Skip to main content

Indian Society

भारतीय समाज: एक हिरो 



        हमे ऐसे लोग चाहिए,  हिरोका वेट ना करे... आर्टिकल १५ या चित्रपटातला हा एक संवाद. भारतात तयार होणाऱ्या शेकडो चित्रपटांपैकी एका चित्रपटातला संवाद. जितकं खोलात शिरत जावं तितकं जास्त आशयघन वाटायला लागतो. चित्रपटाचं नाव आर्टिकल १५. भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वपूर्ण घटकातील, म्हणजेच मूलभूत हक्कांमधील महत्वाचं कलम. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचे ठिकाण यावरून कुठल्याही व्यक्तीविरुद्ध भेदभाव केला जाऊ नये. याच सर्व घटकांच्या आधारावर कुठल्याही व्यक्तीला सार्वजनिक पाणवठ्याचा वापर, दुकाने, मनोरंजनाची साधने, नदीचे घाट यांचा वापर करण्यावर प्रतिबंध घालू शकणार नाही. भारताची राज्यघटना तयार होत असताना सार्वजनिक पाणवठे, मनोरंजनाची साधने, सरकारी वित्त पुरवठ्यातून उभी राहिलेली सार्वजनिक सभास्थाने इत्यादींचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागला. कारण चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा इतिहास ताजा होता. भारताच्या सुदैवाने चवदार तळे सत्याग्रहाचा अग्रणी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत महत्वपूर्ण अशा मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी होता. घटनासमितीने एकमताने दिलेल्या संमतीनंतर कलम १५,१६ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. तत्कालीन अस्पृश्य समाजाला संघटित करणारा त्यांना हरिजन, बहुजन नाही तर 'जन' बनवण्याच्या दृष्टीने विचार मांडणारा, चळवळ उभारणारा, समाजातील प्रत्येकला एक 'हिरो' बनवण्यासाठी झटणारा असामान्य माणूस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतःच एक हिरो झाले, देवत्वाला पोचले. भारतीय समाजमनचाच हा  दोष असावा. कारण भारताच्या इतिहासात 'हिरो का वेट' न करणारा समाज फार कमी वेळा उभा राहिला आहे.
 
उत्तर भारताचा बहुतांश भाग मुस्लिम आक्रमणापुढे शरणागत झालेला होता. जुलमी इस्लामी राजवट हेच आता प्रारब्ध, असे मान्य करून जनता तीर्थयात्रा महसूल, जिझियाच्या अंमलाखाली जगत होती. त्यावेळी दक्षिण भारतात एक आक्रमक प्रतिक्रिया केवळ एतद्देशीय म्हणून हिंदू असं नाही तर 'भारतीय शासन, सामाजिक, सांस्कृतिक' परंपरा रक्षणासाठी सतत उभी ठाकत होती. उत्तर पूर्व भारतातील आहोम राजवट तर मुस्लिम आक्रमणापुढे कायमच विजयी होत आली. दक्षिण भारतात यादव, होयसळ आणि काकतीय साम्राज्ये उभी राहिली. अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याच्या एका तडाख्यानिशी ती कोलमडून पडली. या साम्राज्यांच्या पाडावानंतर अगदी थोड्या काळात विजयनगरचे साम्राज्य उभे राहिले. १५६५च्या तालिकोटच्या लढाईनंतर विजयनगरचे साम्राज्य हे स्वरूप संपुष्टात आले. विजयनगरचे साम्राज्य हे स्वरूप संपुष्टात आल्यानंतरही त्या राज्याची विखुरलेली रूपे दक्षिण भारतात सर्वत्र होती. १५६५ ते १६४५ पर्यंत इस्लामी राजवट स्थिरावली असली तरी त्यांना हिंदू पाळेगारांचा सतत सामना करावा लागला. 

१६४५ पासून पश्चिम भागात सह्याद्रीच्या प्रदेशात केवळ प्रतिक्रियाच नाही तर राज्यस्थापनेची सुरुवात दिसून येते. ही राज्यस्थापना समाजातील 'हिरो' जागवणारी ठरली. कारण हा सामाज्यस्थापनेचा उद्योग 'हे राज्य व्हावें ही श्रींची इच्छा' या भावनेतुन होता. म्हणून शिवाजीची राज्यस्थापना आणि पुढचा लढा, साम्राज्यविस्तार ही केवळ शिवाजी या माणसाची किंवा भोसले घराण्याची कल्पना आणि जीवनमरणाचा लढाई न उरता प्रत्येक सामान्य माणसाची झाली. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक पराक्रमी राजघराणी झाली. पण परचक्राच्या एखाद्या तडाख्याने उद्धवस्त झाली. नामशेष झाली. पण शिवाजीचे राज्य पराजयातही टिकून राहते. विजयात अधिक वाढते. आजवरची भारतीय साम्राज्ये विजयानंतरही दुबळी बनत आणि पराभवात थेट नामशेष होत. आजवरच्या भारतीय राज्यांच्या इतिहासात, शत्रू राज्यात खोलवर येत असे, लढायांमुळे राज्याचेच नुकसान होत होत असे. शिवाजीने ही परंपरा बदलली. शत्रुसैन्याचा प्रजेला कमीतकमी त्रास होईल अशी युद्धभूमी निवडणे. प्रजेला कमीत कमी त्रास होईल अशी व्यूहरचना करणे ही परंपरा शिवाजीने सुरु केली. अशा अनेक घटकांमुळे शिवाजीचा स्वराज्यस्थापनेच्या उद्योग जनतेला आपला वाटला. म्हणूनच कोणी बळकट राजा नसताना, संपत्ती नसताना, सैन्य नसताना जनता औरंगजेबाशी लढा देऊ शकली. शिवाजीने आपल्या उक्ती, कृतीने समाजातला 'हिरो' जागवला. ही भावना जेव्हा क्षीण झाली तेव्हा ते अधःपतन भारतीय शासकापेक्षा परकीय इंग्रज बरा या पातळीपर्यंत येऊन पोचले. 
          
भारतीय स्वातंत्र्यलढा हा देशाच्या इतिहासातील दैदिप्यमान पान आहे. या स्वातंत्र्यलढ्यातील पहिला मोठा संग्राम झाला तो १८५७चा. उत्तर भारत या स्वातंत्र्यसंग्रामात पेटलेला असला तरी महाराष्ट्र, दक्षिण भारत मुख्यतः अनभिज्ञच होता. १८४८-४९ दुसऱ्या शीख-इंग्रज युद्धात इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढलेले शीख, १८५७ मध्ये इंग्रजांच्या बाजूने भारतीय स्वातंत्र्यसेनानींच्या विरुद्ध लढले. १८५७चा स्वातंत्र्यसंग्राम अयशस्वी होण्याची अनेक कारणे सांगितली जाऊ शकतात पण त्यातले मुख्य कारण विषयाला धरून असल्यामुळे नमूद करणे आवश्यक आहे ते म्हणजे त्या लढ्यामागचा विचार लोकांमध्ये पोचला नाही. पुढल्या काळात भारतीय समाज आधुनिक शिक्षण घेत होता. पुणे सार्वजनिक सभा, इंडियन नॅशनल असोसिएशन, मद्रास महाजन सभा अशा  संस्था उभारत होता. 

संविधानिक मार्गाने आपल्या हक्कांची मागणी करतो आहे. पण त्यात जनतेचा सहभाग टिळकांच्या आगमनानंतर दिसतो. तेल्या-तांबोळ्यांचा नेता अशा शब्दांत सनातनी लोकांनी टिळकांची संभावना केली असली तरी स्वातंत्र्यलढ्याचा विचार सामान्य लोकांमध्ये घेऊन जाण्यात टिळक यशस्वी होऊ लागल्याचे ते लक्षण होते.  स्वातंत्र्याची चळवळ हाती असलेल्या साधनांनिशी लोकांमध्ये घेऊन जाण्याची सुरुवात टिळकांनी केली असली ती खऱ्या अर्थाने जनमानसाची चळवळ झाली ती गांधीजींच्या आगमनानंतर. क्रांतिकारी चळवळ खूप थोड्या लोकांकडून प्रचंड त्यागाची अपेक्षा करत होती तर गांधीजी प्रचंड संख्येने असणाऱ्या लोकांकडून खूप थोड्या त्यागाची अपेक्षा करत होते. या छोट्याशा त्यागातून गांधीजींनी प्रत्येक सामान्य माणसातला 'हिरो' जागा केला होता. म्हणूनच १९४२च्या 'छोडो भारत' चळवळीत जवळजवळ सर्व प्रमुख नेत्यांची धरपकड झाल्यानंतर सामान्य जनतेने आपापल्या वकुबानुसार आपापल्या पातळीवर चळवळ उभारली. त्यातूनच पुढल्या काळात जनतेतून 'हिरो' निर्माण करू शकणारे जयप्रकाश नारायण पुढे आले. 
           
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींनी एक भाकीत, विधान केले होते. स्वतंत्र भारतातील सरकारांनी योग्य कारभार केला नाही तर स्वातंत्र्यात  जन्माला आलेली पिढी सरकारविरोधात बंड करून उठणार. स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य चळवळीनंतरचा हनिमून पिरिअड संपल्यानंतर बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार, काळा बाजार, समाजवादी समाजरचनेच्या नावाखाली तयार झालेल्या मक्तेदाऱ्या, महागाई या विरोधात खरोखरच स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीने आंदोलन सुरु केले. १९७१ च्या युद्धाचा, राष्ट्रवादी वातावरणाचा, भारताच्या फाइनेस्ट आर (Finest Hour) चा काही परिणाम झाला नाही. अर्थविचार, रोजच्या जगण्यातील समस्या त्यातच १९७२ चा भीषण दुष्काळ हे  प्रभावी ठरत गेले. गुजरात, बिहार मधील विद्यार्थ्यांच्या पातळीवर सुरु झालेले 'नवनिर्माण आंदोलन' देशव्यापी पसरले. देशात सामाजिक, राजकीय घुसळण मोठ्या प्रमाणात झाली. व्यवस्थेला प्रश्न विचारणारी, पेटून उठून रस्त्यावर उतरणारी नवी पिढी आली. या नवनिर्माण आंदोलनाचा पुढचा अध्याय म्हणजे आणीबाणी. त्यांनतर प्रथमच देशात काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत झालेला पराभव या घटना तरुण पिढीतला, तत्कालीन समाजातला 'हिरो' जागा झाल्यामुळे आणि तो रस्त्यावर उतरल्यामुळे झालेला बदल होता. बरीचशी शांततामय आणि लोकशाही मार्गाने झालेली ती एक क्रांती होती. नवनिर्माण आंदोलनातील अनेक हिरो ठरलेले तरुण नेते पुढे राजकारणातील नग आणि भ्रष्टाचार शिरोमणी म्हणून ओळखले जाऊ लागले ही गोष्ट निराळी. राजकीय आंदोलनातून पुढे येणारे नेतृत्व करंटेच निघावे अशी परंपराच जणू यापुढे सुरू झाली. 
             
भ्रष्टाचार, शासकीय पातळीवर अनागोंदी, सततचे दहशतवादी हल्ले यामुळे आलेली असुरक्षितता, देशाला हादरवून सोडणारे निर्भया प्रकरण (अशी अनेक निर्भया प्रकरणे दुर्दैवाने अजूनही घडत आहेत. ) जनतेच्या मनात खदखदत असलेला असंतोष अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या निमित्ताने दिसून आला. शहरा-शहरात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला. या आंदोलनाचा एक परिपाक आम आदमी पक्ष नावाचा ढोंगी, संधीसाधू नेत्यांचा गोतावळा म्हणून समोर आला तर दुसरा २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताबदलात दिसून आला. २०१४ सालचा तो सत्ताबदल अनेकार्थांनी महत्वाचा होता. त्यानंतर नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. २०१४ साली निवडून आलेले भाजप प्रणित एनडीए सरकार पुन्हा एकदा अधिक बहुमताने सत्तेत आले. नव्या प्रणालीमध्ये देश स्थिरावू पाहत आहे. सध्या तरी देशासमोर कोणाला आवडो न आवडो, पण एक लोकप्रिय नेता आहे. एकंदरच व्यक्तिपूजक असणारा भारतीय समाज सध्या त्या नेत्याला आपला 'हिरो' मनात आहे. तरीही भारतीय समाज योग्य वेळी आपल्यातला 'हिरो' जागवतच असतो. अशिक्षित, असंस्कृत समजल्या गेलेल्या भारतीय समाजाने स्वातंत्र्य लढ्यात, नवनिर्माण आंदोलनात, आणीबाणीच्या लढ्यात आणि अशा कित्येक प्रसंगी आपल्यातल्या हिरोचे दर्शन घडवले आहे. ते रस्त्यावरच्या आंदोलनाची असो की मतपेटीतून भारतीय समाज हिरो म्हणून पुढे आला आहे. भारतीय समाज व्यक्तिपूजक असला तरी त्या देवत्वावर बसवलेल्या व्यक्तीला त्याची जागा दाखवायला मागेपुढे बघत नाही. 'ऐसे लोग चाहिए जो हिरो का वेट ना करे..' हे खरेच आहे कारण हे लोग स्वतःच एक हिरो आहेत. गरज आहे वेळ येताच जागवण्याची.

पूर्वप्रसिद्धी: दैनिक ' राजदंड ' दिवाळी अंक.


Comments

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं