भारत! हे हजारो वर्षांचा वारसा असणारा आणि तो समर्थपणे जपून ठेवणारे राष्ट्र आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाली. ती केवळ लष्करीच नव्हती तर धार्मिक, सांस्कृतिक देखील होती. भारतीय संस्कृतीचा स्वभाव सतत विस्तार करण्याचा आहे. तो विस्तार आक्रमणाद्वारे नाही तर सामावून घेऊन होणारा आहे. म्हणूनच कित्येक आक्रमकांना भारतीय परंपरेने आपल्यात सामावून घेतले आहे. त्याचबरोबर भारतीय परंपरा, भारतीय धर्मविचार हा आत्मोन्नतीवादी आहे. जिथे एकच एक ग्रंथ, प्रेषित आणि त्यांच्या आज्ञा यांच्या चौकटीत भौतिक जीवनातील वाटचाल ही पद्धत नाही. मुळात एक कुठलाही विशिष्ट ग्रंथ नाही. भारतीय परंपरा वेद वाङ्मय, उपनिषदे, आरण्यके, ब्राह्मण ग्रंथ यांच्याबरोबर भौतिक जीवनातील नियमन मांडणाऱ्या स्मृती आणि रामायण-महाभारत या ऐतिहासिक काव्यांना प्रमाण मानते. या सर्वांच्या चौकटीत आपला अध्यात्मिक, अधिभौतिक विकास आपल्या कुवतीनुसार, दृष्टिकोनानुसार करण्यास संपूर्ण वाव देते. त्याचबरोबर या चौकटीचे प्रामाण्य झुगारून देखील आपला विकास साधण्याच्या स्वातंत्र्याचे स्वागत करते. म्हणूनच चार्वाक, बुद्ध आणि जैन भारतीय परंपरेत निर्माण होतात, रुजतात. वेद प्रामाण्य नाकारले तरी या भारतीय पंथांची मूलभूत रचना 'आत्मोन्नतीवादी'च आहे. या सर्व तात्विक पार्श्वभूमीनंतर एक गोष्ट अधिक स्पष्ट करणे आवश्यक ते म्हणजे वेद-उपनिषद वगैर ग्रंथ वंदनीय असले, त्यांचा वारसा अजूनही सुरु असला तरी लोकांच्या मनात आणि आचरणात रामायण-महाभारताचा खोलवर ठसा आहे. कारण आसेतुहिमाचल रामकथा आणि महाभारत कथा प्रत्येकाला ठाऊक आहे. इतर कशाहीपेक्षा लॉकडाऊनच्या काळात रामायण आणि महाभारत या दूरदर्शन वरील मालिकांच्या पुनःप्रक्षेपणाला मिळालेला प्रतिसाद पुरेसा बोलका आहे. हे सर्व असले तरी या महाकाव्यांचा, त्यांतील व्यक्तींचा रोजच्या आयुष्याशी, वागण्या बोलण्याशी काही संबंध आहे का? त्यांचा रोजच्या आयुष्यात आचरणासाठी अन्वयार्थ लावता येतो का? याच प्रश्नांची रंजक उत्तरे अमिश त्रिपाठी आणि भावना रॉय यांनी आपल्या 'धर्म:डिकोडिंग द एपिक्स फॉर या मिनिंगफ़ुल लाईफ' या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.
रामायण आणि महाभारत तसेच इतर अनेक भारतीय काव्य-कथांमधील व्यक्ती, पात्रे अभ्यासकांना कायमच भुरळ पाडतात. एकेका पात्राच्या दृष्टिकोनातून रामायण किंवा महाभारताची कथा उलगडण्याचा प्रयत्न अनेक लेखकांनी केला आहे. त्यात अमिश यांचीच रामचंद्र मालिका उल्लेखनीय आहे. पण हे उलगडणे कादंबरी, म्हणजे ज्याला फिक्शन म्हणता येईल या प्रकारात झाले आहे. त्याचबरोबर या पात्रांचा चिकित्सक पद्धतीने देखील अभ्यास करून तो मांडलेला आहे. मराठीत तर दुर्गा भागवत, इरावती कर्वे, नरहर कुरुंदकर आणि दाजी पणशीकर अशा अभ्यासकांनी सुंदर मांडणी केली आहे. पण फरक असा पडतो की ती मांडणी काहीशी क्लिष्ट, चिकित्सक आणि खूप खोलात जाऊन केलेली आहे. अमिश आणि भावना रॉय यांचे ताजे पुस्तक इंग्रजीत आहे आणि काहीसे वेगळे आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी आपले बालपण, शिक्षण यांची ओळख करून दिली आहे. घरात संस्कृत काव्ये, ग्रंथांचा अभ्यास असणारी, त्या कथा, त्यातील मर्म उलगडून सांगणारी वडील मंडळी आणि इंग्रजी-कॉन्व्हेंट शाळांत या भारतीय परंपरांची करून दिली जात नसलेली ओळख हा विरोधाभास त्यांनी मांडला आहे. म्हणूनच नव्या पिढीसमोर काहीशा परंपरागत पद्धतीने या महाकाव्यांतील व्यक्तींचा अन्वयार्थ मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. भारतीय परंपरेत उपनिषद ग्रंथांमध्ये तत्वज्ञानाची सखोल चर्चा केली आहे. ही चर्चा, तत्वज्ञानसंबंधी काही मूलभूत प्रश्न, त्याचे उत्तर, मतभेद, युक्तिवाद या स्वरूपात आहे. या पुस्तकात लेखकद्वयीने नचिकेत, गार्गी, गार्गीचे वडील धर्म राज आणि आई लोपामुद्रा या काल्पनिक पात्रांमध्ये घडणाऱ्या चर्चा, वाद, युक्तिवादांच्या आधारे अर्थपूर्ण जगण्याचा अन्वयार्थ मांडला आहे.
भारतीय परंपरेत 'धर्म' या संकल्पनेचा अर्थ वेगळा आहे. वेगवेगळ्या संदर्भात धर्म या संज्ञेचा अर्थ वेगळा होतो. तो कर्तव्य, न्याय, नीती अशा वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तसेच 'कर्म' या संज्ञेचे देखील वेगवेगळे अर्थ नसले तरी स्वरूप वेगवगेळे आहे. 'व्हॉट इस कर्म एनीवे?' या प्रकरणात कर्म या संकल्पनेविषयी चर्चा केली आहे. कार्य करत राहणे हे 'कर्म' आहे. पण ते कार्य करणे आत्मोन्नतीसाठी असावे असा विचार मांडत ती चर्चा सुरु होते, चीनपासून. चीनमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य, अविष्कार स्वातंत्र्य यासाठी लिऊ शिआबाओ आयुष्यभर लढा दिला. त्यासाठी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला. ते आपले कर्म करत होते. दुसऱ्या बाजूला चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष आहे. ज्या पक्षाच्या सत्तेने ३० वर्षात ६८० दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. पक्ष देखील आपले कर्म करत होते. लिऊ शिआबाओ यांच्यापेक्षा जगाच्या पटलावर कम्युनिस्ट पक्षाचा ठसा मोठा नाही का? कोणते कर्म चांगले? अशा प्रश्नाने सुरु होणारी चर्चा प्राचीन ग्रीक वांङमयातील राजा मिनुस (Minos)च्या कथा सांगून पुढे सरकते. एकातून एक विषय, कथा पुढे जात वेदवती आणि रावणाची कथा येते. त्या कथेच्या अनुषंगाने कर्माचा विचार येतो. हे कर्म या विषयावर चर्चा करत असतानाच धर्म आणि स्वधर्माचा विषय सतत डोकावत राहतो आणि चर्चा 'स्वधर्म वर्सेस धर्म' या प्रकरणात प्रवेश करते. धर्म आणि कर्माचा संबंध, मर्म समजावून सांगताना गांधारीच्या कथेचा आधार घेण्यात आला आहे. गांधारची राजकन्या ते अंध धृतराष्ट्राशी विवाह आणि त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधून घेण्याचा निर्णय, या कथेच्या आधारे कर्म, धर्म आणि त्याग यांची संकल्पना मांडली आहे. धर्म, स्वधर्म आणि त्यागाची संकल्पना अधिक स्पष्ट, विस्तृत करण्यासाठी पितामह भीष्माची कथा आली आहे. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजन्म ब्रह्मचर्यव्रताची भीष्म प्रतिज्ञा हा निःसिम त्यागाचे, आज्ञाधारकतेचे उदाहरण की प्रतिज्ञा, प्रतिष्ठेचे उदात्तीकरण अशा विषयावर येत चर्चा 'द बर्डन ऑफ एनव्ही' या प्रकरणात येते.
असीम त्यागाचे, कर्तव्याचे, ब्रह्मचर्याचे प्रतीक भीष्म एकीकडे तर वासनेचा अनिर्बंध ओघ असणारा दुःशासन दुसऱ्या बाजूला आणि मध्ये कर्तव्यपालन आणि योग्य प्रमाणात गृहस्थाश्रमी कर्तव्य करणारा अर्जुन यांच्याद्वारे प्रतिज्ञेची दाहकता की मर्यादेत राहून परिपूर्ण आयुष्याचा उपभोग ही चर्चा केली आहे. द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी होती. पण भीमाचे द्रौपदीवर विशेष प्रेम होते. ते केवळ भोगापलीकडचे प्रेम होते, अशी मांडणी करत, स्पष्ट केले आहे की जेव्हाही सुरक्षेची आणि सूडाच्या प्रतिज्ञेची गरज पडली तेव्हा द्रौपदीने भीमाचा धावा केला. व्यक्तीचा स्वाभिमान, स्वाभिमानाला बसणारी ठेच आणि त्याचे होणारे पर्यवसान, एक तर युद्ध-वाद-संघर्षात होऊन सर्वनाशाकडे जाते किंवा क्षमाशीलतेकडे जाते. आयुष्यात सतत नाकारले गेल्याची भावना, उपेक्षेची भावना माणसाला एकतर कडवट बनवते नाही तर आत्मोन्नतीच्या परमोच्च बिंदूकडे नेणारी ठरते. काली, गणेश, कर्ण, द्रोण यांच्या कथेचा आधार घेत या संकल्पनेचा विचार करण्यात आला आहे. कर्तव्य, ऋण, नाते यांचे बंधन यामुळे मिंधेपण येते, लादले जाते की निष्ठा उत्पन्न होते आणि स्वीकारली जाते, या प्रश्नावर कर्ण, दुःशासन आणि कुंभकर्ण यांच्या कथांचा आधार घेत अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तात्विक चर्चा, नक्की कुणाचा मार्ग, दृष्टिकोन योग्य हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कुठल्याही निर्णयाप्रत येण्यापूर्वी सर्व बाजू, त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक असते. ही अशी पार्श्वभूमी भारतीय महाकाव्यांत जागोजागी आहे. ती समजून घेण्याची गरज आहे. तेव्हा जगण्याला काही एक अर्थ प्राप्त होऊ शकतो. महाकव्यांचा, त्यातील व्यक्तींचा अन्वयार्थ लावणे, समजून घेणे थोडे किचकट वाटू शकते, पण जर भारतीय परंपरेतील चर्चात्मक पद्धतीने, एकातून दुसरा विषय, दृष्टांत, कथांच्या आधारे मांडला तर अधिक सुलभ होते. हीच सहजता आणि सुलभता या पुस्तकात साधली आहे. एका विषयातून दुसऱ्या विषयात आपण अलगदपणे शिरतो. अतिशय प्रभावी मांडणीमुळे संदर्भ सुटत नाहीत. आकाराने लहान असले तरी आशयाने संपन्न असे हे पुस्तक आहे. अक्षरशः एका बैठकीत देखील अर्थाचा, तात्विक चर्चेचा आस्वाद घेत पूर्ण होऊ शकणारे आहे. एक वेगळाच अन्वयार्थ समोर उलगडत जात असल्यामुळे आपणही नकळत आपल्या आयुष्यात डोकावून पाहू लागतो. आपल्या आयुष्याचा काही एक वेगळा अर्थ समोर येऊ लागतो. आपण त्याच भारतीय परंपरेचे पाईक असल्याची जाणीव सुखावून जाते. त्या सांस्कृतिक समृद्धीची धारा आपण पुढे वाहून नेऊ शकू की काय असा काहीसा विश्वास वाटू लागतो. त्यामुळे अर्थपूर्ण जगण्यासाठी महाकाव्यांचा लावण्यात आलेला हा अन्वयार्थ वाचलाच पाहिजे.
पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरुण भारत
Comments
Post a Comment