Skip to main content

भारतीय शेती: निर्यातक्षम! तरीही मागे का?




       Is Indian agriculture victim of its past? भारतीय शेती आपल्याच भुतकाळाची बळी आहे काय? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्याला इंग्रजांचा काळ, तेव्हाची शेती आणि शेतकर्यांचं कंबरडं मोडणारी धोरणे यांचा दाखला दिला जातो. जो 100% खरा आहे. त्या काळात शेतीचं आणि एकंदरच भारताच्या अर्थव्यवस्थेचं अपरिमित नुकसान झालं. अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. स्वयंपूर्णतेकडून अन्नधान्य आयात करावी लागणारी शेती आणि अर्थव्यवस्था ही वाटचाल झाली. होणारच होती. कारण सम्पूर्ण व्यवस्थाच शोषणासाठी आखली गेल्यासारखी होती. पण स्वातंत्र्यानंतर काय? अर्थात स्वातंत्र्यानंतरही बराच काळ भारत अन्नधान्य आयात करणाराच देश होता. 80 टक्के जनता शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांवरच अवलंबून होती. भांडवल जवळ जवळ नाहीच. आधुनिक तंत्रज्ञान तर नाहीच नाही. तेव्हा पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीक्षेत्राला केंद्रस्थानी राखून धोरणे आखली गेली. भाक्रा- नांगल सारखी योजना कार्यान्वित झाली. त्या काळापुरती त्या क्षेत्रात धुगधुगी निर्माण झाली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून मात्र अवजड उद्योग, त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक झाली. उद्योगक्षेत्राची वाढ गरजेची होती का? तर होती, पण त्याचा अर्थ शेतीकड़े दुर्लक्ष असा नसतो. 
            मागासलेल्या अर्थव्यवस्थेत, व्यवस्थेला चालना देण्यासाठी लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी दोन पर्याय असतात. एक, शेती क्षेत्रात भांडवल, तंत्रज्ञानाची गुंतवणूक करणे. दोन उद्योगक्षेत्र वाढ़वून त्यात अधिकाधिक गुंतवणूक करणे. भारताने दूसरा मार्ग स्वीकारला. हा दूसरा मार्ग स्वीकारत असताना शेती क्षेत्र एकाधिकार योजना आणि 'कोटा-लेव्ही'च्या चक्रात अडकत गेलं. किंवा अडकवलं गेलं. उद्योगक्षेत्राची वाढ करताना खासगी उद्योजकता काही नगण्य क्षेत्रांपुरती मर्यादित करून त्या दिशेने शेती क्षेत्राकड़े झिरपू शकणाऱ्या पैसा, क्रयशक्ती आणि भांडवल उभारणीची क्षमता मारली गेली. 1960-70 च्या दशकात हरित क्रांती झाली. अन्नधान्याच्या बाबतीतली स्वयंपूर्णता तेव्हापासून कायम आहे. सर्व ऐतहासिक माहिती आणि कालानुरूप होत गेलेल्या सुधारणा, बदल लक्षात घेता भारत आता 70% शेती उत्पादनांच्या बाबतीत निर्यातक्षम झाला आहे. ह्या निर्यातक्षमतेचा योग्य वापर होतो आहे काय? हा प्रश्न महत्वपूर्ण आहे.
            केन्द्रीय उद्योग व व्यापारमंत्री सुरेश प्रभू यांनी भारताच्या निर्यातीत वाढ होण्यासाठी विविध उपाययोजना आणि संभावित क्षेत्र यांचा आढावा घेतला. शेतमालाच्या निर्यातीमुळे भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तुंच्या संख्येतच फ़क्त वाढ होणार नाही तर शेती क्षेत्राच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. 2016-17 ह्या वर्षात धान्य, गहू, तांदुळ आणि मक्याचे प्रचंड उत्पादन झाले आहे. त्याचबरोबर तुर आणि इतर डाळींच्या उत्पादनातदेखील भरगोस वाढ झाली आहे. 2016 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने 'आंतरराष्ट्रीय दाळ वर्ष' म्हणून घोषित केले होते. भारतातदेखील त्या काळात दाळीच्या, त्यातही तुरीच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता, त्याचप्रमाणे सरकारी प्रोत्साहनामुळे तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. उत्तम पावसामुळे उत्पादन प्रचंड झाले. 2017-18 ह्या वर्षात देशांतर्गत मागणी 29.9 लाख टन आहे. उत्पादन 40 लाख टनाच्या आसपास आणि मागील वर्षीचा शिल्लक साठा 22.76 लाख टन आहे. एवढी अतिरिक्त तुर उपलब्ध असताना 2 लाख टन आयात केली गेली. (सदर आयात मोझाम्बिक, म्यानमार इत्यादी देशांतून दीर्घकालीन द्वीराष्ट्रीय संबंध निर्माण करण्यासाठी व जपण्यासाठी आणि पुर्वीच झालेले करार यांमुळे केलेली आहे, हेही नमूद करणे आवश्यक आहे.) त्याचवेळी भारतातून तुरीच्या निर्यातीवर मात्र विशिष्ट वजनाचे बंधन. परिणाम, सरकारने हमीभाव जाहीर केले ते 5,400 रूपये प्रती क्विंटल पण अतिरिक्त पुरवठ्यामुळे प्रत्यक्षात भाव 3,500 रूपये प्रती क्विंटलपर्यन्त उतरले. 
            भारत तेलबिया आणि खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यात अर्जेंटीना इत्यादी देशांतून आयात होणाऱ्या पामतेलाचा वाटा मोठा आहे. हे पामतेल मोहरी आणि इतर खाद्यतेलांत मिसळले जाते. भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलापेक्षा आयात केलेल्या पामतेलाची किंमत खूप कमी आहे. तेव्हा तेलबियां संबंधी देशांतर्गत आणि निर्यातसंबंधी योग्य धोरण असणे आवश्यक आहे. निर्यातीसाठी सातत्यपूर्ण आणि खुलं धोरण असणे आवश्यक आहे. फळे, भाजीपाला आणि मांस निर्यातीत भारत आघाडीवर आहे. फळांत प्रामुख्याने पेरू, आंबा, द्राक्ष, काजूगरांची निर्यात होते. मांसनिर्यातीत मासे आणि लाल मांस ( मटण ते गोमांस) यांची निर्यात होते. 
             ही सर्व निर्यातक्षमता दिसत असताना ती आणखी वाढवताना खूप अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. काही अड़थळे सरकारी पातळीवर आहेत, काही ग्राहक पातळीवर आहेत तर काही नैसर्गिक पातळीवर आहेत. सरकारी पातळीवरील अडथळ्यांचा विचार करत असताना जाणवणारी प्रमूख गोष्ट म्हणजे म्हणजे शेतमालासंबंधीची ग्राहककेंद्रीत धोरणे. ग्राहकांच्या बाजुला झुकणाऱ्या धोरणांचं एक उदाहरण म्हणून तुरीकडेच बघता येईल. 2015 च्या शेवटी आणि 2016 मध्ये तुरीचे किरकोळ बाजारातील भाव 200 रूपये प्रती किलोपर्यंत पोचले. तेव्हा सरकारने एका बाजुला वाढीव हमिभाव आणि इतर प्रोत्साहने देत तुरीच्या अधिक लागवडीसाठी शेतकर्यांना उद्युक्त केले. दुसऱ्या बाजूला राखीव कोट्यातील तुर बाजारात आणली. तसंच विविध देशांबरोबर आयातीसंबंधातील करार केले. हे सर्व करत असताना तुरीच्या खरेदी काळातील घोटाळा/ गैरव्यवहार ही गोष्ट वेगळीच. तेव्हा शेतकर्यांना अधिक उत्पन्न मिळावे यासाठी निर्यातीवरील अनावश्यक बंधने उठवणे आवश्यक आहे. महागाई नियंत्रण आणि शेतकर्यांचं हित असा सुवर्णमध्य काढण्याची तारेवरची कसरत आवश्यक आहे. 
          कृषीअर्थशास्त्र अभ्यासक अशोक गुलाटी 'फार्म टू फ़ॉरेन' ह्या सूत्रांतर्गत विविध उपाय सुचवतात. शेतमाल निर्यात होणाऱ्या जागा ( बंदरे, सीमेवरील व्यापार क्षेत्रे इत्यादी) आणि कृषउत्पन्न बाजार/संस्था यांना योग्य प्रकारे जोड़णे. साठा करण्याच्या मर्यादा उठवणे. 'व्हॅल्यू चेन' उभ्या करण्यासाठी प्रोत्साहन इत्यादी उपायांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोल्ड स्टोरेज, गोदामांची साखळी उभी करणे, कृषीउत्पन्न आणि शेतकरी यांच्यासाठी ती रास्त दरात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. फळे, भाजीपाला इत्यादी वस्तू कृषीउत्पन्न बाजार समितीच्या कक्षेतून बाहेर काढत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊले विविध राज्य सरकारांनी टाकली आहेत. त्याचप्रमाणे जमीनधारणा आणि शेतजमीन भाड़ेकरारावर (Land Leasing) देण्यासंबंधीच्या कायद्यात सुधारणा होणे आणि त्या सुधारणा योग्य रीतिने अंमलात आणणे आवश्यक आहे. जमीन धारणा आणि भाड़ेकरारा संबंधीच्या कडक कायद्यांमुळे अल्पभूधारक शेतकर्यांची भांडवल उभं करण्याची क्षमता घटते. आधुनिक तंत्रज्ञान वापरत शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकर्यांकड़े भांडवल असण्याची गरज आहे. ते भांडवल कर्ज नाही तर अतिरिक्त उत्पन्नातुनच उभं राहु शकतं.
         हे भांडवल उभं राहण्यासाठी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळणे, अतिरिक्त नियंत्रणमुक्त बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. ही बाजारपेठ ई-नाम सारख्या उपायांतून देशांतर्गत आणि खुल्या,सातत्यपूर्ण निर्यातधोरणांमुळेच मिळु शकणार आहे. त्यादृष्टीने योग्य पाऊल सरकारचे पडत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे.

पूर्वप्रसिद्धी: चाणक्य मंडल परिवार: स्पर्धा परीक्षा मासिक 

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...