यापूर्वी अनेक अभिनेत्यांनी ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेचे अनेक कंगोरे आहेत. ही भूमिका साकारताना अभिनयाचा कस लागतो. या भूमिकेचा अभ्यास करताना, त्या भूमिकेत अधिकाधिक शिरत गेल्यामुळे अनेक अभिनेत्यांना मानसिक आजार जडले. डार्क नाईट सिरीज गाजवणारा हिथ ड्रग्सच्या आहारी गेला. त्यापायीच त्याचा अकाली मृत्यू झाला. त्या भूमिकेसाठी मिळालेले ऑस्कर पारितोषिक स्वीकारण्यास तो जिवंत नव्हता. या पार्श्वभूमीवर वॉकीन फिनिक्स या अभिनेत्याने जोकर या चित्रपटातली आर्थर फ्लेक ही भूमिका साकारली आहे. 



जोकर... आर्थर फ्लेक. आपल्या मानसिक दृष्ट्या आजारी आईसोबत राहतो. त्याला स्वतःलादेखील एक मानसिक आजार आहे. एकदा हसायला सुरुवात केली की तो हसतच राहतो. त्यासाठी त्यावर उपचार सुरु आहेत. तो रस्त्यावर, लहान मुलांच्या दवाखान्यात अशा ठिकाणी जोकरच्या वेशात खेळ करतो. एकदा रस्त्यावर १५-१६ वर्षाच्या मुलांचे टोळके त्याच्या हातातला फलक घेऊन पळून जातात. हा त्यांच्या मागे धावतो. ते टोळकं आर्थरला बेदम मारतात. आर्थर उध्वस्त मनाने घरी येतो. बंदूक घेऊन लहान मुलांच्या दवाखान्यात गेल्यामुळे त्याची नोकरी जाते. त्या अवस्थेत तो मेट्रो मध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करत असतो. दारूच्या नशेत काही जण एका मुलीची छेड काढत असतात. त्या वेळी काही झटापट होते. ते लोक आर्थर ला मारहाण करतात. यावेळी आर्थर बंदुकीने गोळ्या झाडून त्यांची हत्या करतो. ही हत्या करत असताना त्याच्या चेहऱ्यावर जोकरचे रंग असतात. त्याचवेळी गॉथम (कथेतील काल्पनिक शहर) शहरात महापौर निवडणुकीचे वारे आहेत. थॉमस वेन हे उद्योगपती त्या पदासाठी उत्सुक आहेत. त्याचवेळी शहरात सफाई कर्मचारी आणि तत्सम काम करणारे लोक संपावर आहेत. शहरात बेकारी, गरिबी विरोधात असंतोष आहे. त्याचवेळी मरी फ्रँकलिन हा नर्मविनोदी कार्यक्रम टेलिव्हिजनवर सुरु आहे. आर्थरची स्टॅन्ड अप कॉमेडियन होण्याची इच्छा एका वेगळ्या मार्गाने पूर्ण होण्याच्या बेतात असते पण मधल्या काळात अशा काही घटना घडतात आणि आर्थरला आपल्या अस्तित्वाविषयी काही धक्कादायक गोष्टी समजतात. त्यातून त्याच्यातला माणूस अधिकाधिक विकृत होत जातो. गॉथम शहरातल्या वाढत्या असंतोषाला एक चेहरा मिळतो. जोकर. सर्व शहरात जोकरचे मुखवटे घालून दंगली सुरु होतात. त्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर एका विकृत, भयकंर जोकर या खलनायकाचा जन्म होतो.

चित्रपटाचे कथानक, मांडणी खूप गडद आहे. फिनिक्सचा अस्वस्थ करणारा आर्थर फ्लेक आपल्या अभिनयाने अवाक  करतो. परिस्थितीने पिचलेला सुरुवातीच्या भागातला आर्थर पुढे जात अधिक निष्ठुर, क्रूर, विकृत होत जातो हा बदल फिनिक्स आपल्या अप्रतिम अभिनयाने दाखवतो. चित्रपटातली हिंसा अंगावर येणारी आहे. अनेक प्रसंग मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींना अधिक अस्वस्थ करू शकतात. संपूर्ण चित्रपटावर फिनिक्सच्या आर्थर फ्लेक म्हणजेच जोकरची छाया आहे. या बरोबरच चित्रपटाचे पार्श्वसंगीत अस्वस्थतेत भर घालते. परिस्थितीमुळे निर्माण झालेला हा खलनायक आणि त्याच्या कृत्यामुळे शहरभर भडकलेली आग आटोक्यात आणताना प्रशासन हतबुद्ध होऊन जाते. सामान्य लोकांकडे होणारे दुर्लक्ष, त्यांच्यातली अस्वस्थता अशा पद्धतीने बाहेर पडली की उत्पात काय उत्पात माजतो हे दिसून येते. उद्योगपती आर्थिक ताकदीच्या बळावर सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात हे काल्पनिक जगतातले संदर्भ वास्तवातही अनेक ठिकाणी दिसतात. या चित्रपटातील प्रसंग, कथानक हिंसक आंदोलनांना चालना देईल की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी अनेक युरोपीय देशात केली गेली. कलात्मकदृष्ट्या उत्कृष्ट असणारा हा सिनेमा एकदा पाहायलाच हवा. खलनायकाची उदात्तीकरण करण्यासाठी नाही तर कुठल्या परिस्तितीत खलनायक तयार होऊ शकतात हे समजून घेण्यासाठी. 

Comments

  1. खूपच छान लिहाल आहेस शौनक ✌️👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं