१९१७
महायुद्धाची भीषणता आणि उलटणारा
वेळ हाच कसा वैरी होतो याची कथा
दोन महायुद्ध. जगाच्या राजकारणाचे, समाजकारणाचे, अर्थकारणाचे पाट बदलणारे. पहिल्या महायुद्धाची कारणे शोधू तितकी कमी इतकी त्यात गुंतागुंत आहे. त्याच्या कारणांचा वेध घेत गेलो तर युरोपच्या राजकारणात किमान १०० वर्षे मागे जावे लागते. जर्मनी, इटलीचे एकीकरण, वसाहतवादी स्पर्धा, बिस्मार्कचे राजकारण, महत्वाकांक्षा यातली प्रचंड गुंतागुंत ते सर्बियाचा राजपुत्र फ्रान्झ फर्डिनांडची हत्या हे तात्कालिक कारण असा मोठा पट त्यात आहे. जितका मोठा पट युद्धामागील कारणांचा आहे तितकाच मोठा पट प्रत्यक्ष युद्धाचा आहे. किंबहुना खूप कमी कालमर्यादेत प्रचंड उलथापालथ महायुद्ध काळात झाली आहे. पहिल्या महायुद्धा मागील कारणांची पार्श्वभूमी मोठी असली तरी दुसऱ्या महायुद्धामागे इतर कशाहीपेक्षा पहिले महायुद्ध हेच एक मोठे कारण होते. जगाचे पाट बदलणाऱ्या या घटनाक्रमांनी हॉलीवूडला अचाट, सुंदर युद्धपट करण्यासाठी हजारोंच्या संख्येत विषय आयते तयार करून ठेवले आहेत. त्यात चार्ली चॅप्लिनच्या 'द डिक्टेटर' पासून ते ताज्या १९१७ पर्यंत नितांत सुंदर आणि युद्धपट किंवा एकूणच चित्रपट क्षेत्रातले मैलाचे दगड ठरतील असे चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यातल्या काही चित्रपटांनी थेट ऑस्कर पर्यंत धडक दिली. ताजा '१९१७' देखील यंदाच्या ऑस्करच्या शर्यतीत आहे.
पहिले महायुद्ध. युरोपीय सत्ता एकमेकांविरुद्ध ठाकल्या. सुरुवातीला कैसरच्या जर्मनीची सरशी झाली. पण अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर युद्धाचा रंग पालटला. जर्मन सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली. माघार घेत असतानाही ठिकठिकाणी शत्रू सैन्यासाठी सापळे रचून ठेवले होते. अशाच एका युद्धभूमीवर जर्मन सैन्याने माघार घेतली आहे. तेव्हा जर्मन सैन्याला अधिक मागे रेटण्याचा उद्देशाने कर्नल मॅकेंझीच्या नेतृत्वाखालील तुकडी दुसऱ्या दिवशी सकाळी हल्ला करणार आहे. पण या युद्धभूमीपासून काही अंतर अलीकडे असलेल्या जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला जर्मन सैन्याची माघार हा एक सापळा आहे हे लक्षात येते. मॅकेंझीच्या तुकडीने हल्ला केला तर ती तुकडी आयतीच सापळ्यात अडकणार आहे आणि हकनाक अनेक जीव जाणार आहेत. तेव्हा जनरल हुद्द्याचा अधिकारी दोन धाडसी कॉर्पोरल हुद्द्याच्या जवानांना उद्या होणारा हल्ला थांबवण्याची आज्ञा घेऊन कर्नल मॅकेंझी पर्यंत पोचवण्याचा कामगिरीवर पाठवतात. युद्धभूमी, पहारे, गस्ती, युद्धासाठीचे चर, खंदक इत्यादी सर्व पार करत त्यांना कर्नल मॅकेंझी पर्यंत पोचायचं आहे. वेळ मर्यादित आहे, सैनिकांच्या एका तुकडीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. कर्नल मॅकेंझीच्या तुकडीत या दोघांपैकी एकाचा भाऊ आहे. '१९१७' या सिनेमाची कथा म्हणावी तर ती एवढीच आहे. पण ती पडद्यावर मांडत असताना युद्धाची भीषणता, मानवी स्वभावातली गुंतागुंत तपशीलवार घेतली आहे. त्या दोघांपैकी एक सैनिक टॉम, कामगिरीवर असताना कामी येतो. माणूस मेल्यानंतर मानवी त्वचेच्या रंगात होणारे बदल याचा ज्या तपशिलात जाऊन विचार केला आहे आणि मांडणी केली आहे त्याला खरोखर सलाम! मुळात कथेचा जीव लहान आहे पण त्याची उणीव पटकथेच्या तपशीलवार मांडणीत भरून काढण्यात आली आहे.
हा चित्रपट एक भव्य दिव्य अनुभव आहे. प्रसंगानुरूप येणारे मोजके पण प्रभावी संवाद अतिशय उत्कृष्ट आहेत. संवादांऐवजी दृश्यमानतेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. युद्धाची भीषणता आणि उलटणारा वेळ कसा वैरी होतो याची कथा पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आवर्जून पाहावा असाच आहे. सेव्हिंग प्रायव्हेट रायन, डंकर्क वगैरे चित्रपटांच्या मांडणीच्या जवळपास जाणारा अनुभव देणारा हा चित्रपट आहे. युद्धाचा अनुभव घेण्यासाठी एकदा पहावाच असा १९१७.
Comments
Post a Comment