Skip to main content

पंजाब नॅशनल बँक: आर्थिक क्षेत्र हादरवणारा घोटाळा






                भारतीय आर्थिक क्षेत्र मोठ्या संक्रमणाच्या काळातून जात आहे.1991 च्या आर्थिक सुधारणांनंतर भारतीय अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलली. स्वातंत्र्यानंतरच्या चार दशकांपासून बसलेली घडी पूर्णपणे बदलली . .1991च्या मोठ्या आर्थिक सुधारणांनंतर दोन दशके नवी व्यवस्था मूळ धरत गेली आणि त्यासाठीच्या बारीकसारीक सुधारणा होत गेल्या. त्यानंतर 2016 आणि 2017 ही वर्षे 'जबरदस्त घुमाव' देणारी ठरली. दरम्यानच्याच काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतातील बँकांत 'ऍसेट क्वालिटी रिव्ह्यू' करण्यात आला. त्यानुसार बँकांतील प्रचंड प्रमाणातील अनुत्पादक कर्जे बाहेर आली. त्या अनुत्पादक कर्जांचा आकडा 10 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. त्याच वेळी बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि बुडालेली, अनुत्पादक कर्जांच्या रकमेतून जास्तीत जास्त रक्कम वसूल व्हावी यासाठी रिझर्व्ह बँक विवीध योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पुनर्भांडवलीकरणाची योजना अंमलात आणत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील संबंध बँकिंग आणि आर्थिक विश्वात खळबळ माजवणारा पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीस आला आहे. सदर घोटाळ्यातील अफरातफरीची रक्कम 11,400 कोटी इतकी आहे(?). घोटाळा उघडकीस आल्यानंतर राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.  आर्थिक क्षेत्रात, शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरची किंमत तब्बल ९ टक्क्यांनी उतरली. एकरात्रीत गुंतवणुकदारांनी आपले 3000 कोटी गमावले. हे सर्व उघडकीला येण्याची सुरुवात पंजाब नॅशनल बँकेतून झाली आणि त्याचे इतर बँकेतील धागेदोरे समोर यायला सुरुवात झाली. ह्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी आणीबाणी पंजाब नॅशनल बँकेतील अधिकारी, कर्मचारी आहेत. सदर बेकायदेशीर व्यवहार 2011 पासून सुरु होते. तर काय आहे हा घोटाळा? कशा पद्धतीने केला गेला? कोण आणि कसे सामील होते? ह्याचे परिणाम काय? इत्यादी प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

उघडकीस आला कसा?
5 फेब्रुवारी रोजी पंजाब नॅशनल बँकेनेच मुंबई शेअर बाजाराला बँकेतील 280 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची कल्पना दिली . 14 फेब्रुवारी रोजी ह्याच बाबतीत अधिक पुढे जात आणखी गैरव्यवहारांची माहिती शेअर बाजाराला कळवण्यात आली. हे गैरव्यवहार 2011 पासून सुरु होते असे ह्या माहितीत नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ह्या गैरव्यवहारांचे आंतरराष्ट्रीय स्वरूप समोर आले. आणि गैरव्यवहाराची रक्कम 1771.7 दशलक्ष डॉलर म्हणजेच11,400 कोटी रुपये असल्याचे समोर आले. ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या एकूण भांडवलाच्या एकतृतीयांश होती. वास्तविक ही रक्कम आणि गैरव्यवहार फक्त पंजाब नॅशनल बँकेपुरती मर्यादित नाही. भारतीय बँकांच्या परदेशातील शाखा आणि काही परदेशी बँकादेखील ह्या सर्वात आहेत. हा घोटाळा उघडकीस येण्यास पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदी यांच्या कंपनीला परदेशातून कच्च्या हिऱ्यांच्या आयातीसाठी 'पतपत्रे' (Letters of Understanding) तयार करण्यासाठी योग्य ती पडताळणी जानेवारी 2018 च्या शेवटी आणि फेब्रुवारी मध्ये केली तेव्हा ह्या आणि अशा कंपन्यांना पतपत्रे देताना कोणतेही तारण ठेवले गेले नाही. योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी झाली नसल्याचे लक्षात आले.

काय आहेत पतपत्रे  (Letters of Understanding)?

पतपत्रे ही एका बँकेने आपल्या ग्राहकाच्या वतीने, दुसऱ्या बँकेला दिलेली हमी असते. पतपत्र हे एकप्रकारे ग्राहकाला अल्पकालीन कर्जउभारणीसाठी दिलेली हमी असते. पतपत्रे मुख्यतः भारतातील व्यापारी, उद्योजक यांना परदेशातून कच्चा माल किंवा इतर वस्तू आयात करण्यासाठी जी रक्कम अदा करावी लागते त्या व्यवहाराच्या सुलभतेसाठी तयार केली जातात. ह्यात सर्व प्रक्रियेत मुख्यतः चार घटक समाविष्ट असतात. पतपत्र तयार आणि जारी करणारी बँक, ज्या बँकेला देण्यात आले आहे ती बँक, आयातदार आणि परदेशातील लाभधारक. ह्या पतपत्रांची मुदत30 दिवस ते 1 वर्ष असते. साधारणतः ती 180 दिवस असते. ही पतपत्रे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे 'सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबँक फायनांशियल टेलिकम्युनिकेशन' (SWIFT) ह्या प्रणालीद्वारे पाठवली जातात. SWIFT द्वारे पाठवणी झाली आहे याचा अर्थ बँकेने पतपत्र जारी करताना सर्व पडताळणी केली आहे आणि सर्व घटकांची त्यास संमती आहे.
          पतपत्रे येण्याच्या आधी अशा पद्धतीच्या व्यवहारांसाठी 'लेटर्स ऑफ कंफर्ट' जारी केली जात असत. जी आयातदाराच्या बँकेने आयातदारासाठी जारी केलेली असत. त्याअंतर्गत आयातदाराला अल्पकालीन 'कर्ज' मिळत असे. त्या विशिष्ट काळात त्या आयातदाराने निर्यातदाराला योग्य ती रक्कम अदा करणे आवश्यक असे. ह्यात उशीर किंवा अदा करण्यात चूक झाली तर जारी करणारी बँक मध्यस्थी करून व्यवहार पूर्ण करत असे. पतपत्रे आयातदाराला जागतिक बँकिंग क्षेत्राचे अवकाश खुले करून देतात. ज्याच्या जोरावर आयातदाराची अल्पकालीन खरेदी कर्ज उभारणीची मर्यादा वाढते.

नीरव मोदी आणि पंजाब नॅशनल बँक, गैरव्यवहार नेमके काय झाले? 

नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेने, नीरव मोदी यांच्या स्टेलर डायमंड्स ह्या कंपनीसाठी SWIFT प्रणालीद्वारे परदेशातील भारतीय बँकांच्या नावे पतपत्रे जारी केली. त्याद्वारे नीरव मोदी यांच्या कंपन्यांनी मोठमोठी अल्पकालीन खरेदी कर्जे विविध बँकां कडून उभारली. पण पंजाब नॅशनल बँकेने हे व्यवहार त्यांच्या कोअर बँकींग सोल्युशन (CBS) प्रणाली मध्ये दाखवले नाही. वास्तविक रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार प्लॅटिनम, पॅलॅडियम, ऱ्होडियम, चांदी आणि पैलू न पडलेले किंवा पाडलेले हिरे ह्या वस्तूंच्या आयातीसाठी खरेदी कर्जाची कालमर्यादा 90 दिवसापेक्षा जास्ती असता काम नये.  अशाच प्रकारचा एक व्यवहार पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रँडी हाऊस शाखेतून16 जानेवारी 2018 रोजी करण्याची विनंती सदर कंपन्यांनी केली होती. त्या वेळी बँकेने योग्य ती कागदपत्रे आणि व्यवहारासाठी नगद रकमेचे तारण असण्याची मागणी केली तेव्हा ह्या कंपन्यांनी आपण विना तारण, कागदपत्रे अशा पद्धतीचे व्यवहार करत असल्याचे नमूद केले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीचे जुने व्यवहार तपासले असता ह्यातील गैरव्यवहार पुढे  लक्षात आला आणि त्याचा आवाका प्रचंड मोठा होता. म्हणूनच उघडकीला येण्याची सुरुवात झाली ती 280 कोटी रुपयांचे गैरव्यवहार आहेत असे शेअर बाजाराला कळवण्यापासून. ह्या प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचा उपव्यवस्थापक दर्जाचा निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी यांना प्रथम अटक करण्यात आली. त्यानंतर हे अटकसत्र सुरूच असून पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि संचालक मंडळावर टीका केली जात आहे.

ह्या घोटाळ्याचे परिणाम? 

सर्वात पहिला आणि सर्वात महत्वपूर्ण परिणाम म्हणजे आधीच अनुत्पादक कर्जांच्या बोज्याखाली असणाऱ्या बँक अधिकच अडचणीत आल्या आहेत. रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार बँकांचे ताळेबंद साफ करून त्यांना पुन्हा कर्जवाटपासाठी सक्षम करण्यासाठी काम करत आहेत. त्यात ह्या घोटाळ्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. दुसरा परिणाम इतर बँका,  ज्यांनी पंजाब नॅशनल बँकेने जारी केलेल्या पतपत्रांच्या आधारे नीरव मोदी यांच्या कंपन्यांना जी कर्जे दिली बुडाल्यात जमा आहेत. ह्यात सार्वजनिक क्षेत्रातील अलाहाबाद बँक आणि खासगी क्षेत्रातील ऍक्सिस बँक आघाडीवर आहेत. त्या बँकांचे नुकसान पंजाब नॅशनल बँकेला भरून द्यावे लागणार आहे. तिसरा परिणाम शेअर बाजार आणि एकंदरच आर्थिक क्षेत्रावर झाला आहे. 36000 ची अत्युच्च पातळी गाठल्यानंतर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार सतत उतरतो आहे. त्यात हा घोटाळा बाहेर आल्यानंतर बँकांच्या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली. पंजाब नॅशनल बँकेचा शेअर 9 टक्क्यांनी उतरला. त्या बँकेचे भांडवल मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झाले.


पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक'

Comments

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं