प्रा. राम शेवाळकर यांनी मांडलेल्या 'परंपरा' संकल्पनेच्या आधारे भारतीय राष्ट्राचा वेध घेत असताना दुसऱ्या भागात ज्ञानमार्ग की राजमार्ग या प्रश्नाचा मागोवा घेत वशिष्ठ आणि विश्वामित्र परंपरांचा धांडोळा घेतला. या भागात स्थिती स्थापकता की गतिवाद म्हणजेच To be Static or Adopt Dynamism या प्रश्नाचा मागोवा घेत भार्गव आणि नारायणीय परंपरेचा धांडोळा घेणार आहोत.
भार्गव
ऋषी भृगु हेही वशिष्ठाप्रमाणेच ब्रह्माचे मानसपुत्र. भारतीय पुराणांनुसार निरनिराळ्या मन्वंतरांत हे ऋषी जन्म घेतात.
विष्णू पुराणानुसार पहिल्या मन्वंतरात भृगु ऋषींचा विवाह ख्यातीशी झाला. त्यांना आयती, नियती आणि भार्गवी म्हणजेच लक्ष्मी इत्यादी मुले होती. त्यातील लक्ष्मीचा विवाह विष्णूशी झाला होता.
शिव पुराणानुसार, दक्ष यज्ञ आणि सतीच्या कथेनंतर भृगुंना चाक्षुष मन्वंतरांत पुनर्जन्म होण्याचा वर मिळाला. त्यानुसार तो झाला आणि या मन्वंतरातील जन्मात भृगूंचा विवाह पुलोमाशी झाला.
भागवत पुराणातील त्रिमूर्ती कथा. यज्ञात वाद पेटला की ब्रह्मा-विष्णू-महेशापैकी श्रेष्ठ कोण? निर्णय होईना. तो करण्याची जबाबदारी आली भृगुंवर.
सत्यलोकात ब्रह्माकडे गेले. आपल्याच पित्याची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना वंदन नाही केले. ब्रह्म क्रोधित झाले.
कैलासात गेले. आपल्या मित्राला भेटण्यासाठी शिव येत होते तोच भृगु म्हणाले "तू अधार्मिक आहेस.." शिव क्रोधित झाले, त्रिशूळ उगारले. पार्वतीच्या हस्तक्षेपाने प्रकरण आवरले.
वैकुंठात गेले. श्रीविष्णू लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेऊन निद्रिस्त होते. भृगुंनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. लक्ष्मी-विष्णू गडबडले. अपेक्षा होती विष्णू क्रोधीत होतील, पण झाले उलटेच. त्यांचेच तुमच्या आगमनाकडे लक्ष गेले नाही म्हणत विष्णूने भृगुंची क्षमा मागितली.
निर्णय झाला. विष्णू श्रेष्ठ.
मत्स्य पुराणातील कथा. देव-दानवांचे युद्ध. असुरांचा पराभव झाला. शुक्राचार्यांकडे आश्रय घेतला. शुक्राचार्यांनी तपश्चर्येने शिवाकडून बळ आणि वर मागण्याचे ठरवले. तोवर असुरांनी आश्रय घेतला, भृगु आश्रमाचा. संरक्षण मिळाले पुलोमाचे.
देवांनी आक्रमण केले. पुलोमाचे संरक्षण होते. देवांचे काही चालेना. विष्णूला पाचारण केले. विष्णूने सुदर्शन चक्राने पुलोमाचा वध केला. भृगु क्रोधित झाले. विष्णूला शाप दिला,
"स्त्रीहत्येचे पाप तुझ्या हातून घडले आहे. मर्त्य लोकांत तुझा पुनःपुन्हा जन्म होत राहील.."
याच भृगु आणि पुलोमाच्या संतती पैकी एक च्यवन. ज्या वंशात पुढे जमदग्नी आणि परशुराम येतात. प्रस्तुत मांडणीतील भार्गव परंपरा इथून सुरु होते.
शिवाचे पिनाक धनुष्य जे परशुरामाला देण्यात आले होते. ते जनकाकडे सुरक्षित राखण्यास देण्यात आले होते. सीता स्वयंवराच्या प्रसंगी श्रीरामाने त्याचा भंग केला.
ही कथा एका रूपकाच्या अर्थाने पाहू गेल्यास पिनाक हे सनातन धर्माचे, त्यातील मूलभूत घटकांचे प्रतीक होते. त्याचे रक्षण करण्याचे कार्य परशुराम करत होते. ही एक स्थिती स्थापकता वादी भूमिका. धर्माचे, परंपरेचे मूलभूत घटक अक्षुण राहावे. त्याचा भंग झाला.
म्हणून परशुराम आणि श्रीरामाचे युद्ध आहे. त्यात श्रीरामाच्या हस्ते परशुरामाचा पराभव झाला. हा एका अर्थी नारायणीय परंपरेचा, गतिवादाचा, Dynamism चा भार्गव परंपरेवरील, स्थिती स्थापकतेवरील विजय होता.
एका बाजूला ही स्थिती स्थापकतावादी भार्गव परंपरा तर दुसऱ्या बाजूला, गतिवादी अशी
नारायणीय
भृगुंच्या शापातच नारायणीय परंपरेची बीजे आहेत. मर्त्य लोकांत पुनःपुन्हा होणारा जन्म हा गतिवादाचा, Dynamism चा, Adoptability चा द्योतक आहे. तोच समरसतेचा, एकरूपतेचा, Assimilative असण्याचा द्योतक आहे.
ही परंपरा ठिकठिकाणी दिसते. तिचे प्रकटीकरण अनेक स्वरूपात, भारतीय पंथांत देखील दिसून येते. आणि मुळातच समरसता असल्याने स्थिती स्थापकता वादी 'भार्गव' की गतिवादी 'नारायणीय' असा कुठल्यातरी एकाचेच अस्तित्व मान्य करण्याचा येथे प्रश्नच उरत नाही. सहअस्तित्व कायम राहते.
मत्स्य, विष्णू, भागवत पुराणे विष्णूची अवतार संकल्पना अधिकाधिक खुलवतात. त्यांचा डोळस विचार करता काय दिसते? भारतवर्षातील विविध प्राणी, त्यांची रूपे, त्यांच्यातील दिव्य शक्तींची उपासना करणाऱ्या समाजगटांना भारतीय परंपरेत समरस, एकरूप करण्याचाच हा प्रयत्न.
रामायण. श्रीरामाचा अयोध्या ते लंका प्रवास. निषाद राजा, शाबर, वानर इत्यादींना समरस, एकरूप करण्याचा प्रवास.
महाभारत. श्रीकृष्णाचा द्वारका ते प्राग्ज्योतिषपूर आणि त्याही पलीकडे समरस, एकरूप करण्याचा प्रवास.
तथागत बुद्धांचा विचार त्यांच्या हयातीतच विविध प्रदेशात पसरण्यास सुरुवात झाली. मौर्य काळात बुद्ध विचाराला राजाश्रय मिळाला. राजाश्रय आणि व्यापारी समृद्धी यांसह हा विचार लंका, ब्रह्मदेश, रेशीम मार्गे मध्य आशियात पोचला.
त्याच काळात भारतात पर्शियन, ग्रीक, शक, कुशाण, हूण आक्रमणे झाली. त्यांनी राज्ये स्थापली. नारायणीय परंपरेने आपले गारुड केले. आक्रमक समरस झाले. भारतीय झाले. Menander चा मिलिंद झाला. शक राजे रुद्रदामन असे नाव घेऊ लागले. कुशाण राजांनी बौद्ध धर्म परिषद काश्मिरात भरवली.
दक्षिण भारतीय दर्यावर्दी सत्तांसह बौद्ध आणि हिंदू विचार जोडीजोडीने पूर्व-दक्षिण पूर्व आशियात पोचला. तिकडच्या मूळ परंपरांशी समरस झाला. एकरूप झाला. श्रीविजय, कंबोज, अशी साम्राज्ये स्थापिली गेली. जगातील सर्वात मोठा मंदिर समूह तो अंकोरवाट तिकडेच उभा राहिला.
भार्गव आणि नारायणीय परंपरा निरनिराळ्या टप्प्यांवर, निरनिराळ्या स्वरूपात भारतीय भूमीतील जैन, बौद्ध इत्यादी पंथातही आढळतात.
पुढल्या काळात बौद्ध पंथात थेरवादी (स्थिरवादी) म्हणजेच हीनयान, महायान, वज्रयान असे पंथभेद घडले.
थेरवादी पंथ, बुद्धाच्या मूळ शिकवणीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. निर्वाणाचे, ज्ञानाचे, तथागताचे प्रतीक म्हणून स्तूप समोर ठेवला जातो.
महायान पंथ, आपल्या कक्षा रुंदावतो. तथागत मानवी रूपात आणतो. ध्यान, अभय, भूमिस्पर्श, वरद, वितर्क अशा विविध मुद्रांकित मूर्ती घडवतो. जातककथा एका अर्थी दशावतार संकल्पनाच मांडतात. याचीच एक तंत्र आधारित शाखा तिबेटी वज्रयान पंथात दिसून येते. असेच जैन आणि इतरांत...
हे सर्व असताना, एक आक्रमक टोळधाड आली. ती एकच ईश्वर आहे, तो म्हणजे अल्ला आहे, मोहम्मद हे त्याचे शेवटचे आणि एकमेव पैगंबर आहेत अशी ठोस भूमिका घेत आली. नारायणीय परंपरेच्या क्षीणतेमुळे की आक्रमकांच्या प्रचंड जोशामुळे ती समरस, एकरूप नाही होऊ शकली. किंबहुना ती समरस होण्यास आलीच नव्हती.
बुतशिकन ही त्यांच्यासाठी गौरवास्पद उपाधी होती आणि आहे. अशा स्थितीत एकच उपाय,
अनादि-अनंत, अखंड, नित्य नूतन इति सनातन अशा आपल्या भारतीय परंपरांचा निरनिराळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे. आक्रमकांचा धर्म समजून घेणे, त्यांचे मानस समजून घेणे, आणि 'आपली' अखंडता राखणे....
परंपरेच्या दृष्टिकोनातून हा वेध घेताना, ही सर्व प्रवाहांची केवळ तोंडओळख आहे, याची माझी मलाही जाणीव आहे. या प्रवाहांचे अधिक खोलात जाऊन विश्लेषण आवश्यक आहे, ते सुरूच राहील. तूर्तास इतकेच,
लेखनसीमा.
Comments
Post a Comment