एक प्रवास..!
कुठेही जाऊन पोचण्यापेक्षा प्रवास ही गोष्ट मला फार आवडते. इतर वेळी शक्यतो माझ्या कोशात राहणारा, काहीसा एकलकोंडा मी प्रवासातदेखील त्या भाऊगर्दीतही शक्यतो अलिप्तच असतो. गर्दीचा भाग झालो तरी गर्दित मिसळत नाही. गर्दीचं निरिक्षण करायला मला आवडतं. म्हणूनच रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक ही माझी आवडती ठिकाणे आहेत. विमानतळावर फारसं जाण झालेलं नाही आणि दुसरं म्हणजे विमानतळावर प्लेटफार्म तिकिट काढून निवांत निरिक्षण करता येण्याची सोय नाही. म्हणून आपल्या पातळीवर रेल्वे आणि बस स्थानक. कित्येक तर्हेची माणसं दिसतात. प्रत्येकाचं प्रवासाचं कारण वेगळ, प्रत्येकाचा बाज वेगळा. 'क्लास थिअरी' मांडणाऱ्या विचारधारेकडे माझा ओढा नाही. किंबहुना मी कडवा टीकाकार आहे. पण एक गोष्ट मान्य करायला हवी की बस आणि रेल्वे स्थानक या ठिकाणी बस किंवा रेल्वे सेवेचा प्रकार, स्तर यावरून 'क्लास' ओळखता येऊ शकतो किंवा काही वेळा ठरवला जाऊ शकतो. रेल्वेच्या प्रथम दर्जा वातानुकुलित बोगीतला प्रवासी टू टिअर च्या प्रवाशाकडे काहीशा सहानुभूती, भूतदया वगैरे नजरेने बघतो, टू तिअर वाला थ्री टिअर वाल्याकडे आणि ही साखळी अशीच पुढे चालते. फ़क्त शयनयान आरक्षण बोगीचे प्रवासी इतर 'सामान्य' प्रवाशांकडे सहानुभूती वगैरे नाही तर काहीशा भीतीयुक्त नजरेने पाहतात. कारण हे सामान्य लोक आरक्षित जागेवर बिनधास्त बसू शकतात. काही म्हणालं तर तेच आपल्या अंगावर धावून येऊ शकतात. कारण मुक्तकंठाने आणि मुक्तहस्ताने भांडण करणे हा 'सामान्य' श्रेणी बोगीतल्या प्रवाशांचा स्थायीभाव आहे. किंबहूना तसं भांडता येणे हे या वर्गाने प्रवास करता येण्यासाठीचे मुख्य क्वालीफिकेशन आहे.
एक प्रवास. रात्री 3 वाजता सुरू झालेला. भारतातल्या एका महत्वपूर्ण रेल्वे मार्गावरचा. एका परीक्षेसाठी मुंबईला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा घोळका. रात्रीची वेळ असल्यामुळे आणि नियम अधिक कठोर, काटेकोर झाल्यामुळे आरक्षित वर्गाच्या बोगीचे दरवाजे पूर्णपणे बंद. सर्व समुदाय अनारक्षित बोगीकडे वळणार हे नक्की. धक्काबुक्की, आरडा ओरडा याला पर्याय नाही. ह्या पार्श्वभूमीवर काही निरिक्षणे नोंदवणे आवश्यक आहे. आत आधीपासून असलेले प्रवासी नविन येणारे लोक म्हणजे कोणी चोर आहेत, आमचं सोन्यासारखा प्रवास उधळुन टाकायला येणारे दंगेखोर आहेत या भावनेत असतात की काय कोण जाणे? चढूच देत नाहीत म्हणजे काय? आत अजिबात जगाच नाही (जी परिस्थिती आमचा सर्व समुदाय चढ़ल्यानंतर निर्माण झाली) अशी परिस्थिती असेल तर गोष्ट निराळी पण दारात आणि त्या जागेत थांबून चढ़ण्यापासून अड़थळाच निर्माण करायचा ह्या वृतीला काय म्हणायचं? आत, लोक अक्षरशः एका पायावर कसाबसा आधार शोधून टेकू देऊन उभे आहेत पण लोक निवांत आडवे झोपतात. किमान माणुसकी म्हणून वृद्ध, स्त्रिया त्यातही लहान मूल कडेवर असलेल्या स्त्रिया यांना तरी किमान बसता यावं इतकी जागा द्यावी इतकंही समजत नसेल तर मुद्दा मुळातल्या संस्कारांपर्यंत जाऊन पोचतो. बरं हे आडवे लोक गाढ झोपेत रेल्वे इंजिनाच्या हॉर्नशी स्पर्धा करणाऱ्या आवाजात घोरत असतात म्हणावे तर ते पण नाही. उघड्या डोळ्यांनी ही भाऊगर्दी बघत असतात. ह्या आडव्या लोकांत स्त्री आणि पुरुष दोघेही असतात. पुन्हा 'अहो असे काय उभे राहता, समजत नाही का तुम्हाला पासून अर्वाच्च्य भाषेत फुकटचे सल्ले' देतात. ह्या लोकांना तिथेच चार शब्द सुनावून का मुस्काडू नये? जी कथा बाकावर आडवे होणाऱ्यांची तीच कथा मधल्या जागेत आडवे होणाऱ्या लोकांची. लोक त्यांना अक्षरशः तुडवत असतात, त्या सगळ्यात कसेबसे उभे असतात. मान्य आहे रात्रीची वेळ असते तर झोप येते पण करणार काय? प्रवास तर सगळ्यांना करायचा आहे. तीच गोष्ट जागेसाठी होणाऱ्या भांडणांची. लोकसंख्या प्रचंड सुविधा अपुऱ्या, काय करावं? असा उद्विग्न प्रश्न पडतो.
ह्या सगळ्यावरुन एका वेगळ्याच मुद्द्याला हात घालू इच्छितो. संघ लोक सेवा आयोग परीक्षा घेऊन प्रशासकीय, पोलिस, विदेश, महसूल वगैरे सेवांसाठी निवड करते. निवड झाल्यानंतर प्रशिक्षणाच्या काळात 'भारत दर्शन' हा उपक्रम असतो. त्यात देशाच्या विविध भागात भेटी दिल्या जातात. बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात. त्याचा निश्चित फायदा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना होत असणार. पण हा प्रवास रेल्वे प्रथम दर्जा, आता विमान आणि विशेष वाहनांद्वारे होतो. प्रत्येक ठिकाणी एक विशेषत्वाची वागणूक दिली जाते. ह्या सर्वात 'खरं' भारत दर्शन होत असेल का? मध्यंतरी नागरी सेवा परीक्षा तयारी करणाऱ्या लोकांनी चालवलेल्या 'मीम' पेजवर एक मीम टाकला होता. त्यात स्वदेस चित्रपटातील एक प्रसंग होता. जेव्हा मोहन भार्गव या अनिवासी भारतीयाची, जो आपलं वेगळेपण जपण्याचा अतोनात प्रयत्न करतो आहे (मोहन जेव्हा गावात प्रथम येतो, कावेरी अम्माला भेटतो. अम्मा त्याला घरातलं पाणी देते. मोहन तो पाण्याचा ग्लास तसाच बाजूला ठेवतो. हे सूचकपणे दाखवलं आहे. असंच, अम्मा त्याला शेतीचं भाडं वसूल करायला पाठवते तेव्हा तो मिनरल वाटरच्या बाटल्या घेऊन निघतो आणि येताना मात्र रेल्वे फलाटावरील 2 रूपये प्रति ग्लास असं पाणी विकणाऱ्या पोऱ्या कडून घेऊन पाणि पितो.. ) असा तो रेल्वेमध्ये सामान्य बोगीत प्रचंड गर्दीत कसाबसा बूड टेकवून बसला आहे. इतर लोकही असेच बसले आहेत. खाली कित्येक लोक बसले आहेत. त्या फोटोखाली लिहीलं होतं "How Bharat Darshan should be actually..". अतिशय खरं आहे. त्या काळातली ती विशेष वागणूक पुढील सनदी सेवेतील सामान्य लोकांपासूनच्या दुराव्याची सुरुवात असते का? असू शकेल..
प्रवास रोज हजारो, लाखो लोक करतात. प्रत्येकाचा उद्देश निराळा, कारण निराळ. माझंही कारण वेगळ होतं पण त्या भाऊगर्दीतही, प्रचंड कोलाहलात हे असे असंख्य विचार डोक्यात सुरू होते आणि राहणार आहेत... एक प्रवास असाही!!
Comments
Post a Comment