Pic credit: Internet |
कुठलीही व्यवस्था ही दोन प्रमुख घटकांवर आधारित असते. एक म्हणजे व्यवस्था उभारणीमागील प्रेरक शक्ती आणि दोन, मार्गदर्शक शक्ती. हाच निकष अर्थव्यवस्थेस देखील लागू पडतो. जगाच्या पाठीवर अनेक प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत, प्रत्येकाची आपली अशी प्रेरक आणि मार्गदर्शक शक्ती आहे.
अमेरिकी अर्थव्यवस्था भांडवलशाहीचा पुरस्कार करते, उद्यमी धाडसीपणला प्रोत्साहन देते त्याचे कारण प्रेरणा व्यक्तीस्वातंत्र्याची आहे, Life, Liberty, and Pursuit of Happiness ची आहे.
जपान देखील चिवटपणा, उद्यमी प्रेरणांच्या आधारे जगात महत्वाच्या स्थानी आहे. ब्रिटिशांना दर्यावर्दी साहसाची प्रेरणा आहे.
चीन हा स्वतःला अभिमानाने Civilisational State म्हणवून घेतो. कम्युनिस्ट विचारधारा आणि हजारो वर्षांचा स्वाभिमानी इतिहास यांची अफलातून सांगड घालत त्यातून प्रेरणा घेत चीन आज जागतिक सत्ता झाला आहे.
याच धर्तीवर भारतीय अर्थव्यवस्थेमागील प्रेरक शक्ती, मार्गदर्शक शक्ती कोणती आणि त्यांचा भारताच्या वाटचालीत काय योगदान काय याचा विस्तृत विचार करण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे.
भारत हे देखील चीनप्रमाणेच हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेले राष्ट्र आहे. भारत सांस्कृतिक एकता-अखंडता असणारे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आधारावरील राष्ट्र आहे. प्रागैतिहासिक काळ ते सिंधू-सरस्वती संस्कृती, वैदिक काळ, महाजनपद, साम्राज्ये, आक्रमणे, गुलामगिरीचा कालखंड, आधुनिक काळ आणि आता उज्वल, वैभवशाली भविष्याकडे वाटचाल असा भव्य पट भारतीय अर्थव्यवस्थेचा आहे.
विविध कालखंडात विविध सम्राटांच्या कालखंडात, राजवटींच्या कालखंडात राजकीय अखंडता देखील झाली होती. पण बहुतांश काळ विविध प्रदेशात विविध राजघराणी राज्य करत असलेली दिसून येतात. त्यांच्या आपापसात लढाया होत असत, त्या वर्चस्वासाठी. असे असले तरी सामाजिक-आर्थिक व्यवस्था अगदीच किरकोळ फरक वगळता सारखीच होती. ती सारखीच होती म्हणजे काय होती?
भारतीय विचारात संपत्तीची कल्पना:
भारतीय संस्कृती-सभ्यतेचा पाया हे वेद वाङ्मय आहे. अभ्यासक श्री प्रसाद जोशी यांनी 'Concept of Wealth in Vedic Culture' या प्रदीर्घ लेखात वेदातील संपत्तीची कल्पना उलगडून सांगितली आहे. पुढील विवेचन त्यांच्या मांडणीच्या आधारेच केलेले आहे.
वेदात अभ्युदय आणि पुरुषार्थ अशा प्रमुख कल्पना मांडण्यात आलेल्या आहेत.
अभ्युदय यात व्यक्ती, कुटुंबाच्या भौतिक संपन्नेतचा, प्रगतीचा विचार अभिप्रेत आहे. संपत्ती निर्मिती, अधिकाधिक संपत्ती मिळवण्याची ओढ सार्वत्रिक असते. म्हणजेच अभ्युदयाची ओढ नैसर्गिक असते. आणि ती असलीच पाहिजे. पण भारतीय विचार कुठल्याच अतिरेकाकडे जात नाही. कुठल्याच प्रकारच्या अतिरेकाचे समर्थन करत नाही.
एका बाजूला अभ्युदयाची संकल्पना आहे, त्याचे स्वागत आहे, तर दुसऱ्या बाजूला ते 'निःश्रेयस' असावे अशीही संकल्पना आहे. श्रेयस, जे उत्तम आहे त्याची आराधना तर निःश्रेयस विचारात आहे हेच उत्तम आहे आणि याहून अधिक चांगले काही असू शकत नाही असे मानणे अध्याहृत आहे. निःश्रेयस हे अंतिम ध्येय आहे, किंबहुना असावे अशी ती संकल्पना आहे.
भारतीय विचारात मनुष्याचे आयुष्य पुरुषार्थांच्या भोवती गुंफले गेलेले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ते चार पुरुषार्थ. अभ्युदय साधणे हे पुरुषार्थात अंतर्भूत आहे. अर्थ आणि काम हे अभ्युदयाशी संबंधित आहेत. काम, केवळ शारीरिक अर्थापुरते हे सीमित नाही. इच्छा, आकांक्षा, तृष्णा इत्यादी सह अधिक विस्तृत अर्थ या संज्ञेमागे आहे. काम पूर्ततेसाठी 'अर्थ' हे अभ्युदयात अभिप्रेत आहे.
वेदातील विविध सूक्ते, ऋचा या इंद्र, अग्नी, वरुण, रुद्र, मरुत इत्यादी देवतांना केलेली आवाहने आहेत. त्यात आपत्तींपासून संरक्षण करण्याच्या आवाहनासोबतच धन, धान्य, पशु आदि संपत्तीने आमची भरभराट सतत होऊ दे असे आवाहन सातत्याने केलेले आहे. किंबहुना 'पशु' हा शब्द आता प्राणी या अर्थानेच घेतला जातो, पण त्याचा एक अर्थ धन असाही आहे. कारण वेदकाळात पशु, त्यातही गाय ही एक संपत्ती मानली जात असे.
ऋग्वेदातील एक ऋचा (१.८९.९) "व्यशेम देवहितं यदायु:" म्हणजेच देवाने आम्हाला दिलेल्या या आयुष्याचा आम्ही पुरेपूर आनंद, उपभोग घेत राहू असे म्हणते. आजही विविध धार्मिक प्रसंगी गायिले जाणारे श्रीसूक्त ही हिरण्यवर्णा म्हणजेच लक्ष्मी, संपत्तीची आराधना आहे.
ऋग्वेदातील अक्षसुक्तात (१०.३४) द्रष्टा जुगारामुळे संपत्ती नाश होतो याबद्दल सावध करतो. मनुष्याने शेती करुन संपत्ती कमवावी असा आग्रह धरतो. शेती करुन, कष्ट करुन कमावलेल्या संपत्तीत आनंद मानावा असे आवाहन करतो.
वैयक्तिक, कौटुंबिक अभ्युदय ही स्पष्ट प्रेरणा आहे, ती पुरुषार्थाचा भाग आहे. पण या प्रेरणेला निःश्रेयसाचे आवाहन देखील आहे.
महाकाव्ये: इतिहास संस्कृतीसह आर्थिक व्यवस्थेची देखील प्रेरणा
वेदकालीन सामाजिक व्यवस्था ही उत्क्रांत होणारी होती. विविध संकल्पना दृढ होणारा तो कालखंड होता. सामाजिक, राजकीय, आर्थिक धारणा अधिकाधिक दृढ झाल्या त्या रामायण-महाभारत आणि त्यापुढील महाजनपदांच्या कालखंडात.
आर्थिक व्यवस्था उद्योग, व्यापार, मालमत्ता या संकल्पनांसह विस्तारत होती. या सर्वात महाकाव्ये कशा पद्धतीने आर्थिक व्यवस्थेसाठी कशी प्रेरक ठरतात याचे विवेचन मल्हार कृष्ण गोखले यांनी केले आहे.
ते मांडतात, भूमी-जमीन ही राज्याच्या म्हणजेच शासनाची मालमत्ता नव्हती. ती व्यक्ती, कुटुंबाची मालमत्ता होती. जमिनीची खासगी मालकी मान्य होती, त्याची खरेदी-विक्री शक्य होती. आणि त्यासाठी जमिनीची योग्य ती मोजणी केली जात असे आणि त्याचा योग्य तो लेखाजोखा ठेवला जात असे. या मालमत्तेवर ठरलेल्या प्रमाणात कर-सारा आकारला जात असे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांकडून देखील खर्च वजा जात उरणाऱ्या नफ्याच्या १/५ इतका कर आकारला जात असे. कारागीर किंवा वस्तू निर्माण करणारे उद्योग यावर देखील निश्चित प्रमाणात कर आकारला जात असे.
बंजारा समाज किंवा व्यवस्था ही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. तिचे व्यापारातील, संपत्ती वृद्धीतील महत्त्व कायमच अधोरेखित होते. त्यामुळेच यावर कमीत कमी कर आकारण्याचे आवाहन आहे.
यजुर्वेदाच्या रुद्राध्यायात विविध व्यवसायांची एक सूची देण्यात आली आहे. त्यात शेती, पशुपालन, रथ सारथी, भविष्यवेत्ता, घोडे सांभाळणारा, हत्ती सांभाळणारा, गुराखी, विणकर, वस्त्र रंगकाम, बागकाम करणारा, सुतार, धातुकाम, सोनार, पुजारी, वैद्य, इत्यादी. उपजीविका आणि ती कमावण्याचे शास्त्र यास 'वार्ता' असे संबोधले आहे. देवर्षी नारद यांनी युधिष्ठिराला उपदेश केला आहे की, 'वार्ता'च्या योग्य विकासात जनतेच्या आनंदाचे, समाधानाचे मर्म आहे.
व्यापाराची प्राचीन परंपरा. |
उद्योग-व्यापार: एक सातत्यपूर्ण प्रेरणा
भारतीय अर्थव्यवस्थेत उद्योग-व्यापार क्षेत्राने सातत्याने प्रचंड योगदान दिले आहे. उद्योग-व्यापाराचे जनपद-महाजनपद, राज्य, साम्राज्य यांच्या आर्थिक वृद्धीत कायमच प्रचंड योगदान होते. शासनव्यवस्था देखील या उद्योग-व्यापारास अनुकूल असे. आर्य चाणक्याचे वचन 'राज्यस्य मूलम् अर्थम्' याचे महत्व सर्व राज्य-साम्राज्यांना पटलेले होते. महाकाव्यांत देखील राजाने श्रीमंतांना अभय द्यावे, त्यांना नजीक ठेवावे असे उपदेश केलेले आहेत, कारण ते राज्याचे आधारस्तंभ असतात.
उद्योग-व्यापार क्षेत्राचे प्राचीन स्वरुप जे होते त्यास विविध संबोधने होती. श्रेणी, संघ, सार्थवाह, निकाय, निगम ही ती संबोधने होत. हा व्यापार कौटुंबिक पातळीवर, एकत्र कुटुंब पद्धतीत असे किंवा अनेक व्यापारी-उद्योजक एकत्र येत संघ स्थापन करत असत. या संघाच्या प्रमुखास श्रेष्ठी, ज्येष्ठक म्हणत असत. कुटुंबातील वयस्कर व्यक्ती किंवा व्यापारी संघातील ज्येष्ठ, श्रेष्ठ व्यक्ती या पदावर असत. याच संबोधनाचे सध्याचे स्वरुप हे शेठ, सेठ यात दिसते.
श्रेष्ठी, ज्येष्ठ यांचे राजदरबारात वजन असे. राज्यशकटात त्यांचा सहभाग असे. राजाच्या प्रमुख वर्तुळात त्यांचा समावेश असे. राजाला राज्याचे आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी श्रेष्ठी मदत करत असत. याचाच अर्थ उद्योग व्यापारास राज्याचे उत्तेजन होते तसेच व्यापारी संघांचे राज्यसंस्थेत महत्त्वाचे स्थान असे.
भारताच्या इतिहासात व्यापारी मार्ग विकास, व्यापार पेठांचा विकास, व्यापारी मार्गांवर विश्रांतीस्थाने इत्यादींच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. सार्थवाह, श्रेणी, संघ, निकाय इत्यादींचे ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थानांच्या विकासात देखील मोठे योगदान आहे.
भारतभरातील बहुतांश लेण्या या प्रमुख व्यापारी मार्गांवर आहेत. घारापुरी, शूर्पारक (नालासोपारा), तसेच अनेक बंदरे यांच्या आसपास लेण्या आहेत. अजिंठा-वेरूळ लेण्या या उज्जैन ते तेर ते दक्षिण भारत या प्रमुख व्यापारी मार्गावर आहेत. पितळखोरा लेण्या, जुन्नर परिसरातील लेण्या, कार्ले-भाजे लेणी, साक्षात नाणेघाट या शूर्पारक बंदराकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आहेत. अनेक लेण्यांत व्यापारी संघाच्या श्रेष्ठीनी लेण्या-मंदिरांसाठी देणगी-दान दिल्याचे शिलालेख, पुरावे उपलब्ध आहेत.
जात व्यवस्था ही आर्थिक व्यवस्थेमागची प्रेरणा?
वर्ण व्यवस्था आणि जात व्यवस्था हे भारतीय सभ्यतेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या व्यवस्थेचा उदय कसा झाला, त्याची जन्माधारित जात व्यवस्थेकडची वाटचाल, त्याचे अन्यायी, शोषक स्वरुप याबद्दलच्या विविध चर्चा यांचा विस्तृत विचार इथे प्रस्तुत नाही.
पुढील विवेचन करताना जन्माधारित जातिव्यवस्थेचे कुठल्याच प्रकारे समर्थन प्रस्तुत नाही. अर्थव्यवस्थेमागील प्रेरणेचा विचार करताना जातिव्यवस्थेचा त्यात काही सहभाग आहे का, याचा केवळ एक दृष्टिकोन म्हणून विचार करण्यात आला आहे.
श्री प्रमोद पाठक यांनी पुढील विवेचन केले आहे. पोलाद निर्मितीसाठी आवश्यक 'Thermo Mechanical' प्रक्रिया प्राचीन काळी केवळ भारतीयांना अवगत होती. सुप्रसिद्ध 'अरेबियन नाईट्स'च्या १३ व्या रात्रीच्या कथेत उत्कृष्ट प्रतीच्या भारतीय पोलादाचे वर्णन आहे. ही कला, कसब गुप्त राखण्याची आवश्यकता होती. त्यासाठी भारतीयांनी आपली पद्धत विकसित केली ती व्यवसायाधारित गटात रोटी-बेटी व्यवहार करण्याची. मनुस्मृती मध्ये वारंवार बदल होत गेले आणि त्यात व्यवसायाधारित गटांना एक संरक्षण दिले.
ही व्यवस्था अनेक शतके चालत आली. वेळोवेळी त्यात आर्थिक पातळीवर, तंत्रज्ञानाच्या पातळीवर काही सुधारणा होत गेल्या. व्यापारी संघांसोबत उत्पादक श्रेणी-संघ देखील निर्माण झाले, वाढले. त्यात देखील श्रेष्ठी इत्यादी व्यवस्था उभी राहिली. पण जन्माधारित जातीव्यवस्था, त्यावर आधारित व्यवसाय बंधन या व्यवस्थेत फारसे बदल झाले नाहीत.
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केलेल्या विवेचनानुसार, भगवान महावीर, भगवान बुद्ध ते महात्मा बसवेश्वर ते संत परंपरा आणि आधुनिक समाजसुधारक अशी मोठी साखळी भारतात होऊन गेली. सनातन धर्मातील कर्मकांड, शोषक, दाहक जोखड यांची पकड कमी करण्यात, पुरोगामी पाऊले टाकत काही बदल घडवण्यात प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणत यशस्वी झाला. पण ही जन्माधारित जातीव्यवस्था समूळ नष्ट करणे कोणालाच शक्य झाले नाही. त्या व्यवस्थेला मुळातून हादरा बसला तो ब्रिटिश राज्याच्या आगमनामुळे.
ब्रिटीश काळात आधुनिक शिक्षण व्यवस्था आली. त्यामुळे जन्माधारित जातीनिरपेक्ष शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. शिक्षण सार्वत्रिक झाले, सर्वदूर झाले आहे का हा प्रश्न आजही प्रस्तुत आहे. पण वस्तुस्थिती आहे ती हीच की शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.
ब्रिटीश शासन व्यवस्थेसह आर्थिक क्षेत्रात उद्योग उभे राहिले. उद्योगांमुळे शहरे वाढीस लागली. उद्योग क्षेत्रात जन्माधारित जात हा घटक काहीसा दुय्यम होत गेला. ब्रिटीश शासनाच्या विविध विभागात आजवर ज्यांना संधी नाकारली गेली होती त्यांना नोकऱ्या मिळू लागल्या. त्रावणकोर, कोल्हापूर, बडोदा, औंध अशा काही आधुनिक, प्रागतिक विचारांच्या संस्थानात आधुनिकीकरणाचे पर्व आले.
कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम जात आधारित नाही तर गुणवत्तेच्या आधारावर नोकरीचे धोरण अंमलात आले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विभूतीच्या घडणीत महत्त्वाचा वाटा उचलला. अर्थात हे सर्व होत असताना नव्या जात समीकरणांचे, नव्या जातीआधारित संघर्षाचे बीज पेरले गेले हेही तितकेच सत्य आहे. त्याचे विवेचन इथे अप्रस्तुत आहे.
आधुनिक प्रेरणा:
स्वातंत्र्योत्तर काळात भारतात राज्यकर्त्यांनी 'Socialistic Pattern of Society' हा मार्ग निवडला. तिथे खासगी, वैयक्तिक उद्योगशीलतेला, उद्यमशीलतेला प्रोत्साहन नव्हते. किंबहुना नफा कमावणे ही निंदनीय गोष्ट समजली जात असे. त्या सर्व कालखंडाचे, सरकारने निवडलेल्या मार्गाचे भारताच्या वाटचालीत योगदान काय, त्याचे बरे-वाईट परिणाम काय याचे विस्तृत विवेचन याच ग्रंथातील श्री विनायक गोविलकर यांच्या लेखात करण्यात आलेले आहे.
आधुनिक प्रेरणांचा विचार करताना वर्ष २०१४ हे मूलभूत बदल करणारे आहे. हा बदल विचाराचा आहे, दृष्टिकोनाचा आहे. उद्योगशीलता, उद्यमशीलता यांना प्रोत्साहन आहे. ते प्रोत्साहन केवळ शाब्दिक, तात्त्विक नाही तर धोरणात्मक पातळीवर आहे. स्टार्ट अप, स्टँड अप, मुद्रा, PM SVANIDHI, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या भविष्यवेधी धोरणांत हा बदललेला दृष्टिकोन दिसून येतो.
भारतीय विचारात सततच खासगी संपत्ती, खासगी उद्योग-व्यापार यांना समर्थन, उत्तेजन आहे. ती परंपरा पुन्हा एकदा आधुनिक स्वरुपात राबवली जात आहे. भारतभरात सुरु होणारे स्टार्ट अप हे त्याचेच द्योतक आहे. उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र, शेती या सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भरती विचार, भारतीय विचारातील प्रेरणा पुन्हा एकदा दमदार पद्धतीने अर्थव्यवस्थेला मार्गदर्शन करत आहे. त्यातून भारताचे भविष्य उज्ज्वल आहे हे निश्चित.
Comments
Post a Comment