Skip to main content

सावरकर: कुरुंदकर आणि इतर विचारवंत काय म्हणतात?

 

''हे मातृभूमी! तुझ्या वेदीवर घरदार, जायदाद बळी देऊन टाकले आहेत. तुझ्या वेदीवर नवपुत्रासह कांताही  बळी दिली आहे आणि आम्ही तिघे आहोत म्हणून तीन बळी  दिले आहेत. जरी सातजण असतो तरी सर्वच्या सर्व बळी देताना मला क्षिती वाटली नसती." पन्नास वर्षे जन्मठेपेची शिक्षा झालेला तरुण आपल्या पत्नीला आणि वहिनीला सांत्वन म्हणून हे पत्र लिहितो आहे, हे पाहिले म्हणजे सावरकरांचे कठोर तप आणि उत्कट व निरपेक्ष असे देशप्रेम दिसून येते. प्रकांडपंडित, वस्तुनिष्ठ चिकित्सक नरहर कुरुंदकर त्यांच्या 'अन्वय' या पुस्तकातील सावरकरांवरच्या लेखात हे मांडतात. सावरकर यांच्याविषयी अतिशय सखोल, वस्तुनिष्ठ विवेचन फार कमी लोकांनी केले आहे. 

विनायक दामोदर सावरकर हा अफाट, अचाट माणूस आकलन करायला अतिशय कठीण. केवळ त्यांनी केलेले लेखन उत्कृष्ट पण क्लिष्ट मराठीत आहे म्हणून नव्हे तर विचार अतिशय तर्ककठोर, ठाम, भेदक आणि मुख्य म्हणजे काळाच्या कैक योजने पुढे असलेले आहेत म्हणून आहे. त्यांचे जात्युच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठ निबंध यातील अत्यंत तर्ककठोर विचार त्यांचे अनुयायी म्हणवणाऱ्या लोकांना देखील पचले नाहीत. 

सिद्धहस्त लेखक, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सावरकरांवरील व्याख्यानापूर्वी केलेल्या छोट्याशा भाषणात सावरकरांच्या तर्ककठोरतेची उपेक्षा कशी झाली याचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. पु. ल. म्हणतात "माझ्या मृत्यूनंतर माझे विद्युतदाहिनीत झोकून द्या, कुठलेही श्राद्धपक्षादी कर्म करू नका असे म्हणणारा व्यक्ती आम्ही कम्युनल म्हणून बाजूला सारला आणि माझी रक्षा गंगा, सिंधू, यमुनेत आणि अनेक नद्यांत विसर्जित करणारा माणूस आम्ही सेक्युलर समजून बसलो." 


सावरकर यांच्या कार्यावर इंग्रजी मध्ये लिखाण झाले ते मुख्यतः प्रस्थापित बाजू मांडणारेच. ह्या प्रस्थापित बाजूला हिंदू आणि हिंदुत्व या शब्दाची जणू ऍलर्जी आहे. त्यामुळे सावरकरांचे लिखाण मुळातून न वाचता, विचार मुळातून न समजून घेता आपल्या झापडातूनच हे लोक सावरकरांकडे पाहतात. त्यांच्या राजकीय, ऍकेडमीक आणि तथाकथित इंटेललेक्चुअल सोयीसाठी दुसऱ्या महायुद्ध काळात तरुणांना सैन्यात भरती होऊन जागतिक रणभूमीचा अनुभव घ्या असे सांगणारा, सैन्यात भरती व्हा, अद्ययावत युद्धशास्त्राचे प्रशिक्षण घ्या, योग्य वेळ येताच बंदुकीचे तोंड कोठे वळवायचे हे आपण ठरवू असे सांगणारा नाही तर 'रिक्रुटवीर' शेलकी शिवी देण्यासाठी सावरकर दिसतो. अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातून राजबंद्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारा, प्रसंगी  पावले मागे घेणारे सावरकर केवळ 'माफीवीर' म्हणून दिसतात. या सर्व बाजूचा समाचार घेणारे लेखन मराठीत विपुल प्रमाणात झाले आहे. 

लंडनस्थित श्री. कुलकर्णी यांनी ब्रिटीश कोषागारातून अनेक तत्कालीन कागदपत्रे उजेडात आणली आहेत. त्यातून तर या तथाकथित बुद्धिमंतांचा बुरखा फाडला गेला आहे. तरीही वस्तुस्थिती आहे ती ही की हे लिखाण मराठीत आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि विशेषतः तथाकथित अभिजन वर्गात इंग्रजीचा वरचष्मा आहे. तिथे हे लिखाण अधिकाधिक येणे आवश्यक आहे.विक्रम संपत ही उणीव भरून काढण्याच्या दृष्टीने एक भरीव पाऊल टाकत आहेत. त्यांचे इंग्रजी पुस्तक लवकरच येऊ घातले आहे. 


सावरकरांच्या विचारांचे चिकित्सक, अभ्यासपूर्ण विश्लेषण, त्याची सर्वोत्कृष्ट मांडणी कोणी केली असेल तर ती प्रा. शेषराव मोऱ्यांनी. शेषराव मोरे हे नरहर कुरुंदकरांच्याच पठडीतील अभ्यासक आहेत. त्यांच्या लेखनातील, भाषणातील प्रत्येक वाक्याला, मात्रेलादेखील पुराव्याचा आधार असतो. सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद, सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग हे त्यांचे ग्रंथ अफाट आहेत. हे ग्रंथ जरी इंग्रजीमध्ये भाषांतरित होऊन प्रसिद्ध झाले तरी सावरकर हा विचार अखिल भारतीयच नाही तर जागतिक पातळीवर उत्कृष्टपणे पोचेल. सावरकरांवरील दुसरा मोठा आरोप म्हणजे गांधी हत्येतील सहभागाचा. गांधी हत्या विशेष न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली असली तरी काँग्रेस आणि ते सर्व वर्तुळ सावरकरांना गांधी हत्येच्या बाबतीत दोषी मानतात. शेषराव मोरे मांडतात की केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आल्यापासून या बदनामीत वाढ झाली. हा आरोप खोडून काढणारे, ठोस पुराव्यांनी युक्त असे 'गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी' पुस्तक शेषराव मोऱ्यांनी नुकतेच लिहिले आहे. तसेच या विषयावर त्यांची व्याख्याने उपलब्ध आहेत.



सावरकर यांच्या विषयी अनेक लोकांनी लिहिलं  आहे. नाटक, जातीनिर्मूलन, काव्य, क्रांतिकार्य, राजकारण, समाजकारण, विज्ञाननिष्ठा, भाषाशुद्धी अशा प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं अफाट कर्तृत्व यावर चिंतन करावं तेवढं कमी आहे. लेखन करावं तेवढं कमी आहे. त्यांचे काळाच्या पुढे असणारे विचार अधिकच लागू होत चालले आहेत. त्यांच्या विचाराची कालसुसंगतता अधिकच प्रकर्षाने पुढे येत आहे. 

पुन्हा शेवटाकडे येत असताना नरहर कुरुंदकरांकडे येणे भाग आहे. सावरकर या व्यक्तीचे, विचाराचे त्यांनी केलेले चिंतन मूलगामी आहे. त्यांच्या क्रांतिकार्याचे विश्लेषण कुरुंदकरांइतके चांगले माझ्यातरी वाचनात नाही. कुरुंदकर लिहितात, " देशावर उत्कट प्रेम, इंग्रजांच्या राज्याविषयी चीड आणि बलिदानाची तयारी ह्या तीन बाबी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला आवश्यक असल्या तरी अपुऱ्या होत्या. क्रांतीकारकांत सावरकर हे असे पहिले क्रांतिकारक की जे भावनेने भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रज्वलित होऊन स्वतःच जळती चूड झाली होते. पण बुद्धीने पाश्चात्त्यविद्येचे व इंग्रजी राज्याचे वास्तववादी आकलन ते क्रांतीचे महान योजकही झाले होते. सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली, हे श्रेय इतिहासाला अमान्य करून चालणार नाही. देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट भाबडे व आततायी झाले नाहीत. ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले. त्यातच त्यांचे खरे मोठेपण आहे.

देश स्वतंत्र करावयाचा तर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हवी आणि ती विदेशाने दिली पाहिजेत, हे सावरकरांनी आधीच ओळखले होते. इंग्रजी साम्राज्याचा त्या वेळी मनातून शत्रू असणारा एक साम्राज्यशहा झार आणि दुसरा हुकूमशहा कैसर ह्या दोघांच्याहीकडून क्रांतीची उठ्वणी होताच क्रांतिकारक सरकारला भारताचे सरकार म्हणून जर्मनी व रशिया मान्यता देतील ह्याची हमी सावरकरांनी मिळवली होती. क्रांतीच्या ठरलेल्या दिवशी मित्र राष्ट्रांच्याकडून शस्त्रास्त्रांनी भरलेली जहाजे भारताला येऊन पोचतील,  आश्वासने इंग्लंडमधील विविध राष्ट्रांच्या वकिलातींकडून त्यांनी मिळवून ठेवली होती. भारतात क्रांतीचा स्फोट होताच भारतीय क्रांतिकारकांचा ध्येय धोरणविषयक जाहीरनामा जगातील सर्व प्रमुख राष्ट्रांत तातडीने प्रकाशित होईल याचीही सोय त्यांनी करून ठेवली होती आणि एवढी प्रदीर्घ योजनासुद्धा विफल होईल हे आधीच हेरून परागंदा क्रांतीकारकांना जपान, जर्मनी, मेक्सिको, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, रशिया व अमेरिका इथे आश्रय मिळेल याची हमी सावरकरांनी घेतली होती. विमाने, रडार यंत्रे अजून उपलब्ध न झालेल्या जगात भारताच्या पंचविशीतील पोराने अखिल भारतीय पातळीवर आंतरराष्ट्रीय संबंध जोडून एवढी भव्य कल्पना आखावी ही कल्पनाच आजही अंगावर रोमांच उभे करणारी आहे. म्हणूनच सावरकरांच्यावर काहीही निश्चित सिद्ध झाले नाही तरी पुनर्जन्म न मानणाऱ्या ब्रिटिश सरकारने त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली..... " 


Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...