Written by a South Indian writer way back in 1960-61 in 'Hindu' Eminent thinker and writer Narhar Kurundkar has quoted this article in magnificent foreword i.e. a letter written to Author of 'Shriman Yogi' Ranjit Desai.
लेखक म्हणतो, 'शिवाजी हे महाराष्ट्रीयांचे दैवत आहे. त्याला परमेश्वरापेक्षा मोठा ठरवताना महाराष्ट्रीयांना थोडाही संकोच वाटणार नाही. मानवजातीच्या पाच हजार वर्षात एवढा मोठा राज्यकर्ता झाला नाही, ही कल्पना महाराष्ट्रीयांनाकेवळ अल्पोक्तीची वाटते. या स्तुतीगीतात मी भागीदार होऊ इच्छित नाही. म्हणून मी, हा माणूस म्हणून किती मोठा होता, हे पाहण्याऐवजी, तो किती छोटा होता, हेच पाहू इच्छितो. या दृष्टीने पाहताना पहिली गोष्ट ध्यानात येते, ती म्हणजे, शिवाजीने एक राज्य निर्माण केले. सर्व भारतभर सगळी मिळून ज्ञात इतिहासातील घराणी ५०० तरी असतील. त्या सर्वांना निर्माते होते. त्यापैकी एक शिवाजी. पण ज्यांनी राज्य निर्माण केले, त्यांना राजकीय गोंधळामुळे राज्य स्थापन करण्याची संधी मिळाली. नालायक राजाच्या सुभेदारांनी केंद्र सत्तेचा दुबळेपणा पाहून स्वतंत्र व्हावे आणि मध्यवर्ती सत्तेला काहीही करता येऊ नये, नालायक सेनापतीने पदच्युत करावा आणि स्वतः राज्य निर्माण करावे असाच सर्व संस्थापकांचा मार्ग असतो. शाही सेना, कारभार चालवणारा अधिकारी वर्ग या मंडळींना आयताच तयार मिळतो. पण ज्याला शून्यातून सारे निर्माण करावे लागले, कोणत्याही राजसत्तेच्या हजारोंच्या फौजा वापरण्यास मिळाल्या नाहीत, ज्याने राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करताच प्रबळ शत्रूची चढाई झाली, शेजारच्या सत्ता उतारात नसून चढत्या वैभवात होत्या, विजापूर आणि गोवळकोंडा यांच्या भर वैभवाचा तो काळ. इकडे शिवाजी विजापूरचा प्रदेश कातरून आपले राज्य निर्माण करत होता. त्याच्या १०-१५ वर्षे विजापूरकरांनी अर्धी निजामशाही गिळंकृत केली आणि शिवाजीच्या काळात सगळा कर्नाटक जिंकीत आणला होता. मोंगल राज्य तर वैभवाच्या शिखरावर होते. आरंभापासून ज्याच्याजवळ कधीच शत्रूचा मैदानात पराभव करण्याचे बळ नवहते, २० वर्षे जे मिळवले, ते १६६५ साली ज्याला चार महिन्यात गमवावे लागले, तरी शेजारच्या वैभवात असणाऱ्या प्रबळ सत्तांशी झुंजून ज्याने २९ वर्षांच्या सतत परिश्रमाने राज्य निर्माण केले असा शिवाजी आहे. भारताच्या राज्यसंस्थापकांत या मुद्द्यावर शिवाजीची तुलना कोणाशी करावी, हे समजले की, तो किती लहान आहे, हे सांगणे सोपे होऊन जाते.
हिंदूंच्या राज्याचे काही विशेष आहेत. शत्रूशी लढताना त्यांचे विजय होत नाहीत, असे नाही. विजय होतातच. पण यांचा विजय झाला म्हणजे शत्रूचा बिमोड होत नाही. त्याचे राज्य कमी होत नाही. त्याचे सामर्थ्य कमी होत नाही. या विजयी राजाचे राज्य वाढत नाही. विजय मिळाला, तरी याचे सामर्थ्य खच्ची झालेले असते. ते भरून निघत नाही. म्हणून असे दिसते की, पराजयात समूळ नाश. विजयात थोडे सामर्थ्य खच्ची होऊन दुबळे होणे हा हिंदू राजांचा क्रम आहे. विजयाने राज्य वाढावे, पराजयात प्रदेश कमी झाला, तरी सामर्थ्य आणि जिद्द टिकावी, हा हिंदूंचा नवा इतिहास शिवाजीपासून सुरू होतो. दुसरी गोष्ट अशी की, हिंदू राजांना शेजारी काय चालले आहे, याची वार्ताच नसे. शत्रूने सिद्धता करावी, आक्रमणाची वेळ साधावी, हे बेसावध असावेत, शत्रू यांच्यात शे-दोनशे मैल चालून यावा, मग हे जागे होणार! लढाई यांच्यात प्रदेशात, जय-पराजय काहीही होवो. प्रदेश यांचाच बेचिराख होणार. हा हिंदूंचा इतिहास शिवाजीवर बदलतो. लढण्याआधी सावधपणा व शत्रू बेसावध असेल, तर त्याच्या मुलुखात जाळपोळ, लुटालूट हा नवा इतिहास इथून सुरू होतो. तिसरी बाब म्हणजे, हिंदू राजांनी विश्वास ठेवावा, करार करावे, शत्रूंनी दगे द्यावे, हा इतिहास बदलून, शिवाजीने दगे द्यावे व सर्वांनी थक्क व्हावे, हा इतिहास इथून दिसतो. हिंदूंच्या इतिहासात या मुद्दयावर शिवाजीची तुलना कोणाशी करावी, हा शोध चालू आहे. अशी अजून एक-दोन माणसे सापडली की, हा किती लहान आहे, हे सांगणे सोपे होऊन जाईल.
शिवाजी धार्मिक होता; पण धर्मभोळे नव्हता. कठोर होता; पण क्रूर नव्हता. साहसी होता; आततायी नव्हता. व्यवहारी होता; पण ध्येयशून्य नव्हता. उच्च ध्येयाची स्वप्ने पाहणारा स्वप्नाळूही. ही स्वप्ने वास्तवात उतरवणारा कठोर वास्तववादी हे त्याचे स्वरूप आहे. तो साधा राहत नसे. डौलदार, वैभवसंपन्न अशी त्याची राहणी, पण तो डामडौलात उधळ्या नव्हता. परधर्मसहिष्णुता त्याजजवळ होती. याबाबतीत अशोक, विक्रमादित्य, हर्ष, अकबर यांच्याशी शिवाजीची तुलना करता येणे शक्य आहे. पण सर्वांना प्रचंड जनानखाने होते. अकबराचा मीनाबाजार होता. अशोकाची तिष्यरक्षिता होती. शिवाजीने वासना मोकाट सोडलेली नव्हती, तरुण सुंदरी, रूपरत्ने आस्वादासाठी गोळा करणारी सर्व हिंदू-मुस्लिम राजांची सत्तरीपर्यंत टवटवीत राहणारी रसिकता शिवाजीपाशी नव्हती. चित्र, शिल्प, संगीत, काव्य यांना उदार आश्रय देणे, मोठमोठ्या इमारती बांधणे इतका पैसाही शिवाजीजवळ नव्हता. त्याला फुरसदही नव्हती. त्याच्या मनाचा तो कलच नव्हता. दुष्काळात लाख लोक अन्नान्न करत मरत असताना, वेठबिगार आणि कोरडे यांच्या जोरावर वीस कोट रुपये खर्चून ताजमहाल बांधणारी रसिकता अगर सगळा भारतभर देवळे, घाट, धर्मशाळा बांधण्याइतकी पुण्यपावनता शिवाजीजवळ नव्हती. तो तुमच्या-माझ्यासारखा 'पापी' व 'उपयोगितावादी' माणूस होता. रसिक अगर पुण्यवान नव्हता. खाफीखान म्हणतो, तो नरकात गेला. मलाही वाटते, तो नरकातच गेला असावा. राज्य शिल्लक ठेवण्यापेक्षा वीरमरण पत्करणारे वीरपुरुष, सेना वाढवण्यापेक्षा यज्ञ करण्यावर भर देणारे पुण्यपुरुष, यांच्या सहवासात त्याला करमलेच नसते, आणि हे सर्वजण स्वर्गात होते. अकबराने हिंदूंच्या बाबतीत उदार धोरण स्वीकारले. त्याची बरीच स्तुती करून झाली आहे. पण बहुसंख्य प्रजेला संतुष्ट ठेवल्याशिवाय स्थिर राजवटीचा पाया घालता येत नसतो, हे साधे व्यवहारज्ञान आहे. ज्यांचे शौर्य साम्राज्य निर्माण करण्याकरता होते, ते बळकट करीत होते, जे बहुसंख्य होते, कर देऊन वैभव निर्माण करत होते, त्यांना अकबराने औदार्याने वागवले आणि हिंदूंना आक्रमणाचा इतिहास नव्हता. त्यांनी मशिदींचे विध्वंस केले नव्हते. मुसलमानांच्या कत्तली केल्या नव्हत्या. त्यांच्या बायका भ्रष्टविल्या नव्हत्या. सक्तीचे धर्मांतर लादले नव्हते. ज्यांना आक्रमणाचा इतिहास नाही, ज्यांच्याकडून आक्रमण होण्याची भीती नाही, त्यांना अकबराने औदार्याने वागवले. शिवाजीच्या प्रजेत मुस्लिम बहुसंख्या नव्हती.ती त्याच्या कराचा आधार नव्हती. मुसलमानांच्या तलवारी त्याचे राज्य निर्माण करत नव्हत्या, त्यांना आक्रमणाचा इतिहास होता. तरी शिवाजीने मुसलमानांना औदार्याने वागवले. भोवतालच्या मुस्लिम राज्यांच्या भीतीने नव्हे, तर स्वयंभू औदार्य म्हणून!
या पार्श्वभूमीवर शिवाजी छोटा करून पाहण्याची माझी तयारी आहे. पण तो कुणापेक्षा छोटा ठरवावा? ते मोजमाप आहेच कुठे?
Comments
Post a Comment