Skip to main content

Chanakya on the concept of Nation Building

चाणक्य आणि राष्ट्रनिर्मितीची संकल्पना 






               'राष्ट्र'  ह्या  संकल्पनेची भारतीय  परिभाषाच  वेगळी आहे. ज्यावेळी समाज 'एकम सत विप्रा: बहुधा वदन्ति' ह्या संकल्पनेवर उभा राहू लागतो तेव्हा भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय भिन्नतेचा स्वीकार होतो. राजकीय उत्थानाचा इतरांचा अधिकार स्वीकारार्ह होतो तेव्हा प्राचीन भारतीय समाजात प्रदेशानुरूप, कालानुरूप अनेक राज्यपद्धती, राजकारणी होऊन जातात; तरीही राष्ट्र म्हणून भारतीय समाज, भारतीय उपखंड, काही अपवाद वगळता एक राहतो. ह्यात सामाजिक, राजकीय परिपकवता दिसून येते. सामाजिक-राजकीय परिपकवता हि सतत घडत राहणारी, होत राहणारी गोष्ट आहे. म्हणूनच 'भारत', 'भारतवर्ष' ह्याच्या व्याख्या राजकीय परिभाषेत कमी आणि भौगोलिक-सामाजिक-सांस्कृतिक परिभाषेत अधिक वेळा केल्या जातात. आधुनिक उपकरणे-संकल्पना  उपलब्ध नसताना 'भारतवर्षाची' व्याख्या 'आसेतुहिमाचल' अशी केली जाते, तेव्हा अभ्यास आणि सांस्कृतिक-सामाजिक विस्ताराची कल्पना येते. सिंधू-सरस्वती संस्कृतीपासून ते महाजनपदांच्या उदयापर्यंत, महाजनपदांपासून ते साम्राज्यांपर्यंत ते विविध राज्ये आणि मध्ययुगीन व्यवस्थेपासून ते आधुनिक संविधानाधिष्टित राज्यापर्यंत विविध राजकीय व्यवस्था नांदल्या, तरी राष्ट्र म्हणून अखंडता आहे. राजकीय परिभाषेतील 'चक्रवर्ती' ही संकल्पना इथे महत्वपूर्ण ठरते. वेदकाळापासून एक ना एक अनौपचारिक केंद्र, ज्याला 'चक्रवर्ती' म्हणता येईल, असे भारतात होते. वेदकालीन 'दाशराज्ञ' युद्धात विजयी ठरलेला भरत ते मगध साम्राज्य अशी चक्रवर्ती राजांची मोठी परंपरा भारतात आहे. ह्या राष्ट्रसंकल्पनेत, राष्ट्रनिर्माता म्हणून चाणक्य कोठे आणि कसा प्रभावी ठरतो?

             महाभारत युद्धाच्या काळातील अनेक गणराज्यांपैकी एक गणराज्य होते ते यादवांचे मथुरा. मगधापती जरासंधाचा जावई असलेल्या कंसाने ही गणराज्य व्यवस्था उलथवून तिथे राजेशाही स्थापन केली होती. मथुरेच्या गणराज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी कंसाचा वध  आवश्यक आहे. तो वध करण्यासाठी गेलेल्या यादवांच्या तुकडीचा सर्वमान्य नेता श्रीकृष्ण आहे. कंसवधानंतर मथुरेच्या शेती आणि गोपालन करणाऱ्या गणराज्यावर जरासंधाच्या फौजांचे वारंवार हल्ले होतात. ते हल्ले थोपवण्याची, प्रतिकार करण्याची यादवांची शक्ती नव्हती. तेव्हा त्यावर तोडगा काढणारा राजनीतिकार मुत्सद्दी श्रीकृष्ण आहे. तुलनेने दुबळे, त्यामुळे 'समान' पातळीवरून संबंध प्रस्थापित करता येईल असे पांडव आणि त्यांचे इंद्रप्रस्थातील राज्य म्हणजे, सध्याच्या भाषेतील 'बफर स्टेट' म्हणता येईल अशा राज्याची स्थापना करून जरासंधाच्या फौजांना अडथळा निर्माण करणे हा पहिला टप्पा. ते करूनही हल्ले कमी होत नाहीत तेव्हा संपूर्ण गणराज्यच मूळ भूमीपासून हलवण्याचा निर्णय यादव वंशाला आर्थिक-सामाजिक स्थिरतेकडे घेऊन गेला. गोपालकांचे गणराज्य मथुरा, द्वारकेत व्यापाऱ्यांचे गणराज्य झाले आणि समृद्ध झाले. परिस्थितीचे योग्य आकलन करून मुत्सद्दी पावले उचलणारा, प्रसंगी माघार घेणारा कूटनीतिज्ञ श्रीकृष्ण एक राष्ट्रनिर्माता ठरतो. ह्याच पार्श्वभूमीवर वास्तववादी, कठोर कूटनीतीज्ञ चाणक्य आपल्या काळाचा राष्ट्रनिर्माता ठरतो आणि पुढील निर्माणासाठी मार्गदर्शक, प्रेरक ठरतो.

             जग जिंकण्याची महत्वाकांक्षा घेऊन निघालेला अलेक्झांडर, भारताच्या उत्तर-पश्चिम सीमेवरील विखुरलेल्या राज्यांचा-गणराज्यांचा पराभव करत, त्या त्या प्रदेशात क्षत्रपांची स्थापना करत होता. अलेक्झांडरचे हे आव्हान थोपवण्याची काहीशा कमकुवत प्रादेशिक राज्यांची क्षमता नवहती. ती क्षमता असणारे साम्राज्य धनानंदाचे होते. धनानंदाचे मगध साम्राज्य एवढे महत्वपूर्ण आणि मध्यवर्ती होते कारण गंगा, घागरा आणि शोण ह्या नद्यांच्या प्रदेशातील सुपीक जमीन, नद्यांच्यामुळे सुलभ जलमार्ग आणि त्यातून पुढे खुला होणारा समुद्री मार्ग, शस्त्रास्त्र, स्थापत्यनिर्मितीसाठी महत्वपूर्ण असणारी खनिजसंपदेची उपलब्धता. बिंबिसार, अजातशत्रूपासून चालत आलेली बळकट सैन्य आणि प्रशासकीय व्यवस्था.  मात्र सम्राट धनानंद आपल्या साम्राज्याच्या आणि भारतवर्षाच्या सुरक्षेविषयी उदासीन-बेफिकीर आहे,  उन्मत्त आहे. अन्यायी आहे. चाणक्य त्याला सावध करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. तरीही धनानंद बेफिकीर-उन्मत्त आहे. ह्या पार्श्वभूमीवर चाणक्यच्याच अर्थशास्त्रातील संकल्पनेनुसार, चाणक्य राष्ट्रसुरक्षक आणि राष्ट्रनिर्माता ठरतो. 'कुटुंबाच्या कल्याणासाठी व्यक्तीचा किंवा व्यक्तीने त्याग करावा, गावाच्या कल्याणासाठी कुटुंबाने किंवा कुटुंबाचा त्याग करावा, राज्याच्या कल्याणासाठी गावाचा-प्रदेशाचा किंवा गावाने-प्रदेशाने त्याग करावा' हि सामाजिक संकलपना,  तर  राजा अन्यायी, उन्मत्त, प्रजा-राज्यरक्षणास असमर्थ असेल तर प्रजेने राजाची सत्ता उलथवून टाकावी. किंबहुना तो प्रजेचा हक्कच आहे. हि राजकीय संकल्पना. त्यानुसार चंद्रगुप्ताला हाताशी धरणे, त्याआधारे धनानंदाची सत्ता उलथवून चंद्रगुप्ताची स्थापना करणे हा त्या सुरक्षेचा-नवनिर्माणचा एक भाग झाला. त्यानुसार चंद्रगुप्ताने अलेक्झांडरचा क्षत्रप सेल्युकस निकेटरचा पराभव केला. राष्ट्रनिर्माणाचा दुसरा भाग आहे तो वैचारिक. चाणक्यांनी अर्थशास्त्र ह्या ग्रंथाची निर्मिती केली. त्यात चाणक्य स्पष्ट करतात की पूर्वीच्या तेहतीस राज्यशास्त्र विचारवंतांचा अभ्यास करून,  त्यात भर घालून सदर ग्रंथ सिद्ध करत आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ मार्गदर्शक आहे. त्यात प्रतिपादिलेल्या संकल्पनांवर आधारित राज्यव्यवस्था मौर्यांबरोबरच कमीअधिक प्रमाणात गुप्त, सातवाहन, वर्धन ते राष्ट्रकूट, चालुक्य, विजयनगर ते सर्वात महत्वपूर्ण शिवाजीच्या राज्यात आढळते.

           अकराव्या-बाराव्या शतकातील मुस्लिम अरब-तुर्कांच्या आक्रमणानंतर आणि दिल्लीत सल्तनत स्थापनेनंतर त्याला प्रत्युत्तर अवघ्या काही वर्षात सुरु झाले. १३१३ मध्ये खिलजी-मलिक काफूरच्या फौजांनी दक्षिणेत मदुराईपर्यंत धडक मारल्यानंतर, १३३० च्या दरम्यान विजयनगर साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली जाते. १५६५च्या तालीकोटच्या लढाईत विजयनगरचा पराभव होतो आणि शंभर वर्षाच्या आत शिवाजीचे राज्य आकार घेऊ लागते. मौर्यांनंतर सातवाहन,  गुप्त-वाकाटक, वर्धन, राष्ट्रकूट-पाल-प्रतिहार, चालुक्य- परमार- सेन,  होयसळ, राजपूत, यादव आणि विजयनगर अशा एका देदीपयमान परंपरेतल्या जुन्या संकल्पना मोडीत काढून नव्या व्यवस्था निर्माण करणारा,  चाणक्याच्या संकल्पनेतील वास्तववादी राजकारण करणारा आदर्श राजा शिवाजी ठरला आहे. त्याने चाणक्य वाचला-अभ्यासला होता; ह्या गोष्टीला पुरावा नाही, पण निर्माण  केलेली व्यवस्था बव्हंशी चाणक्याच्या संकल्पनेतीलच होती. कारण इतिहासशास्त्रीय दृष्टीने शिवाजीने जी व्यवस्था पुढे चालवली आहे ती विजयनगरची आहे. तो अर्थशास्त्रीय संकल्पनेलाच वारसा आहे. राजपूत ते यादव ही, शत्रू राजधानीच्या उंबरठ्यापर्यंत येईपर्यंत गाफील राहण्याची परंपरा नोंदीत काढून, गुप्तहेरांचे मजबूत जाळे पेरणारा, आपल्या पसंतीची युद्धभूमी निवडणारा, शत्रूने हल्ला करण्यापूर्वीच 'गनिमी काव्याने' हल्ले करणारा ( ज्याला पारंपरिक युद्धशात्रात 'कूटयुद्ध' अशी संकल्पना आहे. ती संकल्पना चाणक्य अर्थशास्त्रात अधिक विस्तृत मांडतो.) आरमार उभारणारा, प्रसंगी माघार घेणारा आणि स्वतःला अभिषिक्त छत्रपती घोषित करणारा राष्ट्रनिर्माता चाणक्याच्या संकल्पनेतील राजा शिवाजी आहे. 

             आधुनिक काळात चाणक्य राष्ट्रउत्थानात, राष्ट्रनिर्माणात मार्गदर्शक ठरतो. आधुनिक भारताच्या निर्माणात, उत्थानात सर्वात जास्त मार्गदर्शक ठरते ती परराष्ट्र संबंधाबद्दलची 'राजमंडल' ही संकल्पना. पुन्हा उत्कृष्ट उदाहरण शिवाजीचं आहे. शिवाजीने आपला सुरुवातीचा राज्यविस्तार केला तो आदिलशाहीच्या प्रदेशात. त्यावेळी मोगलांशी आणि कुतुबशाहीशी मुख्यतः मैत्रीचा-मुत्सद्देगिरीचा व्यवहार केला. आदिलशाही दुबळी झाली तेव्हा अदिलशाहीशी तह, कुतुबशाहीशी मैत्रीपूर्ण संबंध आणि राज्यविस्तार मोगलांच्या प्रदेशात. परराष्ट्र व्यवहारात परिस्थितीनुरूप होणारे बदल अभ्यासत वास्तववादी भूमिकेतून करार करणे-मोडणे प्रसंगी युद्ध करणे यात चाणक्याच्या 'राजमंडल' संकल्पनेचे अस्तित्व दिसून येते. ज्यावेळी  बदलणारी परिस्थिती आणि आडाखे यांचे आकलन चुकते किंवा अतिआदर्शवादी दृष्टिकोनातून अवलोकन होऊ लागते तेव्हा परराष्ट्रव्यवहाराचे मूळ सूत्र 'राष्ट्राच्या उद्दिष्टांच्या सुरक्षेसाठीचे राष्ट्रीय धोरण' ह्यात गल्लत-गफलत होऊ लागते. ह्या अतिआदर्शवादाचे परिणाम भारताने १९६२ च्या युद्धाच्या रूपाने भोगले. भारताची फाळणी केवळ एका देशाला नाही तर एका 'शत्रूदेशाला' जन्म देऊन गेली. त्यामुळे एक कायमचा शत्रू, जो लष्करीदृष्ट्या सज्ज आहे, ज्याला दुसऱ्या प्रबळ शेजाऱ्याचे पाठबळ आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा 'राजमंडल' संकल्पना पुढे येते. भारताच्या परराष्ट्र धोरणातील नवे महत्वपूर्ण सूत्र शेजार आणि विस्तारित शेजार (Extended Neighborhood) हे महत्वपूर्ण उत्तर आहे. तुलनेने दुबळ्या विस्तारित-दूरस्थ शेजाऱ्यांना सहाय्य देत, सहकार्य वाढवत शत्रूराज्यास शाह देणे हा महत्वपूर्ण पवित्रा आहे.
            सांप्रतकाळात  'राष्ट्र' हि संकल्पना मान्य नसणाऱ्या विचारधारा मानणाऱ्यांकडून होणाऱ्या प्रचारामुळे भारतीय राष्ट्राची संकल्पना पुन्हा दोलायमान होते आहे की काय असा प्रश्न पडावा. भारतीय राष्ट्र, भारतवर्ष हि पूर्ण संकल्पना सध्याच्या राजकीय व्यवस्थेत सीमांच्या आखणीमुळे बदलली असली तरीही 'आसेतुहिमाचल' खंडप्राय देश अस्तित्वात आहे. तो आधुनिक राज्यघटनेतही प्राचीन संस्कृती-सभयतेचा वारसा स्पष्ट करतो, सामाजिक कायद्यात समानतेचा हक्क प्रस्थापित करतो आणि मुख्य म्हणजे आजही प्राचीन इतिहासापासून चालत आलेला सांस्कृतिक वारसा पुढे चालवतो आहे. दहशतवाद, माओवाद ते इतर राष्ट्रविघातक शक्तींचा दबाव वाढतो आहे. प्रबळ शेजारी चीन आक्रमक पावले टाकतो आहे, तेव्हा राष्ट्रनिर्माता म्हणून चाणक्य मार्गदर्शक ठरतो. गुप्तहेर आणि सुरक्षा संस्थांचे सक्षमीकरण हा महत्वपूर्ण घटक आहे. लष्कराचे आधुनिकीकरण आणिबळकटीकरण, देशांतर्गत व्यवस्थांचे सक्षमीकरण, प्रजेची आर्थिक उन्नती आणि कायद्याचे राज्य हे इतर महत्वपूर्ण घटकही यात आहेत.
          मुंबई १९९३ ते मुंबई २००८ ते पठाणकोट आणि ईशान्य भारतातील विविध बॉम्बस्फोट आणि दहशहतवाडी हल्ले भारताने सोसले आहेत. जवळ जवळ अशा प्रत्येक घटनेनंतर देशांतर्गत गुप्तचर संस्था 'इंटेलिजन्स ब्युरो' आणि देशाबाहेरील माहितीसाठीची गुप्तचर संस्था 'रॉ' " आम्ही योग्य वेळी सूचना दिली होती.." असे वक्तव्य करते. पण मग पोलीस यंत्रणा योग्य ती काळजी घेत नाहीत? ह्याचाच अर्थ ह्या संस्थांत योग्य ताळमेळ नाही. जानेवारी २०१६ मधला पठाणकोट हवाई तळावरचा हल्ला याची साक्ष देतो. तरीही कालांतराने आता पठाणकोट वगळता भारताच्या तुलनेने शांत भागात कुठलाही मोठा दहशहतवाडी हल्ला नाही. काश्मिरात लष्कराला आणि गुप्तचरांना मोकळीक दिल्यानंतर दहशतवादी संघटना आणि कारवाया यांवर अंकुश ठेवला जात आहे. देशविघातक वामपंथी संघटनांनी जातीय-धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलनातून अराजक माजवण्याचा प्रयत्न केला. जे पुढील काळात अधिक वाढत जाणार आहेत. परिणामी गडचिरोलीतील माओवादविरोधी यशस्वी कारवाई आणि माओवाद्यांचे शहरी नेतृत्व यांची अटक महत्वपूर्ण ठरणार आहे.
            भारत आपल्या सांस्कृतिक उत्कृष्टतेची ओळख जगाला करून देत आहे. बहुसांस्कृतिक एकटा आणि योग्य यांचा ह्यात महत्वाचा वाट आहे. पण ह्यांचा प्रचार आणि ' Soft Power'चा बोलबाला बळ नसताना होत नाही. आज भारतासह जगातली तरुण पिढी अमेरिकन वस्तू, आचार विचारांचे अंधानुकरण करते आहे ते अमेरिकेकडे आर्थिक आणि लष्करी बळ आहे म्हणूनच. बळवंताच्या दयाभावनेला काही अर्थ असतो. तसाच बळवंताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न इतर करतात. जगात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला, त्याची सुरुवात मुख्यतः सम्राट अशोकापासून झाली. त्यामागे चर्चा, हृदयपरिवर्तन वगैरे कारणे आहेतच पण मौर्य आणि त्यापुढच्या राज्यांची आर्थिक, राजकीय, सामरी आणि लष्करी सुबत्ता हे महत्वपूर्ण कारण आहे. भारतीय विचारातली राष्ट्रविषयक स्पष्ट संकल्पना, राजकारणाचे, राजनयाचे वास्तववादी आकलन आणि अंमलबजावणी, प्रजाहितकारी, योगक्षेम साधणारी कल्याणकारी राज्यव्यवस्था भारत उभारत आहे. या राष्ट्रउत्थानात आणि निर्माणात  चाणक्य कायमच मार्गदर्शक ठरत आला आहे. ठरत राहणार आहे. गरज आहे ती अवलोकनाची, आकलनाची.   

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...