केंद्रीय सत्तेचे स्थान: नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक |
"जीवन में एक बार आना लखनऊ" अशी एक उक्ती आहे. त्यात थोडासा बदल करुन असे म्हणावे वाटते की जीवन में एक बार आना दिल्ली. दिल्ली, आधुनिक भारताची राजधानी. वास्तविक या शहराची ओळख एवढीच नाही. दिल्ली हे भारताचं एक सत्ताकेंद्र थेट महाभारत काळापासून आहे. इंद्रप्रस्थ ते नवी दिल्ली हा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. दिल्लीच्या इतिहासाच्या, ऐतिहासिकतेच्या खुणा जागोजागी दिसतात. तसेच दिल्लीचा आधुनिक दिमाखही अचंबित करणारा आहे. दिल्लीत पहिल्यांदा गेलो तेव्हा अगदीच चार वर्षांचा होतो, त्या आठवणी अगदीच पुसट आहेत. यावेळी मात्र चांगलाच तळ ठोकला होता.
दिल्ली, पायाभूत सुविधांचा विचार केला तर म्हणावंच लागेल की हे महानगर भारतातल्या इतर अनेक महानगरांपासून कैक योजने पुढे गेले आहे. दिल्ली मेट्रो सेवेने नुकतीच २० वर्षे पूर्ण केली. वर्ष २००२ मध्ये अवघ्या ८ किमीच्या मार्गाने सुरुवात झालेल्या सेवेचा विस्तार आज ३४९ किमीचे राष्ट्रीय राजधानी परिसरभर पसरलेल्या जाळ्यात झाला आहे. ज्यात गुरुग्राम, गाजियाबाद, नोयडा, फरिदाबाद, बहादूरगढ अशा नजीकच्या शहरांचा देखील समावेश आहे. दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसर पायाभूत सुविधा विकासाचे नवे आयाम रचतो आहे. किफायती खर्चात, कमी वेळेत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचण्यासाठी मेट्रो हा खूप आश्वासक मार्ग आहे. या मेट्रो सेवेचा मी पुरेपूर वापर केला. मेट्रोतून प्रवास करत असताना प्रत्येक वेळी मुंबई मेट्रोचा गोंधळ, पुणे मेट्रोचा गोंधळ डोळ्यासमोर येत होता. जेवढे जाळे दिल्ली मेट्रोचे आता आहे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक मुंबई मेट्रोचे २० वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते. असो. हे न संपणारे विषय आहेत.
त्याला कारण दिल्लीत उच्चपदावर कार्यरत असलेला माझा आतेभाऊ अभिषेक दादा! त्याचा आग्रह आणि माझी ओढ यांचा संगम होत मी चांगला १५ दिवस तळ ठोकून होतो. नवी दिल्लीतील लोधी कॉलोनी या प्रतिष्ठित भागात असणारे त्याचे घर भरपूर चालणाऱ्या गप्पांचे स्थान होते. तो वयाने चांगलाच मोठा असल्यामुळे उपयुक्त जीवनावश्यक सल्ले, उपदेशही मिळाले. शिवाय त्याच्यामुळे कधी नव्हे ते मी फुटबॉल विश्वचषकातील अनेक सामने पाहिले. इतके की अंतिम सामना मेस्सीच्या विजयाची मनोमन प्रार्थना करत श्वास रोखून पाहिला. त्याचबरोबर डिसेंबरच्या थंडीत होईल ते सर्व फिरलो. वाचन, मनन, चिंतन, अभ्यासामुळे एका चिकित्सक दृष्टीने देखील त्या शहराकडे, शहराच्या तोंडवळ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला.
रंगीबेरंगी रेषांनी दर्शविलेले मेट्रोचे जाळे आणि पेरिफेरल रोड. |
दिल्ली, पायाभूत सुविधांचा विचार केला तर म्हणावंच लागेल की हे महानगर भारतातल्या इतर अनेक महानगरांपासून कैक योजने पुढे गेले आहे. दिल्ली मेट्रो सेवेने नुकतीच २० वर्षे पूर्ण केली. वर्ष २००२ मध्ये अवघ्या ८ किमीच्या मार्गाने सुरुवात झालेल्या सेवेचा विस्तार आज ३४९ किमीचे राष्ट्रीय राजधानी परिसरभर पसरलेल्या जाळ्यात झाला आहे. ज्यात गुरुग्राम, गाजियाबाद, नोयडा, फरिदाबाद, बहादूरगढ अशा नजीकच्या शहरांचा देखील समावेश आहे. दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसर पायाभूत सुविधा विकासाचे नवे आयाम रचतो आहे. किफायती खर्चात, कमी वेळेत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचण्यासाठी मेट्रो हा खूप आश्वासक मार्ग आहे. या मेट्रो सेवेचा मी पुरेपूर वापर केला. मेट्रोतून प्रवास करत असताना प्रत्येक वेळी मुंबई मेट्रोचा गोंधळ, पुणे मेट्रोचा गोंधळ डोळ्यासमोर येत होता. जेवढे जाळे दिल्ली मेट्रोचे आता आहे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक मुंबई मेट्रोचे २० वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते. असो. हे न संपणारे विषय आहेत.
मेट्रोच्या अनुषंगाने दिल्लीच्या तोंडवळ्यात झालेला बदल आणि दिल्लीकरांच्या वागणुकीत झालेला बदल, स्वभावात झालेला बदल याबद्दल देखील चर्चा झाली. दिल्ली हे राष्ट्रीय राजधानीचे शहर असल्यामुळे सर्व प्रांतातील तसेच जवळजवळ सर्व देशांचे दूतावास असल्यामुळे परदेशी नागरिकांचे देखील वास्तव्य या शहरात आहे. पण प्राबल्य उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणाच्या लोकांचे आहे. आता त्या त्या राज्यांचे स्वभाववैशिष्ट्य माणसांत दिसून येतातच. तद्वत शिस्तीचा अभाव हे दिल्लीचे व्यवच्छेदक लक्षण होते. दादा, दिल्ली मेट्रोचे जाळे उभे राहण्याच्या काळात २००४-०५ मध्ये दिल्लीत राहिला होता. आणि त्यानंतर हे जाळे पुरेसे विस्तारल्यानंतर २०१२-१३ मध्ये पुन्हा दिल्लीत वास्तव्यास आला. त्याने मांडलेले, "मेट्रोमुळे, दिल्लीच्या लोकांत बऱ्याच प्रमाणात शिस्तीची जाणीव झाली आहे." हे मत चिंतनीय आहे.
दिल्ली भारताची राजधानी शोभते. राष्ट्रपती भवन, केंद्रीय सचिवालये, लागूनच असलेली संसद भवनाची इमारत, निर्माणाधीन नवी इमारत आणि नव्याने सुशोभित करण्यात आलेला कर्तव्य पथ या सर्व परिसरात भारताच्या सत्ताकेंद्राचा दिमाख आहे. भव्यता आहे. कर्तव्यपथ असे नामकरण करुन सुशोभीकरण करण्यात आले असले तरी मूळ निर्माता त्या सर एडवर्ड लुटीयन्सना मनोमन कुर्निसात करण्याचा मोह आवरत नाही. या सर्वातच संधी मिळाली ती पंतप्रधान मोदी ज्याला लोकशाहीचे मंदिर म्हणतात त्या संसदेला भेट देण्याची. संसदेचं कामकाज, खासदारांचा गोंधळ, संसदेच्या आवारातील (गांधीजींच्या पुतळ्या जवळील) आंदोलने आणि काय काय टीव्हीवर पाहिलेले असते.
लोकसभा गॅलरीचा पास मिळाला. तो विशिष्ट वेळेचा, विशिष्ट वेळेकरता मिळतो. मी आणि महेश दादा (अभिषेक दादाचा मित्र) असे ठरल्या वेळी बाहेरच्या गेटवर पावते झालो. प्राथमिक तपासणी, मोबाईल फोन जमा करुन प्रत्यक्ष आवारात आलो. तेथून काही अंतर चालून त्या सुप्रसिद्ध चक्राकार इमारतीच्या जवळ पोचलो. पुढले अनुभवकथन करण्यापूर्वी काही निरीक्षणे नोंदवणे आवश्यक आहे.
संसदेच्या आवारात, प्रामुख्याने अधिवेशन सुरु असताना खासदार, मंत्री यांच्यासह कार्यकर्ते, कामे घेऊन येणाऱ्या लोकांचा चांगलाच राबता असतो. खासदार, मंत्र्यांकडून कामे करुन घेतो अशा लोकांचा देखील मोठा राबता असतो. खासदार मंत्र्यांच्या पुढे पुढे करणे, ते माध्यमांशी बोलत असताना मागे उभे राहणे जेणेकरुन आपण फ्रेम मध्ये राहू, संसदेच्या दारात मंत्र्यांच्या फोटोत दिसू अशी काळजी घेणाऱ्या लोकांची ही फौज असते. कार्यकर्ते, सामान्यजन, प्रतिष्ठित व्यक्ती अशा सर्वांची पातळी जोखून त्याप्रमाणे वागणूक बदलणारा कर्मचारी वर्ग व्यस्त असतो. अशी बरीचशी निरीक्षणे मनाशी नोंदवत दाराशी आलो आणि पुन्हा एकदा तपासणी झाली. वर्ष २००१ च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षा व्यवस्था खूपच कडक करण्यात आल्याचे तेथील लोकांनी सांगितले.
लोकसभा गॅलरी पर्यंत जाईपर्यंत चार वेळा तपासणी झाली. ठरल्या वेळी संसदेच्या कर्मचाऱ्यांनी आत सोडले. आत सोडताना हातवारे करत खासदार-मंत्र्यांकडे अंगुलीनिर्देश करु नये, पाय दुमडून बसू नये, बोलू नये वगैरे स्पष्ट सूचना देण्यात आल्या. आम्ही गेलो त्यावेळी लोकसभेत 'लक्षवेधी' (Calling Attention) सुरु होते. विविध पक्षांचे खासदार आपापल्या मतदारसंघातील समस्यांकडे संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधून घेत होते. टीव्हीवर लाईव्ह कामकाज पाहत असताना या गोष्टींचे महत्त्व चटकन जाणवत नाही. म्हणजे एखाद्या एक्सप्रेस ट्रेनचा थांबा आमच्या मतदारसंघातील अमूक स्थानकावर देण्यात यावा अशा वरवर सामान्य वाटणाऱ्या मागण्यांबाबत लोकसभेत लक्षवेधी का मांडण्यात येते? असा प्रश्न पडू शकतो. किंबहुना पडतोच. पण प्रत्यक्ष डोळ्याने ते पाहत असताना मात्र सरासरी १५ लाख लोकसंख्येच्या मतदारसंघाचा प्रतिनिधी ती मांडणी करत आहे ही जाणीव अधिक ठळक होत जाते.
दिल्ली हे शिक्षणाचे देखील एक केंद्र आहे. दिल्लीत अनेक मातब्बर शिक्षण संस्था आहेत. पण त्यातील काही संस्था निराळ्याच कारणांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यातलीच एक म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ- JNU ही संस्था. दिल्लीतील वास्तव्यात दोन वेळा या संस्थेत जाण्याची, तेथील वातावरण अनुभवण्याची संधी मिळाली. शाम्भवी आणि गोविंद हे छान मित्र मिळाले.
पुलंचं एक भन्नाट वाक्य आहे, "प्रथमदर्शनी प्रेमावर द्वितीय दर्शन हा उतारा आहे" पण JNU हे त्याला अपवाद म्हणावे लागेल. निदान माझ्या बाबतीत तरी. आधी प्रथमदर्शनी प्रेम कशावर बसले ते सांगतो. विस्तीर्ण परिसर, भलेमोठे वाचनालय, प्रामुख्याने डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी (काही वेळा प्राध्यापक देखील) आंदोलने करतात त्या जागा, विविध ज्ञानशाखांच्या इमारती, अभ्यासात गढलेले विद्यार्थी, इंडिया कॉफी हाऊस किंवा विविध ढाब्यांवर आपले काम, भाजप-हिंदुत्व-संघ, पुरुषसत्ताक पद्धती आणि काय काय विषयावर चर्चा, वादविवाद करणारे विद्यार्थी, ते अभ्यासातही तितकेच गढलेले दिसतात. JNU मध्ये डाव्यांच्या पाच वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांचे आपसात वाद आहेत. आता अभाविपचा देखील बोलबाला वाढू लागला आहे. प्रमाण अर्थातच कमी आहे. पण अभाविप विरुद्ध सर्व डाव्या विद्यार्थी संघटना 'वयं पंचाधिकं शतम' या न्यायाने एकत्र येतात.
JNU मधील एकही इमारत मूळ रंगरूपात नाही. |
विद्यापीठातील एकही इमारत तिच्या मूळ रंगरूपात नाही. मार्क्स, लेनिन, भगतसिंग, महात्मा फुले, चे गव्हेरा वगैरेंच्या संदर्भ सोडून काढलेल्या वाक्यांपासून ते 'Free Sharjeel' (CAA आंदोलनकाळात पूर्वोत्तर भारत तोडण्याची भाषा करणारा शर्जील इमाम..) पर्यंत कलाकुसर सर्व इमारतींवर आहे. नुकतेच झालेले प्रकरण, ब्राह्मण-बनियांच्या विरोधात केलेली कलाकुसर पाहण्यासाठी आवर्जून त्या जागी गेलो. विद्यापीठ प्रशासनाने भलतीच चपळाई दाखवत ते पुसून टाकले होते. पण तरी बरीच वाक्ये पाहायला मिळाली.
प्रथमदर्शनी या संस्थेवर प्रेम बसते. डावी विचारधारा मानणारे, जगापासून काहीसे तुटलेले विद्यार्थी, आंदोलने वगैरे सगळं मान्य पण तरीही या संस्थेत एक शैक्षणिक वातावरण आहे. आणि बाहेरून माध्यमे, समाजमाध्यमे यातून प्रतीत होणारी प्रतिमा आणि प्रत्यक्ष दर्शन निराळे आहे. याच दरम्यान द्वितीय दर्शन झाले ते प्रेम अधिकच घट्ट करणारे ठरले. निमित्त होते अभाविप आणि वाल्मिकी स्टडी सर्कल आयोजित प्रसिद्ध वकील, वक्ते, लेखक जे. साई दीपक यांच्या 'Manufactured Fault lines of Bharat' या विषयावरील व्याख्यानाचे. अभाविप आयोजित कार्यक्रम, उघड आणि ठामपणे हिंदूंची बाजू मांडणारा वक्ता या पार्श्वभूमीवर अगदीच हाणामारी नाही तरी बहिष्कार, प्रत्यक्ष कार्यक्रमात गोंधळ वगैरे अपेक्षित होता. पण कार्यक्रम अतिशय सुरळीत पार पडला. सभागृह तुडुंब भरलेले होते. JNU चा ज्ञात इतिहास पाहता अशा कार्यक्रमात दीप प्रज्वलन आणि ते होत असताना साक्षात वेदघोष हे आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद होते. विद्यार्थ्यांनीच आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय नेटका होता. प्रास्ताविक, वक्त्यांची ओळख वगैरे अगदी ३-४ वाक्यात करुन देत प्रत्यक्ष कार्यक्रमाला केलेली सुरुवात व्यक्तिशः मला प्रचंड आवडली. साई दीपक यांच्या वकिली, काहीशा क्लिष्ट मांडणीला प्रतिसाद तुफान होता. प्रश्न देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास दाखवून देणारे होते.
तुम्हाला वाचनाची आवड असेल तर दिल्ली तुमच्यासाठी जादूचा पेटारा, अलिबाबाची गुहा ठरू शकते. जुन्या, दुर्मिळ पुस्तकांच्या स्टॉल पासून ते खान मार्केट, कॅनॉट प्लेस सारख्या ठिकाणच्या मोठमोठया पुस्तकांच्या दुकानापर्यंत भरपूर पर्याय आहेत. मी चार दिवस या पुस्तकांच्या दुकानात फिरत होतो. खरं सांगतो, त्या दुकानांतील संग्रह पाहून वेड लागायची पाळी येते. खान मार्केट मधील बहारीसन्स, कनॉट प्लेस मध्ये अम्रित, जैन आणि ऑक्सफर्ड ही दुकाने खरंच अलिबाबाची गुहा आहेत. लोकमान्य टिळकांचे १९५६ साली त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आलेले चरित्र इत्यादी सारखी काही दुर्मिळ पुस्तके घेऊन आलो. बऱ्याच पुस्तकांच्या केवळ नोंदी घेऊन आलो. कारण ऍमेझॉन वगैरेंनी पुस्तक खरेदी आता काहीशी किफायती आणि सुलभ केली आहे. पण त्याचबरोबर हे निरीक्षण देखील मांडणं आवश्यक आहे की इतिहास विभाग इस्लामी, मुघल इतिहासाने भरून वाहतो. मराठा, किंबहुना दक्षिणेच्या इतिहासाच्या बाबतीत दुष्काळ आहे. ही त्या पुस्तक विक्रेत्यांची चूक की आपली इंग्रजी मध्ये फारसं न लिहिण्याची, आपला इतिहास घेऊन उत्तरेत न पोचण्याची चूक हा प्रश्न वेगळ्या चर्चेचा आहे.
दिल्लीतले प्रदीर्घ वास्तव्य अनेकार्थांनी अनुभवसमृद्ध करणारे ठरले आहे. माझ्यासारखा फिरण्यासाठी उत्सुक, घरापासून लांब राहण्यास उत्सुक माणूस आता नव्या जागेच्या, नव्या अनुभवांच्या शिदोरीची वाट पाहतो आहे. तोवर दिल्लीचं गाठोडं उलगडलं आहे.
Jabardast likhan ...precise !!
ReplyDelete