वक्ता दशसहस्त्रेषु प्रा. राम शेवाळकर यांनी त्यांच्या योगेश्वर श्रीकृष्णावरील व्याख्यानात 'परंपरा' ही संकल्पना मांडली आहे. ती पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये, सामाजिक चालीरीती या अर्थी नाही. भारतीय राष्ट्राचा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक गाभा या व्यापक अर्थाने ती संकल्पना त्यांनी मांडली आहे. श्रीकृष्ण उलगडण्याचा दृष्टीने त्यांनी तिचा थोडक्यात विस्तार केला आहे. तोच धागा पकडून भारतीय राष्ट्राचा परंपरेच्या दृष्टिकोनातून वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे...
भारतीय राष्ट्र.... उच्चारल्याबरोबर माझ्या तरी डोळ्यासमोर येते ते विष्णू पुराणातील भारतीय भूमीचे आणि भारतीयाचे वर्णन,
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम।
वर्षं तद भारत नाम भारती यत्र संतति:।।
समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला भारत म्हणतात आणि तिथे राहणारे ते भारतीय.
ही झाली भौगोलिक व्याख्या. पण भारतीय राष्ट्र केवळ या भूगोलापलीकडे आहे. सिंधू-सरस्वती-वेद काळापासून चालत आलेला तो सांस्कृतिक प्रवाह आहे.
राज्यकर्ते आले गेले. राजकीय व्यवस्था बदलत राहिल्या. बदलला नाही तो संस्कृतीचा गाभा. एकम सत विप्रा बहुधा वदन्ति हा मंत्र प्रमाण. तो तसाच आहे. मुळं घट्ट आहेत, खोड भक्कम आहे, अनेक फांद्या फुटल्या त्या विस्तारत गेल्या आहेत.
भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना प्रबळ होती. ती अधिकाधिक प्रबळ राखणे आपले कर्तव्य आहे. हे म्हणत असताना, रं ना गायधनी आणि व ग राहुरकर यांच्या 'प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास' या पुस्तकातील ही वक्तव्ये विचारात घेतलीच पाहिजेत,
"इतिहास चालू पिढीला मार्गदर्शन करणारा व भविष्य घडवणारा सांस्कृतिक ठेवा आहे ही भारतीयांची श्रद्धा आहे." तसेच
"भारतीय संस्कृतीने काल हा अनादि अनंत मानला आहे. कोणत्याही घटनेचा कालनिर्णय भारतीयांना गौण वाटतो. काळाच्या पटावर मानवी कर्तृत्वाने लिहिलेले आलेख हेच लक्षणीय धन आहे." आणि,
"व्यक्ती संस्कृती घडवत नाही, पण संस्कृती व्यक्तीचे जीवन नक्कीच घडवते"
असा सर्व सांस्कृतिक पट लक्षात घेत मूळ विषयाकडे परत आले पाहिजे, तो परंपरेच्या दृष्टीने भारतीय राष्ट्राचा वेध. प्रा. शेवाळकर मांडतात त्या परंपरा चार,
कोशल राज्याचे राजपुरोहित, 'योगवासिष्ठ' कर्ते ऋषी वसिष्ठ यांच्यापासून सुरु होणारी 'वसिष्ठ' परंपरा,
ऋग्वेद द्रष्टे, प्रतिसृष्टी निर्माते, राजर्षी विश्वामित्र यांच्यापासून सुरु होणारी 'विश्वामित्र' परंपरा,
सप्तर्षींपैकी एक, ब्रह्मा निर्मित प्रजापतींपैकी एक अशा भृगु ऋषींच्यापासून सुरु होणारी 'भार्गव' परंपरा, आणि,
भगवान श्रीविष्णू पासून सुरु होणारी 'नारायणीय' परंपरा..
काय आहेत या परंपरा? प्राचीन ते आधुनिक इतिहासात त्यांचे प्रतिबिंब कोठे आणि कसे दिसते?
याचा वेध पुढल्या भागात...
Stay Tuned.
Comments
Post a Comment