Skip to main content

आर्थिक गुन्हेगारी: प्राचीन भारतीय विचार, वर्तमान आणि भविष्य

फोटो सौजन्य: एलिट मॅग द्वारा इंटरनेट 


एक हजार रुपयाची वस्तू आपण विकत घेत असतो. दुकानदार विचारतो, बिल देऊ का? या प्रश्नाची हो किंवा नाही अशी दोन उत्तरे संभवतात. जर उत्तर हो असे दिले तर ती वस्तू उदाहरणार्थ दहा टक्के जीएसटी लागून अकराशे रुपयांना मिळेल. जर उत्तर नाही असे दिले तर तीच वस्तू हजार रुपयांनाच मिळेल. यात आपण शंभर रुपये वाचवतो. पण आपल्याही नकळत सूक्ष्म पातळीवर एका आर्थिक गुन्हेगारीला उत्तेजन दिलेले असते. कसे?

बिल न घेता वस्तू खरेदी केली. त्याचे नगदी पैसे चुकते केले. पण ती गोष्ट कुठल्याही हिशेबाचा भाग नाही झाली. देवाण-घेवाण झालेली नगद ही बेहिशेबी संपत्ती झाली. (आता UPI च्या काळात अशा गोष्टी खूप कमी झाल्या आहेत, पण मुद्द्याच्या अनुषंगाने उदाहरण घेऊन पुढे जाऊ) आर्थिक गुन्हेगारीचे हे अत्यंत प्राथमिक स्वरुप झाले. कायदेशीरदृष्ट्या ते फारसे गंभीर नसेलही पण नैतिकदृष्ट्या नक्कीच आहे. 

आर्थिक गुन्हेगारी ही अशा प्राथमिक, सुप्त अवस्थेपासून सुरु होते आणि त्याचे स्वरूप प्राथमिक ते उच्च पातळीवरचा भ्रष्टाचार, हिशेब वह्यांतील प्राथमिक गडबड ते प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा, प्राथमिक स्तरावरील पैशाची अफरातफर ते थेट हवाला, पैशाची परदेशी फिरवाफिरवी पर्यंत वाढत जाते. हे प्रमुख प्रकार पाहिले तर राजकारणी, काही सरकारी अधिकारी यांची गाजलेली, न गाजलेली भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणे, उद्योग जगतातले घोटाळे डोळ्यासमोर येतात. प्रस्तुत लेखात आर्थिक गुन्हेगारी यांना एका प्रकारे उत्तेजनच देणारी व्यवस्था कशी होती, स्वातंत्र्योत्तर भारतातील गाजलेले मोठे आर्थिक घोटाळे, आर्थिक गुन्हेगारी रोखण्याचा अस्सल भारतीय असा प्राचीन विचार, आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील व्यवस्था सक्षम होण्याची वाटचाल यांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

स्वातंत्र्योत्तर भारत सरकारने समाजवादी आर्थिक रचनेचा स्वीकार केला. त्यानुसार १९४८, १९५३, १९७३, १९८४ अशा वर्षांमध्ये औद्योगिक धोरणे आणली. एका १९८४ चा अपवाद वगळता इतर सर्व औद्योगिक धोरणांनुसार खासगी क्षेत्राचा सहभाग कमी कमी करत नेण्याकडेच वाटचाल राहिली. अवजड उद्योग तसेच इतर अनेक क्षेत्रांत सरकारी उद्योग आले. त्यांनी एक किमान पाया घातला ही वस्तुस्थिती असली तरी दृष्टीकोन निराळा असल्यामुळे सर्वांगीण आर्थिक विकासाला हातभार लागला नाही. हा दृष्टिकोन होता 'Import Substitution' म्हणजे आयातीला पर्याय देण्याचा. याउलट याच काळात इतर आशियाई अविकसित, विकसनशील देशांनी 'Export Promotion' म्हणजेच निर्यातीला प्रोत्साहन हे धोरण स्वीकारले. 

परिणाम? भारतातील शेती एकाधिकारशाही योजना, लेव्ही वगैरे योजनांमुळे डबघाईला आली. उद्योगजगत प्रामुख्याने सरकारी हातात होते. तिथे लायसन्स, परमिट, कोटा राज आणि त्यांचे नियंत्रक म्हणजे नोकरशाही यांचे राज्य. आयातीवर प्रचंड कर. यात चलन दर हे नियंत्रित होते. जवळ जवळ सर्व बाजुंनी अर्थव्यवस्था गच्च आवळून ठेवली होती. व्यवस्थाच आर्थिक गुन्हेगारीला उत्तेजन देणारी ठरली. काळाबाजार, तस्करी वाढीला लागली. त्याची पुढली पायरी ती हवाला आणि अंडरवर्ल्ड. हे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला ज्या मर्यादित क्षेत्रात आणि प्रमाणात खासगी क्षेत्र कार्यरत होते तिथे निराळेच खेळ सुरु होते. निराळे आर्थिक गुन्हे घडत होते. 

स्वातंत्र्य मिळाल्याच्या अवघ्या पाच-सात वर्षात पहिला मोठा घोटाळा घडला आणि साक्षात अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. ते प्रकरण म्हणजे मुंद्रा डील. त्याची कहाणी अशी की, LIC या त्यावेळी खासगी क्षेत्रात असणाऱ्या कंपनीने आपल्याकडील विमा हप्त्यांची रक्कम, हरिदास मुंद्रा यांच्या डबघाईला येऊ घातलेल्या कंपन्यांत गुंतवावी, यासाठी तत्कालीन अर्थमंत्री यांच्याद्वारे दबाव टाकण्यात आला. LICच्या संचालक मंडळाला न विचारता ही गुंतवणूक परस्पर करण्यात आली. या गुंतवणुकीमुळे मुंद्रा यांच्या जहाजबांधणी आणि नौकानयन क्षेत्रातील कंपन्यांसह एकूण शेअर बाजार वर जाऊन लाभ होईल असे भासवण्यात येत होते, जे झाले नाही. प्रचंड नुकसान झाले. हे सर्व प्रकरण बाहेर आले, अथवा आणले, अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. LIC चे राष्ट्रीयीकरण झाले. हे प्रकरण बाहेर काढून जवाहरलाल नेहरू प्रणित आपल्याच पक्षाची लक्तरे टांगणारे खासदार होते, फिरोज गांधी. 

हर्षद मेहता प्रकरण हे नुकत्याच आलेल्या तुफान लोकप्रिय वेबमालिकेमुळे माहिती झाले आहे. शेअर बाजारात क्षमता नसलेल्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव कृत्रिमरित्या चढते ठेवण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या फंडाचा गैरवापर, शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी बोगस कंपन्यांची निर्मिती असं सर्व करत असताना १९९२ मध्ये सर्व फुगा फुटला आणि प्रकरण सर्वांसमोर आले. शेअर बाजारात दाणादाण उडाली. यानंतर भारतीय रिजर्व्ह बँक, सेबी वगैरे यंत्रणांनी काही पावले उचलली. पण तरीही व्यवस्थेतील त्रुटींचा लाभ उठवून आर्थिक गुन्हेगारी करणारे थांबत नाहीत. हर्षद मेहता किरकोळ वाटावा अशा आकाराचा पण त्याच पद्धतीचा घोटाळा केतन पारेख ने केला. आणि व्यवस्थेत आणखी बदल करण्यात आले. 

हे झाले सरळसरळ घोटाळे या व्याख्येत बसणारे गुन्हे. पण काही प्रकरणे असतात जिथे गुन्हा असतो तो क्षमतेपेक्षा प्रचंड प्रमाणात कर्ज घेणे, ते वेळेत न फेडणे आणि कारवाईच्या वेळी सर्वांना गुंगारा देऊन देशाबाहेर पळून जाणे अशा प्रकारचा. किंगफिशर एअरलाईन आणि विजय मल्ल्या प्रकरण हे या प्रकारचे आहे. वर्ष २००५ पासून फोन बँकिंग हा प्रकार जोरात होता. राजकारणी लोकांकडून फोन जायचे आणि लोकांना कर्जे मिळायची. फेडण्याची क्षमता आहे का, त्या उद्योगाची वर्तमान आणि भविष्यात काही वाढीची शक्यता आहे का याचा काहीही विचार न करता, खिरापती प्रमाणे कर्जे वाटली गेली. 

विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन मध्ये या कर्जांतून उत्पादक, भविष्यातील वाढीच्या दृष्टीने, सेवा अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने खर्च करण्याच्या ऐवजी त्यांचे सुप्रसिद्ध कॅलेंडर, त्यांवरील कन्यका, छानछोकी आणि इतर अनावश्यक खर्चावर भर देण्यात आला. MAB एव्हिएशन या कंपनीचे संस्थापक मंदार भारदे यांनी एके ठिकाणी सांगितले आहे की एअरलाईन व्यवसाय फायद्यात राखण्यासाठी तुमचे विमान चोवीस तासांपैकी बारा तासांपेक्षा अधिक काळ हवेत असायला हवे आणि कमीत कमी वेळात ते जमिनीवरून काढून घेण्याची (विमानतळावर उतरून प्रवासी, सामान उतरून, पुढचे प्रवासी, सामान चढणे, इंधन भरणा, आवश्यक चाचण्या करून पुन्हा हवेत ही सर्व प्रक्रिया) यंत्रणा असावी. किंगफिशरची विमाने हवेत राहण्याचा कालावधी अवघा नऊ तासाचा होता. त्यामुळे ती कंपनी डब्यातच जाणार होती हे स्पष्ट होते, आणि झालेही तसेच. विजय मल्ल्या भारतातून निघून जाणे, संपत्तीवर टांच वगैरे घटनाक्रम सर्वज्ञात आहे. 

करचोरी हादेखील एक आर्थिक गुन्हेगारीचा प्रकार. सुरुवातच एका प्रातिनिधिक उदाहरणाने केली आहे. ती झाली अप्रत्यक्ष करचोरीची घटना. प्रत्यक्ष कर, त्यात आयकर चुकवणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. कर वाचवणे आणि चुकवणे यात खूप फरक आहे. आयकर कायद्याच्या कलम ८० नुसार कर वाचवण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्याचा यथायोग्य लाभ व्यक्ती आणि कंपन्या घेतच असतात. पण अनेक वेळा उत्पन्न बेहिशेबी असते, त्याची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न उभा राहतो. एक पर्याय स्थावर मालमत्ता, दागदागिने घेणे हा असतो, पण तो आयकर खाते आणि इतर यंत्रणांच्या पटकन डोळ्यावर येणारा. दुसरा पर्याय देशाबाहेर अशा ठिकाणी ठेवावा ज्यांना सेफ हेवेन्स, टॅक्स हेवेन्स म्हणतात. मौरिशस, पनामा, सायप्रस इत्यादी देश हे असे टॅक्स हेवन आहेत. स्विझर्लंड हा सेफ हेवन पैकी. स्विस बँका कायम चर्चेत असण्याचे हेच कारण आहे. काही वर्षांपूर्वी पनामा पेपर्स प्रकरणात भारतातल्या भल्याभाल्यांची नावे समोर आली होती. 


या सगळ्यात प्राचीन भारतीय विचार हा मुद्दा येतो कुठे? मुद्दा असा आहे की आर्थिक गुन्हेगारी रोखावी कशी? त्यासाठी एका बाजूला नियामक व्यवस्था अधिकाधिक सक्षम करणे आणि जास्तीत जास्त कडक शिक्षांची तरतूद हे पर्याय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे पंचप्राण सांगितले आहेत त्यात वसाहतवादी मानसिकता सोडणे याचा अंतर्भाव आहे. त्याचे प्रतिबिंब कायदेनिर्मितीसह नियामक व्यवस्थेतही दिसून येत आहे. आधुनिक नियामक व्यवस्थेसाठी मूलभूत विचार प्राचीन भारतातील ज्ञात असा सर्वश्रेष्ठ विचारवंत म्हणजे चाणक्य आणि त्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे अर्थशास्त्र. 

अर्थशास्त्रात संभाव्य आर्थिक घोटाळे-गुन्हेगारीचे चाळीस प्रकार नमूद केले आहेत. आधी जमा झालेले उत्पन्न, काही काळाने हिशेबवह्यात मांडणे, अर्धवट केलेले काम पूर्ण म्हणून दाखवणे, एक गोष्ट केली जाते पण दुसरीच दाखवली जाते, अर्धवट भरणा केलेली रक्कम पूर्ण भरली असे दाखवणे, उच्च मूल्याच्या वस्तूंच्या जागी कमी मूल्याच्या वस्तू दाखवणे, आर्थिक वर्षाबाबत विसंगती, उत्पन्नाचे-खर्चाचे स्रोत बदलून लिहिणे, जे काम करायला नको, जो खर्च करायला नको तो करणे, जी रक्कम भरायची आहे ती भरलीच न जाणे, अशासह अनेक शक्यता चाण्यक्याने नमूद करुन ठेवल्या आहेत. एवढेच नाही तर हे सर्व रोखावे कसे, त्यासाठी हिशेब लेखन, त्यावरील कंट्रोल व्यवस्था याचेही विस्तृत विवेचन केलेले आहे. अर्थशास्त्रामधील या एकेक शक्यता वाचताना डोळ्यासमोर मुंद्रा, दालमिया, हर्षद मेहता, केतन पारेख, विजय मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी, अनेक राजकारणी, भ्रष्ट नोकरशहा डोळ्यासमोर येतात. प्राचीन भारतीय विचार समृद्ध आहे, त्याचा योग्य परामर्श घेऊन आधुनिक गरजांनुसार मांडणी केल्यास अस्सल भारतीय व्यवस्था, कायदे निर्मिती होत राहणार आहे.  

तहान लागली की विहीर खणायला घेणे हा सर्वसाधारण स्वभाव आहे. पण काही अपवादात्मक वेळी दूरदृष्टीनेही पावले उचलण्यात आली आहेत. ही पाऊले त्या त्या वेळच्या सरकारांनी त्यांच्या विचार, धोरणानुसार उचलली. मुंद्रा प्रकरणानंतर LIC चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. पुढे बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. १९९१ नंतर विविध क्षेत्रे खासगी उद्योजकांसाठी खुली झाली तशी अनेक नियामक संस्था स्थापण्यात आल्या. विमा क्षेत्राच्या नियमनासाठी 'इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी- IRDA' आली. हर्षद मेहता प्रकरण उघडकीस आल्यानंतर सेबी ही आधीपासून अस्तित्वात असलेली संस्था अधिक बळकट केली गेली. तिला कायद्याद्वारे स्वायत्त संस्थेचा दर्जा देत स्टॉक मार्केट, रोखे यांच्याबाबत अधिक अधिकार देण्यात आले. केतन पारेख प्रकरणापासून शेअर प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन करण्याच्या प्रक्रियेला प्रचंड गती मिळाली. 

व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने अनेक पाऊले स्वतःहून उचलली. त्याची सकारात्मक फळे आता दिसू लागली आहेत. त्यात दिवळखोरी आणि नादारी संहिता, वस्तू व सेवा कर, नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टींग ऑथॉरिटी यांचा समावेश आहे. वस्तू व सेवा करामुळे अर्थव्यवस्थेतील उद्योग-व्यवसाय हे संस्थात्मक चौकटीत येत आहेत. दिवाळखोरी आणि नादारी संहितेमुळे एखादा आजारी उद्योग कमीत कमी वेळात बंद करुन, बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्था, इतर संबंधित घटक यांचे कमीत कमी नुकसान सोसत बाहेर पडण्याची व्यवस्था निर्माण झाली. यामुळे बँकांची परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. अनुत्पादक कर्जाचे प्रमाण नीचांकी पातळीवर आहे. कंपन्या नव्या गुंतवणुकीसाठी कर्जे घेत आहेत. 

व्यवस्था कितीही सक्षम करत नेल्या, कितीही कडक कायदे केले तरी घोटाळेबाज त्यातून पळवाटा काढून गुन्हे करतातच आणि  करतच राहणार. ते उघडकीस आणणारी अकाउंटिंगची शाखा म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग अधिक लोकाभिमुख करणे, अधिकाधिक तज्ज्ञ घडवणे ही आजची गरज आहे आणि वाढतच जाणार आहे. फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ डॉ. अपूर्वा जोशी यांनी या शाखेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. अधिक तज्ज्ञ घडवण्याच्या दृष्टीने देखील त्या कार्य करत आहेत. 

आर्थिक गुन्हे, घोटाळे होतच राहणार आहेत. स्वरूप बदलत राहणार. पण भारताचा प्राचीन विचार अंगीकारत, आधुनिकतेची जोड देत व्यवस्था सक्षम करत राहणे यापलीकडे भविष्यात दुसरे काय आहे? 


पूर्वप्रसिद्धी: एकता मासिक 

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...