प्रा. राम शेवाळकर यांनी मांडलेल्या 'परंपरा' संकल्पनेच्या आधारे भारतीय राष्ट्राचा वेध घेत असताना पहिल्या भागात भारत ही संस्कृती-सभ्यता याचा थोडक्यात आढावा घेतला, आणि त्या परंपरा कोणत्या इथवर येऊन थांबलो. त्या परंपरा म्हणजे वशिष्ठ, विश्वामित्र, भार्गव आणि नारायणीय होय.
वशिष्ठ आणि विश्वामित्र परंपरांच्या आधारे ज्ञानमार्ग की राजमार्ग या प्रश्नाचा वेध या भागात...
वशिष्ठ
साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असणारे ऋषी वशिष्ठ हे ब्रह्मदंड धारी आहेत. ज्ञान धारी आहेत. २१ प्रजापतींपैकी एक आहेत. श्रीरामाच्या इक्ष्वाकू वंशाचे राजपुरोहित आहेत.
दशरथाच्या आज्ञेनुसार ऋषी वशिष्ठांनी राम-लक्ष्मणाला न्याय, नीती आणि आदर्श राज्यपद्धती शिकवणारे मार्गदर्शन केले, ते म्हणजे योग वासिष्ठ. हे त्रेता युग एका बाजूला परशुरामाचा अवतार आहे, दुसऱ्या बाजूला आदर्श राज्य, कुटुंब, सामाजिक परिस्थितीची संकल्पना दृढ करणारे आहे.
ऋग्वेदात वर्णिलेले दाशराज्ञ युद्ध हे आद्य ज्ञात महायुद्ध. भरत कुलाच्या सुदास पैजवान राजाच्या विरुद्ध आर्य-अनार्य अशा दहा राजकुलांनी संघटन केले आणि युद्ध छेडले. त्या भरत कुलाचे कुलगुरू, पुरोहित ते वशिष्ठ.
विश्वामित्र
कान्यकुब्जवर राज्य करणाऱ्या कौशिक राजाच्या वंशातील, क्षत्रिय वंशी, राज्यकर्ता विश्वामित्र. राज्यशकट हाकणे आणि युद्धांत निष्णात असणाऱ्या या क्षत्रियाला ब्रह्मज्ञानाची तेवढीच ओढ होती, त्यानुसार त्यांनी तपश्चर्या देखील केली. दीर्घ तपश्चर्या आणि आराधनेतून साक्षात ब्रह्माने राजर्षि असणाऱ्या विश्वामित्रांना ब्रह्मर्षी ही उपाधीही दिली.
गायत्री मंत्राचे उद्गाते असणारे हे ऋषी ऋग्वेद द्रष्टे देखील आहेत.
प्रस्तुत विषयाच्या संदर्भात एक मुद्दा विचारात घ्यावा लागेल तो, वशिष्ठ-विश्वामित्रांमधील कायमच्या वादांचा.
एकदा पारध करताना विश्वामित्र वशिष्ठ आश्रमात आले आणि त्यांनी वशिष्ठांकडील कामधेनूची मागणी केली. वशिष्ठांनी धुडकावून लावली. वशिष्ठांनी ब्रह्मदंडाच्या आधारे साक्षात कामधेनूच्या आधारे विश्वामित्रांचा सैन्यासह पराभव केला. तो सहन न होऊन विश्वामित्रांनी तपश्चर्या केली, शिवाला प्रसन्न करुन घेतले, दिव्यास्त्रे मिळवली.
त्रिशंकू राजाला स्वर्ग पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली. त्यासाठी यज्ञ करावा ही आवश्यकता होती. तो वशिष्ठांच्या पौरोहित्यात व्हावा अशी मनीषा त्याने बाळगली. वशिष्ठांनी नकार दिला. क्रोधीत त्रिशंकू विश्वामित्रांकडे गेला. विश्वामित्रांनी पौरोहित्य मान्य केले. यज्ञ केला. त्रिशंकू स्वर्गात गेला पण पोचू शकला नाही. सर्व परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात घेता विश्वामित्रांनी व्यवस्थेला ठोस आव्हान दिले. साक्षात प्रतिसृष्टी निर्माण केली.
तपश्चर्या सुरूच होती. त्याचेच फळ म्हणून ब्रह्माकडून ब्रह्मर्षी उपाधी मिळाली. वशिष्ठांनी देखील ती मान्य केली. विश्वामित्रांच्या सततच्या आगळिकीला क्षमा केली. याचेच प्रतिबिंब रामायणात दिसते. दिव्यास्त्र, युद्ध प्रशिक्षण यासह यज्ञ रक्षणासाठी विश्वामित्रांनी राम-लक्ष्मणाची मागणी करताच ऋषी वसिष्ठांनी त्यास मान्यता दिली.
दाशराज्ञ युद्ध. भरत कुलाच्या विरुद्ध दश राजकुलांचा संग्रह. त्यात अनु, द्रुह्यु, इत्यादींच्या सह कुशिक राजकुलाचा समावेश. त्याच वंशातील क्षत्रिय विश्वामित्र. पुढे तपश्चर्येने ब्रह्मर्षी.
भरत कुलाचा विजय झाला. सुदास पैजवान चक्रवर्ती झाला. त्याने अश्वमेध यज्ञ केला. त्या यज्ञाचे पुरोहित.....
ब्रह्मर्षी विश्वामित्र!
इथवर वशिष्ठ आणि विश्वामित्र कोण होते, त्यांचे संबंध कसे होते, त्यांची वैशिष्ट्ये काय होती हे निश्चित करता येते. त्याच आधारे पुढील विवेचन करता येते...
वशिष्ठ परंपरा ही ज्ञानमार्गी परंपरा आहे. वशिष्ठांची क्षमाशीलता, ज्ञानाची आराधना, तपश्चर्येचे स्वागत, अभिनंदन करण्याची परंपरा. ही परंपरा उपनिषद-पुराण चर्चेतून, निर्मितीपासून प्रवाही होते.
प्राचीन भारतीय विद्यापीठे आणि तेथील ज्ञानसाधना हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ही ज्ञानपरंपरा आदर्श निर्माणाचा आग्रह धरते. क्षमाशीलता एका निवृत्तिमार्गी चळवळीकडे देखील प्रवाही होते. त्याचे प्रतिबिंब आदि शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांती मार्गाने पसरलेल्या भक्ती चळवळीत दिसते.
ही भक्ती चळवळ दक्षिणेत त्यागराज-पुरंदरदास, मध्वाचार्य परंपरा, महाराष्ट्रात अखंडित असणारा वारकरी संप्रदाय, पूर्वेकडे शंकरदेवाची चळवळ, उत्तरेत हरिदास-मीरा-तुलसीदास पासून साक्षात शीख परंपरा अशा स्वरूपात दिसते का हो?
आधुनिक काळाकडे प्रवास करताना दोन भिन्न विचारसरणी पण उद्देश काहीसे समान असणाऱ्या प्रवाहांत देखील हे दिसून येते. एक गांधीजी प्रणित सर्वोदय संकल्पना. जिचे आधार, कार्यक्रम तात्कालिक होते, संदर्भ बदलले आणि तो प्रवाह मागे पडला.
दुसरा तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. राष्ट्र प्रथम, एकात्मिक मानवतावाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद या विचारावर आधारित व्यक्तिनिर्माण हा प्रवाह अजूनही कार्यरत असलेला दिसून येतो.
विश्वामित्र परंपरा ही मुळातच राजमार्गी परंपरा आहे. राजर्षि कडून ब्रह्मर्षि पदाकडे जाणारी वाटचाल आहे. प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारी, वेळ पडल्यास प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक बाळगणारी परंपरा आहे.
या परंपरेचे थेटपणे भिडणारे प्रवाह निश्चित करताना सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते आचार्य चाणक्य. परकीय आक्रमणापासून राष्ट्राचे रक्षण करण्यास विद्यमान सत्ता सक्षम नाही किंबहुना उदासीन आहे हे पाहून चंद्रगुप्ताला हाताशी धरून नव्या राज्याची प्रेरणा आचार्य चाणक्यांनी दिली.
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. ८व्या शतकापूर्वी पर्यंतची आक्रमणे भारताने पचवली. ती आक्रमकांनाच समरस-एकरूप करुन घेऊन. पण त्यानंतरची आक्रमणे आणि आक्रमक वेगळेपणाचा आग्रह धरणारे होते आणि आहेत. त्यांना एक ठोस आव्हान देणारे पुन्हा आदि शंकराचार्यच आहेत.
वारकरी हा प्रामुख्याने निवृत्तिमार्गी संप्रदाय. पण त्याच संप्रदायात विजयनगर साम्राज्य समाप्त होतानाचा काळात संत एकनाथ हा स्पष्टपणे हिंदू राज्याची आग्रही मागणी करणारे वारकरी संप्रदायातील व्यक्ती आहेत.
संत एकनाथांचा काळ संपत असतानाच एक पूर्णपणे भिन्न संप्रदायाचा किंबहुना संप्रदाय निर्माण करणारा व्यक्ती तो समर्थ रामदास अधिक स्पष्टपणे, थेटपणे हिंदू राज्याची कामना करत होता. ते राज्य अस्तित्वात आल्याचे त्यांना पाहायला देखील मिळाले. हा असा परंपरांचा संगम हे भारतीय वैशिष्ट्य आहे.
इस्लामी आक्रमणे थोपवून, त्यांचा पराभव करुन पुनः हिंदू राज्य निर्माण करण्याची पहिली प्रेरणा विद्यारण्य स्वामींची आहे. ती विजयनगर साम्राज्यात दिसते. त्याच विजयनगर साम्राज्याची प्रेरणा आणि तो विचारांचा प्रवाह भोसले कुळात शहाजी महाराज, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असा दिसून येतो.
इस्लामी राज्यात, दडपशाहीत आता कोणी क्षत्रिय उरला नाही. म्हणून कोणी हिंदू राजा अभिषिक्त होऊ शकत नाही या सार्वत्रिक समजास आव्हान देत क्षत्रियत्व सिद्ध करत शिवाजी महाराजांना अभिषिक्त छत्रपती होण्याची विनंतीवजा आज्ञा करणारे गागाभट्ट हे याच प्रवाहाचे फलित आहे.
हाच प्रवाह ब्रिटीश काळात गतवैभवाची साक्ष काढत आपण निराळे राष्ट्र असल्याची घोषणा करणाऱ्या इस्लामी विचाराला
आसिंधु सिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका
पितृभू पुण्यभूश्चैव स वै हिंदूरिती स्मृत:
असा हिंदू-राष्ट्राचा राजकीय विचार देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर विष्णू पुराणातील भारताच्या भौगोलिक व्याख्येला राजकीय परिमाण देतात.
या सर्व विवेचनातून एक लक्षात घायला हवे की या परंपरांत वाद नाहीत. प्रश्न प्राधान्याचे आहेत. ज्ञानमार्ग की राजमार्ग? राजमार्ग स्वीकारून राज्य सक्षम, स्थिर केले तर ज्ञानमार्ग उन्नत होतो हे वास्तव आहे. एक निश्चित की या दोन्ही परंपरा समांतर चालत राहिल्या तर ज्ञानमार्ग की राजमार्ग हा प्रश्नच उरणार नाही.
पुढल्या भागात, भार्गव आणि नारायणीय परंपरांचा विविध प्रवाहांच्या आधारे वेध...
Stay Tuned.
Comments
Post a Comment