Skip to main content

त्रिपुरा: भाग २


                       

                         ईशान्य भारत. फक्त बावीस किलोमीटर रुंदीच्या 'सिलीगुडी चानेल' किंवा 'चिकन्स नेक'ने उर्वरित भारताशी जोडलेला आहे. या एका चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्यातून रस्ते, रेल्वेमार्ग सर्वकाही जातं. राजकीय, सामाजिक, आर्थिक उलाढाली होतात. आर्थिक उलाढाली होतच राहतात. त्याचं प्रमाण आणि देशाच्या एकंदर सकल उत्पादनातील वाटा अत्यंत कमी आहे. का? सामाजिक आणि राजकीय करणं आहेत. लोकसंख्या कमी आहे. आसाम वगळता इतर सर्व राज्यांतील लोकसंख्येची घनता अत्यंत कमी आहे. संसदेतील प्रतिनिधित्व(संख्यात्मक) कमी, त्यातही विविध राज्यातील स्थानिक समाजकारण आणि राजकारण आजवर केंद्र सरकारचं एकंदर दुर्लक्ष, विघटनवादी गट आणि त्यांच्या कारवाया त्या प्रदेशाला अधिक मागासलेपणाकडे घेऊन गेल्या. पण हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. त्यातल्या सकारात्मक बदलाकडे झपाट्याने वाटचाल करणाऱ्या त्रिपुरा राज्याच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान डॉ. संदीप महात्मे यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन, त्रिपुरा राज्य संग्रहालय( उज्जयंता राजवाडा) काही क्षणाचा उशीर झाल्यामुळे हुकलेला भारत-बांगलादेश सीमेवरील ध्वज कार्यक्रम असं झाल्यानंतर पुढल्या प्रवासास रवाना झालो. 
           पुणे ते मुंबई, मुंबई ते हावडा, कोलकाता ते अगरताळा असा प्रवास, अगरताळा मधील विविध भेटीगाठी झाल्यानंतर प्रवासातला पुढला टप्पा होता धर्मनगर, उत्तर त्रिपुरा जिल्हा. अगरताळाहून दुपारी निघालो. संपूर्ण ईशान्य भारतात सूर्योदय आणि सूर्यास्त एक ते दीड तास आधी होतो. ४.३०-५ वाजल्यापासून अंधार पडण्यास सुरवात होते. ईशान्य भारतातील विघटनवादी दहशतवादी आणि कारवायांचा इतर भागातील इतिहास आणि वर्तमान यांची तुलना करता त्रिपुरा शांत-सुरक्षित आहे. तरीही सीमा सुरक्षा दलाचे जवान रात्री प्रमुख रस्त्यांवर गस्त घालत असतात. त्रिपुरातील डोंगररांगांत भर जंगलात आमची गाडी काही किरकोळ बिघाडामुळे खोळंबली पण कसलाही धोका जाणवला नाही. सीमा सुरक्षा दलाचे गस्तीवरचे जवान भेटले, त्यांनी मदत केली. रात्री १०.३० च्या सुमारास धर्मनगर येथे पोचलो. थेट तेथील पोलिस अधीक्षक कार्यालयात, अधीक्षक अभिजित सप्तर्षी यांना भेटलो. त्यांच्यासोबत तिथेच रात्रीचे जेवण घेतले आणि त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तरांच सत्र सुरु झालं. 
             उत्तर त्रिपुरा. तुलनेने 'तरुण' असणारा त्रिपुरातील जिल्हा. भौगोलिक स्थान महत्वपूर्ण. वायव्य-पश्चिम-आणि नैऋत्येला बांगलादेशची सीमा आणि उत्तरेस आसाम. सप्तर्षी सरांसोबत बोलत असताना पहिला प्रश्न वर नमूद केलेल्या सुरक्षिततेच्या वातावरणाबद्दलच आम्ही विचारला, त्याला उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं, 
         'त्रिपुरातल्या Insurgency Movements मागची पार्श्वभूमी काहीशी वेगळी आहे. बहुसंख्य असणारा समाज, इतर राज्यातून, देशातून होणाऱ्या स्थलांतरामुळे अस्वस्थ आणि असुरक्षित झाला होता. विशेषतः १९७१ नंतर बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात बंगाली हिंदू यामुळे स्थानिक आदिवासी असुरक्षित झाले आणि गटांची, हिंसक कारवायांची सुरुवात, वाढ झाली. त्या मोडून काढण्यासाठी विविध पर्याय योजले गेले. आसाम रायफल्स, त्रिपुरा राज्य रायफल्स, पोलिस खातं आणि केंद्रीय निमलष्करी दले यांच्या धडक कारवाया. शरण येण्यासाठी दिलेली आश्वासनं ,त्यांचं योग्य पुनर्वसन यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया कमी झाल्या. सशस्त्र कारवायांबरोबर प्रशासन प्रत्येक छोट्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यातलं यश यामुळे आता दिसते ती शांतता आणि सुरक्षितता आहे.'
            या सविस्तर उत्तरानंतर साहजिकच पुढला प्रश्न होता, आता पोलिस खात्यापुढे कुठली आव्हाने आहेत? 
        ' जे इतर शांत प्रदेशात असतं तेच. कायदा आणि सुव्यस्था सांभाळणे. पण त्याहीपलीकडे उत्तर त्रिपुरा जिल्ह्याचा विचार करताना काही अधिक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या आहेत. त्या म्हणजे आसाममधील हिंसक गट, तिकडे कारवाया करून त्रिपुरात आश्रयाला येतात, त्यांचा शोध, त्यांना पकडणे, आसाम पोलिसांच्या ताब्यात देणे इत्यादी. त्याचबरोबर बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर काही ठिकाणी बंदिस्त नसलेल्या, नद्या-नाले असल्यामुळे बंदिस्त करता येऊ न शकणाऱ्या ठिकाणावरून होणारं स्मगलिंग आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखणे ही आव्हाने आहेत.'
         अशीच प्रश्न आणि अभ्यासपूर्ण उत्तरं हा सिलसिला सुरु असतानाच, ३१ डिसेंबर या तारखेला घड्याळात रात्री बारा वाजले. बाकी उभा देश पार्ट्या आणि सेलीब्रेशनमध्ये असताना आम्ही मात्र या मार्गदर्शनात गुंग झालो होतो. आजवरची सर्वोत्तम वर्षअखेर ती हीच अशीच सर्वांची भावना होती. 
          दिनांक १ जानेवारी, २०१६. सकाळी लवकर उठून, 'उनाकोटी' या प्रसिद्ध स्थळाला भेट दिली. खडकात खोदलेले शिव, विष्णू, गणपती, पार्वती आणि इतर अनेक पुतळे. मधून वाहणारा पाण्याचा ओढा, चहुबाजूंनी घनदाट जंगल, शांतता. अविस्मरणीय आहे ते सगळं. त्या शांततेत पवित्रतेची भर घालत त्या नितांतसुंदर ठिकाणी उपासना केली आणि अभिजित सप्तर्षी सरांच्या घरी गेलो. त्यांच्यासोबत Brunch घेतलं. सप्तर्षी सर आणि त्यांचं कुटूंब सर्वांसोबत गप्पागोष्टी यात वेळ खूप छान गेला. अत्यंत आनंदात वेळ घालवल्यानंतर सरांचा निरोप घेऊन पुढल्या राज्याच्या दिशेने प्रवास सुरु करावयाचा होता. पुढलं राज्य होतं, आसाम.      

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...