Skip to main content

सवाई एकांकीकोत्सव

सवाई एकांकीकोत्सव 


महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्रात एकांकिका स्पर्धांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातही पुणे, मुंबईत आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा या नाट्य-चित्रपट सृष्टीसाठी कलाकारांची, तंत्रज्ञांची खाण ठरतात. ही कलाकारांची खाण आता मुंबई-पुण्याच्या पट्ट्याबाहेर वाढू लागली आहे. राज्य नाट्य स्पर्धा, अहमदनगर महाकरंडक, कोकणात पेण, बार्शी, औरंगाबाद, मध्यंतरीच्या काळात सकाळ करंडक आणि आता लोकसत्ता लोकांकिका ही विविध व्यासपीठे उपलब्ध आहेत. पण या सर्व चुरशीच्या स्पर्धा प्राथमिक ठराव्यात अशी एकांकिका स्पर्धा आहे ती 'चतुरंग सवाई' एकांकिका स्पर्धा. या स्पर्धेचे स्वरूपच आहे ते 'उत्तमातील सर्वोत्तम निवडण्याची स्पर्धा' असे. राज्यभरातील विविध एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिका साठी असणारा 'जयराम हर्डीकर करंडक' विजेती एकांकिका इत्यादी संघाना सवाई एकांकिका स्पर्धेत प्रवेश मिळतो. त्यानुसार चालू वर्षात सवाई एकांकिका स्पर्धेत राज्यभरातील उत्तम अशा एकांकिका त्यातील सात 'सवाई' च्या अंतिम फेरीत होत्या. ही स्पर्धा मुंबईत संपन्न होते, पुण्यातल्या प्रेक्षकांना यातील एकांकिकांचा आस्वाद घेता यावा म्हणून 'चतुरंग' ने सवाई 'एकांकीकोत्सव' आयोजित केला होता. जिथे 'सवाई एकांकिका' प्रेक्षक पारितोषिक विजेती 'ब्रह्मास्त्र', अंतिम फेरीतील स्पर्धक एकांकिका 'द कट' आणि सवाई एकांकिका प्रथम आलेली 'अ बास्टर्ड पेट्रिअट' या एकांकिका सादर करण्यात आल्या. 



सवाई प्रेक्षक पारितोषिक विजेती एकांकिका 'ब्रह्मास्त्र'. ही एकांकिका पाहिल्यानंतर तिला प्रेक्षक पारितोषिक मिळाले यात आश्चर्य असे काहीच वाटले नाही. एक प्रेक्षक म्हणून मनापासून दाद द्यावी अशीच ही एकांकिका. छोटीशी कथावस्तू आकर्षक, कलात्मक मांडणीने स्मरणीय कशी करता येते हे ही एकांकिका दाखवून देते. कोकणातील 'दशावतार खेळ' हा एक लोकप्रिय आणि त्याचबरोबर कलात्मकदृष्ट्या उत्कृष्ट कलाविष्कार. हे एका बाजूला आणि हे खेळ करणाऱ्या कलाकारांचे दारिद्र्य, त्यांच्या विवंचना, कौटुंबिक कलह एका बाजूला. यातला झगडा, एवढीच 'थीम' आहे असे म्हणू. ही थीम कुठेही लागू पडू शकते. आणि तपशील काहीसे वेगळे पण प्रत्येक ठिकाणी सुंदर कलाकृती निर्माण करता येऊ शकतात. ही थीम कलात्मकरीत्या दशावतार मंडळीतील लोकप्रिय कलाकाराच्या घरात नेली की ब्रह्मास्त्र सारखी छान एकांकिका तयार होते. राजा नेरुरकर हा लोकप्रिय कलाकार, त्याच्या जीवावर त्यांची दशावतार मंडळी चालू आहे अशी जवळजवळ परिस्थिती. पण वाढतं वय आणि ढासळती तब्येत या पार्श्वभूमीवर पत्नीने ठेवलेला, संसार की दशावतार, हा पेच पडणारा प्रश्न तिथे राजा संसाराची निवड करतो आणि त्याच्यासोबतच त्याच्या दशावतार मंडळाची घुसमट सुरु होते. पण एका कारणामुळे तो आपला निश्चय बाजूला ठेऊन पुन्हा उभा राहतो. त्यावेळी एक सुखांत अशी मांडणी राजाचे तप, वरदान म्हणून ब्रह्मास्त्र मागणे, ही पुराणातली कथा रूपक म्हणून वापरत, आधी विरोध करणारी पत्नी, त्याच्या कलेच्या वेडासाठी त्याचे 'ब्रह्मास्त्र' म्हणून पाठीशी उभी ठाकते. अशी साधारण कथावस्तू. 

आता हे कथानक मांडत असताना नेपथ्य रचना, प्रकाशयोजना, अप्रतिम अभिनय यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे संगीत याचा उत्कृष्ट वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाट्यलेखन, मांडणीमध्ये प्रवेश संपताना ब्लॅकआऊटचा प्रसंग कसा आहे त्यावर तो संपूर्ण प्रवेश प्रेक्षकांच्या मनावर किती ठसतो हे अवलंबून असते. या एकांकिकेत पहिला प्रवेश संपताना राजा घरातून पत्नीबरोबर झगडून बाहेर पडतो एक्झिट घेतो आणि लगेच कर्णाच्या वेशात एंट्री घेऊन कुंतीला युद्धापूर्वी दिलेलं वचन आणि तिची निर्भत्सना हा संवाद सादर करतो त्यावेळी ब्लॅकआऊट पूर्वीची प्रकाशयोजना आणि उभा केलेला 'मोमेन्ट' यामुळे स्पष्ट होऊन जातं की पुढे काय असणार आहे. दुसऱ्या प्रवेशाचा ब्लॅकआऊट असाच सुंदर रित्या वर जाणारा प्रसंगाचा आलेख आणि राजा बेशुद्ध पडतो तो पकडलेला मोमेन्ट. पुढे राजाची तगमग दाखवत असताना वापरलेले 'मोंटाज' केवळ अप्रतिम. इकडून माणसे विविध गोष्टी घेऊन मंचावर वावरताना दिसतात आणि अचानक आपल्यासमोर उभी राहते ती गावची जत्रा. असं करत करत एकांकिका पुढे जाते आणि आलेख वर जात जात एक सुखांत दाखवत पडदा पडतो. या सर्व खेळात अभिनय, दिग्दर्शनासोबत प्रकाशयोजना आणि संगीताचा वाटा खूप मोठा आहे. दशावतार खेळात मृदंग, पेटी आणि टाळ यांचा उत्कृष्ट वापर असतो, या एकांकिकेत त्याच वाद्यांचा वापर करत संगीत तयार केलेले आहे. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या या संघातील विद्यार्थ्यांनी ते एकांकितेसाठी खास तयार केलेले असेल तर खरोखर मनापासून दाद द्यावीच लागेल. सुरुवातील म्हणालो तसं या एकांकिकेला प्रेक्षक पारितोषिक मिळाले यात आश्चर्य काहीही नाही पण उत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिक मिळायला हरकत नव्हती. विशेषतः सवाई करंडक पटकावणारी एकांकिका पहिल्यानंतर तर तीव्रतेने जाणीव झाली. 

राष्ट्रवाद, हिटलर, नाझी अत्याचार हा महाविद्यालयीन वर्तुळातील एकांकिका करणाऱ्या गटांचा आवडता विषय आहे. त्याच त्या कथा वेगवेगळा मसाला वापरून मांडल्या जात असतात. त्याचप्रमाणे विद्यमान भारतात एक विशिष्ट पक्ष, त्यांची राष्ट्रवाद सांगणारी विचारसरणी यांवर या अशा विषयांवरीयल एकांकिकांमधून भाष्य वगैरे करण्याचे प्रयत्न होतात. भाष्य करावं. हरकत नाही पण त्यातही काही कला मूल्य आणि त्याहीपेक्षा महत्वाचं त्यात वस्तुस्थितीची गल्लत असता काम नये. कल्याण येथील दिशा थिएटर्स अँड ओमकार प्रोडक्शन्सची 'अ बास्टर्ड पेट्रिअट' ही एकांकिका वास्तविक तपशिलांच्या चुकांमुळे आणि उथळ लेखनामुळे भिडत नाही. विशेषतः ब्रह्मास्त्र या एकांकिकेने जेव्हा आपलं नाणं खणखणीत वाजवून अपेक्षा उंचावून ठेवलेल्या असताना बास्टर्ड पेट्रिअटचा उथळपणा अधिक जाणवतो. जर्मन शास्त्रज्ञ फ्रित्झ हेबर याच्या कथेवर आधारित ही एकांकिका. सुरुवात होते ती प्रयोगशाळेत हेबरने लावलेल्या अमोनियाच्या शोधाने. त्याचबरोबर पुढे जात त्यानेच शोध लावलेल्या गॅसचा वापर नाझी जर्मनीने ज्यूंना मारण्यासाठी केला. त्याने लावलेल्या शोधामुळे पहिल्या महायुद्ध काळात जर्मन शासन हेबरला कॅप्टनचा हुद्दा देते. इथेच पहिला तपशीलातला घोळ आहे आणि तिथून पुढे सर्व एकांकिका आपली प्रेक्षकांवरचा पकड सोडते. कॅप्टनचा हुद्दा देत असताना वापरलेली लष्करी टोपी, त्यावर नाझी 'हुक्ड क्रॉस' ज्याला काही कारण नसताना स्वस्तिक म्हणतात, ते आहे. त्याचबरोबर त्या प्रसंगी इतर लोक हेबरला नाझी पद्धतीचा सॅल्यूट करतात. नाझी सॅल्यूट पहिले महायुद्ध संपल्यानंतर कित्येक वर्षांनी हिटलर सत्तेवर आल्यावर वापरात आले. त्याचबरोबर हेबर आणि त्याची पत्नी क्लारा यांच्यातील देशप्रेम वगैरेवरील संवाद. गाभा पकड घेऊ शकणार होता परंतु संवाद लेखन अतिशय उथळ आणि त्यात वारंवारता होती. अभिनय देखील उथळ दिसून येत होता. तसाच आणखी एक प्रसंग म्हणजे हेबर आणि आईन्स्टाईन यांच्यातला संवाद. आजच्या काळातले संदर्भ भूतकाळात नेऊन संवाद लिहिल्यासारखे वाटत राहतात. आणि अत्यंत उथळ मांडणीमुळे पकड सुटते. ही सर्व टीका एका बाजूला आणि शेवटचा प्रसंग, हेबर इंग्लंडमधून परत जर्मनीत जाण्यास उत्सुक आहे पण त्याला त्याच्या मित्राचे पत्र आलेले आहे, ते पत्र वाचत असताना केलेला धक्कातंत्र आणि उत्कृष्ट प्रकाशयोजनेचा वापर एका बाजूला. विद्यमान काळावर भाष्य करण्याचा उथळ आणि अयशस्वी प्रयत्न असे या एकांकिकेला म्हणता येईल. 

सोमालियातील भीषण अशा फिमेल जेनिटल म्युटेशनवर जळजळीत भाष्य करणारी 'द कट' ही एकांकिका काही कारणामुळे पाहू शकलो नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करण्यात काहीही अर्थ नाही. ब्रह्मास्त्रला सवाई एकांकिका पारितोषिक मिळायला हवे होते असे ठाम मत आहे. अर्थात ते अर्धवट माहितीवर आणि 'या बास्टर्ड पेट्रिअट' च्या पार्श्वभूमीवर आहे. अंतिम फेरीतील सात एकांकिकांपैकी इतर चार एकांकिका पाहिलेल्या नाहीत. त्या जर पहिल्या तर मत बदलेल कदाचित. आहे उपलब्ध असलेल्या माहितीवरून आहे ते मत मांडले आहे. अर्थात हे वैयक्तिक मत आहे. मतभेद व्यक्त करण्याचा, खोडून काढण्याचा इतरांना अधिकार आहेच. प्रत्येकाचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हेच मर्म आहे, कलाविष्कार हे एक माध्यम तर त्याची समीक्षा हे दुसऱ्या बाजूचे माध्यम. चतुरंगचा हा उपक्रम उत्कृष्ट आहे यात मात्र कोणाचे दुमत असू नये. 

Comments

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं