Skip to main content

जम्मू आणि काश्मीर: संवैधानिक लोकशाही प्रक्रियेचा विजय


"जम्मू आणि काश्मीर विधानसभेची ही निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. भारताचे संविधान पूर्णपणे लागू झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे..."

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या भाषणातील या वक्तव्याला अनेक पैलू आहेत. 

भारतीय जनता पक्ष, त्याचा पूर्वसुरी जनसंघ यांची "एक देश में दो विधान, दो निशान और दो प्रधान नहीं चलेंगे" या सूत्रावर स्थापनेपासून अढळ निष्ठा आहे. आपल्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यानुसार वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला स्पष्ट जनादेश मिळाला, आणि राष्ट्र प्रथम, राष्ट्रीय एकता यांवर अढळ निष्ठा ठेवणाऱ्या केंद्र सरकारने दृढ राजकीय इच्छाशक्तीचे दर्शन घडवले. 

५ ऑगस्ट २०१९ या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, राष्ट्रपतींनी गॅझेट मध्ये प्रसिद्ध केल्याप्रमाणे, कलम ३७० चे सर्व खंड लागू असणार नाहीत, तसेच ३५अ कलम रद्द झाले असण्याची घोषणा केली. कलम ३७० च्या खंड ३ मध्येच राष्ट्रपती जम्मू आणि काश्मीर घटनासमितीच्या शिफारशीने, केवळ गॅझेट मध्ये सार्वजनिक प्रसिद्धी देऊन हे कलम रद्द करु शकतात अशी तरतूद होती. 

जम्मू आणि काश्मीरची घटनासमिती १९५६ मध्ये विसर्जित झाली होती. जम्मू आणि काश्मीर राज्याची विधानसभा ही त्या घटनासमितीची घटनात्मक आणि कायदेशीर वारसदार झाली. विधानसभा विसर्जित असताना, आणि कलम ३५६ नुसार राष्ट्रपती शासन लागू असताना वैधानिक आणि कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे असतात. 

वर्ष २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरची विधानसभा विसर्जित होती. तत्कालीन राज्यपालांनी शिफारस केली आणि त्यानुसार राष्ट्रपतींनी गॅझेट मध्ये प्रसिद्ध केले आणि त्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. 

कलम ३७० हे जम्मू आणि काश्मीरसाठी 'तात्पुरत्या तरतुदी' असणारे कलम होते. त्यानुसार भारताच्या संसदेने पारित केलेले विधी राज्य विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू होत नसत. यासोबतच त्या राज्याला वेगळे संविधान, वेगळा झेंडा असण्याचे मान्य करत होते. 

कलम ३५अ हे वर्ष १९५४ मध्ये, संविधानाच्या कलम ३६८ मध्ये असलेल्या घटनादुरुस्ती विषयक तरतुदींना पूर्णपणे फाटा देऊन केवळ राष्ट्रपतींच्या आदेशाने घालण्यात आले. यानुसार जम्मू आणि काश्मीरचे 'कायमचे निवासी' अशी श्रेणी तयार केली गेली. त्यांना राज्याच्या राज्यघटनेनुसार विशेषाधिकार मिळाले. त्या श्रेणीत नसलेल्या पण राज्यात पाकिस्तानातून आलेले निर्वासित, वाल्मिकी, पहाडी सारखे काही समाजगट यांना ते नाकारण्यात आले होते. 

कलम ३७० आणि ३५अ हे तेथील समाजमनात त्यांचा विशेषाधिकार असल्याचे बिंबले आहे. किंबहुना राज्यातील फुटीरतावादी गट आणि नेत्यांनी हे बिंबवण्यास प्रचंड मोठा हातभार लावला आहे. जम्मू आणि काश्मीर राज्य फुटीरतावाद आणि दहशतवाद यांमुळे कायम धुमसत राहिले. भारतीय सशस्त्र दले, निमलष्करी दले, स्थानिक पोलीस त्यांचा सातत्याने सामना करत आहेत. 

कलम ३७० आणि ३५अ रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय पातळीवर विरोध झाला. तो होणारच होता. अनेक संस्था, संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. कलम ३७० आणि ३५अ यामुळे जम्मू आणि काश्मीर बाहेरील भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना बाधा पोचत होती असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०२३ मध्ये स्पष्टपणे ५ ऑगस्ट २०१९ चा निर्णय घटनात्मक असल्याचा निर्वाळा दिला. 

त्या ऐतिहासिक निर्णयानंतर जम्मू आणि काश्मीरला भारताचे संविधान खऱ्या अर्थाने, पूर्णपणे लागू करण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यात राज्याचे विभाजन करुन जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. त्यात जम्मू आणि काश्मीर साठी विधानसभेची तरतूद करण्यात आली. 

केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये जम्मू आणि काश्मीर साठी रहिवासी दाखला (डोमिसाईल क्लॉज) ची तरतूद केली. त्यानुसार भारतातील इतर कोणत्याही राज्यांप्रमाणेच, कोणीही व्यक्ती १५ वर्षे वास्तव्य केले, ७ वर्षे शिक्षण घेतले तसेच दहावी, बारावीच्या परीक्षा दिल्या असतील तर केंद्रशासित प्रदेशात रहिवासी दाखला मिळवू शकतो. 

केंद्र सरकारने राज्यातील १४ भूमीविषयक विधी बदलले किंवा रद्द केले. 'जम्मू अँड काश्मीर एलिअनेशन ऑफ लँड ऍक्ट, १९३८' आणि 'बिग लँडेड इस्टेटस अबोलीशन ऍक्ट, १९५०' या दोन विधीनुसार कायम रहिवासी नसलेल्या नागरिकांना राज्यात जमीन खरेदी करता येत नव्हती, ते रद्द केले. 

संसदेने पारित केलेली भारतीय न्याय संहिता (आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम) प्रदेशाला लागू झाली. न्याय संहितेने राज्याच्या राज्यघटनेनुसार लागू असणारे 'रणबीर पिनल कोड' रद्दबातल ठरवले. यामुळे खऱ्या अर्थाने जम्मू आणि काश्मीरचा विशेषाधिकार संपला आणि तो भारताच्या इतर सर्व राज्य/ केंद्रशासित प्रदेशांसारखाच एक झाला. 

सात दशकांनंतर प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या वाल्मिकी, पहाडी, गड्डा ब्राह्मण, कोळी अशांसारख्या समाजगटांना जमीन खरेदी करण्याचा, सरकारी नोकरी मिळवण्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदानाचा अधिकार मिळाला. 

 संविधानाच्या भाग IX मध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तरतूद आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर सात दशकात पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीर मध्ये ग्राम पंचायत, पंचायत डेव्हलपमेंट कौन्सिल (पंचायत समिती समकक्ष) आणि डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल (जिल्हा परिषद समकक्ष) साठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांना उमेदवारी, निवडणूक प्रक्रिया सहभाग, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदान प्रक्रियेत लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत स्थानिक प्रशासन लोकशाही पद्धतीने होत आहे. 

वर्ष २०२२ मध्ये दोन्ही केंद्रशासित प्रदेशांसाठी परिसीमन आयोगाची (Delimitation Commission) स्थापना झाली. त्यानुसार लडाख साठी १, जम्मू काश्मीर साठी ५ लोकसभा मतदारसंघांचे परिसीमन करण्यात आले. तसेच जम्मू आणि काश्मीर मध्ये ९० विधानसभा मतदारसंघांचे परिसीमन करण्यात आले. 

एप्रिल-मे २०२४ मध्ये लोकसभाच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूक राजकीय सभांपासून ते प्रत्यक्ष मतदान यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. निकाल जे काय लागायचे ते लागले.

विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भाजप बहुमताच्या जवळपास देखील नाही. किंबहुना भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी जिंकलेल्या जागांमध्ये जम्मू आणि काश्मीर खोरे, हिंदुबहुल जम्मू आणि मुस्लिमबहुल काश्मीर खोरे अशी स्पष्ट विभागणी दिसून येते. तो गहन, चिंतनीय विषय आहेच. 

अनेक देशांच्या निवडणूक प्रतिनिधींनी, निरीक्षकांनी जम्मू आणि काश्मिरातील सुरक्षित वातावरणातील मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेतला. 

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा भारताच्या भारताच्या संवैधानिक लोकशाही प्रक्रियेचा, सुरक्षा दलांचा हा एका अर्थी विजयच आहे. हा भारताच्या लोकांचा विजय आहे. हा भारताचा विजय आहे. 

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरुण भारत

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...