Skip to main content

आर्य: चाणक्याच्या जीवनावरील चित्तथरारक कादंबरी

आर्य 
- वसंत पटवर्धन 

प्रजासुखे सुखं राज्ञ:। प्रजनांच हिते हितम।
नात्मप्रियं हितं राज्ञ: प्रजानां तु प्रियं हितम।।
तस्मात नित्योतथीतो राजा कुर्यादर्थानुशासनम 
अर्थस्य मुलमुत्थानम अनर्थस्य विपर्यय: 
अनुथाने ध्रुवोनाशः 

                या श्लोकात आर्य चाणक्याने राज्यकारभार आणि आदर्श राजाने कोणती तत्वे पाळत राज्यकारभार करावा याचे सार वर्णन केले आहे. राज्यकारभार, दुर्गव्यवहार, अर्थव्यवहार, गुप्तहेर यंत्रणा, युद्ध कल्पना, दंडनीती अशा अनेक राज्यव्यवहार संबंधी प्रश्नांवर अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शनपर ग्रंथ आर्य चाणक्याने सिद्ध केला आहे. तो ग्रंथ, त्यातील सूचना आजही उपयोगात आणल्या जातात. राज्यव्यवहारासोबतच कंपनी व्यवस्थापनासकट अनेक क्षेत्रात चाणक्याचा हा ग्रंथ २५०० वर्षांनंतरही उपयुक्त ठरत आहे. युरोपीय इतिहासात अत्यंत तर्ककठोर, व्यवहारी असा विचार मांडणारा विचारवंत आहे तो मॅकिआव्हेली. पण तुलनाच करायची झाली तर निःसंशय चाणक्य कित्येक योजने पुढे आहे असे जाणवते. तो सर्वसामावेशक ग्रंथ म्हणजेच अर्थशास्त्र आणि त्याचा रचियता आर्य चाणक्य. चाणक्याचा हा ग्रंथ आता उपलब्ध आहे. पण चाणक्य ही व्यक्ती, संस्था यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. किंबहुना त्या काळाबद्दलच फारशी माहिती उपलब्ध नाही. भारतीय अशी साधने उपलब्ध असू शकली असती ती कदाचित नालंदा, तक्षशिला वगैरे विद्यापीठांच्या ग्रंथालयांत असली असती. पण ही विद्यापीठे नष्ट करण्यात पराक्रम मानण्यात धन्यता वाटणाऱ्या आक्रमकांमुळे हा अमूल्य साठा नष्ट झाला असावा. त्यामुळेच जी काही माहिती उपलब्ध होते ती प्रामुख्याने ग्रीक साधनांतून आणि मुद्राराक्षस सारख्या अद्वितीय नाट्यकृतींतून. ठोस माहितीची अनुपलब्धता असल्यामुळेच चाणक्यासारख्या व्यक्तीवर कादंबरीसारखा साहित्य प्रकार सिद्ध करणे ही प्रचंड अवघड गोष्ट आहे. ती आजवर केवळ दोन सिद्धहस्त लेखकांना साधली आहे. त्यातली एक आहे भा. द. खेर लिखित 'चाणक्य' आणि दुसरी वसंत पटवर्धन लिखित 'आर्य.' 

                प्रत्यक्ष कादंबरीला सुरुवात करण्यापूर्वीच लेखकाने कुठल्या साधनांचा घटनांची संगती लावण्यासाठी उपयोग केला आहे ते स्पष्ट केले आहे. त्यात विशाखदत्ताचे मुद्राराक्षस, सेल्युकस निकेटरचा ग्रंथ, पुरातत्त्वीय साधने इत्यादींचा उपयोग केला आहे. कथानकाची सुरुवात चाणक्य, म्हणजेच विष्णुगप्त, तक्षशीलेत असल्यापासून होते. तिथून कथानक विष्णुगुप्तांच्या आठवणींच्या रूपाने गतकाळात जात मगध राज्यातील चणक गाव, तेथील बालपण येथे घेऊन जाते. तिथपासून तक्षशिला विद्यापीठ, तेथील शिक्षण आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुकुलाची आचार्यांनी विष्णुगुप्ताच्या हाती गुरुकुलाची जबाबदारी देणे हा घटनाक्रम येतो. त्याचवेळी पश्चिम सीमेवरून जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडरची स्वारी आर्यावर्ताच्या सीमेवर आली आहे. तक्षशिलेचा राजा गंभीराला त्याच्याच मुलाने, अंभीने बंदिगृहात घालून राज्य ताब्यात घेतले आहे. आर्यावर्तातील केकय प्रदेशाचा राजा पौरव (पर्वतेश्वर) हा बलाढ्य राजा आहे. त्याची मुलगी अपूर्वा रूपवती आहे त्याचप्रमाणे शूर-राज्यकारण चतुर आहे. अंभीला पौरवाचा पराभव करायचा आहे, त्याचबरोबर अपूर्वेला आपली राणी करण्याची महत्वाकांक्षा आहे. त्यासाठी अंभी अलेक्झांडरशी युती करतो. पुढे अलेक्झांडर आणि पौरवाचे युद्ध आहे. युद्धानंतर अलेक्झांडरने पौरवाला दिलेली राजाची वागणूक हा घटनाक्रम पुढे येतो. तिथून कथेचा पट विष्णुगुप्तासह मगधाची राजधानी पाटलीपुत्रात येतो. तिथे विष्णुगुप्ताला आचार्य पदवी मिळणे, धनानंदाच्या दरबारात अपमान आणि धनानंदाचे राज्य संपवण्याची प्रतिज्ञा येते. विष्णुगुप्त तिथून बाहेर पडतात, किरात राज्यात येतात. तेथे त्यांचा तक्षशिलेतला शिष्य चंद्रगुप्त राजा झालेला आहे. या चंद्रगुप्ताला हाताशी धरून आर्य चाणक्य धनानंदाचे साम्राज्य उलथवून चंद्रगुप्ताला सम्राट करतात. असे एकंदर कथानक आहे. ही कथानकाची संगती, घटनाक्रम मांडण्यासाठी लेखकाने विष्णुगुप्त, चंद्रगुप्त, मेगॅस्थिनीस (मेघास्थी ), अमात्य राक्षस, अपूर्वा, तारिणी अशा प्रमुख पात्रांच्या तोंडून त्यांच्या दृष्टिकोनातून घटनाक्रम मांडला आहे. अशा पद्धतीची मांडणी शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय आणि युगंधर मध्ये केली आहे. मांडणीची ही पद्धत एकाच वेळी अत्यंत रोचक वाटू शकते तर दुसऱ्या बाजूला कंटाळवाणी देखील वाटू शकते. पण त्यामध्ये हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ही यामुळे एकाच घटनेकडे कोण कुठल्या दृष्टिकोनातून पाहत होते. पाटलीपुत्रावर हल्ला करून नंद साम्राज्य उलथवून टाकणे यात चंद्रगुप्त, विष्णुगुप्त यांना विजय वाटत असला तरी नंदाचे अमात्य राक्षस यांच्या दृष्टीने ती वेगळी गोष्ट होती. या मांडणीमुळेच कथानकाचा आवाका वाढतो त्याचप्रमाणे दृष्टीकोनाची परिपूर्णता मिळते. 

                     घटनाक्रम मांडत असतानाच अर्थशास्त्रातील विचार श्लोक हे विष्णुगुप्ताचे मनन या स्वरूपात मांडण्यात आले आहेत. त्याचबरोबर विष्णुगुप्त आणि त्यांची सखी तारिणी यांच्यातील संवादाद्वारे जैन-बौद्ध पंथांचे अस्तित्व, त्या मुळातील उदात्त पंथविचारातील वाढता स्वैराचार, वैदिक कर्मकांडांवर टीका करत, ते नाकारत वेगळा विचार मांडलेल्या या पंथांनी आपले वेगळे असे कर्मकांड निर्माण केले, अशा पद्धतीचा सखोल विचार मांडला आहे. वैदिक मार्गातील चार आश्रमांची संकल्पना त्यांचे महत्व आणि जैन-बौद्ध तत्वज्ञानातील वैराग्याची अवास्तवी आणि अव्यवहार्य भावना यावर विष्णुगुप्ताचे विचार-टीका मांडण्यात आली आहे. त्याचप्रमाणे युद्धाचे प्रकार, ग्रीक युद्ध साधने आणि भारतीय युद्ध पद्धती, चतुरंग सेना यातील फरक अलेक्झांडर-पौरव लढाईचे विस्तृत आणि तपशीलवार वर्णनाद्वारे मांडण्यात आला आहे. त्यावरून ती लढाई ते पानिपतची तिसरी लढाई भारतीय युद्ध मानसिकतेत काहीही फारसा फरक नाही हेच दिसून येते. स्वतः चंद्रगुप्त आणि शिवाजी महाराज हे यात सणसणीत अपवाद. म्हणूनच काही वर्षांपूर्वी एका लेखकाने चाणक्याच्या स्वप्नातील आदर्श राजा दोन हजार वर्षानंतर शिवाजीच्या रूपात साकार झाला असे लिहिले होते. पाटलीपुत्र काबीज करण्यासाठी चंद्रगुप्ताने विष्णुगुप्ताच्या मार्गदर्शनाखाली केलेला कूटयुद्ध नीतीचा अवलंब अतिशय तपशिलाने मांडण्यात आला आहे. 

                या कादंबरीतील सर्वात आकर्षक आणि चित्तथरारक भाग म्हणजे चंद्रगुप्ताचा पाटलीपुत्र विजय ते त्याच्या राज्याचे स्थिर होणे हा काळ. नंदाचे अमात्य राक्षस चंदनदास श्रेष्ठींच्या तळघरात लपून बसले आहेत, त्यांची नंद साम्र्याज्याप्रती असलेली स्वामीनिष्ठा त्यांना हा बदल सहजासहजी स्वीकारू देत नाही. त्यावेळी अमात्यांची गुप्तहेर यंत्रणा, त्यांनी चंद्रगुप्ताला विषप्रयोग करून मारण्याचे प्रयत्न आणि चाणक्याची चतुर प्रतिगुप्तहेर यंत्रणा यांनी अमात्यांचे हाणून पाडलेले सर्व बेत हा घटनाक्रम ज्या ताकदीने मांडण्यात आला आहे ते केवळ अफलातून आहे. ही भन्नाट कादंबरी वाचत असताना कायम गेम ऑफ थ्रोन्स डोळ्यासमोर येत होते. गेम ऑफ थ्रोन्स हा काल्पनिक आणि बरीचशी अतिरंजित कथा आहे. पण शह-काटशह, युद्ध, समाजव्यवस्था यांचा भारतीय खेळ हा खराखुरा इतिहास आहे. चाणक्याचा अद्वितीय ग्रंथ 'अर्थशास्त्र' ही वस्तुस्थिती आहे. आज कितीही नाकारले तरी ही गोष्ट खरी आहे की चित्रपट-मालिका ही सर्वमान्य कला  आहे. अशा पद्धतीचे कथानक नुसते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहता आले आणि ते भारतीय बॉलीवूडी चौकटीत नाही तर अधिक वास्तववादी पद्धतीने तर आपलाच देदीप्यमान इतिहास अधिक समर्थ पद्धतीने पुढे येण्यास लोकमान्य होण्यास मदत होणार आहे. भन्नाट कथानक, गुंगवून टाकणारी मांडणी, ओघवती भाषा यासाठी एकदा तरी वाचावीच अशी एका महामानवांची गाथा... आर्य!

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...