Skip to main content

अमिताभ..

अमिताभ..



अभिनय असावा तर त्याच्यासारखा, सभा - संमेलनात वावर असावा तर त्याच्यासारखा, भाषेवर प्रभुत्व असावं तर त्यांच्यासारखं, व्यावसायिकता असावी तर त्यांच्यासारखी, वय सहसरचंद्र दर्शनाकडे जात असताना तरुणांना लाजावणारी ऊर्जा असावी तर त्यांच्यासारखी, वागण्या - बोलण्यात सुसंस्कृतपणा असावा तर त्याच्यासारखा. आणखी किती आणि काय गुण सांगावेत त्यांच्यातले जे अंगीकारले तर माणूस आपापल्या क्षेत्रात यशस्वी होईल, मानद होईल. भारतीय चित्रपटसृष्टीत ४० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध धाटणीचे चित्रपट, जाहिरात, दूरचित्रवाणी कार्यक्रम अशा क्षेत्रांत उत्तुंग काम केलेल्या, महनीय अशा महानायकला यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. गोवा मुक्तिंग्राम ही पार्श्वभूमी असणाऱ्या सात हिंदुस्तानी या चित्रपटातील अन्वर पासून ते अलीकडेच गाजलेल्या पिंक पर्यंत आपल्या अभिनयाने, भरदार आवाजाने महानायक झालेल्या अमिताभ बच्चन यांच्याविषयी अनेक माध्यमात अनेक वेळा बोललं गेलं आहे. त्यांच्या कारकीर्दीचा उहापोह अनेक वेळा करण्यात आलेला आहे. आता पुन्हा करण्यात काय हशील असा प्रश्न पडू शकतो. पण कितीही वेळा चर्चा केली तरी काहीतरी उरतंच. पुनरुक्ती होते, पुन्हा सगळं ढवळलं जातं पण तरी बोलण्यासारखं काहीतरी उरतंच.

विसावं शतक संपत असताना जन्माला आलेल्या आमच्या पिढीसमोर चित्रपटगृहात अमिताभ आला तो कभी खुशी, कभी गम, बागबान वगैरे चित्रपटांतून. वास्तविक ते चित्रपट आले तेव्हा शाळकरी वय होतं. पांढऱ्या दाढीतल्या, भरदार आवाजाच्या या माणसाविषयी लोक इतकं भरभरून काय आणि का बोलत आहेत असा प्रश्न पडायचा. कारण बाप, काका वगैरे भूमिका तशा दुय्यम मानल्या गेलेल्या असतात. (निदान तेव्हा तरी. ) पण जसजसे मोठे होत गेलो तसा हा माणूस खूप मोठा पल्ला गाठून इथवर आला आहे आणि या वयातही चित्रपटाच्या कथानकात त्याचं महत्त्व टिकवून आहे हे लक्षात यायला लागलं. ते लक्षात येण्यासाठी निःसंशय हातभार लावला तो टेलिव्हिजनने. कारण त्याच काळात एका बाजूला हा माणूस जगाविषयी आमचं कुतूहल जागं करणारा कार्यक्रम, कौन बनेगा करोडपती सादर करत होता तर दुसऱ्या बाजूला केवळ चित्रपट दाखवणाऱ्या वाहिन्यांवर त्याचे जुने चित्रपट दाखवले जात होते. सामान्यांच्या मनातल्या असंतोषाला वाचा फोडणारा त्याचा अँग्री यंग मॅन दिसत होता, ' आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश...' म्हणत खळखळून हसवणारा नायक दिसत होता, ' पिछले छह महिनोसे बकबक सून रहा हुं...' अशी आर्त हाक घालून रडवणारा संवेदनशील नायक दिसत होता. त्यामुळे केवळ हिरोचा किंवा हिरोईनचा बाप, काका, शिक्षक वगैरे भुमिकांपुरता मर्यादित हा अभिनेता नाही हे लक्षात येत गेलं. आमच्या पिढीने त्याचा अँग्री यंग मॅन टेलिव्हिजन वर पाहिला. टेलिव्हिजनच्या पडद्यावरची त्याची माझ्या मनात घर करून गेली तर त्याकाळात पडद्यावर तयार झालेली प्रतिमा केवढी मोठी असेल कल्पनाच केलेली बरी.


अमिताभने तद्दन व्यावसायिक ते समांतर अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांत अभिनय केला. एरवी अतिशय सुमार ठरले असते असे चित्रपट त्याने आपल्या अभिनय सामर्थ्यावर तारून नेले. त्याच्या चित्रपटांची यादी भली मोठी आहे. त्यात प्रत्येकाला त्याच्या आवडी नुसार भावणार काही ना काही आहे. माझी आवड सुरू होते ती आनंद पासून. त्याचा डॉ. भास्कर बॅनर्जी  आपल्या पुस्तकाचं प्रकाशन आणि कथेने सुरुवात करतो. तेव्हा अमिताभ डोळ्यात भरायला लागतो. पण काही वेळाने राजेश खन्ना येऊन आपल्या प्रसन्न वावराने सगळा चित्रपट भारून टाकतो. पण शेवटच्या प्रसंगात मात्र पुन्हा एकदा अमिताभ पडदा व्यापतो. त्या प्रसंगात अमिताभने जणू आपल्यातला अभिनेता चित्रपटसृष्टीला दखल घ्यायला लावला. ही आवड पुढे वाढत गेली ती ' कल एक और कुली उन्हे हफ्ता देने से इन्कार करने वाला है..., तुम लोग मुझे उधर ढूंढ रहे हो, और में तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं.. , में आज भी फेके हुए पैसे नहीं उठता...' हे संवाद एका बेदरकार आत्मविश्वासाने, थंड नजरेने म्हणणाऱ्या दीवार मधल्या विजयपाशी. ती आवड तशीच पुढे जाते अमर अकबर अँथनी मधल्या अँथनीपाशी. अमर (विनोद खन्ना) कडून बेदम मार खाऊन आल्यानंतर दारूच्या नशेत आरशातल्या आपल्या प्रतिमेला मलमपट्टी करणारा अँथनी, हा प्रसंग हा अभ्यास करावा असा अभिनयाविष्कार आहे. तत्कालीन चित्रपटांतील काहीशा एकसारख्या कथानकांच्या पार्श्वभूमीवर चासनाला
खाण दुर्घटनेवर आधारित काला पत्थर मधला विजय अधिक आवडू लागतो. पुढे अमिताभच्या सुमार चित्रपटांच्या काळातील पत्नीवरील बलात्काराचा सूड घेणारा डेव्हिड आणि त्याचाच मुलगा विजय अशा दुहेरी भूमिका असणारा चित्रपट आखरी रास्ता आवड अधिक वाढवतो.

ही आवड अधिकाधिक वाढत असताना खुदा गवाह, सूर्यवंशम वगैरे चित्रपट समोर येतात. कुठेतरी प्रतिमेला धक्का बसतो. पण मग पुन्हा समोर येते ती दमदार सेकंड इनिंग. ' लगान, जोधा अकबर ' ची कथा त्याच्या आवाजात उलगडते. खाकी मधला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी समोर येतो. सरकार मधला सुभाष नागरे आणि ' नो... अपने आप में एक पुरा वाक्य होता हैं...' म्हणणाऱ्या पिंक मधल्या अॅडव्होकेट सेहगल पर्यंत येत त्याची प्रतिमा अधिक मोठी होत जाते. नवरत्न तेल ते खेळकर अंदाजातलं ' कुछ दिन तो गुजारो गुजरात में..' अशा अनेक जाहिराती. आपल्या असण्याने, आपल्या बोलण्याने समोरच्याला धीर देणारा, बोलतं करणारा अमिताभ मला प्रचंड आवडतो.

कौन बानेगा करोडपती चे शेकडो एपिसोड त्याची साक्ष आहेत. तरीही एक प्रसंग सांगावासा वाटतो. राजीव मसंद हे चित्रपटविषयक इंग्रजी पत्रकारितेतील मोठं नाव आहे. त्यांचा ' राऊंड टेबल ' हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. वर्षभरात उत्तम काम केलेल्या कलाकारांची एकत्र मुलाखत अशा स्वरूपाचा तो कार्यक्रम. वर्ष २०१७. उडता पंजाब, पिंक वगैरे आशयसंपन्न चित्रपट येऊन गेले होते. त्या वर्षीच्या ' अॅक्टर्स राऊंड टेबल ' मध्ये रणबीर कपूर, शाहीद कपूर आणि आणखी एक दोन प्रसिद्ध कलाकार आणि नुकताच प्रकाशझोतात आलेला दलजीत दोसांज आणि अमिताभ होता. दलजीत पंजाबी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय आणि गायानामुळे सुपरस्टार आहे. पण  हिंदी चित्रपट सृष्टीत काहीसा नवखा असलेला दलजीत दबून गेलेला होता. राजीव मसंद प्रत्येकाला त्यांचे चित्रपट, भूमिकेची तयारी वगैरे प्रश्न विचारत होते. इतर कलाकार फर्ड्या इंग्रजीमध्ये उत्तरं देत होते. दलजीत मात्र दबकत, माझ्याकडे येणारं काम मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो, असं उत्तर देत होता. त्यावेळी पुढला प्रश्नाचा ओघ रोखत अमिताभने ' आप जो काम कर रहे हैं, वह उत्कृष्ट कर रहे हैं! ऐसे ही दिल लगाकर काम करते रहे..' असं म्हणत कौतुक, धीर, आत्मविश्वास दिला. भरून आलेल्या डोळ्यांनी, नम्रपणे हात जोडत दलजीत ने केलेल्या या कौतुकाचा स्वीकार हा अमिताभच्या सुसंसकृतपणा ्चा उत्कृष्ट नमुना होता.



आपला अभिनय, आपला आवाज हा एक ब्रँड आहे आणि त्याचा व्यावसायिक तसेच समाजोपयोगी वापर अमिताभने यथायोग्य केला आहे. गुजरात पर्यटन असो की ' दो बूँद जिंदगिके..' अशी पोलिओ लसीकरण जाहिरात असो की सध्याची स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात असो. आपला ब्रँड त्याला अभ्यासाची, सुसंस्कृत वावराची नैसर्गिक जोड मिळाल्यामुळे अमिताभ अधिकच आवडायला लागतो. वेळेच्या बाबतीत काटेकोर, अत्यंत व्यावसायिक अशा हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत दुर्मिळ, महान अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवडण्यात आलं आहे. पुरस्कार मिळत जातात पण लाखो लोकांच्या मनातील प्रतिमा हा खूप मोठा पुरस्कार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीच्या महानायकाला सलाम!!

Comments

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं