Skip to main content

सुहेलदेव: - अमिश त्रिपाठी


"इंडियाज लिटररी पॉपस्टार" असे अमीश त्रिपाठी यांचे यथार्थ वर्णन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले आहे. या वर्णनास साजेशी अशीच अमीश यांची लेखन कारकीर्द आहे. पशुपती महादेवाच्या कथेकडे शक्य तितक्या मानवी दृष्टिकोनातून बघत त्यांनी कादंबरीस्वरूपात केलेली मांडणी 'शिव ट्रायोलॉजी' मधून पुढे आली आहे. रामायणाकडे देखील मानवी दृष्टिकोनातून बघत, त्यातील चमत्कृतीपूर्ण आश्चर्यांना फाटा देत, तीन प्रमुख पात्रे, राम-सीता आणि रावण यांच्या दृष्टीने तीन भागात कादंबरीमय रामायण त्यांनी मांडले आहे. याच मालिकेत त्यांचे पुढची कादंबरी आली आहे. ज्यात त्यांनी मध्ययुगीन भारतातील पराक्रमी परंतु काहीशा विस्मरणात गेलेल्या राजाची गाथा त्यांनी मांडली आहे. 

एक असा राजा ज्याने इस्लामच्या ध्वजाखाली अमानुष आक्रमणे करणाऱ्या तुर्कांच्या सैन्याचा सपाटून पराभव केला. असा राजा ज्याच्या पराक्रमामुळे पुढच्या दीडशे वर्षात तुर्की आक्रमकांचे भारतीय भूमीवर आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही. असा राजा ज्याने शक्य तेवढ्या सर्व राज्यांना, राजघराण्यांना एकत्र करून, सामूहिक लढा दिला आणि भारताच्या इतिहासात अजरामर झाला. त्या राजाला विसमरणात ढकलण्याचे, किंवा त्याच्या जात, प्रदेशापुरते सीमित करण्याचे पाप आपल्याकडून घडले. यापुढे तसे होऊ नये. भारताच्या इतिहासातील अशा पराक्रमी वीरांची गाथा कायम गायली गेली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणता येईल अशी ही अमीश यांची कादंबरीमय गाथा म्हणजे लिजंड ऑफ सुहेलदेव!

ही गाथा सुरु होते गझनीच्या महमूदाच्या सोमनाथवरील स्वारीपासून. भारतीयांसाठी पवित्र आणि महत्वपूर्ण असलेल्या सोमनाथच्या मंदीरावर अनेक वेळा स्वारी झाली. मंदिर अनेक वेळा उध्वस्त करण्यात आले ते केवळ संपत्तीसाठी नाही. त्यामागे निश्चित धार्मिक विचार होता. कमअस्सल मूर्तिपूजक आणि त्यांच्या मूर्तींना अस्तित्वात राहण्याचा काहीही अधिकार नाही यावर ठाम श्रद्धा असणारे मूलतत्त्ववादी मुस्लिम तेव्हा होते आजही आहेत. त्यात सुफी तत्वज्ञान मानणारे आणि इतर काही व्यक्तिविशेष हे अपवाद आहेत. भारतीयांना, हिंदूंना प्रिय असणाऱ्या मंदिरांवर, श्रद्धास्थानांवर हल्ला करून त्यांची लढण्याची, प्रतिकार करण्याची क्षमताच मारून टाकण्याची योजना वापरण्यात येत होती. 

सोमनाथवरील स्वारीचा प्रतिकार करण्यासाठी देशभरातून सैन्याच्या तुकड्या गेल्या होत्या. त्यात श्रावस्तीचा युवराज मल्लदेवाचा देखील समावेश होता. सोमनाथाची सुरक्षा करत असताना लढाईत मल्लदेव धारातीर्थी पडतात आणि युवराजपदासोबतच एक मोठी जबाबदारी मल्लदेवाचा धाकटा भाऊ सुहेलदेवावर येऊन पडते. सुहेलदेव एक पराक्रमी, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्याकांक्षी तरुण आहे. त्याने भारताच्या सीमेपलीकडून सातत्याने स्वाऱ्या करणाऱ्यांचा धोका ओळखला आहे. त्या आक्रमणांना स्वाऱ्या वेळीच पायबंद घालून मातृभूमीचे रक्षण करण्याची गरज त्याने वेळीच ओळखली आहे. त्यासाठी भारतातील विविध राजांची आणि राज्यांची मोट एकत्र बांधण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. पण जातींच्या क्षुद्र अभिमानापायी एकत्र येण्यात अडथळे आहेत. या सर्वांवर मात करत उत्तर भारतातील २१ प्रमुख राज्यांना आणि दक्षिणेतील मातबर चोळ साम्राज्याशी संपर्क करून त्यांचेही साहाय्य कसे मिळवतो हे मुळातून वाचण्यासारखे आहे. आक्रमकांची चाल ओळखून त्यांची चाल उलटवून बहराईच येथे गझनीचा सेनापती सालार मकसूदचा पराभव केला याची गाथा अमीश यांनी मांडली आहे. 

भारताला जशी पराक्रमी वीरांची परंपरा आहे तशीच शत्रूला चूड दाखवून घरात घेऊन संपूर्ण घराचीच वाताहत घडवणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांची देखील देदीप्यमान परंपरा आहे. क्षुद्र सामाजिक मानापमानांसाठी, स्थानिक राजकीय हिशेब चुकते करण्याच्या नादात शत्रूशी हातमिळवणी करण्याची आणि त्यातून शत्रूने आपल्या भूमीवरच ताबा घेतल्याची परंपरा आहे. ती परंपरा मौर्यपूर्व काळात अलेक्झांडरच्या स्वारीपासून ते इंग्रजांपर्यंत आणि आता प्रामुख्याने पाक-चीन पुरस्कृत पंचमस्तंभी कारवायांपर्यंत कायम आहे. या परंपरेतील काही उदाहरणे या गाथेत आढळतात. सुहेलदेवाचा पराक्रम आणि सर्वांना एकत्र करू शकण्याच्या क्षमतेमुळे गझनीच्या महमूदचा सेनापती सालार मकसूदचा पराभव झाला. त्यामुळे पुढली दीडशे वर्षं भारतावर मोठे आक्रमण झाले नाही. पुढे भारत पुन्हा जातीच्या अभिमानापायी फुटला आणि क्षुद्र स्वार्थापायी पुन्हा शत्रूला चूड लावून घरात घेतले तेव्हा पृथ्वीराजाचा पराभव झाला. भारत गुलामीच्या टाचेखाली गेला. या चुका टाळण्यासाठी, भारताला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सुहेलदेवासारख्या वीर पराक्रमींच्या गाथा सतत गायल्या, ऐकल्या गेल्या पाहिजेत. इतिहासाच्या उजळणीमुळेच भविष्यातल्या भक्कमतेची पायाभरणी होते. 

पहिल्या ओळीपासूनच ही कादंबरी वाचकाचे लक्ष वेधून घेते. कथानकावर खिळवून ठेवते. श्रावस्ती, कनौज, गझनी ते चोळांची राजधानी गंगकोंडचोलपूरम असा कथानकाचा मोठा पट आहे. तत्कालीन समाज, राजकीय परिस्थिती यांचे यथार्थ चित्रण कादंबरीत करण्यात आले आहे. उदाहरणार्थ भाषा. संपूर्ण भारतात विविध प्रदेशात विविध भाषा बोलल्या जात. पण संपूर्ण भारतात किमान प्रमुख राजकीय व्यक्ती, लोकांमध्ये होणार संवाद संस्कृतद्वारे होत असे. हे चित्र आजच्या भारताशी मिळतेजुळते आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात कुठलीही भाषा बोलली जात असो, बहुतांश भागात हिंदीद्वारे किंवा इंग्रजीद्वारे संवाद सुलभ होतो. 

भारतीय इतिहासाच्या पानापानांत अशा पराक्रमाच्या गाथा आहेत. इतके प्रयत्न करूनही इस्लामी आक्रमकांना भारतावर संपूर्ण नियंत्रण कधीही मिळवता आले नाही. इस्लामी आक्रमण उत्तरेत यशस्वी होत होते त्यावेळी दक्षिणेत यादव, होयसळ, काकतीय इत्यादी घराणी पराक्रम गाजवत होती. भारतीयत्वाची पताका फडकती ठेवत होती. या राजवटी जेव्हा इस्लामी आक्रमणापुढे पराभूत झाल्या तरी त्याच वेळी पूर्वेकडे आसाममध्ये अहोम सत्ता उदयाला येत होती. यादव, काकतीय आणि होयसळ साम्राज्य लयाला गेल्यानंतर अवघ्या काही वर्षात विजयनगरचे साम्राज्य उभे राहिले. विजयनगरचे साम्राज्य लयाला गेल्यानंतर अवघ्या शंभर वर्षांच्या आत महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आकार घेऊ लागले. म्हणजेच देशाच्या कुठल्या न कुठल्या भागात भारतीय राज्य, पराक्रम कायमच उभा राहत आला आहे. या पराक्रमाच्या गाथा राष्ट्रीय स्तरावर गाण्याची सुरुवात राणा प्रतापापासून सुरु होऊन शिवाजी, संभाजी, बाजीराव असे करत अनेक विस्मरणात गेलेल्या वीरांची गाथा समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्या अधिकाधिक पुढे येतच राहाव्यात. तूर्तास श्रावस्तीच्या राजाची, सुहेलदेवाची गाथा नक्की वाचावी. 
  

Comments

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं