लोकसभेच्या गदारोळात झाकोळलेल्या विधानसभा निवडणुका
आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम
देश का त्योहार म्हणून सर्वत्र गाजावाजा झालेली सतराव्या लोकसभेसाठीची निवडणूक मतमोजणीच्या अंतिम टप्प्यावर आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २०१४ साली मिळाल्या त्याहून अधिक जागा मिळणार हे निश्चित आहे. टेलिव्हिजन, प्रिंट, सोशल अशा सर्व माध्यमांत लोकसभा निवडणूक, त्यासाठीचा बरा-वाईट प्रचार हाच मुद्दा केंद्रस्थानी होता. त्यातही माध्यमांना सर्वाधिक टीआरपी मिळवून देणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांच्या सभा, रोड शो, मुलाखती यांनी माध्यमे व्यापलेली होती. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष यांच्या एकसुरी, कुठलाही प्रश्न नसणाऱ्या पत्रकार परिषदा. इतर नेत्यांच्या मुलाखती हा सर्व गदारोळ होता. या गदारोळात लोकसभा निवडणुकांसोबतच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकादेखील आहेत याचा जणू राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांना विसर पडला होता. ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणूक पार पडल्या. त्यांचेही निकाल लोकसभेसोबतच जाहीर होत आहेत. त्यात काही महत्वपूर्ण राजकीय, सामाजिक संदेश दडलेले आहेत.
सर्वप्रथम आंध्र प्रदेश. २०१३ साली राज्याचे विभाजन झाले. उसळलेला जनक्षोभ, हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय लाभासाठी केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने विभाजनाच्या कायद्यास मंजुरी दिली. त्यानुसार विभाजन झाले. त्याचा पहिला फटका काँग्रेस पक्षालाच बसला. त्याची प्रमुख कारणे म्हणजे राज्यातील काँग्रेसचा जनमानसातील लोकप्रिय नेता वाय.एस.आर. राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती निधनानंतर तसाच जनाधार तयार करू शकणाऱ्या त्यांच्या पुत्राला म्हणजेच जगनमोहन रेड्डी याना काँग्रेसने पाठिंबा दिला नाही. किंबहुना सीबीआय, आयकर खात्याचा ससेमिरा मागे लावून दिला. परिणाम काँग्रेसला असलेला सर्व जनाधार घेऊन जगनमोहन यांनी आपल्या पित्याच्या नावाने पक्ष स्थापन केला. विभाजनांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम आणि भाजप यांच्या युतीला बहुमत मिळाले तरी जगनमोहन यांच्या पक्षाने प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावली. त्याचबरोबर स्वतः जगनमोहन यांनी राज्यभर (विभाजित आंध्र प्रदेश) पदयात्रा, जनसंपर्क यात्रा करत जनाधार निर्माण केला. सीईओ सारखे राज्य चालवणाऱ्या (असा त्यांचा दावा आहे) चंद्राबाबू नायडू यांनी २०१८ मध्ये भाजपची साथ सोडली. त्यास आंध्र प्रदेश राज्यास विशेष दर्जा, विशेष पॅकेज इत्यादी कारणे दिली गेली. चंद्राबाबू यांच्या पक्षाने केंद्रातील एनडीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव देखील आणला. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या काळात स्वतः चंद्राबाबू देशभर विविध राज्यस्तरीय पक्षांच्या नेत्यांच्या सारख्या भेटी घेत होते. तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आल्यास नेता कोण असणार हा मुख्य मुद्दा. पण त्यांचा राज्यातील जनाधार तुटला, प्रमुख आणि साथ देऊ शकेल अशा पक्षाशी त्यांनीच फारकत घेतली. तिसरा घटक भाजप. त्रिपुरा विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांना आंध्र प्रदेशात प्रभारी म्हणून पाठवण्यात आले परंतु अखेरच्या टप्प्यात त्यांना पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात ही घटना आंध्र प्रदेशात भाजपची काय स्थिती आहे ते सांगण्यास पुरेशी आहे. परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वाय.एस.आर काँग्रेस पक्षाने क्लीन स्वीप मारला आहे. विधानसभेच्या १७५ पैकी १४१ (लेख लिहीत असताना व छपाईस जाण्यापूर्वीचे हे आकडे आहेत. प्रत्यक्ष आकड्यात फरक असू शकतो.) जागा जगनमोहन यांच्या पक्षाने जिंकल्या आहेत.
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम. अरुणाचल प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर-पूर्व भारतातील सर्वात मोठे राज्य असले तरी लोकसंख्या अतिशय कमी आहे. देशातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले हे राज्य आहे. लोकसभेच्या केवळ दोन जागा आणि विधानसभेच्या ६० जागा असा संसदीय आकार या राज्याचा आहे. पारंपरिक दृष्ट्या ह्या राज्यात काँग्रेसची सत्ता होती. पण केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखाली भाजप वाढली. त्यात विधानसभेतील एक मोठा गट फुटून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर एक राजकीय अस्थिरता निर्माण झाली. तत्कालीन मुख्यमंत्री कालिखो पूल यांची संशयास्पद आत्महत्या आणि त्यांनतर पूर्णपणे भाजपचे असे पेमा खांडू यांचे सरकार असे एक मोठे राजकीय नाट्य घडून गेल्यांनतर अरुणाचल प्रदेश मध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका झाल्या. सर्वोच्च न्यायालय पातळीवर एक 'केस स्टडी' म्हणून उभे राहिलेले राजकीय नाट्य एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता तो नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा. त्यातील तरतुदींवरून आसाम मध्ये मोठा जनक्षोभ उसळला होता. एनडीए मधील घटक पक्ष आसाम गण परिषद काही काळासाठी बाहेर देखील पडला होता. तसेच अरुणाचल राज्यात आलेल्या चकमा निर्वासितांचा देखील मुद्दा देखील महत्वाचा आहे. चकमा निर्वासितांच्या मुद्द्यावर अरुणाचल प्रदेशात असंतोष वाढला होता. केंद्रीय मंत्री रिजिजू आणि भाजपचे उत्तर-पूर्व भारतातील युतीचे प्रमुख हिमंत बिस्वा शर्मा यांच्या मध्यस्तीनंतर हा मुद्दा काहीसा निवळला असला तरी सुप्त असंतोष अजूनही आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत अरुणाचल मध्ये दोन्ही लोकसभा जागा भाजप कडे तर विधानसभेत ६० पैकी ४२ पेक्षा जास्त जागी भाजप विजयी होत पेमा खांडू यांचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. सिक्कीम राज्यात विद्यमान आणि सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम असणारे पवनकुमार चामलिंग यांचा पक्ष पुन्हा आघाडीवर आहे.
पश्चिम बंगालसोबतच भाजपने सर्वाधिक जोर लावलेले पूर्व भागातील राज्य म्हणजे ओदिशा. गेली दोन दशके तिथे नवीन पटनायक मुख्यमंत्री आहेत. तसेच लोकसभेत देखील ओदिशातील जवळजवळ सर्व जागा बिजू जनता दलाकडे असत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी सुरुवातीपासूनच ओदिशामध्ये जोर लावला होता. वास्तविक नवीन पटनायक आणि त्यांच्या बिजू जनता दलाची लोकप्रियता हा राष्ट्रीय स्तरावर एक कुतूहलाचा विषय आहे. माध्यमांपासून सहसा दूर राहणाऱ्या नवीन पटनायक यांचा पक्ष आणि शासकीय यंत्रणेवर प्रचंड वचक आहे. त्यांचा पक्षावरील वचक मध्यंतरीच्या बिजू जनता दलाचे लोकप्रिय नेता खासदार बैजयंत पांडा यांच्या पक्षातून हकालपट्टीच्या प्रकरणातून दिसून आला. प्रशासकीय यंत्रणेवर देखील त्यांची पकड आहे. विकासाच्या मुद्द्यावर इतर राज्यांप्रमाणे चमकदार वगैरे कामगिरी त्यांची नसली तरी अगदी गावपातळीवर प्रशासन पोचवण्यात त्यांना यश मिळाले आहे. पण सर्वाधिक गरिबी, आरोग्य सुविधेचा बोजवारा इत्यादी मुद्दे याच राज्यात पाहायला मिळतात. १९९९ सालच्या वादळात १० हजाराहून अधिक बळी गेले होते. त्याच ओडिशा राज्याने विज्ञानाच्या साहाय्याने प्रशासकीय यंत्रणा, नैसर्गिक आपत्ती निवारणासाठीची चोख यंत्रणा उभी केली आहे. त्याच जोरावर नुकत्याच आलेल्या भीषण फणी या वादळाचा निर्धोक सामना करणारे आणि संयुक्त राष्ट्राची वाहवा मिळवणारे हेच राज्य आहे. राजकीय मतभेद असले तरी ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पटनायक यांनी आपत्ती निवारणाच्या कामात योग्य ते सहकार्य करत, स्वीकारत लोकशाही मूल्यांचाच परिचय घडवला. तरीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे कल आणि निकाल पाहता विधानसभेत नवीन पटनायक यांना निर्णायक स्पष्ट बहुमत तर लोकसभेत बिजू जनता दल आणि भाजप यांना कमी अधिक फरकाने जागा असा कौल ओदिशाच्या जनतेने दिला आहे. बिजू जनता दलाला १४६ पैकी १०७ तर भाजपला अवघ्या २७ जागा मिळाल्या आहेत.
या राज्यांतील लोकसभेच्या जागा आणि विधानसभा यांचे निकाल पाहता एक मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित होतो, तो म्हणजे मुळातच प्रगल्भ असणारा भारतीय मतदार अधिकच प्रगल्भ झालेला आहे. राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे कोणते त्यास कोणता पक्ष योग्य रीतीने न्याय देऊ शकेल, राज्य पातळीवरचे मुद्दे कोणते तिथे कुठल्या पक्षास प्राधान्य द्यावे याचे भान मतदाराने राखले आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाव्यात या चर्चेवर एका पक्षाच्या लाटेत लोकसभा आणि विधानसभा तोच पक्ष वरचढ ठरणार या युक्तिवादाला ह्या निवडणूक आणखी एक उत्तर आहे. नजीकच्या काळात असेच उत्तर दिल्ली विधानसभा २०१५, बिहार विधानसभा, तेलंगणा विधानसभा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ मध्ये मिळाले आहे. अर्थत त्या राज्यात लोकसभेसोबत निवडणूक झाल्या नसल्या तरी मतदाराच्या प्रगल्भतेचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी तेथील निकाल महत्वपूर्ण आहेत. निकाल लागतात, कोणी जिंकतात कोणी हरतात परंतु अटल बिहारी वाजपेयींच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'लोकतंत्र बचना चाहिये..' हे निकाल पाहता दिसून येते की लोकतंत्र अधिकाधिक प्रगल्भ होत आहे. हा भारतीय लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे.
या राज्यांतील लोकसभेच्या जागा आणि विधानसभा यांचे निकाल पाहता एक मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित होतो, तो म्हणजे मुळातच प्रगल्भ असणारा भारतीय मतदार अधिकच प्रगल्भ झालेला आहे. राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे कोणते त्यास कोणता पक्ष योग्य रीतीने न्याय देऊ शकेल, राज्य पातळीवरचे मुद्दे कोणते तिथे कुठल्या पक्षास प्राधान्य द्यावे याचे भान मतदाराने राखले आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाव्यात या चर्चेवर एका पक्षाच्या लाटेत लोकसभा आणि विधानसभा तोच पक्ष वरचढ ठरणार या युक्तिवादाला ह्या निवडणूक आणखी एक उत्तर आहे. नजीकच्या काळात असेच उत्तर दिल्ली विधानसभा २०१५, बिहार विधानसभा, तेलंगणा विधानसभा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ मध्ये मिळाले आहे. अर्थत त्या राज्यात लोकसभेसोबत निवडणूक झाल्या नसल्या तरी मतदाराच्या प्रगल्भतेचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी तेथील निकाल महत्वपूर्ण आहेत. निकाल लागतात, कोणी जिंकतात कोणी हरतात परंतु अटल बिहारी वाजपेयींच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'लोकतंत्र बचना चाहिये..' हे निकाल पाहता दिसून येते की लोकतंत्र अधिकाधिक प्रगल्भ होत आहे. हा भारतीय लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे.
पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक'
Comments
Post a Comment