कुमारच्या चेहऱ्यावर आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते. पाच वर्षापूर्वीच्याच कानांना 'आता अवधारिजो जी' असे जरासे बजावून सांगणारा तोच, तसाच षड्ज लागला आणि त्यापूर्वी कोणीही न ऐकलेल्या एका रागातल्या चिजेचा अद्भुत मुखडा कानी पडला, "मारुजी भूलो ना म्हाने". अस्ताई म्हटल्यावर पुन्हा चिजेच्या तोंडाकडे येताना मारुजीमधल्या 'जी'वर कुमार कोमल रिषभावर दोनच सेकंद असेल पण अशा ताकदीने ठेहरला की त्या कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला. त्या रिषभाची जखम आजही माझ्या मनात ओलीच आहे. कुमारने मग त्या रागाचे नाव सांगितले, 'सोहनीभटियार' आणि म्हणाला, "गेल्या काही वर्षात असे काही नवे राग आणि नव्या चिजा झाल्या आहेत." पु.ल. नावाच्या शब्दप्रभूने 'मंगल दिन आज' या गुण गाईन आवडी मधील व्यक्तिचित्रात पंडित कुमार गंधर्व या संगीतातील अलौकिक चमत्काराचे असे वर्णन केले आहे.
पुल ज्याप्रमाणे त्या नव्या रागातील कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला असे वर्णन करतात, तो कोमल रिषभ लागला, म्हणजे काय झालं हे नीट सविस्तर समजावून सांगितल्याशिवाय काही मला कळणार नाही. पण एक गोष्ट नक्की की कुमार गंधर्वांचं गाणं काळजाला भिडतं. एक विलक्षण भावना मनात दाटते. ती भावना वर्णनातीत असते. आजतागायत ती तशीच आहे. त्यामुळेच कुमार गंधर्व या महापुरुषाबद्दल आपण भक्तिभाव यापलीकडे दुसऱ्या भावनेने पाहू शकत नाही. चिकित्सा वगैरे फार लांब राहिली. त्यांच्या कार्याचे आकलन जरी झाले तरी भरून पावलो.
पुलंची त्या 'सोहनीभटियार' शी पहिली ओळख साक्षात कुमार गंधर्वांनी करुन दिली. माझी पहिली ओळख झाली राहुल देशपांडे यांच्या 'कुमार राग विलास' या कार्यक्रमात. इतर शास्त्रीय गायक गातात, किंवा स्वतः राहुल देशपांडेच गातात त्यापेक्षा हे वेगळं आहे. या मांडणीत एक विलक्षण आर्तता आहे. काळजात चलबिचल करणारी आर्तता आहे. ती सुरवात मनावर गारुड करणारी आहे. त्या दिवशी मनात ते "मारुजी भूलो ना म्हाने... अब घर तुम बिन राता डर लागे म्हाने" या शब्दांनी मनात विलक्षण खळबळ माजवली. त्याच धुंदीत एक निश्चय झाला की, साक्षात त्या गंधर्वांची गायकी ऐकली पाहिजे.
आता श्रवण-दृश्यभक्ती साठी सर्वात मोठा आसरा म्हणजे युट्युब. त्या तंत्रज्ञानाच्या आश्रयाला गेलो. त्यानी निराश केलं नाही. कुमार गंधर्वांच्या गायनाचं भांडार खुलं झालं. सुरुवात अर्थातच सोहनीभटियार ने केली. पुन्हा तोच अनुभव. एकदा ऐकून समाधान होईना. त्या दिवशी तेवढा एकच राग किती वेळा ऐकला असेल माहिती नाही. युट्युब ही एक अशी अजब गुहा आहे की एकदा आत गेलात की जातच राहता. हे ऐकत असतानाच शेजारी रेकमेंडेशन मध्ये बिहाग होता. बिहाग हा मुळात आवडत्या रागांपैकी एक आहे. कुमार गंधर्व रचित बिहाग रागातील ती "मोरा मन.." बंदीश अशीच वेगळ्या जगात घेऊन जाते. एकामागून एक राग ऐकत गेलो. आणि एक गोष्ट परत ठसठशीतपणे जाणवली. ती म्हणजे प्रचलित शास्त्रीय संगीत गायकीपेक्षा ही गायकी काहीशी वेगळी आहे. आणि हेही तेवढ्याच तीव्रतेने जाणवलं की केवळ वगेळेपणाच्या अट्टाहासापायी हे केलेलं नाही. तर विचारपूर्वक झालेली ही कृती आहे.
कुमार गंधर्वांचा आणखी एक महत्वपूर्ण आविष्कार म्हणजे भजन. त्यात सगुण-निर्गुण भजन सर्व आले. कुमारांच्या आवाजात जेव्हा 'उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला' हे कबीराचे शब्द येतात, तेव्हा त्या शब्दांतली भावना कुमार गंधर्वांपेक्षा थेट, काळजाला भिडेल अशी दुसरी कोणी मांडू शकणार नाही अशी खात्रीच पटते. कबीर, मीरा, तुलसीदासांच्या रचनांना कुमारांनी चढवलेला स्वरसाज असो की माळवी लोकगीते, माळवी लोकगीतांच्या धून हाती धरून नव्याने रचलेले राग असो हा गंधर्व क्षणोक्षणी अचंबित करत राहतो. शास्त्रीय संगीताचं आणि एकूणच संगीताचं सखोल चिंतन करणारा, ते पचवणारा आणि त्यातून नवनिर्मिती करणारा हा अवलिया कलावंत होता.
कुमार गंधर्वांचं गाणं ऐन बहरात येत असताना त्यांना दुर्धर आजाराने गाठलं. अनेक वर्ष हा दैवी आवाज शांत होता. पण त्या शांततेच्या काळात हा अवलिया चिंतन करत होता. इतर अनेक आवाज, धून डोक्यात साठवीत होता. ते आजारपण जणू पुढल्या क्रांतिकारी नवनिमिर्तीसाठीच्या शांततेचा काळ ठरला. संगीतातला नवा विचार, नवी मांडणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत असणारा हा कलावंत होता. तो विचार त्यांनी 'अनूप राग विलास' या श्रेष्ठ ग्रंथात मांडला आहे. तो विचार, मांडणीतली विविधता, नवेपणा अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. वसंतराव देशपांडेंसारखे कुमार गंधर्वांपेक्षा वयाने ज्येष्ठ असणारे गायक त्यांच्याकडून काही शिकण्यासाठी तत्पर असतात. अशा अवलियास पुल, रामूभैया दाते, वसंतराव देशपांडे आणि इतर अनेक क्षेत्रातले असंख्य स्नेही लाभले. आजारपणात साथ देणारे कुटुंबीय, आप्त लाभले. हे प्रेम, स्नेह दुतर्फी होते. पंडित मुकुल शिवपुत्र, कलापिनी कोमकली, सत्यशील देशपांडे आणि असे अनेक शिष्य त्यांनी घडवले.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात क्रांतिकारी नवनिर्मिती करणाऱ्या शिवपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments
Post a Comment