Skip to main content

राजगड

                                     

                   
                 पावसाने चांगलीच ओढ दिली होती. जुलैचा दुसरा आठवडा आला तरी म्हणावा तितका पाउस पडलेला नव्हता. सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. नुसतं घरात स्वस्थ बसून राहवत नव्हतं. दऱ्या-खोऱ्यात फिरण्याचे दिवस हे… " घरात काय बसून राहायचं? " अशा मनस्थितीतून जात असताना अचानक सर्वांच्या मनात आलं. चला राजगडावर. राजगड. १६४७ पासून सुरु झालेल्या  साम्राज्याच्या निर्मितीतील महत्वाचे साक्षीदार असणारे महाराजांचे आवडते किल्ले म्हणजे तोरणा, पुरंदर, रोहीडा, प्रतापगड आणि राजगड. 'गडांचा राजा, राजांचा गड' असं यथार्थ वर्णन राजगडाचं करण्यात येतं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. नजर ठरत नाही अशा उत्तुंग उंचीवर असणारं जणू गरुडाचं घरट. बोलावं, ऐकावं, वाचावं तितकं कमी आहे असा हा राजगड. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो. देवाच्या दयेनं दिसलाच सूर्योदय  तर तो राजगडच्या पायथ्यालाच  पहायचा अशा निर्धाराने गाड्या  पिटाळत होतो. 
                रस्त्याच्या दुतर्फा हिरवा गालीचा पसरलेला होता. ढगाळ वातावरण. तासाभरात नसरापूर मार्गे गुंजवणे गावात पोचलो. राजगड अर्धाच दिसत होता. त्यावर ढगांचा मुक्त संचार सुरु होता. चहापाणी करून गड चढायला सुरुवात केली. सुरुवातीला झाडी-झुडुपातून चिंचोळी वाट जात होती. काही वेळाने एक विस्तीर्ण पठार आलं. समोर अक्राळ-विक्राळ पसरलेला राजगड दिसत होता. तो आपले सुवेळा- पद्मावती माचीरुपी बाहू पसरून खुणावत होता. की या…. निसर्गाच्या या आविष्काराची जादू अनुभवायला, इतिहासाची पानंच्या पानं वाचायला या!! क्षणभरच ढग थोडे विरळ झाले आणि दर्शन घडलं राजगडावरचं निसर्गाचं आश्चर्य असणाऱ्या नेढ्याचं. मन थरारून उठलं आणि त्याच उत्साहात पुढची वाटचाल सुरु केली. 
               थोडी निसरडी, थोडी कोरडी पण छान झाडीतून वाट जात होती. आणि अचानक समोर दिसली ती पद्मावती माचीच्या कड्यावर चढत जाणारी खडी चिंचोळी वाट. दाट धुकं, ती खडी चढण पाहूनच उरात धडकी भरत होती. त्यातून आम्ही वाट निवडली होती ती अवघड समजली जाणारी. गडावर जाण्यासाठी गुंजवणे, वाजेघर, पाली वगैरे गावातून वेगवेगळ्या वाटा आहेत. बहुतेक सगळ्या पद्मावती माचीवर पोचतात. सुवेळा आणि संजीवनी माचीवर येणाऱ्या ज्या वाटा आहेत त्यावरून चढणं किंवा उतरणं त्या वातावरणात निवळ अशक्य. त्यापेक्षा स्वर्गाची वाट कितीतरी सोपी म्हणावी लागेल. त्या खड्या चढणीत दगडात आधार घेत जात होतो. आता  निसरडी मातीतली वाट संपली होती. दगड, खोबणी अशी वाट सुरु होती. एका बाजूला उत्तुंग कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. वास्तविक धुक्यामुळे दरीतलं काही दिसत नव्हतं. दिसलं असतं तर डोळे फिरायचंच काम होतं. पायवाटेच्या शेजारून लोखंडी रेलिंग बसवले होते. त्याचा आधार नसता तर अंगाचा एक छोटासा बाक सरळ स्वर्गाच्या दारी घेऊन गेला असता. काही वेळाने साडेतीन-पावणे चारशे वर्ष समर्थपणे उभी असणारी तटबंदी दिसायला लागली. 
              तटबंदीच्या बाजूबाजूने जात होतो. तरी गडाचा कुठलाच दरवाजा वगैरे दिसत नव्हता. पुढे गेल्यावर एक छोटं दीड-दोन फुटाच भोक दिसायला लागलं. त्यातून आत गेल्यावर लक्षात आलं तो चोर दरवाजा होता. वा! गडावर प्रवेश झाला. पद्मावती तळं समोर दिसत होतं. आणि त्यापाठी राजगडाचा दिमाखदार बालेकिल्ला लपंडाव खेळत होता. ढग कमीजास्त होत होते तसा बालेकिल्ला दर्शन देत होता. पण आजचं टार्गेट बालेकिल्ला नाही तर, ते 'आश्चर्य' नेढ हे होतं. जास्त वेळ न घालवता बालेकिल्ल्याच्या डाव्या बाजूने सुवेळा माचीकडे जाणारऱ्या वाटेवर चालू लागलो. आता पावसाला सुरुवात झाली. हातभर लांबवरचंदेखील काही दिसेना. बालेकिल्ला उजव्या बाजूला ठेऊन पुढे जात होतो. माचीवरला फुलांचा गालीचा नजर वेधून घेत होता. दोन्ही बाजूनी चिलखती तटबंदी आणि खोल तुटलेले कडे. माचीचा पसारा निमुळता होत चालला होता. माचीच्या पहिल्या टप्प्यावरचा बुरुज लागला. मराठशाहीची शान असलेला भगवा झेंडा डौलानं फडकत होता. त्या बुरुजाच्या पायऱ्या बाजूला ठेऊन पुढे गेलो. उजव्या बाजूला 'सुवेळा माची दरवाजा' अशी पाटी दिसली. त्या दरवाजात जाउन ठाकलो आणि वाचाच बंद पडायची पाळी आली. समोर दिसणारा निसर्ग डोळ्याचं पारणं फेडणारा होता. 
               दर्याखोर्यातून बेभानपणे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे निर्माण झालेलं ते नेढ. शब्द फुटत नव्हता तिथे बसून. नि:शब्द बसून राहिलो कितीतरी वेळ. पायच निघेना. पण वेळेचं बंधन होतं. परत निघालो. आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. मशीनगनमधून धाड धाड गोळ्या सुटून अंगाला लागाव्यात तसे पावसाचे थेंब अंगावर लागत होते. तसेच पद्मावती माचीवर परत आलो. त्याच वाटेनं गड उतरणं प्राप्त होतं. पुन्हा 'चोर दरवाजात' येउन पाहतो तर काय! त्यातून पाण्याचा प्रवाह बेभानपणे उसळत, फेसाळत खाली जात होता. या अशा वाटेवरून खाली उतरायचं होतं! कितीतरी वेळ नुसतेच पाहत राहिलो. मग हिम्मत करून जीव मुठीत घेऊन प्रत्येक पाउल सांभाळून टाकत तो टप्पा उतरलो. त्या खड्या उतारणीहून पायवाटेवर आलो तेव्हा जरा जीवात जीव आला. धो धो पावसाचा मारा सुरु होता, वाट निसरडी होती पण आता तितकं अवघड नव्हतं. उतरून गावात आलो. गावात आल्याआल्या एका दुकानवजा हॉटेलात गेलो तर त्यांच्या एका वाक्यानं चाट पडलो, ते म्हणाले,
          " गडावरून येताना पाउस घेऊन आलात तुम्ही… "
गावातला 'नेहमीसारखा' असा तो पहिलाच पाउस होता. तिथे स्वतःला आणि नोटा, फोन वगैरे वाळायला घातलं. चहावर चहा पिणं सुरु होतं. चांगले दोन-अडीच तास तिथे होतो. आपसात गोष्टी सुरु होत्या पण मनात त्या अविस्मरणीय अनुभवाची चित्रं कोरली जात होती. समोर गाड्या आणि पुण्याकडे जाणारा रस्ता दिसत होता पण मनात राजगडाने पुन्हा एकदा नव्याने घर केलं होतं. त्या उत्तुंग पहाडावरून नजर हटत नव्हती. गाड्या पुण्याकडे धावत होत्या तरी मनात राजगडावरच्या एकेक प्रसंगांचा चित्रपट धावत होता.

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...