धुंवाधार पाऊस कोसळत होता. आजी-आजोबा, मामा-भाचे वगैरे गोतावळा गाडीने तुळजापूरच्या वाटेवर होतो. अशा प्रवासात कायम असतात तशी गाणी तत्कालीन टेपवर वाजत होती. माझ्या मामाने प्रस्ताव मांडला, की एक भजनाची कॅसेट आहे माझ्याकडे. ऐकू. छान वाटेल. भजन म्हटल्यावर आम्ही मुलं काहीसे नाखूष झालो. पण एक समजूतदार तोडगा निघाला, की इतका वेळ इतर सर्व सुरूच होतं, आता हे ऐकायला काय हरकत आहे? संध्याकाळी साडेसातची वेळ असावी. अंधार पडला होता. पाऊस होताच, मृदंगाचा भजनी ठेका ऐकायला आला आणि, ओम नमो भगवते, वासुदेवाय... मृदंगाच्या तालाच्या पार्श्वभूमीवर हळूहळू वाढत जाणाऱ्या आवाजात हे बोल ऐकायला आले. एका विलक्षण अनुभूतीला सुरुवात झाली. त्या वासुदेवाची आराधना मृदंग, टाळाच्या साथीने सुरु झाली. प्रत्येक कडव्यात एका अक्षरापासून त्या श्रीविष्णूची कौतुके गायली जातात. वामनम विश्वरुपंच वासुदेवम च विठ्ठलम... असं म्हणत त्वं वंदे वेदवल्लभम असं समेवर येताच आपणही आपसूक गायला लागतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.. पंडित जसराज या संगीत मार्तंडाशी माझी ओळख ही अशी झाली. वास्तविक ते वय, "शास्त्रीय संगीत म्हणजे काय? दळण दळल्यासारखं एकच शब्द, एकच वाक्य पुनःपुन्हा गात राहायचं. वगैरे आणि वगैरे.. " बोलण्याचं होतं. पण हा वासुदेवाच्या नावाचा गजर, ती लय आणि त्या आवाजामुळे काहीतरी हललं होतं. काहीतरी वेगळं आहे, हे जाणवायला लागलं होतं. त्या दरम्यान इतर काही लोकांचं ख्याल गायन ऐकण्याचा प्रयत्न केला. पण विलंबित लयीतील ते ख्याल काही पचनी पडेनात. एक खंड पडला पुन्हा. पण मग निर्णायक क्षण आला आणि शास्त्रीय संगीत मला मनापासून आवडायला लागलं. मला आनंद देऊ लागलं. तो क्षण होता, पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवात पंडित जसराज यांचं गायन.
पंडितजींनी जयजयवंती उलगडला. त्यातले बारकावे, बारीक सारीक गोष्टीला लोक दाद देत आहेत, त्या ठिकाणी नक्की काय कारागिरी दाखवली आहे ते काहीही कळत नव्हतं. हे खरं आहे की बारकावे अजूनही फारसे कळत नाहीत. पण लडिवाळ मांडणी, स्वरांना खेळवत, आंजारत-गोंजारत, आरोह-अवरोहाच्या चक्रातून समेवर येत साथीदारांकडे टाकला जाणारा कटाक्ष हे आवडायला लागलं. द्रुत लयीत बंदिश गाताना येणाऱ्या ताना मात्र अंगावर यायला लागल्या. दाणेदार ताना वगैरे घेत, सरगम मांडत ती बंदिश संपली. आणि त्याक्षणी लक्ख जाणीव झाली की या जवळ जवळ अर्धा-पाऊण तासात या माणसाने काही मोजक्या शब्दांच्या साथीने समोरच्या काही हजार श्रोत्यांना गुंगवून टाकलं होतं. लोक काही क्षण टाळ्या द्यायला विसरले होते. नंतर टाळ्यांचा एकच एक गजर झाला. त्यानंतर आणखी एक छोटीशी बंदिश गायल्यानांतर, भैरवी आली. भैरवी संपत येत होती तसा घड्याळात १० चा काटा जवळ येताना दिसत होता. पण लोक जागचे हालेनात. त्यात मीही होतो. लोकांचा काही जाण्याचा बेत दिसत नाही हे लक्षात येताच अतिशय खेळकर आवाजात पंडितजी म्हणाले, "चलो, गोविन्द दामोदर गा देते हैं.." चला, हे काहीतरी वेगळं होतं. नवीन होतं. छान होतं. पण १० वाजून गेले होते, नियमाप्रमाणे पोलीस लोक मंडपात आले. ते भारलेलं वातावरण पाहून पोलीस, आपण स्पीकर वगैरे तातडीने बंद करा, हे सांगण्यासाठी आलो आहोत हे विसरून भान हरपून ऐकत होते. ही त्या पंडित जसराज नावाच्या अफाट कलाकाराची थोरवी होती. जी मी याची देही अनुभवली.
त्यानंतर मी इंटरनेट कॅफे जवळ केले. कारण त्यावेळी स्मार्टफोन चांगलाच लांब होता. त्यामुळे अधिक काही ऐकायचं आहे, डाउनलोड करून आपल्याकडे ठेवायचं आहे तर तोच एकमेव स्रोत होता. मग एका बाजूला युट्युब वर ऐकत दुसऱ्या बाजूला डाउनलोड सुरु. तेव्हा सुरुवात पुन्हा छोट्या ख्यालांपासून केली. तो राग होता, शंकरा. एकेक करत पुढे गेलो. शंकरा, तोडी रागाची विविध अंग दाखवणारे राग वगैरे घेऊन आलो. वाचन करताना, अभ्यास करताना, संध्याकाळचा गच्चीत बसलो असताना, अगदी रस्त्याने चालताना देखील हे ऐकत होतो. शास्त्रीय संगीताचं हे बळ आहे. आणि असं वाटतं, जवळ जवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा असतो की, शास्त्रीय संगीताला तुच्छ लेखलं जातं. पण असाच एखादा क्षण येतो आणि त्या संगीताची गोडी वाढते. वाढतच जाते. तेव्हा पासून जो सिलसिला सुरु झाला, तो आजतागायत सुरु आहे. आणि यापुढेही सुरुच राहणार आहे. पण माझ्या सारख्या अनेकांना शास्त्रीय संगीताच्या महासागरात खेचून घेऊन येणारा हा संगीत मार्तंड आज देहाने आपल्यातुन गेला. ९० वर्षांचं आपलं आयुष्य त्यांनी संगीत-संगीत आणि संगीताच्या साथीनेच व्यतीत केलं. आणि सोबतच असंख्य रसिकांना चिरस्मरणीय आनंद दिला.
'द जर्नी ऑफ पंडित जसराज' या फिल्म्स डिव्हिजन निर्मित आणि पंडितजींच्या पत्नी, चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा जसराज दिग्दर्शित माहितीपटात त्यांचा प्रवास विलक्षण प्रतिभेने टिपला आहे. शाळेच्या वाटेवर एका हॉटेलातल्या ट्रान्झिस्टर वर बेगम अख्तरची रोज कानावर पडणारी "दिवाना बनाना हैं तो दिवाना बना दे, वरना कहीं तकदीर तमाशा ना बना दे" ही गज़ल त्यांना संगीताच्या जगाकडे आकृष्ट करून गेली. वास्तविक त्याचं घराणं हे जातिवंत गायक-संगीतकारांचं घराणं आहे. त्यांचे वडील मेवाती घराण्याचे आणि पुढे हैदराबादच्या दरबारातील राजगायक झालेले पंडित मोतीराम, त्यांचे मोठे बंधू पंडित मणिराम हे मोठे गायक. त्यामुळे हा वारसा त्यांच्याकडे आला नसता तरच नवल. पण त्यांची सुरुवात झाली ती तबला शिकण्यापासून. कारण लय-तालाची योग्य जाण येणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तबला शिकला पाहिजे अशी घराण्याची परंपरा. त्यात त्यांचे मोठे बंधू पंडित प्रताप नारायण हे तर तबल्यातले मोठे नाव. त्यामुळे सुरुवातीला पंडित कुमार गंधर्व आणि इतर गायकांना तबल्याची साथ जसराजजी करत असत. कुमार गंधर्वांच्या गायकीतील एक बारकावा अचूक टिपून तो त्यांनी मांडला तेव्हा हेटाळणीच्या स्वरात एका बुजुर्गाकडून आलेले, "तुम तो मरा हुआ चमडा बजाते हो.." हे शब्द त्यांच्या जिव्हारी लागले. आणि तबलावादक पंडित जसराज गायकीकडे वळले. पंडित मणिराम यांच्याकडे घेतलेली मेवाती घराण्याची गायकी त्यांनी जगभरात नेऊन पोचवली.
स्वरांची शुद्धता, चीज, बंदिश गाताना शब्दांच्या स्पष्ट उच्चारांवर भर ही मेवाती घराण्याची काही वैशिष्ट्ये. पारंपरिक चीजांबरोबरच प्राचीन संस्कृत वाङ्मयातील श्लोक पंडित जसराज यांनी ख्याल गायनात वापरले. ख्याल गायकीबरोबरच त्यांनी धृपद गायकी, हवेली संगीत, श्रीकृष्ण भजन असे अनेक प्रकार हाताळले. 'अ ट्रिब्यूट टू बैजू बावरा' यात आसावरी, भीमपलास, भैरव रागांचे अनोखे पैलू उलगडले. धृपद गायनातील आलाप हे 'नोम तोम' मध्ये न घेता मंगलाचारणात, 'अनन्त हरी नारायण' या शब्दात घेतले आहेत. तर 'मियां तानसेन' या संग्रहात असेच धृपद गायन करताना रागेश्री, मियाँ की सारंग, पुरिया वगैरे रागात 'नोम तोम' मधले आलाप गायले आहेत. या धृपद गायनात पुन्हा तोच मंत्रमुग्ध होऊन जाण्याचा अनुभव येतो. वास्तविक नंतरच्या चीजेपेक्षा ते आलापच अधिक परिणामकारक ठरतात. याबरोबरच अनेक संस्कृत भजन, श्लोक त्यांनी गायले आहेत. मधुराष्टकम, शिवाष्टकम, यमुनाष्टकं या सोबतच मीरेची भजने श्रवणीय आहेत. त्याचबरोबर एक अचाट प्रकार ऐकला तो म्हणजे मांडुक्य उपनिषद, गणपती अर्थवशीर्ष वगैरेंचे गायन. पंचतंत्र, इसापनीतीच्या गोष्टींसारखेच एकातून एक असे अचाट स्वराविष्कार पुढे येत जातात. काय घेऊ आणि काय नको असं होऊन जातं. भिन्न षड्ज ऐकला की बागेश्री दिसायला लागतो, तो ऐकला की बिहाग दिसायला लागतो. त्याला अंतच लागत नाही.
संगीत मार्तंड पंडित जसराज यांना मानसन्मान अनेक मिळाले. भारत सरकारचे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण सह संगीत क्षेत्रातील अनेक सन्मान त्यांना मिळाले. पण एक अनोखा सन्मान त्यांना काही वर्षांपूर्वी 'इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनिअन' कडून देण्यात आला. आपल्या सौरमालेतील एका लघुग्रहाला पंडितजसराज असे नाव देण्यात आले आहे. अशा पद्धतीचा बहुमान मिळालेले ते भारतातले पहिले संगीतकार आहेत. या मानसन्मानांच्या पलीकडे पंडित जसराज एक मोठा वारसा सोडून गेले आहेत. तो म्हणजे, मेवाती घराण्याची गायकी, परंपरा अभिमानाने, जबाबदारीने पुढे घेऊन जाणारा शिष्यांचा गोतावळा. आजच्या पिढीतील पंडित संजीव अभ्यंकर, पंडित रतन मोहन शर्मा, अंकिता जोशी, व्हायोलिन वादक कला रामनाथ, बासरीवादक शशांक सुब्रमण्यम यांचा समावेश आहे.
पंडितजींनी त्यांच्यावरील माहितीपटात बद्रीनारायण मंदिराच्या पायऱ्यांवर बसून आपल्या आयुष्यातला दिव्य अनुभव कथन केला आहे. त्याच बद्रीविशालच्या मंदिराच्या आवारात ते गात होते. गाणं रंगत गेलं आणि एक क्षण असा आला की ते सर्व काही विसरून गेले, संगीत आराधनेच्या परमोच्च बिंदूवर पोचले. आणि लक्षात आलं, हीच तर ती समाधी अवस्था. त्यापर्यंत पोचण्याचा त्यांचा मार्ग संगीत आराधनेचा होता. आयुष्यभराची सुरांची आराधना त्या बद्री श्रीविष्णूच्या आवारातच परमोच्च बिंदुला घेऊन गेली होती. संगीताच्या आराधनेत अहोरात्र गढलेला हा संगीत मार्तंड आज अनंताच्या प्रवासाला निघाला आहे. संपूर्ण जगाच्या कल्याणाची शुभेच्छा मनात बाळगत आपले दोन्ही हात उचलून विलक्षण मायेने जय हो, म्हणणाऱ्या या संगीत मार्तंडाचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायमच आपल्यासोबत राहणार आहेत. या संगीत मार्तंडाला भावपूर्ण श्रद्धांजली!!
एखाद्या मैफिलीसारखा रंगला आहे लेख. संगीत मार्तंड जसराज यांना विनम्र श्रद्धांजली.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteशौनक, खुपच छाण प्रस्तुती, शुभेच्छा आणि अभीनंदन ।।
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteAmazingly written.
ReplyDeleteTakes the reader into the live मेहफिल of Panditji.
Thank you so much.
Deleteशौनक, शब्दांच्या लयबद्ध मांडणीच्या मैफिलीने तू पंडितजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलो आहेस. खूपच अप्रतिम.....
ReplyDeleteखरंच खूप छान लिहिलेस मी पण प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे ओम नमो चा अजून ही अंगावर रोमांच येतं आठवलं की
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete