आकडे हे फसवे असतात. ते जे दाखवतात ते आकर्षक असतं पण ते जे लपवतात ते जास्त महत्वपूर्ण असतं. काय लपवतात आकडे? ग्रास रूटची परिस्थिती आणि प्रत्यक्ष आकडेवारी यात इतकी तफावत का आढळते? उत्तर साधं आहे, आकडेवारी काही विशिष्ट गृहीतकं, ठोकताळ्यावर आधारलेली असते. भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगात सर्वाधिक वेगाने वाढते आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर ७-७.५% इतका आहे. इतर विविध आर्थिक आघाडीवरील आकडेवारी सकारात्मक आहे. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? २०-२२% जनता दारिद्र्यरेषेखाली जगते, ४५% शहरीकरण आहे पण शहरे बकालपणाकडे झुकत चालली आहेत. बेरोजगारी, गुन्हेगारी इत्यादींच प्रमाण प्रचंड आहे. हे झालं राष्ट्रीय पातळीवर. विविधतेनं नटलेल्या या भारतात काही प्रदेश असे आहेत जे राष्ट्रीय सकारात्मक आकडेवारीत मोलाची भर घालतात. त्यातल्या काहीचं दुर्दैव असं की ते उर्वरित भारताकडून दुर्लक्षित राहिले. म्हणूनच त्यापैकी काही राज्यांचा अभ्यास दौरा आम्ही केला. त्यातलं पाहिलं राज्य त्रिपुरा.
संपूर्णतः जमिनीने वेढलेला, वर्षभर वाहणाऱ्या नद्यांची खोरी, जवळजवळ ६५% भूभाग जंगलांनी व्यापलेला, भारताच्या ईशान्येला असणारा निसर्गसुंदर प्रदेश त्रिपुरा. प्रदेशाची जवळजवळ ८०% सीमा बांगलादेशाशी लागून, उरलेल्या २०% मध्ये आसाम आणि मिझोरम. काय सांगते या राज्याची आकडेवारी? २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरतेच्या बाबतीत केरळच्या खालोखाल त्रिपुराचा दुसरा क्रमांक होता. ( साक्षरता ८९%) २०११ च्या आकडेवारीनुसार त्रिपुरा साक्षरतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर गेलं आहे. (साक्षरता ९४%) Educational Enrollment १००% आहे. ही सकारात्मक आकडेवारी. पण मग वास्तव काय? याचप्रकारचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही त्रिपुराची राजधानी, जे ईशान्य भारतातलं गुवाहाटीच्याखालोखालचं मोठं शहर आहे, अगरतळा येथे डॉ. संदीप महात्मे (IAS), मोहीम संचालक (Mission Director ), राष्ट्रीय आरोग्य मिशन यांना भेटलो. साक्षरतेसंबंधातली आकडेवारी आणि त्याअनुषंगाने येणारा प्रश्न 'रोजगार', विचारल्यावर महात्मे सरांनी सांगितलं,
'प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण यात enrollment १००% आहे ही गोष्ट खरी आहे पण १२वी नंतर शैक्षणिक गळतीचं प्रमाण खूप जास्त आहे. साक्षरतेच्या आकडेवारीसाठी प्राथमिक शिक्षण हे गृहीतक महत्वपूर्ण मानलं जातं, पण पुढचं काय? पुढची गळती आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा, आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात तफावत आहे. मनुष्य माध्यमिक शिक्षण घेतलेला आहे म्हणून तो तांत्रिक आणि उच्च पदावरील नोकऱ्यांसाठी पात्र असेलच असे नाही.'
'रोजगाराच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, उत्पादन क्षेत्र आणि वाहतुकीच्या सोयी महत्वपूर्ण ठरतात. त्रिपुराची परिस्थिती काय आहे? दळणवळणाचा एकाच मार्ग 'चिकन्स नेक'-सिलीगुडी चानेल, गुवाहाटीहोऊन येणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४ किंवा अगरताळा विमानतळ. त्रिपुरा राज्यात अंतर्गत रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रत्येक छोट्या घटकापर्यंत पोचलेल्या आहेत. आसाममधील, रस्त्याने किंवा रेल्वेमार्गाने ( जुना मीटर गेज) त्रिपुरा उर्वरित भारताशी जोडला गेलेला आहे. तिथल्या रस्त्यांची अवस्था, insurgent movements यामुळे त्रिपुराच्या विकासावर मर्यादाच येतात. संपूर्ण ईशान्य भारत पर्यटन उद्यागासाठी नंदनवन ठरावा असा आहे, पण पायाभूत सुविधांचा अभाव, 'गुवाहाटी-अगरताळा पर्यटन कॉरिडोर' विकासाच्या मधला अडथळा आहे.'
सद्यपरिस्थिती प्रचंड सकारात्मक आहे. का? त्रिपुरा काही वर्षांपूर्वी ३०% बंगाली आणि ७०% स्थानिक आदिवासी (देबबर्मा इत्यादी)असं लोकसंख्येचं प्रमाण असलेला होता. आता प्रमाण बरोबर उलट आहे. सीमा सुरक्षा बळ, आसाम रायफल्स, त्रिपुरा राज्य रायफल्स आणि त्रिपुरा राज्य पोलिस यांनी तेथील insurgency movements विविध पर्याय वापरून मोडून काढल्या. त्रिपुरा २००५ पासून ईशान्य भारतातलं एक शांत राज्य आहे. केंद्र सरकारची 'look East आणि Act East' धोरणं, त्यादृष्टीने होणारं पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे याचं चालणारं काम, यामुळे तेथील जनता सकारात्मकरीत्या भारताकडे, राष्ट्रीय विकासाकडे लक्ष ठेवून आहे. नुकताच ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी व्यापार वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने पडलेलं महत्वपूर्ण पाउल, बांगलादेशातलं चितगोंग बंदर खुलं करण्याचा निर्यय ईशान्य भारतासाठी आणि त्यातही त्रिपुरासाठी Game changer ठरणार आहे.
डॉ. संदीप महात्मे यांना नुकताच 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' मधील उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ते उत्तम काम काय? महात्मे सरांच्या कार्यालयात त्यासंदर्भातील सादरीकरण एका अधिकार्यांनी केलं. गरोदरपणाच्या काळातील अपुरं पोषण आणि काही गरोदरपणातील Complications मुळे जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये जन्मतःच काही दोष आढळतात. उदाहरणार्थ ओठ चिरलेला, पाय वाकडा, अपुरं वजन इत्यादी. हे दोष विशिष्ट काळात बहुतांश वेळा शस्त्रक्रिया न करता बरे केले जाऊ शकतात पण त्यासाठी अशा केसेस मुळात समोर येणं गरजेचं असतं. त्यासाठी महात्मे सरानी 'Mobile Health Team' स्थापन केल्या. छोट्यातल्या छोट्या आदिवसी वस्तीपर्यंत जाउन, ९ महिन्यात ९२४८२ बालकांचा सर्व्हे केल्यानंतर २३% बालक काही दोष असणारे आढळले. त्यापैकी बहुतांश बालकं शस्त्रक्रिया न करता योग्य उपचारांमुळे बरी करण्यात आली आणि ९८९ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता ते सर्व सामान्य जीवन जगू शकत आहेत. या कार्यक्रमासाठी आरोग्य, शस्त्रक्रिया शिबिरांसाठी तज्ञ्य डॉक्टर गुवाहाटी, कोलकातामधून बोलावण्यात आले होते . योग्य नेतृत्व, सहकार्य आणि इच्छाशक्ती खूप मोठा परिणाम घडवू शकते.
पर्यटन, नैसर्गिक वायू, स्थानिक बांबू उद्योग, चहा इत्यादी क्षेत्रात त्रिपुरा, ईशान्य भारतात प्रचंड Potential आहे. गरज कसली आहे? सकारात्मक इच्छाशक्ती, ज्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात काम तिकडे सुरु आहे. सर्व राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करणे, गुवाहाटी-सिल्चर-अगरताळा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग खूप सकारात्मक परिणाम घडवणार आहेत. त्रिपुरातून हद्दपार झालेली insurgency, आसाम-मिझोरम इत्यादी भागात त्याविरोधात चालणार्या धडक मोहिमा यामुळे सगळ्यात महत्वपुर्ण गोष्ट साधली जाइल ती ईशान्य भारत उर्वरित भारताशी जोडला जाइल. त्या प्रदेशात इतकी सकारात्मकता आहे तर कमी कशाची आहे? उर्वरित भारतचं आणि खास करून माध्यमांचं दुर्लक्ष ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. Potential आहे, सकारात्मकता आहे आता गरज आहे राजकीय, सामाजिक, आर्थिक इच्छाशक्तीची.
मस्त.... अजून वाचायला आवडेल...
ReplyDelete👍👍😊
ReplyDelete